Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठात 107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन केले.

उद्‌घाटनपर भाषणत पंतप्रधान म्हणाले, ‘भारताची विकासगाथा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधनाचे परिदृश्य बदलण्याची गरज आहे.’

‘संशोधन, पेटंट, उत्पादन आणि समृद्धि हा या देशातील युवा वैज्ञानिकांसाठी माझा मंत्र आहे. हे चार घटक भारताला जलद विकासाकडे घेऊन जातील. लोकांनी केलेले आणि लोकांसाठीचे संशोधन ही आपल्या नव भारताची दिशा आहे, असे ते म्हणाले.

‘नवीन भारताला तंत्रज्ञान आणि तर्कसंगत भूमिकेची गरज आहे, जेणेकरुन आपल्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राला आपण नवी दिशा देऊ शकतो’, असे ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देतो आणि समाजाला एकसंध ठेवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतो, असे ते म्हणाले.

माहिती आणि दूरसंचार क्षेत्रातील घडामोडींमुळे आता स्मार्ट फोन स्वस्तात उपलब्ध झाले आहेत आणि देशातल्या प्रत्येकाकडे हे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे आता सर्वसामान्य माणसाचाही सरकारपेक्षा आपण वेगळे नाही, असा विश्वास निर्माण झाला आहे. तो आता सहजपणे थेट सरकारशी संपर्क साधू शकतो आणि आपले म्हणणे मांडू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी युवा वैज्ञानिकांना स्वस्त आणि उत्तम संशोधनासाठी ग्राम विकास क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींसाठी काम करण्याचे आवाहन केले. 107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’ या संकल्पनेचा उल्लेख करतांना पंतप्रधान म्हणाले की, केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळेच सरकारी कार्यक्रम गरजूपर्यंत पोहोचले आहेत.

विज्ञान आणि अभियांत्रिकीविषयक प्रकाशनांमध्ये भारत जगात आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. ‘विज्ञान आणि अभियांत्रिकीविषयक प्रकाशनांमध्ये जागतिक स्तरावर भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, असे मला सांगण्यात आले आहे. तसेच 4 टक्के जागतिक सरासरीच्या तुलनेत या क्षेत्राची वाढ 10 टक्के आहे’, असे ते म्हणाले.

नाविन्यपूर्ण संशोधन निर्देशांक क्रमवारीतील भारताचे स्थान सुधारल्याचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात सरकारी कार्यक्रमांनी आधीच्या 50 वर्षांच्या तुलनेत अधिक इन्क्युबेटर्स निर्माण केले हे त्यांनी अधोरेखित केले.

सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काल पीएम किसान कार्यक्रमांतर्गत आमच्या सरकारने 6 कोटी लाभार्थ्यांना हफ्ता जारी केला. आधार संलग्न तंत्रज्ञानामुळेच हे शक्य झाले असे ते म्हणाले. गरीबांसाठी शौचालये बांधण्यात आणि त्यांना वीज पुरवण्यात तंत्रज्ञानानीच मदत केली, असे ते म्हणाले. जीओ टॅगिंग आणि डाटा सायन्स तंत्रज्ञानामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकले, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान सुलभता, सुनिश्चित करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत आणि लाल फितीचा कारभार कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाविपणे वापर करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

डिजिटलायझेशन, ई-व्यापार, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सारख्या सेवा ग्रामीण जनतेने लक्षणीयरित्या मदत करत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण विकासाच्या अनेक उपक्रमांमध्ये विशेषत: किफायतशीर शेती आणि शेतकरी ते ग्राहक पुरवठा साखळी नेटवर्क क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

पिकांचे अवशेष जाळणे, भूजल पातळी राखणे, संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध, पर्यावरण स्नेही वाहतूक यासारख्या मुद्यांवर तंत्रज्ञानदृष्ट्या तोडगा काढण्याचा आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने योगदान देण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकतो, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी पंतप्रधानांनी I-STEM पोर्टल सुरु केले.

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane