“ॲपल” चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिप कुक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालांबाबत पंतप्रधानांचे अभिनंदन करत कुक यांनी आपल्या भारत भेटीविषयी चर्चा केली. भारतात आपले उत्साहाने स्वागत झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या विविध भागांना दिलेल्या भेटीबद्दल तसेच युवा, उद्योजक आणि चित्रपट कलावंतांशी झालेल्या भेटीविषयही माहिती दिली. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदीराला दिलेली भेट आणि क्रिकेट सामन्याचा कुक यांनी विशेष उल्लेख केला. कुक यांचे कौतुक करत “भारतात प्रत्यक्ष पाहणे हेच विश्वास ठेवणे” असल्याचे सांगितले. हे अनुभव व्यापार विषयक निर्णय घेताना कुक यांना मार्गदर्शक ठरतील असंही पंतप्रधान म्हणाले.
या वेळी कुक यांनी भारतासाठीच्या ॲपलच्या भावी योजनांची माहिती दिली. भारतात उत्पादन आणि किरकोळ विक्री करण्याबाबतच्या शक्यतांचाही त्यांनी उल्लेख केला. भारतातल्या युवा बुद्धीमत्तेचे त्यांनी कौतुक केले आणि युवकांमध्ये असलेल्या प्रचंड कौशल्याचा वापर करायला ॲपलला आवडेल असं सांगितले. भारतात अस्तित्वात असलेल्या विविध ॲप विकसित करण्याच्या क्षमतेचाही कुक यांनी उल्लेख केला. तसेच ॲपल हैदराबाद इथे उभारत असलेल्या नकाशा विकास केंद्राबाबत विस्तृत माहिती दिली. व्यवसाय सुलभीकरणाबाबत पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
नवीकरणीय उर्जेबाबतही पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराचेही कुक यांनी कौतुक केले. “ॲपल” चे 93 टक्के काम हे नवीकरणीय ऊर्जेवर चालते असे सांगून “ॲपल” ची संपूर्ण पुरवठा साखळी नवीकरणीय ऊर्जेकडे वळवण्याच्या बाबतच्या योजनेबद्दलही माहिती दिली. कुक यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी राजस्थानच्या ग्रामीण भागात आलेले अनुभव सांगितले. या भागात अनेक गावांचे नुकतेच विद्युतीकरण करण्यात आले असून, महिलांना सौर ऊर्जा उपकरणे तयार करणे आणि चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. “ॲप विकास” आणि “नवीकरणीय ऊर्जा” या क्षेत्रात सामोऱ्या आलेल्या उद्योजकतेच्या काही गोष्टीबाबत पंतप्रधान मोदी आणि कुक यांनी चर्चा केली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाविषयी माहिती दिली आणि “ई-शिक्षण” आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ ही डिजिटल इंडिया पुढील तीन महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे सांगितले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ॲपल ने सहाय्य करावे असे पंतप्रधानांनी सांगितले.
सायबर सुरक्षा आणि डेटा एनक्रिपशन या बाबतीतही यावेळी चर्चा झाली. सायबर गुन्ह्याच्या आव्हानांशीही सामना करण्यासाठी जागतिक समुदायाला मदत करण्यासाठी पंतप्रधानांनी कुक यांना प्रोत्साहित केले.
टिप कुक यांच्या हस्ते यावेळी “नरेंद्र मोदी मोबाईल ॲप” च्या अद्ययावत आवृत्तींचा शुभारंभही करण्यात आला.
J.Patankar/B.Gokhale/M.Desai
Thank you @tim_cook! Friends, welcome & happy volunteering. Your views & efforts are always enriching. pic.twitter.com/aAu4isv6wM
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2016