पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंब अंदौरा, उना ते नवी दिल्ली या नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची पाहणी केली आणि रेल्वेगाडीतील सुविधांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण कक्षाची तसेच उना रेल्वे स्थानकाचीही त्यांनी पाहणी केली.
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील अंब अंदौरा रेल्वे स्थानकावर पंतप्रधानांसोबत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूरही उपस्थित होते.
या रेल्वेगाडीमुळे प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. तसेच उना ते नवी दिल्ली प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. अंब अंदौरा ते नवी दिल्ली पर्यंत धावणारी, ही देशातली रेल्वे ताफ्यात दाखल होणारी चौथी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे. अधिक हलकी आणि कमी कालावधीत उच्च गती गाठण्यात ही सक्षम आहे. वंदे भारत 2.0 अधिक प्रगत आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. उदाहरणच द्यायचे तर ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग फक्त 52 सेकंदात गाठते. हिचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत आहे. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन 392 टन आहे. आधी ते 430 टन होते. यात मागणीनुसार वाय-फाय कंटेंट सुविधाही आहे. प्रत्येक डब्यात 32 इंचाचे स्क्रीन आहेत. मागील आवृत्तीच्या 24 इंचाच्या तुलनेत प्रवाशांना ते माहिती आणि मनोरंजनाची अधिक सुविधा प्रदान करतात. वंदे भारत एक्स्प्रेस पर्यावरणस्नेही देखील आहे. यातील वातानुकूलन यंत्रणा 15 टक्के जास्त ऊर्जा कार्यक्षम आहे. ट्रॅक्शन मोटरच्या धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकुलनासह, प्रवास अधिक आरामदायक होईल. याआधी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या प्रवाशांना दिलेली साइड रिक्लायनर सीट सुविधा आता सर्व श्रेणींसाठी उपलब्ध करून दिली आहे. एक्झिक्युटिव्ह डब्यात 180 अंशात फिरणारी अतिरिक्त वैशिष्ट्यपूर्ण आसने आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन प्रारुपामध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (आरएमपीयू) आहे यात फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित केली आहे. सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ), चंदीगडच्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेतील जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासून मुक्त हवा शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी ही प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित केली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट सुविधा आणि विमानासारखा प्रवास अनुभव देते. हे प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात ट्रेनची टक्कर टाळण्याची देशात विकसित केलेली प्रणाली – कवच समाविष्ट आहे.
***
GopalC/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
The Vande Bharat train flagged off earlier today will improve connectivity and give an opportunity for many more people to explore the natural beauty and spirituality of Himachal Pradesh. pic.twitter.com/GZnqjmLEka
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2022