Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 1 मार्च 2025

नमस्कार,

आय टीवी नेटवर्कचे संस्थापक आणि संसदेतील माझे सहकारी कातिर्केय शर्मा जी , नेटवर्कची संपूर्ण टीम, देश-विदेशातून आलेले सर्व अतिथी, इतर मान्यवर, महिला आणि पुरुषहो,

NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही  ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

मी यापूर्वी देखील माध्यमांच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जात राहिलो आहे, पण आज मला वाटत आहे की तुम्ही एक नवा पायंडा पाडला आहे आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करत आहे. आपल्या देशात माध्यमांचे अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि एक परंपरा देखील  चालत आहे, त्यामध्ये काही आर्थिक विषय देखील आहेत, प्रत्येकाच्या फायद्याच्या गोष्टी असतात काही, मात्र, तुमच्या नेटवर्कने याला एक नवी मिती दिली आहे. तुम्ही लीकपासून दूर होत एका नव्या मॉडेलवर काम केले आहे. मला आठवते, जर मी पूर्वीच्या शिखर परिषदा आणि तुमच्या शिखर परिषदेविषयी जे कालपासून ऐकत आहे. पूर्वी ज्या शिखर परिषदा वेगवेगळ्या मीडिया हाऊसनी आयोजित केल्या होत्या, त्या नेता केंद्रित होत्या. तर ही नीती केंद्रित असल्याचा मला आनंद आहे. या ठिकाणी धोरणांची चर्चा होत आहे. बहुतेक कार्यक्रम जे झाले आहेत, ते भूतकाळाच्या आधारावर वर्तमानातील जीवन जगण्याविषयी आहेत. मी पाहात आहे की तुमची ही शिखर परिषद येणाऱ्या भविष्याला समर्पित आहेत. मी पाहात होतो की पूर्वी जितके काही असे कार्यक्रम मी लांबून पाहिले आहेत किंवा स्वतः गेलो आहे तिथे विवादांचे महत्त्व जास्त होते, इथे संवादाचे महत्त्व जास्त आहे. आणि मला पक्का विश्वास आहे आणि दुसरी बाब म्हणजे ज्या काही कार्यक्रमांमध्ये मी गेलो आहे, एका लहानशा जागेत होतात आणि आपापले लोक असतात. इथे इतक्या भव्य सोहळ्याला पाहणे आणि ते सुद्धा एका मीडिया हाऊसच्या सोहळ्याला आणि जीवनाच्या प्रत्येक स्तराशी संबंधित लोकांची इथली उपस्थिती, ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे. असे होऊ शकते या ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींना काही मसाला नाही मिळणार, पण देशाला प्रेरणा भरपूर मिळेल. कारण येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार देशाला प्रेरणा देणारे विचार आहेत. आशा आहे की हा पायंडा, हा ठसा याचे अनुकरण आगामी काळात इतर मीडिया हाऊस देखील आपापल्या पद्धतीने करून आणि नवोन्मेषी बनून कमीत कमी त्या लहानशा जागेतून बाहेर पडतील.

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारतावर आज संपूर्ण जगाची नजर आहे, जगभरातील लोकांना भारतात यायचे आहे, भारताला जाणून घ्यायचे आहे. आज भारत जगातील तो देश आहे जिथे सकारात्मक बातम्या सातत्याने तयार होत आहेत. News manufacture कराव्या लागत नाही आहेत. जिथे दररोज नवे विक्रम होत आहेत. काही ना काही नवे होत आहे. आता 26 फेब्रुवारीलाच प्रयागराजमध्ये एकतेच्या महाकुंभाची सांगता झाली.  संपूर्ण जग चकित झाले आहे की कसे काय एका अस्थायी शहरात, एक तात्पुरती व्यवस्था, नदीच्या काठावर कोट्यवधी लोकांचे येणे, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणे आणि पवित्र स्नान करून त्या भावनेने भरून जाणे. आज जग भारताचे आयोजनाचे आणि नवोन्मेषाचे कौशल्य पाहात आहे. आम्ही सेमीकंडक्टरपासून विमानवाहू युद्धनौकेपर्यंत  येथेच उत्पादन करत आहोत.  भारताच्या याच यशाविषयी जगाला सविस्तर जाणून घ्यायचे  आहे. मला असे वाटते की ही बातमी एक्स वर्ल्डमध्ये स्वतःच एक खूप मोठी संधी आहे.

