Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य

103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर विद्यापीठात, 103व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन केले. “भारताच्या स्वयंपूर्ण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” ही यावर्षीची संकल्पना आहे.

पंतप्रधानांनी तंत्रज्ञान व्हिजन 2035चं प्रकाशन केले तसंच 2015-16 या वर्षासाठीची आय.एस.सी.ए. पारितोषिकंही पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

पंतप्रधानांचे भाषण :

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला,

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या,

मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉ. हर्षवर्धन आणि वाय.एस. चौधरी,

भारतरत्न प्राध्यापक सी.एन.आर. राव,

प्राध्यापक ए.के. सक्सेना,

प्राध्यापक के. एस. रंगप्पा,

प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि प्रतिनिधी,

भारतातून तसंच जगभरातून आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान नेत्यांच्या सहवासात वर्षाची सुरुवात करणे हे मोठे आनंददायी आहे.

भारताच्या भविष्याबद्दलचा आमचा विश्वास हा तुमच्यावरच्या भरवश्यातूनच येतो.
म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षात 103व्या विज्ञान काँग्रेसला संबोधित करणे फार गौरवाचे आहे.

देशातले काही थोर नेते या सन्माननीय संस्थेतून उत्तीर्ण झाले आहेत.

थोर विचारवंत आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन आणि भारतरत्न प्रोफेसर सीएनआर राव यांचा यात समावेश आहे.

विज्ञान काँग्रेस आणि म्हैसूर महाविद्यालय यांचा इतिहास साधारण एकाच काळातला.

भारतात नव्या जागृतीचा तो काळ होता. केवळ स्वातंत्र्यच नव्हे, तर देशातल्या मानवी प्रगतीचाही तो शोध होता.

केवळ स्वतंत्र भारत नव्हे, तर आपल्या मनुष्यबळाच्या जोरावर, वैज्ञानिक क्षमतांवर आणि औद्योगिक विकासाच्या बळावर स्वतंत्रपणे उभा राहणारा भारत अभिप्रेत होता.

हे विद्यापीठ म्हणजे भारताच्या थोर पिढीच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे.

भारतात सबलीकरण आणि संधीची नवी क्रांती आम्ही सुरु केली आहे.

मानव कल्याण आणि आर्थिक प्रगतीची आमची उद्दिष्टे जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आमच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांकडे वळलो आहोत.

ज्ञानाचा शोध आणि चौकस वृत्तीच्या मानवी प्रेरणेतून तसंच मानवी आव्हानांची दखल घेण्यासाठी जगानं प्रगती केली आहे.

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यात या प्रेरणेचं सर्वात जास्त प्रतिबिंब दिसत होते.

अद्वितीय वैज्ञानिक कामगिरीने त्यांचं आयुष्य युक्त होते, तर त्यांच्या हृदयात मानवता आणि अपार करुणा होती.

त्यांच्यासाठी विज्ञानाचे उद्दिष्ट म्हणजे दीनदुबळ्या लोकांच्या, शोषितांच्या आणि युवकांच्या आयुष्याचा कायापालट हेच होते.

मजबूत आणि जनतेप्रती आस्था बाळगणारा स्वयंपूर्ण भारत हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते.

या काँग्रेसची संकल्पना हा त्यांच्या दूरदृष्टीप्रती व्यक्त केलेला आदरभावच होय.

प्रोफेसर राव, राष्ट्रपती कलाम आणि तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासह अनेक भागात भारताला अग्रेसर ठेवले आहे.

छोटासा अणू ते विशाल अंतराळापर्यंत आपले यश पसरलेले आहे. अन्न आणि आरोग्य सुरक्षा आपण विस्तारली आहे. तसंच जगात इतरांना उत्तम आयुष्यासाठी आशाही दाखवली आहे.

आपल्या जनतेच्या इच्छा आकांक्षांचा स्तर आपण जसा वाढवतो त्याचप्रमाणे आपले प्रयत्न वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्यासाठी सुप्रशासन म्हणजे केवळ धोरण आणि निर्णय घेणे वा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व नव्हे, तर आपल्या धोरणाशी, पर्यायाशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणेही आहे. आपले डिजिटल नेटवर्क, सार्वजनिक सेवांचा दर्जा त्यांची व्याप्ती तसंच गरिबांसाठीचे सामाजिक फायदे विस्तारण्याचे कार्य करत आहे. आणि पहिल्या राष्ट्रीय अंतराळ परिषदेत आम्ही प्रशासन, विकास आणि जतनाला स्पर्श करणारे 170 ॲप्लिकेशन ओळखले.

