Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘हवामान-2021’संबंधी आयोजित नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

महामहीम राष्ट्राध्यक्ष बायडन,

मान्यवर सहकारी,

आणि या पृथ्वीवरील माझे बंधू-भगिनी,

नमस्कार !

ही परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानतो. आज संपूर्ण मानवता जागतिक महामारीचा सामना करत आहे. आणि त्याचवेळी आयोजित करण्यात आलेली ही परिषद म्हणजे, हवामान बदलाचे संकट अजूनही कायम असल्याचे योग्य वेळी स्मरण करून देणारी आहे.

किंबहुना, आज ‘हवामान बदल’ हे जगभरातील लक्षावधी लोकांसमोर प्रत्यक्षात उभे ठाकलेले संकटच आहे. त्यांच्या आयुष्यावर आणि उपजीविकेवर हवामान बदलाचे विपरीत परिणाम होत असल्याचे आपल्याला दिसते आहे.

मित्रांनो,

मानवतेला जर हवामान बदलाच्या संकटावर मात करायचे असेल, तर त्यासाठी ठोस कृतीशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला अशी कृती जलद गतीने, व्यापक स्तरावर आणि जागतिक आयाम लक्षात घेऊन करावी लागेल. आम्ही भारतात, या संदर्भातील आमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडत आहोत. 2030 पर्यंत 450 गिगावाट  शाश्वत उर्जानिर्मितीचे आमचे उद्दीष्ट, आमची वचनबद्धता दर्शवणारे आहे.

आमच्यासमोर विकासाची आव्हाने असतानाही आम्ही स्वच्छ ऊर्जा निर्मिती, ऊर्जा कार्यक्षमता, वनीकरण आणि जैव-विविधता जतन करण्यासंदर्भात अनेक पावले उचलली आहेत. आणि म्हणूनच, आम्ही अशा मोजक्या काही देशांपैकी आहोत ज्यांचे राष्ट्रीय निश्चित योगदान 2 अंश सेल्सियस तापमानाशी सुसंगत आहे.

आम्ही जागतिक पातळीवरही योगदान देत आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य, लीड आयटी आणि आपत्ती प्रतिबंधक पायाभूत संरचना सहकार्य विकसित केले आहे.

मित्रांनो,

हवामान बदल विषयक जबाबदार विकसनशील देश म्हणून, भारतात शाश्वत विकासाची आदर्श उदाहरणे निर्माण करणाऱ्या भागीदारांचे आम्ही स्वागत करतो. याचा, हरित अर्थव्यवस्था आणि स्वच्छ तंत्रज्ञान हवे असलेल्या इतर विकसनशील देशांनाही लाभ मिळू शकतो.

म्हणूनच, राष्ट्राध्यक्ष बायडन आणि मी संयुक्तपणे, ‘भारत-अमेरिका हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा अजेंडा 2030 भागीदारी’ सुरु करत आहोत. आम्ही एकत्रितरीत्या यासाठी गुंतवणूक उभी करू शकू, स्वच्छ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर आणि हरित सहकार्य साध्य करु शकू.

मित्रांनो,

आज, जेंव्हा आपण जागतिक हवामान बदलविषयक कार्यक्रमावर चर्चा करतो आहोत, त्यावेळी मला एक विचार आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन प्रमाण 60 % इतके असून जागतिक सरासरीपेक्षा ते कमी आहे. याचे कारण, भारतीयांची जीवनशैली आजही शाश्वत पारंपरिक पद्धतींशी जोडलेली आहे.

आणि म्हणूनच, मला हवामान बदलासंदर्भात मला जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यायचा आहे. शाश्वत जीवनशैली आणि ‘मूलभूत गोष्टींकडे परत चला’ हे मार्गदर्शक तत्व, कोविड नंतरच्या आपल्या आर्थिक धोरणाचा महत्वपूर्ण स्तंभ असायला हवा.

मित्रांनो,

यावेळी मला थोर भारतीय विचारवंत, चिंतक, धर्मगुरु स्वामी विवेकानंद यांचे वचन आठवते. ते म्हणाले होते, उठा, जागृत व्हा आणि आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका! आपण सर्वांनी मिळून हे दशक हवामान बदलविषयक ठोस कृतीचे दशक बनवूया.

धन्यवाद, खूप खूप धन्यवाद !

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com