मित्रांनो,

काही महिन्यांपूर्वीच भारताने जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन केले आहे. 60 वर्षांनी असे काही घडले की सलग तिसऱ्यांदा एखादे सरकार सत्तेवर आले आहे. याच जनविश्वासाचा आधार  गेल्या 11 वर्षातील भारताच्या अनेक कामगिरी आहेत. मला खात्री आहे की तुमचे नवे चॅनेल, भारताच्या सत्य कथा जगापर्यंत पोहोचवेल. कोणताही रंग न देता तुमचे ग्लोबल चॅनेल भारताचे तसेच चित्र दाखवेल, जसा तो आहे. आम्हाला मेकअपची गरज नाही.

मित्रांनो,

अनेक वर्षांपूर्वी मी Vocal for Local and Local for Global चा दृष्टीकोन देशासमोर मांडला होता. आज आम्ही हा दृष्टीकोन सत्यामध्ये रुपांतरित होताना पाहात आहोत. आज आमची आयुष उत्पादने आणि योग Local  पासून  Global झाली आहेत. जगात कुठेही जा योगाची माहिती असलेला कोणी ना कोणी भेटेलच, माझे मित्र टोनी इथे बसले आहेत, ते तर रोजचे योगा petitioner आहेत. आज भारताचे सुपरफूड, आपले मखाना, Local पासून Global होत आहे. भारताची मिलेट्स श्रीअन्न देखील, Local पासून Global होत आहेत. आणि मला असे कळले आहे की माझे मित्र  टॉनी एबॉट, दिल्ली हाट मध्ये भारतीय मिलेट्स च्या चवीचा पहिल्यांदा अनुभव घेतला आहे त्यांनी आणि त्यांना मिलेट्सच्या dishes खूपच आवडल्या आणि हे ऐकून मला खूपच चांगले वाटले.

मित्रांनो,

मिलेट्सच नाहीत, भारताची हळद देखील Local पासून Global झाली आहे, भारत जगातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त हळदीचा पुरवठा करत आहे, जास्तीत जास्त हळदीचा पुरवठा करत आहे. भारताची कॉफी देखील  Local पासून Global झाली आहे. भारत जगातील सातवा सर्वात मोठा कॉफी निर्यातदार बनला आहे. आज भारताचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, भारतात तयार झालेली औषधे, आपली जागतिक ओळख निर्माण करत आहेत आणि या सर्वांबरोबरच आणखी  एक गोष्ट झाली आहे. भारत अनेक Global Initiatives चे नेतृत्व करत आहे. अलीकडेच मला फ्रान्समध्ये AI एक्शन समिट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. जगाला AI भविष्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या शिखर परिषदेचा भारत सह-यजमान होता. आता तिचे यजमानपद भूषवण्याची जबाबदारी भारताकडे आहे. भारताने आपल्या प्रेसिडेंसी मध्ये इतक्या दिमाखदार G-20 शिखर परिषदेचे आयोजन केले. या शिखर परिषदेच्या  काळात आम्ही जगाला  इंडिया-मिडल इस्ट-युरोप कॉरिडोर च्या रुपात एक नवा आर्थिक मार्ग दिला. भारताने ग्लोबल साऊथला देखील एक बुलंद आवाज़ दिला आहे, आम्ही द्वीप राष्ट्रांना त्यांच्या हितांना आमच्या प्राधान्यक्रमांसोबत जोडले आहे.

हवामान संकटाचा सामना करण्यासाठी भारताने जगाला मिशन लाइफ हा दृष्टिकोन दिला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडी असे अनेक उपक्रम आहेत ज्यांचे नेतृत्व भारत जागतिक स्तरावर करत आहे. आणि मला आनंद आहे की आज जेव्हा अनेक भारतीय ब्रँड्स जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, तसतसे भारतातली माध्यमे देखील जागतिक होत आहेत आणि  जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संधी समजून घेत आहेत.

मित्रांनो,

गेल्या अनेक दशकांपासून जग भारताला त्यांचे बॅक ऑफिस म्हणून संबोधत होते, परंतु आज भारत जगाची नवीन फॅक्ट्री बनत आहे.  आपण केवळ मनुष्यबळ (वर्कफोर्स)  असलेला देश नाही तर एक जागतिक शक्ती (वर्ल्ड फोर्स) बनत आहोत. एकेकाळी आपण जी उत्पादने आयात करत होतो , आज देश त्यांचे उदयोन्मुख निर्यात केंद्र बनत आहे. जो शेतकरी कधीकाळी  फक्त स्थानिक बाजारांपुरता मर्यादित होता , मात्रा त्याची उत्पादने जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचत आहेत. पुलवामातील स्नो पीज , महाराष्ट्रातील पुरंदरची अंजीरे आणि काश्मीरच्या क्रिकेट बॅट्स यांची मागणी आज जगात वाढत आहे. आपली संरक्षण उत्पादने जगाला भारतीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचे दर्शन घडवत आहेत. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत जगाने आपली व्याप्ती , आपले सामर्थ्य पाहिले आहे. आम्ही जगाला केवळ आमची उत्पादने देत नाही, तर जागतिक पुरवठा साखळीत भारत एक विश्वासार्ह आणि विश्वासू  भागीदार देखील बनत आहे. आज आपण अनेक क्षेत्रात नेतृत्व करत आहोत, त्यामागे अनेक वर्षांची अतिशय विचारपूर्वक केलेली मेहनत आहे. पद्धतशीर धोरणात्मक निर्णयांमुळेच हे शक्य झाले आहे. तुम्ही 10 वर्षांचा प्रवास पहा, जिथे कधीकाळी पुलांचे काम अपूर्ण होते, रस्ते रखडले होते, आज तिथे स्वप्ने नव्या गतीने पुढे जात  आहेत. चांगले रस्ते आणि उत्कृष्ट दृतगती मार्ग यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी झाला आहे. उद्योगांना  मालवाहतुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात लागणारा वेळ कमी  करण्याची संधी मिळाली. याचा खूप मोठा फायदा आमच्या  वाहन उद्योग क्षेत्राला झाला आहे. यामुळे वाहनांची मागणी वाढली, आम्ही गाड्यांच्या , इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. आज भारत जगामध्ये वाहनांचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून उदयाला आला आहे.

मित्रांनो,

असेच परिवर्तन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्येही  दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षांत, अडीच कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत पहिल्यांदाच वीज पोहोचली. देशात विजेची मागणी वाढली,उत्पादन वाढले ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी वाढली.आम्ही डेटा स्वस्त केला, त्यामुळे मोबाईल फोनची मागणी वाढली. मोबाईल फोनवर अधिकाधिक सेवा आणल्या तेव्हा डिजिटल उपकरणांचा वापर आणखी वाढला.या मागणीचे संधीत रूपांतर करून आम्ही पीएलआय योजनांसारखे कार्यक्रम सुरू केले. आज पहा, भारत  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा एक प्रमुख निर्यातदार देश बनला आहे.

मित्रांनो,

आज भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि ती साध्य करत आहे कारण याच्या मुळाशी एक खास मंत्र आहे. हा मंत्र आहे – किमान सरकार, कमाल शासन. हा कार्यक्षम आणि प्रभावी शासनाचा मंत्र आहे. म्हणजे सरकारचा नाही आणि सरकारचा दबाव देखील नाही. मी तुम्हाला एक रंजक उदाहरण देतो. मागील एका दशकात आपण जवळपास दीड हजार असे कायदे रद्द केले आहेत, जे कालबाह्य झाले होते.दीड हजार कायदे रद्द करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यातील अनेक कायदे ब्रिटीश राजवटीत लागू करण्यात आले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल , एक कायदा होता , नाट्यमय सादरीकरण विषयक कायदा, हा कायदा इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी बनवला होता, तेव्हा इंग्रजांची इच्छा होती की नाट्य आणि नाटकांचा वापर  सरकारच्या विरोधात होऊ नये. सार्वजनिक ठिकाणी 10 जण नाचताना आढळल्यास त्यांना अटक केले जाऊ शकत होते अशी तरतूद या कायद्यात होती. आणि हा कायदा देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील 75 वर्षे चालूच  राहिला. म्हणजे लग्नाच्या वेळी वरात निघाली आणि 10 लोक नाचत असतील तर पोलीस नवरा मुलग्यासह त्यांना अटक करू शकले असते.हा कायदा स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्षापर्यंत अस्तित्वात होता. आमच्या सरकारने हा कायदा रद्द केला.70 वर्षे हा  कायदा आम्ही सहन केला, मला त्यावेळच्या सरकारला, इथे बसलेल्या त्या नेत्यांना काही म्हणायचे नाही, पण मला या लूटमार करणाऱ्या जमातीचे  आश्चर्य वाटते, या टोळीचे आश्चर्य वाटते. हे लोक 75 वर्षे या कायद्याबाबत मौन का बाळगून होते? हे लोक जे प्रत्येक वेळी न्यायालयात  जातात, पीआयएल चे ठेकेदार बनून फिरतात , हे लोक गप्प का होते? तेव्हा त्यांना स्वातंत्र्य आठवले नाही का? आज कोणी विचार केला जर मोदींनी असा कायदा केला असता तर काय झाले असते? आणि सोशल मीडियावर हे जे  ट्रोल करणारे असतात ना , त्यांनी देखील खोटी बातमी पसरवली असती की मोदी असा कायदा करणार होते, आग लावली असती या लोकांनी , मोदींचे केस उपटले असते.

मित्रांनो,

हे आमचे सरकार आहे, ज्यांनी गुलामगिरीच्या काळातील हा कायदा रद्द केला. मी  आणखी एक उदाहरण देतो बांबूचे , बांबू ही आपल्या आदिवासी भागाची, विशेषत:  ईशान्येकडील भागाची जीवनरेखा आहे. मात्र, यापूर्वी बांबू कापल्याबद्दल तुरुंगातही पाठवले जात होते, आता कायदा का केला? आता मी तुम्हाला  विचारले की  बांबू हे झाड आहे का? कुणी मानेल का हे झाड आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही माझ्या देशाचे सरकार बांबू हे झाड आहे असे मानत होते आणि म्हणून ज्याप्रमाणे झाडे तोडण्यास बंदी होती त्याचप्रमाणे बांबू तोडण्यासही बंदी होती. आपल्या देशात बांबूला झाड मानणारा कायदा होता आणि वृक्ष संबंधी सर्व कायदे त्याला लागू होते, ते तोडणे कठीण होते. बांबू हे झाड नाही हे आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांना समजले नाही. इंग्रजांचे स्वतःचे काही हितसंबंध असतील, पण आपण का केले नाही? बांबूशी संबंधित अनेक दशके जुना कायदाही आमच्या सरकारने बदलला.

मित्रांनो,

तुम्हाला आठवत असेल की 10 वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य व्यक्तीसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे किती कठीण होते. आज, तुम्ही काही क्षणांमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरता आणि काही दिवसांतच रिफंड थेट तुमच्या खात्यात जमा होतो. आता तर प्राप्तिकर संबंधित कायदे आणखी सुलभ करण्याची प्रक्रिया संसदेत सुरू आहे.

आम्ही 12 लाख रुपयांपर्यंतचे  उत्पन्न कर मुक्त केले, हा, आता टाळ्या वाजल्या, बांबू साठी टाळ्या नाही झाल्या, कारण तो आदिवासींचा आहे.यामधे विशेषकरून जे माध्यमकर्मी आहेत, आपणासारख्या वेतनधारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.जे युवा आत्ता पहिली, दुसरी नोकरी करत आहेत, त्यांच्या आकांक्षाही वेगळ्या असतात, त्यांचे खर्च वेगळे असतात.त्यांच्या आकांक्षाची पूर्तता व्हावी, त्यांची  बचत वाढावी यासाठी अर्थसंकल्पाने मोठी मदत केली आहे ,देशातल्या लोकांना सुखकर जीवन देणे,व्यवसाय सुलभता देणे,त्यांना भरारी घेण्यासाठी मोकळे अवकाश  देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.आज भौगोलिक डेटाचा लाभ किती स्टार्ट अप्स घेत आहेत ते पहा.याआधी कोणाला नकाशा  करायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागत असे.आम्ही यात बदल केला आणि आज आपले स्टार्ट अप्स, खाजगी कंपन्या या डेटाचा उत्तम उपयोग करत आहेत.

