नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024
आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा, यासाठी सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केले होते की, हमी देण्यात आलेल्या सर्व पिकांचे एमएसपी अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित केले जाईल. त्यानुसार, 2025 च्या हंगामासाठी योग्य सरासरी गुणवत्तेच्या मिलिंग म्हणजेच तेल गिरणीयोग्य खोबऱ्याचा एमएसपी ₹ 11582/- प्रति क्विंटल, तर गोटा खोबऱ्याचा एमएसपी ₹ 12100/- प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे.
सरकारने मिलिंग खोबरे आणि गोटा खोबऱ्याचा एमएसपी विपणन हंगाम 2014 मधील ₹ 5250 प्रति क्विंटल आणि ₹ 5500 प्रति क्विंटल वरून विपणन हंगाम 2025 मध्ये ₹ 11582 प्रति क्विंटल आणि ₹ 12100 प्रति क्विंटल वर आणला असून, तो अनुक्रमे 121 टक्के आणि 120 टक्के इतकी वृद्धी नोंदवत आहे.
एमएसपी मधील वृद्धी नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देईलच त्याचबरोबर शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खोबरे उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देईल.
नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, मूल्य समर्थन योजने अंतर्गत खोबरे आणि सोललेल्या नारळाची खरेदी करणारी केंद्रीय नोडल एजन्सी (CNAs) म्हणून काम करेल.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai