जपानमध्ये टोकियो येथे होणाऱ्या ‘क्वाड’ नेत्यांच्या शिखरपरिषदेसाठी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिलेल्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 24 मे 2022 रोजी परिषदेत सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही मोदी यांच्याबरोबर सदर शिखरपरिषदेत सहभागी होणार आहेत.
टोकियोमध्ये होणारी ही शिखरपरिषद म्हणजे, मार्च-2021 मध्ये झालेल्या पहिल्या आभासी बैठकीपासून विचार करता, या क्वाड नेत्यांचे चौथे संवादसत्र आहे. यापूर्वी सप्टेंबर-2021 मध्ये वॉशिंग्टन येथे त्यांची प्रत्यक्ष शिखरपरिषद झाली होती तर मार्च-2022 मध्ये पुन्हा दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली होती.
आगामी क्वाड शिखरपरिषदेद्वारे, या नेत्यांना हिंद-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींविषयी विचारांचे आदानप्रदान करण्याची, तसेच सध्याच्या जागतिक महत्त्वाच्या विषयांपैकी परस्पर-स्वारस्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
क्वाडच्या उपक्रमांची प्रगती आणि क्वाड कार्यगटांचे कामकाज यांचा आढावा हे नेते यावेळी घेणार आहेत. तसेच सहकार्याचे नवे आयाम हेरून सामरिक मार्गदर्शन देणे आणि भविष्यातील सहयोगाबद्दल दृष्टीकोनाची बांधणी करणे, ही कामेही या शिखरपरिषदेत करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मे रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. किशिदा यांच्यासोबतच्या या बैठकीमुळे उभय नेत्यांना, मार्च-2022 मध्ये किशिदा यांच्या भारतभेटीदरम्यान झालेल्या 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखरपरिषदेतील संवादाचे सूत्र पुढे नेता येणार आहे. जपान दौऱ्याच्या वेळी, पंतप्रधान मोदी जपानच्या व्यापारक्षेत्रातील नेतृत्वाबरोबर एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच जपानमधील भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मे 2022 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याबरोबरही द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. नुकतेच म्हणजे 11 एप्रिल 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उभय नेत्यांची भेट झाल्याने, त्यांच्यातील नियमित संवादाचा पुढचा टप्पा या बैठकीत घडून येईल. भारत-अमेरिका सामरिक भागीदारीचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच, सप्टेंबर-2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यासह जी द्विपक्षीय बैठक झाली होती, त्यातील चर्चेचा पाठपुरावाही यावेळी केला जाण्याची शक्यता आहे. परस्पर स्वारस्याच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदानही उभय नेत्यांमध्ये यावेळी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 21 मे 2022 ला निवडणूक होत आहे. या बैठकीत उभय देशांचे पंतप्रधान भारत-ऑस्ट्रेलिया सर्वंकष सामरिक भागीदारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. तसेच परस्पर स्वारस्याच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींविषयी विचारांचे आदानप्रदानही यावेळी होईल असा अंदाज आहे. उभय देशांच्या पंतप्रधानांची याआधीची द्विपक्षीय बैठक 21 मार्च 2022 ला आभासी माध्यमातून झाली होती व त्यानंतर 2 एप्रिल 2022 रोजी ईसीटीए म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
***
JPS/JW/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com