मित्रांनो,

शून्य ही संकल्पना जगाला देणारा भारत आज अमर्याद नवोन्मेशाची भूमी बनत आहे.आज भारत केवळ नवोन्मेष नव्हे तर इन्डोवेटही करत आहे.मी इन्डोवेट म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आहे भारतीय पद्धतीने नव कल्पना. नवोन्मेशातून आपण असे उपाय शोधत आहोत,जे किफायतशीर असतील, सर्वाना शक्य असतील आणि बदलाभिमुखही असतील.आम्ही हे उपाय स्वतःपुरते मर्यादित राखले नाही तर अवघ्या जगाला ते देऊ केले. जग जेव्हा सुरक्षित आणि किफायतशीर डिजिटल पेमेंट प्रणालीच्या शोधात होते,आम्ही युपीआय व्यवस्था तयार केली. मी प्राध्यापक कार्लोस मोंटेस यांचे भाषण ऐकत होतो, युपीआयसारख्या तंत्रज्ञानाचे लोक स्नेही स्वरूप पाहून ते प्रभावित झाल्याचे दिसले.आज फ्रान्स,संयुक्त अरब अमिराती,सिंगापूर यासारखे देश, आपल्या वित्तीय परीसंस्थेमध्ये युपीआय एकीकृत करत आहेत.आज आपली सार्वजनिक पायाभूत सुविधा India Stack  समवेत जोडून घेण्यासाठी जगातले अनेक देश करार करत आहेत.कोविड महामारीदरम्यान आपल्या लसीने जगाला दर्जेदार आरोग्य उपायांचे उदाहरण दाखवले. आम्ही आरोग्य सेतू अ‍ॅपही ओपन सोर्स केले ज्यायोगे जगाला त्याचा लाभ व्हावा.भारत अंतराळ क्षेत्रातही मोठी शक्ती आहे,दुसऱ्या देशांच्या अंतराळ आकांक्षा पूर्ण करण्यासाठीही  आपण मदत करत आहोत. सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यावर भारत काम करत आहे आणि आपले अनुभव,आपले नैपुण्य जगासमवेत सामायिकही करत आहे.

मित्रांनो,

आय टीव्ही नेटवर्कने आज अनेक फेलोशिप्स सुरु केल्या आहेत. भारताचा युवक, विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी आहे आणि सर्वात मोठा भागधारकही आहे. म्हणूनच भारताच्या  युवकाला आमचे सर्वाधिक प्राधान्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मुलांना  पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची संधी दिली आहे. माध्यमिक शाळेपासूनच मुले कोडींग शिकत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स क्षेत्रासाठी तयार होत आहेत. अटल टिंकरिंग  प्रयोगशाळा नवनवीन तंत्रज्ञानाचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देत आहेत.म्हणूनच या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही 50 हजार नव्या  अटल टिंकरिंग  प्रयोगशाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

