Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2023

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण.  हा अद्भुत संयोग  आहे.  हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या  सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.

माझ्या कुटुंबियांनो,

मी आताच खूप उंचावर असलेल्या लेपचा इथे जाऊन आलो आहे. असे म्हणतात की सण तेव्हाच साजरे होतात जिथे कुटुंब असते. तेथेच सण होतात. सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात असणे, ही पराकोटीची कर्तव्यनिष्ठा आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आठवण येते. मात्र इथेही  तुमच्या चेहऱ्यावर निराशा दिसत नाही. तुमचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. उत्साह, ऊर्जा ठासून भरलेली आहे. कारण, तुम्हाला माहीत आहे की 140 कोटी देशवासीयांचा हा मोठा परिवारही तुमचाच आहे . आणि यासाठी देश तुमचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी तुमच्या सुखासाठी प्रत्येक घरात दिवा लावला जातो.प्रत्येक पूजेत तुमच्यासारख्या वीरांसाठी देखील एक प्रार्थना केली जाते. मी देखील याच भावनेने प्रत्येक वर्षी दिवाळीला आपल्या सुरक्षा दलातील जवानांना भेटण्यासाठी जातो. असे म्हटले आहे – अवध तहाँ जहं राम निवासू! म्हणजे जिथे राम आहे, तिथे अयोध्या आहे. माझ्यासाठी जिथे माझे भारतीय सैन्य आहे, जिथे माझ्या देशातील सुरक्षा दलांचे जवान तैनात आहेत, ते ठिकाण  माझ्यासाठी मंदिराप्रमाणेच आहे. तुम्ही जिथे असाल तिथे माझा सण आहे. आणि हे गेली बहुतेक 30-35 वर्षांहून अधिक काळ लोटला असेल , अशी कुठलीही दिवाळी नाही जी मी तुमच्याबरोबर साजरी केली नाही.

पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसतानाही भारताचा अभिमान बाळगणारा सुपुत्र  म्हणून मी दिवाळीत कुठल्या ना कुठल्या सीमेवर अवश्य जायचो. तुम्हा लोकांबरोबर तेव्हाही मिठाई खायचो, मेसचे जेवण देखील जेवायचो आणि या ठिकाणाचे नाव देखील शुगर पॉईंट आहे. तुझ्यासोबत मिठाई खाऊन माझी दिवाळी आणखी गोड झाली आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

या भूमीने शौर्याच्या शाईने इतिहासाच्या पानांवर स्वतःची कीर्ती स्वतः लिहिली आहे. येथील शौर्याची परंपरा तुम्ही अटळ , अमर आणि अखंड राखली आहे. तुम्ही  सिद्ध केले आहे – आसन्न मृत्यूच्या छातीवर, जे सिंहनाद करतात. काळ स्वतः मरतो मात्र ते वीर मरण पावत नाहीत. आपल्या जवानांना नेहमीच या शूर वसुंधरेचा वारसा लाभला आहे, त्यांच्या निधड्या छातीत कायम ती धग दिसून आली आहे जिने नेहमीच पराक्रमाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत.  जीवाची पर्वा न करता आपले जवान नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. सैनिकांनी नेहमीच सिद्ध केले आहे की  ते सीमेवर देशाची सर्वात मजबूत संरक्षक भिंत आहेत.

माझ्या वीर मित्रांनॊ,

भारताचे सैन्य आणि सुरक्षा दलांचे राष्ट्र उभारणीत निरंतर योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच अनेक युद्धात लढलेले आपले शूर योद्धे, प्रत्येक संकटात देशाची मने जिंकणारे आपले योद्धे! आव्हानांच्या जबड्यातून विजय हिसकावून आणणारे आपले शूर पुत्र आणि कन्या ! भूकंपासारख्या आपत्तीत प्रत्येक आव्हानाला तोंड देणारे जवान ! त्सुनामीसारख्या परिस्थितीत समुद्राशी लढत  जीव वाचवणारे शूरवीर! आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमांमध्ये भारताची जागतिक प्रतिमा उंचावणारे सैन्य आणि सुरक्षा दल! असे कोणते संकट आहे ज्यात आपल्या वीरांनी मदत केली नाही? असे कोणते क्षेत्र आहे जिथे त्यांनी  देशाचा मान वाढवला नाही? याच  वर्षी मी संयुक्त राष्ट्रात शांती सैनिकांसाठी एक स्मारक हॉल उभारण्याचा प्रस्ताव देखील मांडला आणि तो एकमताने मंजूर झाला. आपले सैन्य आणि सैनिकांच्या बलिदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे, जो  जागतिक शांततेसाठी त्यांचे योगदान अमर बनवेल.

