Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

90 व्या इंटरपोल महासभेला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण

90 व्या इंटरपोल महासभेला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण


केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शहा, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल- रईसी, इंटरपोलचे महासचिव जर्गन स्टॉक, सीबीआयचे संचालक एस. के. जयस्वाल, विशेष प्रतिनिधी आणि सहभागी मान्यवर,

90 व्या इंटरपोल महासभेत मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. भारत आणि इंटरपोल, दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्हा सर्वांचे येथे असणे खचितच सुखद आहे. भारत 2022 या वर्षात स्वातंत्र्यप्राप्तीचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. हा आमच्या लोकांचा, आमच्या संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे. आपण सर्व जिथून आलो आहोत, त्या दिशेला मागे वळून पाहण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला पुढे कुठे पोहोचायचे आहे, हे पाहायचीही वेळ आली आहे. इंटरपोल सुद्धा ऐतिहासिक टप्पा गाठत आहे. 2023 मध्ये, इंटरपोल आपल्या स्थापनेचे 100 वे वर्ष पूर्ण करणार आहे. आनंद व्यक्त करण्याची आणि चिंतन करण्याची ही चांगली वेळ आहे. आपण अपयशातून शिकू या, विजयोत्सव साजरा करू या आणि भविष्याच्या दिशेकडे आशेने पाहू या.

मित्रहो,

इंटरपोल ही संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध पैलूंशी जोडलेली आहे. इंटरपोलचे ब्रीदवाक्य आहे, पोलिसांना सुरक्षित जगाशी जोडणे. वेद हे जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक असल्याचे तुमच्यापैकी अनेकांनी ऐकले असेल. वेदांमध्ये एका श्लोकात असे म्हटले आहे, आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः, अर्थात सर्व दिशांनी उत्तम विचार येऊ दे. या जगाला एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी सार्वत्रिक सहकार्याचे आवाहन आहे. भारताच्या आत्म्यामध्ये एक अद्वितीय वैश्विक दृष्टीकोन आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये धाडसी पुरुष आणि महिलांना पाठवण्यात भारत अव्वल योगदान देणारा देश आहे.  देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यापूर्वीसुद्धा हे जग एक चांगले ठिकाण व्हावे, यासाठी भारताने बलिदान दिले. महायुद्धात हजारो भारतीय लढले आणि मारले गेले. हवामानातील बदलांशी संबंधित उद्दिष्टांपासून ते कोविड लसींपर्यंत, अगदी प्रत्येक संकटांच्या वेळी भारताने आघाडीवर राहण्याची तयारी दर्शवली आहे आणि आता, बहुतेक राष्ट्रे आणि समाज अंतर्मुख होत असताना भारत व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आवाहन करत आहे. स्थानिक हितांसाठी जागतिक सहकार्य हे आमचे आवाहन आहे.

मित्रहो,

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ चाणक्य यांनी कायद्याच्या अंमलबजावणीचे तत्त्वज्ञान उत्तम प्रकारे स्पष्ट केले आहे. आन्वीक्षकी त्रयी वार्तानां योग-क्षेम साधनो दण्डः। तस्य नीतिः दण्डनीतिः; अलब्धलाभार्था, लब्धपरिरक्षणी, रक्षितविवर्धनी, वृद्धस्य तीर्थेषु प्रतिपादनी च। अर्थात कायद्याच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून समाजाचे भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण सुनिश्चित केले जाते. चाणक्याच्या मते, कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आपल्याजवळ जे नाही ते प्राप्त करणे, आपल्याकडे जे आहे त्याचे संरक्षण करणे, आपण जे जतन केले आहे ते वाढविणे आणि सर्वात पात्र लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. कायद्याच्या अंमलबजावणीचा हा सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे. जगभरातील पोलीस दले केवळ लोकांचे संरक्षण करत नाहीत तर सामाजिक कल्याणासाठीही पुढाकार घेत आहेत. कोणत्याही संकटाचा प्रतिकार करताना ते समाजात अगदी अग्रभागी सज्ज असतात. कोविड-19 साथरोगाच्या काळात हे प्रकर्षाने दिसून आले. जगभरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली. त्यांच्यापैकी अनेकांनी लोकांच्या सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मी त्यांना नमन करतो. जग थांबले तरी ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संपत नाही. साथरोगाच्या काळातही इंटरपोल सात दिवस चोवीस तास आपले कर्तव्य बजावत राहिले.