बातम्यांच्या जगतात  आपण वेगवेगळ्या एजन्सीचे वर्गणीदार होता, यातून आपल्याला उत्तम न्यूज कव्हरेजसाठी मदत होते. तशाच प्रकारे  संशोधन क्षेत्रात, विद्यार्थ्याला जास्तीत जास्त माहिती स्त्रोताची आवश्यकता भासते. यासाठी पूर्वी त्यांना महागड्या मासिकांची वर्गणी भरावी लागत असे, स्वतःचे पैसे खर्च करावे लागत असत.आमच्या सरकारने  या सर्व संशोधकांना या चिंतेतून मुक्त केले. आम्ही वन नेशन वन सबस्क्रिप्शन आणले आहे.यामुळे देशातल्या प्रत्येक संशोधकाला जगभरातली प्रतिष्ठीत मासिके मोफत मिळण्याची निश्चिती झाली आहे. यावर सरकार 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तमातल्या उत्तम संशोधन सुविधा मिळाव्यात याची सु निश्चिती आम्ही करत आहोत. मग अंतराळ शोध असो, जैव तंत्रज्ञान संशोधन असो,कृत्रिम बुद्धिमत्ता असो,आपल्या देशातली मुले अग्रगण्य म्हणून उदयाला येत आहेत.डॉक्टर ब्रायन ग्रीन यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला आहे आणि अंतराळवीर माईक मॅसीमिनो यांनी सेन्ट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि हा अनुभव उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यातला मोठा शोध भारताच्या एखाद्या छोट्या शाळेतून लागेल असा दिवस आता फार लांब नाही.

मित्रांनो,

भारताचा झेंडा जागतिक मंचावर फडकत राहावा हीच आमची आकांक्षा, हीच आमची दिशा आहे.

मित्रांनो,

छोटी पाऊले आणि छोटे विचार करण्याची  ही वेळ नव्हे.एक माध्यम संस्था या नात्याने आपण   ही भावना जाणली आहे याचा मला आनंद आहे.10 वर्षांपूर्वी आपण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांपर्यंत आपल्या माध्यम समूहाची व्याप्ती कशी वाढवता येईल  याचा विचार करत होतात आज आपणही जागतिक होण्याचे धाडस दाखवले आहे. हीच प्रेरणा,हाच निश्चय आज प्रत्येक नागरिकाचा,प्रत्येक उद्योजकाचा असायला हवा.जगातल्या प्रत्येक बाजारपेठेत,प्रत्येक दिवाणखान्यात,प्रत्येकाच्या जेवणाच्या टेबलावर कोणतातरी भारतीय ब्रँड  असायला हवा असे माझे स्वप्न आहे. मेड इन इंडिया  हा जगाचा मंत्र व्हावा.कोणी आजारी पडल्या त्याने ‘हिल इन इंडिया’चा पहिल्यांदा विचार करावा. कोणाला लग्न करायचे असल्यास ‘वेड इन इंडिया’ म्हणजे भारतात लग्न करण्याचा विचार पहिल्यांदा यावा. कोणाला हिंडा- फिरायला जायचे असल्यास त्याच्या यादीत भारताचे नाव पहिल्या क्रमांकावर असावे,परिषद भरवायची असेल, प्रदर्शन भरवायचे असेल तर सर्वात आधी त्याने भारतात यावे. संगीत समारंभ आयोजित करायचा असल्यास  त्याने सर्वात आधी भारताची निवड करावी.हे सामर्थ्य , हा सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायाचा आहे. यामध्ये आपल्या नेटवर्कची, आपल्या वाहिनीची मोठी भूमिका असेल.संधी अपार आहेत,  धाडस आणि निर्धार यांच्या बळावर आपल्याला त्या वास्तवात आणायच्या आहेत.

मित्रांनो,

येत्या 25 वर्षात विकसित भारत बनण्याचा संकल्प घेऊन भारत आगेकूच करत आहे. आपणही एक माध्यम समूह म्हणून स्वतः ला जागतिक मंचावर आणले आहे,असाच संकल्प घेऊन पुढे आला आहात.आपल्याला यात नक्कीच यश मिळेल असा मला विश्वास आहे.आय टीव्ही नेटवर्कच्या संपूर्ण चमूला पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा देतो आणि देश-विदेशातून जे सहभागी आले आहेत त्यांचेही अभिनंदन करतो,त्यांच्या विचारांनी सकारात्मक विचारांना नक्कीच बळ दिले आहे यासाठी मी या सर्वांचे आभार मानतो कारण भारताचा गौरव वृद्धिंगत झाल्याने प्रत्येक भारतीयाला आनंद होतो, अभिमान वाटतो म्हणून यासाठी सर्वाना धन्यवाद देतो.

नमस्कार.

JPS/Shailesh/Sushama/Nilima/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com