Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हरियाणाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण

हरियाणाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण

हरियाणाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण


आज हरियाणा आपल्या सुवर्णजयंती कार्यक्रमांची सुरुवात करत आहे. अशा महत्वाच्या प्रसंगी सर्व हरियाणावासियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ! मुख्यमंत्री महोदय म्हणाले तसे हा महोत्सव कुठल्या एका पक्षाचा किंवा सरकारचा नाही, तर हा उत्सव प्रत्येक हरयाणवी नागरिकाचा आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस साजरा करणे, काही खास प्रसंग साजरे करणे, यातून त्याना नवे संकल्प करण्याची प्रेरणा मिळते. तसेच राज्यांचे वर्धापनदिन साजरे केले तर राज्याना आणि समाजाला असे नवे संकल्प करण्याची प्रेरणा मिळते.
या सुवर्णजयंती वर्षानिमित्त हरियाणातल्या सर्व नागरिकांनी 1966 साली हरियाणा राज्य निर्मितीच्या वेळी केलेल्या सर्व संकल्पांचा विचार करावा, त्यावेळी जी आंदोलने झाली, ते विचार मांडले गेले, त्या काळातली वर्तमानपत्रे, त्या काळातली माहिती या सगळ्याचा पुन्हा विचार करावा. आपण काय ध्येय्य निश्चित केले होते, आपल्या राज्याला कोणत्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट होते, आपण आता कुठे पोचलो आहोत? आणि आपल्याला अजून किती वाटचाल करायची आहे ? या सगळ्याचा यानिमित्त परामर्ष घ्यायला हवा, आपल्या प्रगतीचा लेखा जोखा मांडण्याची हीच योग्य वेळ आहे.

गेल्या पन्नास वर्षातल्या वाटचालीचा गौरव, या काळात राज्याला यशस्वी करण्यात प्रत्येकाने केलेले परीश्रम, गाजवलेला पुरुषार्थ, यातून हरियाणा आज या ठिकाणी पोचले आहे. मात्र १० वर्षांपूर्वी आपण ज्या गतीने वाटचाल केली तेव्हा ते चालू शकले. गावात खाटेवर बसून, नर्मविनोदी भाषेत, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगण्याची कला हरियाणाच्या व्यक्तीला अवगत असते. आपल्या ग्राम्य भाषेत तो मोठे गहन तत्वज्ञान सहजतेने सांगू शकतो.

तुमच्या या भूमीत मला अनेक वर्षे काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले, त्यामुळे मला या प्रदेशाची चांगली माहिती आहे. हरियाणा तसे तर अगदी छोटे राज्य आहे, मात्र जीवनाचे असे एकाही क्षेत्र नसेल जिथे हरियाणाच्या व्यक्तीच्या घामाचा सुगंध पोहोचला नाही. तसे तर हा प्रदेश शेतीसाठी प्रसिद्ध आहेत, इथले बहुतांश लोक शेती करतात, मात्र ज्या लोकांनी बाहेरच्या राज्यात जाऊन व्यापार उद्योग केले, त्यातही त्यांनी यश मिळवले.

अनेकांना वाटते की हरियाणाच्या गावातील लोक शेतीच करतात, मात्र या देशातील प्रत्येक १० जवानांमागे सेनेचा एक जवान तरी हरियाणाचा असतो. असे कुठलेही क्षेत्र नाही , की जिथे हरियाणाच्या लोकांनी त्यांच्या बलिदानातून आपली वेगळी ओळख निर्माण केली नाही. स्वामी दयानंद सरस्वती यांचाही हरियाणात मोठा प्रभाव आहे. आपल्याला अशी शेकडो कुटुंबे मिळतील जिथे आजही स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक येते. याच भूमीवर आणखीही अनेकांच्या नावाची छाया आपल्याला आजही जाणवते.

जगभरात कदाचित अनेक युध्दे झाली असतील, मात्र जगात कदाचित अशी एकाही युध्दभूमी नसेल जिथे एकाचा वेळी घनघोर युद्धात जीवनमरणाचा खेळ सुरु आहे तिथेच जीवनाच्या आदर्शांची हजारो वर्षांपर्यंत मार्गदर्शक ठरणारी गीता रचली गेली असेल. ही एक विलक्षण घटना आहे. तसे तर एखाद्या शांत ठिकाणी बसून चिंतन मनन केल्यावर असे जीवनविषयक तत्वज्ञान उमगू शकते, मात्र या युध्दभूमीचे वैशिष्ट्य बघा, युध्दाच्या मैदानावरही इथे जीवनाचे सार मांडता येऊ शकते.मात्र जे जितके मोठे असते ,तितकीच त्याच्यावर जबाबदारीही अधिक असते. माझ्या मनात नेहमीच एका खंत होती, की हा इतका संस्कारी प्रदेश, इतका सामर्थ्यवान प्रदेश, प्रत्येक पावलावर नव्याचे स्वागता करणारा, नव्या गोष्टी स्वीकारणारा प्रदेश, अशा प्रदेशात मुलीची तिच्या आईच्या गर्भातच हत्या केली जावी ? काय कारण असेल यामागे?