मित्रहो,

भारतातील वैविध्य आणि व्यापकता ज्यांनी अनुभवली नाही, त्यांच्यासाठी निव्वळ कल्पना करणे कठीण आहे. हा देश म्हणजे सर्वात उंच पर्वतरांगांचे सदन आहे, सर्वात कोरड्या वाळवंटांपैकी एक आहे, काही सर्वात घनदाट जंगले आणि जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या शहरांचा हा देश आहे. अनेक खंडांची वैशिष्ट्ये ज्याच्या ठायी एकवटली आहेत, असा हा देश आहे. उदाहरणादाखल बघायचे झाले तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे, या राज्याची लोकसंख्या जवळपास ब्राझीलच्या लोकसंख्येइतकी आहे. संपूर्ण स्वीडनपेक्षा जास्त लोक आपल्या राजधानीत, दिल्लीत आहेत.

मित्रहो,

भारतीय पोलीस केंद्र आणि राज्य स्तरावर 900 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि राज्यांचे सुमारे दहा हजार कायदे लागू करण्यात मदत करतात. यामध्ये भारतीय समाजाची विविधताही लक्षात घेतली पाहिजे. जगातील सर्व प्रमुख धर्माचे लोक येथे राहतात. शेकडो भाषा आणि बोली बोलल्या जातात. मोठ्या उत्सवांमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. उदाहरणार्थ – कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आणि दीर्घ काळ चालणारा आध्यात्मिक सोहळा असून त्यात 240 दशलक्ष भाविक सहभागी झाले. हे सर्व करतानाच आपले पोलीस दल संविधानाने व्यक्त केलेल्या वचनबद्धतेसह, विविधतेचा आणि लोकांच्या हक्कांचा आदर करत काम करते. ते केवळ लोकांचे रक्षण करत नाहीत तर आपल्या लोकशाहीची सुद्धा सेवा करतात.  भारतातील मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुकांची व्यवस्था पाहिली, तर सुमारे 900 दशलक्ष मतदारांची व्यवस्था करावी लागते. ही लोकसंख्या उत्तर आणि दक्षिण अमेरिकन खंडांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास आहे. निवडणुकीसाठी सुमारे 23 लाख पोलिस कर्मचारी तैनात केले जातात. विविधता आणि लोकशाही जपण्याच्या दृष्टीने भारत हा जगासाठी खरोखरच अभ्यासाचा विषय आहे.

मित्रहो,

गेल्या 99 वर्षांमध्ये, इंटरपोलने जागतिक स्तरावर 195 देशांमधील पोलीस संघटनांना जोडले आहे. कायदेशीर चौकट, यंत्रणा आणि भाषांमध्ये फरक असतानाही हे साध्य केले आहे. त्याची दखल घेत आज एक टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आले आहे.

मित्रहो,

मागच्या काळातील सर्व यशप्राप्तीनंतरही, आज मी जगाला काही गोष्टींची आठवण करून देऊ इच्छितो. जगासमोर अनेक घातक सामाईक धोके आहेत. दहशतवाद, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी, शिकार आणि संघटित गुन्हेगारी. या धोक्यांच्या स्वरूपातील बदलाचा वेग पूर्वीपेक्षा जास्त आहे. जेव्हा धोक्यांचे स्वरूप जागतिक असते तेव्हा प्रतिसाद फक्त स्थानिक पातळीवर देणे पुरेसे नाही! या धोक्यांना पराभूत करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे.