मित्रहो,

संकटकाळात आपले सैन्य आणि सुरक्षा दले देवदूताप्रमाणे काम करतात आणि केवळ भारतीयच नाही तर परदेशी नागरिकांचीही सुटका करतात. मला आठवतंय ,जेव्हा भारतीयांना सुदानमधून बाहेर काढायचे होते ,तेव्हा किती धोके होते. मात्र भारताच्या शूरवीरांनी कोणत्याही हानीशिवाय यशस्वीपणे आपले ध्येय पूर्ण केले. तुर्कस्तानचे लोक आजही आठवण काढतात , जेव्हा तेथे भीषण भूकंप झाला तेव्हा आपल्या सुरक्षा दलांनी कशा प्रकारे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवले. जगात कुठेही भारतीय संकटात सापडले तर त्यांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्य, आपले सुरक्षा दल सदैव तत्पर असतात. भारताचे सैन्य आणि सुरक्षा दले युद्धापासून ते सेवेपर्यंत प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहेत. आणि म्हणूनच, आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे, आम्हाला आमच्या जवानांचा अभिमान आहे.  तुम्हा सर्वांचा आम्हाला अभिमान आहे.

माझ्या कुटुंबियांनो,         

जगातील सध्याच्या परिस्थितीत भारताकडून अपेक्षा सातत्याने वाढत आहेत. अशा महत्त्वाच्या काळात भारताच्या सीमा सुरक्षित राहणे आणि देशात शांततेचे वातावरण राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यात तुमची मोठी भूमिका आहे. जोपर्यंत भारताच्या सीमेवर तुम्ही शूरवीर हिमालयाप्रमाणे खंबीरपणे  उभे आहात  तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. तुमच्या सेवेमुळेच भारतभूमी सुरक्षित आहे आणि समृद्धीच्या मार्गावर आहे. गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंतचा हा कालावधी, एक वर्ष उलटून गेले आहे, हे वर्ष विशेषत: भारतासाठी अभूतपूर्व कामगिरीचे वर्ष ठरले आहे.

अमृत काळातले हे वर्ष भारताच्या सुरक्षा आणि समृद्धीचे प्रतीकात्मक वर्ष बनले आहे. गेल्या एका वर्षात भारताने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे जिथे इतर कोणताही देश पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काही दिवसांतच भारताने आदित्य एल वनचे  यशस्वी प्रक्षेपण केले . आपण गगनयानशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची चाचणीही यशस्वीपणे पूर्ण केली आहे.या एका वर्षात भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील झाली. याच वर्षात भारताने तुमकुरू येथे आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना सुरू केला आहे.  याच वर्षात  सीमावर्ती भागाच्या विकासासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू करण्यात आला.क्रीडा जगतातातही भारताने आपला झेंडा फडकावला आहे, हे आपण पहिलेच आहे. लष्कर आणि सुरक्षा दलांच्या कतीतरी जवानांनी पदके जिंकून लोकांचे मन जिंकले आहे. गेल्या वर्षभरात आशियाई आणि पॅरा गेम्समध्ये आपल्या खेळाडूंनी पदकांचे शतक झळकावले. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या महिला खेळाडूंनी विश्वचषक जिंकला. 40 वर्षांनंतर भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) बैठकीचे यशस्वीपणे आयोजन केले आहे.

मित्रहो,

गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंतचा कालखंड म्हणजे भारतीय लोकशाही आणि भारताच्या जागतिक कामगिरीचे वर्ष होते. या एका वर्षात भारताने संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. संसदेच्या नवीन इमारतीत पहिल्याच सत्रात नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाला. याच एका वर्षात नवी दिल्लीमध्ये जी-20 चे यशस्वी आयोजन झाले. आपण नवी दिल्ली जाहीरनामा आणि जागतिक जैव इंधन सहकार्य यासारखे महत्वाचे करार केले. या कालावधीत, रिअल-टाइम पेमेंटच्या बाबतीत भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनला. याच कालावधीत भारताची निर्यात 400 अब्ज डॉलरच्या पुढे गेली. या काळात भारत जागतिक जीडीपीमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला. याच कालावधीत आपण 5G वापरकर्त्यांच्या बाबतीत युरोपला मागे टाकले.

मित्रहो,

गेले एक वर्ष हे राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे. या वर्षात आपण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठे यश संपादन केले. आज भारत रस्ते नेटवर्क असलेला जगातील   दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे. याच काळात आपण जगातील सर्वात जास्त अंतराची रिव्हर क्रुझ सेवा सुरु केली. देशाला नमो भारत, ही आपली पहिली जलद रेल्वे सेवा भेट म्हणून मिळाली. भारतातील 34 नवीन मार्गांवर वंदे भारत रेल्वे गाडी वेगाने धावू लागली आहे. भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा शुभारंभ आपण केला. दिल्लीत यशोभूमी आणि भारत मंडपम या दोन जागतिक दर्जाच्या अधिवेशन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. QS जागतिक क्रमवारीत भारत हा आशियातील सर्वाधिक विद्यापीठे असलेला देश बनला आहे. याच काळात, कच्छमधील धोर्डो हे सीमावर्ती गाव, धोर्डो या वाळवंटी प्रदेशातील छोट्याशा गावाला संयुक्त राष्ट्रांचा बेस्ट टूरिज्म विलेज हा पुरस्कार मिळाला. आपले शांतिनिकेतन आणि होयसाळ मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले.