कल्पकतेला, उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही स्टार्ट अप इंडिया अभियान सुरु केले आहे. शैक्षणिक संस्थात आम्ही तंत्रज्ञानविषयक बीजे रोवत आहोत. शासनाच्या वैज्ञानिक संस्था आणि खात्याच्या वैज्ञानिक ऑडिटच्या रुपरेषेविषयी मी विचारणा केली आहे. केंद्र आणि राज्य संबंधात प्रत्येक क्षेत्रात हीच सहकार्यात्मक संघीय भावना आकार देते. केंद्र आणि राज्य सरकारी संस्था आणि एजन्सी यांच्यात जास्तीत जास्त व्यापक वैज्ञानिक सहयोगासाठी मी प्रोत्साहन देत आहे.

विज्ञानासाठीच्या संसाधनाचा स्तर वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि धोरणात्मक प्राधान्यक्रमानुसार ती आम्ही उपयोगात आणू.

देशात विज्ञान संशोधन कार्य सुलभपणे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु तसंच विज्ञान प्रशासन सुधारण्याबरोबरच पुरवठा विस्तार आणि देशातल्या विज्ञान शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठीही कार्य करत राहू.

त्याचबरोबर केवळ कल्पक शोध हे फक्त आपल्या विज्ञानाचे लक्ष्य राहता कामा नये. या कल्पक शोधांनी वैज्ञानिक प्रक्रियेलाही गती दिली पाहिजे. किफायती कल्पकता आणि क्राऊड सोर्सिंग ही कार्यक्षम आणि प्रभावी वैज्ञानिक उद्योगाचे लक्षण आहे. कल्पक दृष्टीकोन हे केवळ सरकारचे उत्तरदायित्व नाही, तर खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक समूहांचीही ती जबाबदारी आहे.

मर्यादित संसाधने आणि प्रतिस्पर्धी दाव्यांच्या या जगात आपल्या प्राथमिकता निश्चित करताना आपण बुद्धीमान असले पाहिजे. आणि हे जास्त करुन भारतासाठी महत्त्वाचे आहे. जिथे आव्हाने अगणित आहेत – आरोग्य आणि भुकेपासून ते ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेपर्यंत.

सन्माननीय प्रतिनिधी,

आज जगासमोरच्या सर्वात मोठ्या आव्हानाबाबत मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. याच विषयावर गेल्या वर्षी जगाचे लक्ष केंद्रित झाले होते. ते जगाच्या समृद्ध भविष्यासाठी आणि आपल्या ग्रहाच्या अविरत उज्वल भवितव्यासाठी मार्ग निश्चित करणे.
2015 मधे जगाने दोन ऐतिहासिक पावले उचलली.

गेल्या सप्टेंबरमधे संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 साठीचा विकास कार्यक्रमाचा स्वीकार केला. 2030 पर्यंत दारिद्रयनिर्मुलनाला यामधे स्थान देण्यात आले आहे. आर्थिक विकासाला यात सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. मात्र, त्याचवेळी आपले वातावरण आणि वस्‍तीस्थाने यांच्या सातत्यापूर्णतेवर तेवढाच भर देऊन हा विकास साधायचा आहे.

आणि गेल्या नोव्हेंबरला पॅरीसमधे एका ऐतिहासिक करारासाठी जग एकत्र आले ते म्हणजे आपल्या ग्रहाची दिशा बदलण्यासाठी मात्र तेवढ्याच महत्त्वाचे असलेले आणखी काही तरी आपल्या हाती लागले.

हवामान बदलाच्या विचारविमर्शाच्या केंद्र स्थानी कल्पकता आणि तंत्रज्ञान आणण्यात आपण सफल ठरलो.

उद्दिष्ट आणि संयम यांच्याबाबत केवळ बोलणे पुरेसे नाही, या आमच्या संदेशात सातत्य होते. स्वच्छ उर्जेकडे घेऊन जाणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. केवळ हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी नव्हे न्याय्य हवामानासाठी कल्पकता महत्त्वाची असल्याचे मी पॅरसिमधे सांगितले आहेच.

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान सर्वांनाउपलब्ध, शक्य आणि परवडणारी असावी, यासाठी संशोधन आणि कल्पक शोधांची आपल्याला गरज आहे.

पॅरिसमधे कल्पक शोध शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष ओलांद, राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि मी अनेक जागतिक नेत्यांसमवेत एकत्र आलो.

नाविन्यपूर्ण कल्पक शोधांसाठी गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो. सरकार आणि खाजगी क्षेत्राची नाविन्यपूर्ण कल्पक क्षमता यांना एकत्र आणणाऱ्या जागतिक भागीदारीसाठीही आम्ही प्रतिबद्ध आहोत.

येत्या दहा वर्षात आपण निर्माण करत असलेली, वितरित आणि वापर करत असलेल्या उर्जेच्या पद्धती बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 30-40 विद्यापीठ आणि प्रयोगशाळांनी आंतरराष्ट्रीय नेटवर्क उभारावे अशी सूचनाही मी केली. जी-20 मधेही आम्ही याचे अनुकरण करणार आहोत.

नवीकरणीय ऊर्जा अधिक स्वस्त, अधिक भरवश्याची आणि ट्रान्समिशन ग्रीडना जोडण्यासाठी सुलभ असावी, यासाठी आपल्याला नाविन्यपूर्ण शोधांची गरज आहे.

2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने भारतासाठी हे महत्त्वाचे आहे. कोळश्यासारखे जीवाश्म इंधन अधिक स्वच्छ आणि प्रभावी बनवण्याची गरज आहे. समुद्राच्या लाटांपासून ते भूऔष्णिक उर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेच्या नव्या स्त्रोतांचा उपयोग करायला हवा. औद्योगिक युगाला इंधन पुरविणाऱ्या उर्जा स्रोतांनी आपल्या ग्रहाला संकटात आणले असताना आणि विकसनशील देशांना अब्जावधी लोकांना समृद्ध करायचे आहे, अशा काळात आपले भविष्य प्रकाशमान करण्यासाठी जगाने सूर्याकडे पाहायला हवे. म्हणूनच पॅरिसमधे भारताने सौर समृद्ध देशांसमवेत भागीदारी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर युतीचा प्रारंभ केला आहे. आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग म्हणून केवळ आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे, असे नव्हे, तर हवामान बदलाचे आपल्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठीही आपल्याला त्याची गरज आहे.

हवामानाशी मिळत्याजुळत्या शेतीचा विकास आपण करायला हवा. हवामान बदलाचा आपल्या हवामान, जैवविविधता, हिमनदी आणि महासागरांवर होणारा परिणाम जाणून त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे हे आपण जाणले पाहिजे. नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधण्याची आपली क्षमता आपण अधिक दृढ केली पाहिजे.

सन्माननीय प्रतिनिधी,

वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या वाढत्या आव्हानाची दखलही आपण घ्यायला हवी. चिरंतन जगासाठी हे महत्त्वाचे आहे.

मानवी इतिहासात प्रथमच आपण शहरी शतकात आहोत. या शतकाच्या मध्यापर्यंत जगातली 2/3 लोकसंख्या शहरात राहणारी असेल. 3 अब्जापेक्षा किंचित कमी अशी लोकसंख्या सध्याच्या साडेतीन अब्ज शहरनिवासी लोकसंख्येला येऊन मिळेल आणि 90 टक्के वाढ ही विकसनशील देशातून असेल.

आशियातल्या अनेक नागरी क्लटरमधली लोकसंख्या ही जगातल्या मध्यम आकाराच्या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त असेल.

2050 पर्यंत भारतातली निम्यापेक्षा जास्त लोकसंख्या शहरात वास्तव्याला असेल आणि 2025 पर्यंत जागतिक नागरी लोकसंख्येच्या 10 टक्के लोकसंख्या भारतात असू शकेल.

एका सर्वेक्षणानुसार जगातल्या शहरी लोकसंख्येपैकी सुमारे 40 टक्के जनता झोपड्यात किंवा अनौपचारिक आश्रमस्थानात रहाते आणि तिथे आरोग्य तसंच पोषणाविषयीच्या अनेक समस्या भेडसावत असतात.

आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी आणि प्रगतीचे इंजिन म्हणजे शहरे आहेत.

मात्र जागतिक उर्जेच्या मागणीपैकी शहरांची मागणी 2/3 पेक्षा जास्त आहे. परिणामी जागतिक हरितवायू उत्सर्जनापैकी 80 टक्के उत्सर्जन होते.

म्हणूनच मी स्मार्ट सिटीजवर जास्त भर देत आहे.

केवळ अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि उत्तम सेवा प्रदान करणारी शहरे एवढेच उद्दिष्ट नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेचे इंजिन ठरणारी आणि आरोग्यदायी राहणी पुरवणारी ही चिरंतन शहरं असावीत यासाठीची दृष्टी आहे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला भक्कम धोरणाची गरज आहे. मात्र सर्जनशील उपाययोजनांसाठी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विसंबू शकतो.

स्थानिक जीवसृष्टी आणि वारसा जतन करत शहर आराखडा सुधारण्यासाठी आपण अधिक उत्तम वैज्ञानिक साधने विकसित केली पाहिजेत. त्याचवेळी वाहतुकीची मागणी कमी करणारी, कोंडी कमी करणारी वैज्ञानिक साधनेही हवीत.

आपल्या बऱ्याचशा नागरी पायाभूत सुविधा अद्याप उभारायच्या आहेत. वैज्ञानिक सुधारणांसह आपण जास्तीत जास्त स्थानिक साहित्याचा वापर करत इमारती उर्जा सक्षम बनवायला हव्यात. घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्याला वाजवी दरातली व्यवहार्य उपाययोजना शोधावी लागेल. टाकाऊचा वापर इमारती बांधताना तसंच उर्जेसाठी करायला हवा आणि वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर करायला हवा.

शहरी कृषी क्षेत्र आणि जीवसृष्टीकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. आपल्या मुलांनी स्वच्छ हवेच्या शहरात मोकळा श्वास घेतला पाहिजे. विज्ञान तसंच कल्पक शोधांची मूळे असलेल्या सर्वंकष उपाययोजनांची आपल्याला गरज आहे.

नैसर्गिक आपत्तीचा फटका झेलू शकणारी शहरे आणि निसर्गाशी तादात्म्य पावलेली घरे आपल्याला हवी आहेत. याचाच अर्थ किफायतशीर इमारती निर्माण करणे आहे.

सन्माननीय प्रतिनिधी,

आपल्या ग्रहाचे चिरंतन भविष्य केवळ आपण जमिनीवर काय करतो, यावर अवलंबून नाही, तर आपण महासागरांबाबत कोणता दृष्टीकोन बाळगतो कसा वापर करतो यावरही आहे.

आपल्या ग्रहापैकी 70 टक्के पेक्षा जास्त भाग महासागरांनी व्यापला आहे. 40 टक्के मानवजमात आणि जगातली सुमारे 60 टक्के मोठी शहरे किनारपट्टीपासून 100 किलोमीटरपर्यंतच्या भागात वसलेली आहेत.

महासागर हे आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वाहक ठरतील, अशा नव्या युगाच्या टोकावर आपण आहोत, त्यांचा निरंतर वापर आपल्याला भरभराटीबरोबरच स्वच्छ उर्जा, नवी औषधे आणि केवळ माशांशिवाय त्यापलिकडे जाऊन अन्नसुरक्षाही पुरवेल.

आणि म्हणूनच मी छोट्या द्वीप राज्यांचा मोठी समुद्री राज्ये असा उल्लेख करतो. भारतच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून महासागर महत्त्वाचे आहेत, 1300हून अधिक बेटे, 7500 किलोमीटर सागरी किनारा आणि 2.4 दशलक्ष वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र यामधे येते. आणि म्हणूनच गेल्या वर्षात आम्ही महासागर आणि नील अर्थव्यवस्थेवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. सागरी विज्ञान क्षेत्रातल्या आपल्या वैज्ञानिक प्रयत्नांचा स्तर आपण उंचावू. सागरी जीवसृष्टी आणि जैवतंत्रज्ञानातली प्रगत संशोधन केंद्रे आपण उभारु तसंच सागरी आणि द्वीपकल्प संशोधन केंद्राचे भारतात आणि परदेशातही जाळे उभारु.

सागरी विज्ञान आणि महासागर अर्थव्यवस्थेसंदर्भात आपण अनेक देशांशी करार केला आहे. महासागर अर्थव्यवस्था आणि “प्रशांत द्वीप देश” याविषयी 2016 मधे नवी दिल्लीत आपण एक आंतरराष्ट्रीय परिषदही भरवत आहोत.

सन्माननीय प्रतिनिधी,

महासागरांप्रमाणेच नद्यांनीही मानवी इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नद्यांनी संस्कृतीची जोपासना केली आणि नद्या आपल्या भविष्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. आपल्या समाजाच्या आरोग्यपूर्ण आणि स्वच्छ भविष्यासाठी, आपल्या जनतेच्या आर्थिक संधींसाठी आणि आपल्या वारश्याच्या पुनरुज्जीवनासाठी नद्यांचे पुनरुज्जीवन हा माझ्या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भाग आहे.

आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला नियमन, धोरण, गुंतवणूक आणि व्यवस्थापनाची गरज आहे. आपल्या नद्या केवळ आत्तासाठीच नव्हे, तर भविष्यातही स्वच्छ आणि आरोग्यदायी रहाव्यात, यासाठी तंत्रज्ञानाची, कल्पकतेची आपल्या प्रयत्नांशी सांगड घातली, तरच आपण यशस्वी ठरु. यासाठी शहरीकरण, शेती, औद्योगिकीकरण आणि भूगर्भातल्या पाण्याचा वापर, नद्या दूषित होण्याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन आपण जाणला पाहिजे.

नद्या म्हणजे निसर्गाचा आत्मा आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे निसर्गाचे जतन करण्याचा मोठा घटक ठरले पाहिजे.

भारतात आपण मानवता ही निसर्गाचा भाग म्हणून पाहतो त्यापेक्षा वेगळी किंवा जास्त म्हणून नव्हे.

आपल्या संस्कृती आणि परंपरेत जतनाची शिकवण निसर्गत:च आहे.

पर्यावरणीय ज्ञानाचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. वैज्ञानिक अभ्यास आणि पद्धतीची सखोल मुळे असणाऱ्या निसर्ग जतनासाठी एकीकृत राष्ट्रीय कृतीसाठी आपल्याकडे वैज्ञानिक संस्था आणि मनुष्यबळ आहे.

सन्माननीय प्रतिनिधी,

निसर्ग आणि मानव यांच्यातले साहचर्य पुन्हा निर्माण करायचे असेल, तर आपल्या पारंपरिक ज्ञानाचा पूर्ण क्षमतेने आपण वापर करायला हवा.

जगभरातल्या समाजाने युगानुयुगापासून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर आपली संपत्ती वाढविली आहे.

आपल्या अनेक समस्यांची पर्यावरण स्नेही उत्तरे, तसंच आर्थिक, कार्यक्षमतेची अनेक गुपिते त्यात दडलेली आहेत. मात्र सध्याच्या रेट्यात हे नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. परंपरागत ज्ञानाप्रमाणेच विज्ञानही मानवी अनुभव आणि निसर्गाच्या शोधातून विकसित झाले आहे. म्हणूनच आपण त्या विज्ञानाला मान्यता द्यायला हवी, जे जगाविषयी अनुभवजन्य ज्ञानाच्या रुपात तयार झालेले नाही. आणि म्हणुनच पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्यातले अंतर आपण बुजविले पाहिजे, जेणेकरुन आपल्या आव्हानांबाबत स्थानिक आणि चिरंतन उपाययोजना आपण निर्माण करु शकू.

आपली कृषी उत्पादकता वाढविण्यावर, पाण्याचा वापर कमी करण्यावर तसंच पीक उत्पादनाचे पोषक मूल्य वाढविण्यावर आपल्याला काम करायला हवे.

आपली पारंपरिक तंत्र, स्थानिक प्रथा आणि सेंद्रीय शेती यांचा मिलाफ करत आपली शेती जास्त संसाधन केंद्री न राहता निसर्गाशी पूरक राखायला हवी.

आरोग्याच्या क्षेत्रात, तर आधुनिक औषधांनी आरोग्यक्षेत्राचा कायापालटच घडविला आहे. औषधोपचाराऐवजी तंदुरुस्तीवर भर देणाऱ्या जीवनशैलीकडे घेऊन जाणाऱ्या योगाभ्यास तसंच पारंपरिक औषधांचा सखोल अभ्यास करणाऱ्या शास्त्रशुद्ध तंत्र आणि पद्धतीचा आपण वापर करायला हवा.

जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आणि मानवी आयुष्याचा बळी घेणाऱ्या आजारांच्या वाढत्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे.

सन्माननीय प्रतिनिधी,

एक राष्ट्र म्हणून आपण अनेक जगात वसतो आहोत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक उत्तम कामगिरीच्या उंबरठ्यावर आपण आहोत. वर्तमानात आपण अनिश्चितता आणि जगण्यातली असमानता पाहतो. म्हणूनच आशा, संधी, समानता आणि सन्मानाच्या शोधात आहोत. या आकांक्षाची आपण वेगाने व्यापक स्तरावर पूर्तता करायला हवी, जो मानवी इतिहासात दुर्मिळ आहे.

आपली समृद्ध परंपरा आणि जगाप्रती आपली कटिबद्धता लक्षात घेत आपण चिरंतन मार्ग चोखाळला पाहिजे. 1/6 मानवजातीचे यश म्हणजे जगाचे अधिक भरभराटीचे आणि चिरंतन भविष्य होय.

तुमचे नेतृत्व आणि पाठिंब्याच्या बळावरच आपल्याला हे शक्य आहे.

आपण हे जाणू शकू जेव्हा, विक्रम साराभाई यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, “वैज्ञानिकांनी त्यांच्या प्राविण्याच्या क्षेत्राबाहेरच्या समस्यात रुची घ्यावी, यासाठी आमही प्रोत्साहन देतो”.

वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी आपल्या शोधाच्या केंद्रस्थानी ज्याला मी पाच ई तत्त्वे म्हणतो ती ठेवली, तर विज्ञानाचा प्रभाव मोठा राहीला.

इकॉनॉमी – जेव्हा आपण किफायतशीर आणि प्रभावी उपाययोजना शोधू
एनव्हॉयरमेंट- जेव्हा कार्बन उर्त्सजन कमी राहील आणि जीवसृष्टीवर याचा कमी परिणाम होईल.

एनर्जी – प्रगतीसाठी आपण उर्जेवरचे अवलंबित्व कमी राखू आणि वापर करत असलेल्या उर्जेमुळे आपले आकाश निळे आणि पृथ्वी हरित राहील.

एंपथी – आपली संस्कृती, परिसर आणि सामाजिक आव्हानांना अनुसरुन आपले प्रयत्न राहतील.

इक्वीटी – जेव्‍हा विज्ञान सर्वसमावेशक विकासाकडे आणि दुर्बलातल्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी कार्य करेल.

अल्बर्ट आईन स्टाईन यांनी द फाऊंडेशन ऑफ द जनरल थिएरी ऑफ रिलेटिव्हिटीचे 1916 मधे प्रकाशन केले. या विज्ञानाच्या महत्त्वाच्या क्षणाची शंभर वर्ष आपण यावर्षी साजरी करत आहोत. त्यांच्या मानवतेप्रतीच्या विचारांचे स्मरण आपण आज करायला हवे. “मनुष्यजमात स्वत: आणि त्यांचे भविष्य हा सर्व तंत्रविषयक शोधांचा मूळ हेतू असायला हवा.”

आपण सार्वजनिक जीवनात असू दे. खाजगी क्षेत्रात असू दे. व्यापार किंवा विज्ञान क्षेत्रातले असू देत, आपल्यासाठी यापेक्षा मोठे कर्तव्य असू शकत नाही की आपण या ग्रहावरुन जाऊ तेव्हा आपल्या भावी पिढीसाठी हा ग्रह अधिक चांगल्या स्थितीत सोडून जाऊ.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखांनी या सामाईक हेतूसाठी एकजूट व्हावे.

धन्यवाद.

N. Chitale/S.Tupe/M.Desai