मित्रहो,

अनेक दशकांपासून भारत आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी दोन हात करत आहे. जगाला जाग येण्याच्या खूप आधीपासून, आम्हाला सुरक्षिततेचे मोल ठाऊक होते. या लढ्यात आपल्या हजारो लोकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. पण आता केवळ जमिनीच्या स्तरावरूनच दहशतवादाचा मुकाबला करणे पुरेसे नाही. हा दहशतवाद आता ऑनलाइन कट्टरता आणि सायबर धोक्यांच्या माध्यमातून आपले हातपाय पसरवत आहे. एका बटणावर क्लिक करून हल्ला सुरू केला जाऊ शकतो किंवा एखादी यंत्रणा उद्ध्वस्त केली जाऊ शकते. प्रत्येक देश त्यांच्या विरोधात धोरणे आखत आहे. परंतु आता आपण आपल्या सीमेच्या आतमध्ये जे करतो तेवढे पुरेसे नाही, त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय धोरणे आणखी विकसित करणे आवश्यक आहे. हे धोके लवकर ओळखणे आणि सूचना देणाऱ्या यंत्रणेची स्थापना, वाहतूक सेवांची सुरक्षा, दळणवळणाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा, महत्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा, तंत्र आणि तांत्रिक सहाय्य, गोपनीय देवाणघेवाण, यापैकी अनेक बाबी नव्याने विचारात घेण्याची गरज आहे.

मित्रहो,

मी भ्रष्टाचाराला भयंकर धोका असे का म्हटले, असा विचार कदाचित तुमच्यापैकी काहीजण करत असतील. भ्रष्टाचारामुळे आणि आर्थिक गुन्ह्यांमुळे अनेक देशांच्या नागरिकांचे हीत संकटात आले आहे. भ्रष्ट लोकांना गुन्ह्यांमधून मिळणारी कमाई जगाच्या विविध भागांमध्ये पोहोचवण्याचा मार्ग सापडतो. हा पैसा ज्या देशातून घेतला गेला आहे, त्या देशातील नागरिकांचा आहे. बहुतेकदा हा पैसा जगातील काही गरीब लोकांकडून घेतला जातो. शिवाय तो वाईट कामांसाठी वापरला जातो. दहशतवादाला नीधी पुरवठ्याचा हाच मुख्य स्रोत आहे. बेकायदेशीर अंमली पदार्थांपासून मानवी तस्करीपर्यंत, कमकुवत लोकशाहीपासून बेकायदेशीर शस्त्रास्त्र विक्रीपर्यंत, हा अवैध पैसा अनेक विनाशकारी उद्योगांना निधीपुरवठा करतो. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विविध कायदेशीर आणि प्रक्रियात्मक आराखडे आहेत. मात्र त्यांचे सुरक्षित आश्रय हिसकावून घेण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी जलदगतीने कृती करणे आवश्यक आहे. भ्रष्ट, दहशतवादी, अंमली पदार्थ तस्करी, अवैध शिकार करणाऱ्या टोळ्या किंवा संघटित गुन्हेगारांसाठी लपण्याचे कोणतेही ठिकाण सुरक्षित आश्रयस्थान असता कामा नये. कोणत्याही ठिकाणच्या लोकांविरोधातील असे गुन्हे हे सर्वांविरुद्धचे गुन्हे आहेत, मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत. असे गुन्हे आपल्या वर्तमानाचेच नव्हे तर आपल्या भावी पिढ्यांचेही नुकसान करतात. पोलिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमधील सहकार्य वाढवण्यासाठी प्रक्रिया आणि नियमावली तयार करण्याची गरज आहे. या संदर्भात इंटरपोल फरार गुन्हेगारांसाठी रेड कॉर्नर नोटीस प्रक्रियेला वेग देऊन मदत करू शकते.

मित्रहो,

सुरक्षित आणि खुशाल जग ही आपली सामायिक जबाबदारी आहे. जेव्हा चांगल्या शक्ती परस्परांचे सहकार्य करतात, तेव्हा गुन्हेगारी शक्ती त्यांच्यापुढे टिकाव धरू शकत नाही.

मित्रहो,

माझे बोलणे संपविण्यापूर्वी मी सर्व पाहुण्यांना आवाहन करतो की त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्याचा विचार अवश्य करावा. या दोन्ही ठिकाणी तुम्ही, भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना वंदन करू शकता. हे तुमच्यासारखे अनेक स्त्री-पुरुष होते, जे आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार होते.

मित्रहो,

या, आपण गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा पराभव करण्यासाठी परस्पर संवाद, सहकार्य आणि समन्वय सक्षम करू या. 90 वी इंटरपोल महासभा यासाठी एक प्रभावी आणि यशस्वी मंच सिद्ध होईल, अशी आशा मला वाटते. या महत्त्वाच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो.

धन्यवाद.

***

Gopal C/Madhuri/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai