नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना‘निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील.
या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल दिना‘ विषयी एक चित्रपटही दाखवला जाणार आहे. यासोबतच MYBharat आणि MyGov पोर्टलच्या माध्यमातून संवादात्मक स्वरुपातल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषांसारख्या स्पर्धांचंही आयोजन केलं जाणार आहे.
श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन ‘ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,9 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वाच्या दिनी केली होती.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai