Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हैदराबाद इथल्या जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचे संबोधन

हैदराबाद इथल्या जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचे संबोधन


बंधू आणि भगिनींनो,

जागतिक माहिती तंत्रज्ञान संमेलनाचे उद्‌घाटन करतांना मला खूप आनंद होत आहे. भारतात प्रथमच हे संमेलन आयोजित होत आहे. नॅसकॉम, विट्सा आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे संमेलन जगभरातून आलेले गुंतवणुकदार, नवकल्पनाकार, विचारवंत आणि या क्षेत्राशी संबंधितांसाठी लाभदायक ठरेल, असा माझा विश्वास आहे. या समारंभात मला प्रत्यक्ष उपस्थित राहायचे होते. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या ताकदीमुळे मी तुम्हाला दुरवरुन संबोधित करु शकतोय याचा मला आनंद होत आहे.

जगभरातून आलेल्या प्रतिनिधींचे भारतात स्वागत आहे, हैदराबादमध्ये स्वागत आहे.

या परिषदेच्या निमित्ताने तुम्हाला हैदराबादचा इतिहास आणि स्वादिष्ट भोजनाला आस्वाद घ्यायला वेळ मिळेल अशी आशा व्यक्त करतो. भारताच्या इतर भागांना भेट देण्याबाबत प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास आहे.
भारत हा नि:संदेह प्राचीन समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा संगम आहे, ज्याचा मूळ पाया एकात्मता आहे.

बंधू आणि भगिनींनो,

“वसुधैव कुटुंबकम्- सर्व विश्व एक कुटुंब” ही संकल्पना भारतीय तत्वज्ञानात खोलवर रुजली आहे. ही संकल्पना आमच्या सर्वसमावेशक परंपरांना प्रतिबिंबित करते. 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञान हे या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचे माध्यम बनत आहे. यामुळे आम्हाला अडथळा विरहीत, एकात्मिक विश्व निर्माण करायला मदत होते आहे.

एका अशा जगात जिथे भौगोलिक अंतर अधिक चांगले भविष्य घडवण्यात बाधा ठरत नाही, आज भारत डिजिटल नवनिर्मितीत, सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण केंद्र बनत आहे.

आमच्याकडे केवळ नवसंकल्पना देणारे उद्योजकच नाहीत, तर तंत्रज्ञान नव संकल्पनासाठी वाढणारी बाजारपेठही आहे. ऑप्टिकल फायबरने जोडली गेलेली एक लाखाहून अधिक खेडी, 121 कोटी मोबाईल फोन, 120 कोटी आधार कार्ड आणि इंटरनेटचा वापर करणारे 50 कोटी ! या सर्वांमुळे आम्ही माहिती तंत्रज्ञानाशी सहजपणे जोडला गेलेला जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत आणि पुढेही राहू.

तंत्रज्ञानाच्या शक्तीचा फायदा घेऊन प्रत्येक नागरिकाचे सबलीकरण निश्चित करुन भविष्यात लांब उडी मारण्यासाठी भारत सर्वाधिक उत्तम स्थितीत आहे. डिजिटल इंडिया देशात डिजिटल मार्गाने सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उभारुन डिजिटल सबलीकरणाचे शक्तीशाली माध्यम बनत आहे.

डिजिटलायझेशनचे चक्र गेल्या साडे तीन वर्षात आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. प्रक्रिया आणि जनतेमधे वर्तनात्मक बदल यातून हे शक्य झाले. डिजिटल इंडिया केवळ सरकारी प्रयत्नापर्यंत सिमित राहिला नाही तर आता तो लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे.

तंत्रज्ञान आज लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक सरकारी उपक्रम सरकारी मदतीवर अवलंबून असताना डिजिटल इंडिया, जनतेच्या पाठिंब्यावर यशस्वी ठरत आहे.

जनधन योजना, आधार आणि मोबाईल जेएएममुळे देशात गरीबांची 32 कोटी जनधन खाती आधार आणि मोबाईलशी जोडली गेली आहेत. त्यामुळे सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून सरकारच्या 57 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

देशातल्या 172 रुग्णालयात सुमारे दोन कोटी वीस लाख डिजिटल व्यवहाराद्वारे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सुलभपणे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुरु झाले असून एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी यावर नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला योग्य दाम मिळावा यासाठी ऑनलाईन कृषी बाजार ई नाम शेतकऱ्यांना मदत करत आहे. यावर 65 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामार्फत 470 कृषी बाजार आपसात जोडले गेले आहेत. जानेवारी 2018 मधे भीम ॲपद्वारे 15 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला.

तीन महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेले अनोखे उमंग ॲप 185 प्रकारच्या सरकारी सेवा उपलब्ध करुन देत आहेत. देशाच्या विविध 2.8 लाख सामाईक सेवा केंद्राद्वारे लोकांना डिजिटल सेवा प्रदान करण्यात येत आहेत. या केंद्रावर सुमारे दहा लाख लोक काम करत असून त्यात हजारो महिला उद्योजकही आहेत. आपल्या युवकांची प्रतिभा आणि कौशल्य उपयोगात आणण्यासाठी ईशान्य भारतात कोहिमा आणि इंफाळपासून जम्मू-काश्मीर पर्यंत बीपीओ केंद्र काम करत आहेत. 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अशी 86 युनिट्स सुरु झाली असून लवकरच आणखी काही युनिट्स सुरु होणार आहेत. प्रत्येक घरात डिजिटल साक्षरता सुरु करण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन सुरु करण्यात आले असून याद्वारे ग्रामीण भारतातल्या सहा कोटी प्रौढांना डिजिटल साक्षर केले जाईल. या अभियानाअंतर्गत एक कोटी लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या अभिसरणाबरोबर आपण मोठी वाटचाल केली आहे. एकीकडे 2014 मधे भारतात केवळ दोन मोबाईल निर्मिती कारखाने होते. आता भारतात अशा प्रकारचे 118 कारखाने असून यात जागतिक सर्वोत्तम ब्रॅन्डचाही समावेश आहे.

सरकारी ई मार्केट प्लेसला राष्ट्रीय खरेदी पोर्टलच्या रुपात विकसित करण्यात आले आहे. लहान आणि मध्यम उद्योगांना सरकारच्या खरेदीसंदर्भातल्या आवश्यकतांची आणि मध्यम उद्योगांना पूर्तता करण्यासाठी आपापसात निकोप स्पर्धा करणे शक्य आहे. या सुलभ माहिती तंत्रज्ञान चौकटीमुळे सरकारी खरेदीत पारदर्शकता वाढली आहे. यामुळे खरेदी प्रक्रियेत गती आली असून छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या सबलीकरणाला बळ मिळत आहे.

काल मुंबई विद्यापीठात वाधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्था, देशाला समर्पित करण्याची संधी मला मिळाली ही एक स्वतंत्र सामजिक संशोधन संस्था असून सामाजिक हितासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर अभियान म्हणून काम करत आहे.
काही दिवसांपूर्वी दुबईमधे आयोजित जागतिक सरकारी शिखर संमेलनात भविष्यातले संग्रहालय प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मला लाभली. तंत्रज्ञानाच्या अग्रदुतांची मी त्यांच्या कामासाठी प्रशंसा करतो. यातले काही आज प्रेक्षक म्हणूनही उपस्थित आहेत. मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते काम करत आहेत.

आज आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या शिखरावर विराजमान आहोत. तंत्रज्ञानाचा सार्वजनिक हितासाठी उपयोग केला तर मानवतेच्या शाश्वत भरभराटीसाठी आणि आपल्या वसुंधरेच्या चिरंतन भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. या परिषदेच्या महत्वाच्या संकल्पनामधे आपण त्या संधीची प्रतिक्षा करत होतो त्याचे प्रतिबिंब दिसते. ब्लॉक चेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज् यासारख्या तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनमानावर, कामावर सखोल परिणाम राहील. आपल्या कामाच्या जागी त्याचा जलदगतीने स्वीकार आवश्यक आहे.

भविष्यातल्या कार्यस्थळाच्या दृष्टीने नागरिकांना कौशल्य प्रदान करणे आवश्यक आहे. मुले आणि युवकांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन सुरु केले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उदय लक्षात घेऊन आपल्याला सध्याच्या मनुष्यबळाला पुन्हा कौशल्य प्रदान करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमात वक्ता म्हणून निमंत्रित वक्ता रोबो सोफिया म्हणजे नव्या तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा अविष्कार आहे. या नव्या युगात रोजगाराचे बदलते रुप प्रतिबिंबित होण्याची गरज आहे. स्किल ऑफ फ्युचर हा मंच विकसित करण्याबद्दल मी नॅसकॉमची प्रशंसा करतो.

नॅसकॉमने आठ नवी तंत्रज्ञाने विकसित केल्याची माहिती मला देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, व्हर्च्युअल रिॲलिटी, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डाटा ॲनलॅटिक्स, थ्री डी प्रिंटीग, क्लाऊड कॉम्युरिंग यांचा यात समावेश आहे. नॅसकॉमने 55 रोजगार शोधले आहेत. ज्यांना जगभरातून मोठी मागणी आहे.
स्किल्स ऑफ फ्युचर हा मंच भारतासाठी स्पर्धात्मक क्षमता राखण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. डिजिटल तंत्रज्ञान हे प्रत्येक व्यापारासाठी अत्यावश्यक भाग ठरला आहे. व्यापारात विविध कार्य आणि प्रकियेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे.

अल्पावधीत आपण आपल्या लाखो छोट्या आणि मध्यम उद्योजकांना या परिवर्तनासाठी कसे तयार करणार आहोत? नाविन्य आणि कल्पकतेचे अर्थव्यवस्थेच्या भविष्यातले आणि व्यापारातले महत्व लक्षात घेऊन आम्ही स्टार्ट अप इंडिया हा उपक्रम केला आहे.

हे स्टार्ट अप म्हणजे आर्थिक उपाय शोधण्यासाठीची गुरुकिल्ली आहे असा आमचा विश्वास आहे. अटल इनोव्हेशन मिशनद्वारे आम्ही देशभरातल्या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब उभारत आहोत. युवा पिढीत सृजनशीलता, कल्पकता आणि जिज्ञासा निर्माण करणे हा याचा उद्देश आहे.

उपस्थित महिला आणि पुरुषवर्ग,

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पनावर विचार करताना तुमच्या मनात सामान्य जनतेचे हित नक्कीच राहील याची मला खात्री आहे. जगभरातून आलेल्या मान्यवर प्रतिनिधींच मी भारतात पुन्हा एकदा स्वागत करतो. आपली चर्चा फलदायी ठरो. याची निष्पत्ती जगातल्या गरीब आणि शोषित वर्गासाठी लाभदायी ठरावी.

धन्यवाद.

B.Gokhale/J.Patankar/N.Chitale/P.Malandkar