मी आज मनोहरलाल यांचे अभिनंदन करतो, हरियाणाच्या लोकांचेही अभिनंदन करतो, कारण जेव्हा मी “ बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाच्या शुभारंभाच्या वेळी मी हरियाणाच्या जनतेला मुलींच्या जीवनाची भीक मागितली होती. आणि आज मी समाधानाने सांगू शकतो, की हरियाणाच्या जनतेने या भावनेचा आदर केला. आज पूर्ण देशात स्त्री-पुरुष प्रमाणाच्या टक्केवारीत जी सुधारणा होते आहे, त्यात हरियाणाचा मोठा वाटा आहे.

मी त्या मातांचेही अभिनंदन करतो की, ज्यांनी त्यांच्या सुनेच्या गर्भात असलेल्या बालिकेचे सासूच्या नात्याने, आईच्या नात्याने, रक्षण करण्याचा संकल्प केला.

मी त्या ज्येष्ठाचेही अभिनंदन करतो, ज्यांनी हरियाणाच्या मुलीला यापुढे मारणार नाही, मारू देणार नाही असा संकल्प केला. आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी मेहनत करुन स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. आज या सुवर्णजयंती उत्सवाच्या प्रसंगी अशा सर्व ज्येष्ठांना, महिलांना मी वंदन करतो, त्यांचे अभिनंदन करतो. आणि या हरियाणाच्या सुकन्या केवळ हरियाणाच्या नाही, तर संपूर्ण भारताची शान आहेत. आज या प्रसंगी आपण प्रत्येकाने संकल्प करुया की मुलीला वाचवण्यात, स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यात आपण काहीही कसूर करणार नाही. नं मुलीला मारू दिले जाणार ना तिला जन्म देण्याचा मातेचा हक्क हिरावून घेतला जाणार. या संकल्पात बद्ध होण्याची हीच योग्य वेळ आहे.

मनोहरलाल यांचे मी आज अभिनंदन करतो की त्यांनी काही जिल्हे हागणदारीमुक्त घोषित केले. आपण कल्पना करा की २१वे शतक सुरु होऊन दिड दशक उलटून गेले तरी आजही आपल्या काही माता भगिनीना उघड्यावर शौचाला जावे लागते, यापेक्षा जास्त लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते ? या स्त्रिया लाजेमुळे एकतर सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर शौचाला जातात. त्याना याचा किती त्रास होत असेल ? तरीही त्या बिचाऱ्या तो त्रास सहन करतात. हा अक्षरशः जुलूम आहे. म्हणूनच मी हरियाणाच्या जनतेकडून आणि सरकारकडून अपेक्षा करतो की त्यांच्या राज्यात यापुढे एकाही महिलेला कधीच उघड्यावर शौचाला जावे लागू नये. खरे तर शक्य झाल्यास या सुवर्णजयंती वर्षातच संपूर्ण हरियाणा राज्य हागणदारी मुक्त करायला हवे. मला विश्वास आहे की हरियाणा सरकार हे करू शकेल ,नक्कीच करू शकेल.

आज हरियाणाने संपूर्ण देशाला नवी दिशा दिली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मनापासून अभिनंदन करतो . त्यांनी काही जिल्हे केरोसिनमुक्त बनवले. आठ जिल्ह्यांमध्ये केरोसिनचा पुरवठा सुरु होता, तो आता पूर्ण बंद करण्यात आला आहे. खरे तर आता वीज आली आहे, घरात गॅस जोडणी आहे, सिलेंडर आहे , असे असतानाही केरोसिनचा कोटा अजून का सुरु होता , कळत नाही. गरीब माणसे तर केरोसिन नेत नाही,दुसरेच कोणीतरी नेतात. कोणी मधले लोक, दलाल, रॉकेलचा काळाबाजार करणारे लोक हे अनुदानित दरातील केरोसिन घेऊन जात असत. आणि ते केरोसिन डीझेलमध्ये मिसळून देत, गाड्या चालवत त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असे. परदेशी चलनाचेही नुकसान होत असे, केरोसिनचा हा काळाबाजार थांबल्याने मोठे नुकसान कमी झाले आहे.

मी तर देशातल्या सर्व राज्य सरकारांना आग्रह केला आहे की तुम्ही केरोसिनचा वापर कमी करून त्याची बचत करा, त्यातून जेवढे पैसे वाचतील, त्यापेक्षा अधिक पैसे मी तुम्हाला देईन, मात्र केरोसिन वाचवा. आज हरियाणामध्ये आठ जिल्हे पूर्णपणे केरोसिनमुक्त झाले आहेत आणि मला असे सांगण्यात आले आहे की, मार्च महिन्यापर्यंत सगळ्या हरियाणातला केरोसिनचा काळाबाजार संपवला जाईल. हे उत्तम काम करण्यासाठी सुवर्णजयंती वर्षापेक्षा अधिक चांगला मुहूर्त कुठला असू शकेल?
मला याचा विशेष आनंद आहे की, सुवर्णजयंतीचा हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम नाही बनवला गेला. हा कार्यक्रम हरियाणाच्या जनतेसाठी एक संकल्प पर्व बनला आहे. जनसहभागातून हरियाणाचा विकास कसा करायचा, त्याला प्रगतीपथावर नेण्यात सर्व जनतेचे काही ना काही योगदान असायला हवे. हरियाणाच्या माझ्या प्रिया बंधू भगिनीनो, या सुवर्ण जयंतीच्या प्रसंगी जर हरियाणाचा प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे गेला , तर हरियाणा एकाच वेळी अडीच कोटी पावलं पुढे जाऊ शकेल. आणि जर सर्वानी दृढनिश्चय करून पुढे पाउल टाकले, तर हरियाणाच्या पुढे जाण्याची हिंमत कोण करू शकेल?

हरियाणाच्या जनतेने मग हा संकल्प करायला हवा की नको ? आपण सर्वानी हरियाणाला पहिल्या क्रमाकावर न्यायला नको की नाही ? आपले जे सामर्थ्य आहे, त्यात तर आपण पुढे आहोतच, मात्र अजून अशा काही शक्ती आहेत, सामर्थ्य आहे, ज्याची आपल्याला अजून पुरती ओळख पटलेली नाही. आपण त्या शक्तीना ओळखले पाहिजे, आणि केवळ आपणच नाही, तर तुमचा विकास झाला, तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या दिल्लीचाही विकास होईल, तुमच्या प्रगतीचा लाभ दिल्लीलाही होईलच. दिल्ली देशाची राजधानी आहे, जर दिल्लीचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. म्हणूनच, देशाचा विकास करण्याची संधी हरियाणाला आज मिळाली आहे. भौगोलिकदृष्ट्या हरियाणा अशा स्थानी आहे, की जिथून आपण देशाला ताकद देऊ शकतो. आणि म्हणूनच हा सुवर्णजयंतीचा उत्सव, विकासाच्या नव्या सीमारेखा ओलांडण्याचे संकल्प करणारा, सर्वसामान्य जनतेसाठी संकल्प निश्चित करणारा, बदलाची प्रेरणा देणारा, त्यासाठी कृतिबद्ध करणारा, असा असायला हवा. आणि जर आपण या भावनेने हा उत्सव साजरा करणार असू , तसे कार्यक्रम जनसहभागातून राबवणार असू, तर हा सोहळा केवळ एक उपचार नं राहता आपण त्यातून काहीतरी साध्य करू शकू जे आपल्या राज्याच्या दीर्घ विकासासाठी लाभदायक असेल.

तुम्ही बघा माझ्या मित्रानो, हरियाणामध्ये इतकी ताकद आहे, की हे राज्य देशालाही पुढे घेऊन जाईल. देशाच्या विकासाच्या गाडीचे इंजिन बनण्याची क्षमता हरियाणामध्ये आहे.

मी पुन्हा एकदा , जगभरात पसरलेल्या सर्व हरियाणावासियांचे , हरियाणात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो त्याना या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अपेक्षा करतो ,की आपण शांतता, एकता, सद्‌भावना या मंत्राने, खांद्याला खांदा लावून भावी पिढीचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करू.

जी स्वप्ने उराशी बाळगून हरियाणा राज्याची स्थापना करण्यात आली होती, त्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी एक मोठी उडी घेण्याची गरज आहे , हे लक्ष्य मनात ठेवून आपण जर पुढची वाटचाल केली तर हरियाणात आपले स्वप्न पूर्ण करण्याची नक्कीच ताकद आहे , असा मला विश्वास आहे. हरियाणा हे लक्ष्य नक्की पूर्ण करू शकतो. मला विश्वास आहे की, सुवर्णजयंती च्या या वर्षात आपण या नव्या उंचीला गाठत, नक्कीच स्वप्नपूर्ती करू. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद !!

N.Sapre/R.Aghor/Anagha