मित्रहो,

जोपर्यंत तुम्ही सीमेवर सतर्क आहात तोपर्यंत देश चांगल्या भविष्यासाठी परिश्रम घेत राहील. आज भारत संपूर्ण ताकदीने विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करत असेल, तर त्याचे श्रेय तुमची ताकद, तुमचे संकल्प, आणि तुमचे बलिदान यालाही मिळत आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

भारताने शतकानुशतके संघर्ष सहन केले आहेत आणि शून्यातून शक्यता निर्माण केल्या आहेत. एकविसाव्या शतकातील आपला भारत आता आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर पुढे पाऊल टाकत आहे. आता संकल्पही आपले असतील आणि साधन संपत्तीही आपलीच असेल. आता धैर्यही आपले असेल आणि शस्त्रेही आपलीच असतील. ताकदही आपली  असेल आणि पावलेही आपली असतील. प्रत्येक श्वासावर आपला पूर्ण विश्वासही असेल. खेळाडू आपला खेळही आपलाच, जय विजय आणि आपली प्रतिज्ञा अजिंक्य, उंच पर्वत असो वा वाळवंट, अथांग समुद्र असो की विस्तीर्ण मैदान, आकाशात फडकणारा हा तिरंगा ध्वज सदैव आपला आहे. या अमृत काळात वेळही आपली असेल, स्वप्न केवळ स्वप्न नसतील, ते पूर्णत्वाची एक गाथा लिहितील, पर्वताहूनही उंच संकल्प असेल. शौर्य हाच पर्याय असेल. आपली गती आणि अभिमान याचा जगात सन्मान होईल, प्रचंड यश मिळवून भारताची सर्वत्र प्रशंसा होईल. कारण, तो स्वबळावर युद्ध लढतो, ज्यांच्या हातात सत्ता असते ते स्वतःचे नशीब घडवतात. भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांची ताकद सातत्याने वाढत आहे. संरक्षण क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर अव्वल देश म्हणून वेगाने उदयाला येत आहे. एक काळ असा होता जेव्हा आपण लहान लहान गरजांसाठी इतरांवर अवलंबून होतो. मात्र आज आपण स्वतः बरोबरच आपल्या मित्र देशांच्या संरक्षण क्षेत्राच्या गरजाही पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. 2016 मध्ये जेव्हा मी या प्रदेशात दिवाळी साजरी करण्यासाठी आलो होतो, तेव्हापासून आजवर भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढ झाली आहे. आज देशात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे संरक्षण उत्पादन होत आहे आणि हा एक विक्रमच आहे.

मित्रहो,

आपण लवकरच अशा टप्प्यावर पोहोचू, जिथे गरजेच्या वेळी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे आपल्या लष्कर आणि सुरक्षा दलांचे मनोबल वाढले आहे. आपल्या सैन्याची आणि सुरक्षा दलांची ताकद वाढली आहे. हाय-टेक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण असो किंवा CDS सारख्या महत्त्वाच्या यंत्रणा असो, भारतीय लष्कर आता हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. तंत्रज्ञानाच्या या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला हे देखील सांगेन की तंत्रज्ञानाचा वापर करताना आपल्याला मानवी बुद्धीला नेहमीच त्यापेक्षा वरचे स्थान द्यायला हवे. तंत्रज्ञान मानवी संवेदनांवर कधीही मात करणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल.

मित्रहो,

आज स्वदेशी संसाधने आणि सीमावर्ती भागातील सर्वोच्च श्रेणीच्या पायाभूत सुविधाही आपली ताकद बनत आहेत. आणि यात नारी शक्ती देखील मोठी भूमिका बजावत आहे, याचा मला आनंद आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्करात 500 हून अधिक महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्यात आले आहे. आज महिला वैमानिक राफेलसारखी लढाऊ विमाने उडवत आहेत. युद्धनौकांवर प्रथमच महिला अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. सशक्त, सक्षम आणि साधनसंपन्न भारतीय सेना दले, जगात आधुनिकतेचे नवे आदर्श ठेवतील.

मित्रहो,

सरकार तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घेत आहे. आता आपल्या सैनिकांसाठी असे कपडे बनवण्यात आले आहेत, जे अमानवी तापमानातही पुरेसे संरक्षण देतील. आज देशात असे ड्रोन बनवले जात आहेत, जे सैनिकांची ताकदही बनतील आणि त्यांच्या प्राणांचे रक्षणही करतील. वन रँक वन पेन्शन-ओआरओपी अंतर्गत आतापर्यंत 90 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मित्रहो,

तुमचे प्रत्येक पाऊल इतिहासाची दिशा ठरवते हे देशाला माहीत आहे. तुमच्यासारख्या वीरांसाठीच म्हटले गेले आहे-

शूर वीर विचलित होत नाही,

क्षणभरही धीर सोडत नाही,

संकटांना हसत सामोरे जातो,

काट्यांतून मार्ग काढतो.

मला विश्वास आहे, तुम्ही असेच भारत मातेची सेवा करत रहाल. तुमच्या सहाय्याने देश विकासाची नवी शिखरे सर करत राहील. आपण एकत्र येऊन देशाचा प्रत्येक संकल्प पूर्ण करू. हीच कामना करतो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या बरोबर बोला-

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

भारत माता की– जय,

सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Jaydevi PS/Sushama/Rajashree/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai