Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्विस संघ राज्याच्या राष्ट्राध्यक्ष डोरीस लेथू हार्ड यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

स्विस संघ राज्याच्या राष्ट्राध्यक्ष डोरीस लेथू हार्ड यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य


माननीय राष्ट्राध्यक्ष,

सन्माननीय पाहुणे,

प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी

माननीय राष्ट्राध्यक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.
महोदया,

भारत आपल्यासाठी नवीन नाही, आपण यापूर्वी अनेकदा भारत भेटीवर आहात. परंतु राष्ट्राध्यक्षा म्हणून आपली भेट अशावेळी होत आहे, जेव्हा आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला 70 वर्ष पूर्ण होण्याचा सोहळा साजरा करत आहोत. भारत-स्विस मैत्री आणि आस्थाना कराराला 7 दशकं पूर्ण होण्याची देखील ही वेळ आहे. तुमच्या या भेटीदरम्यान तुम्हाला तेच जोरदार स्वागत आणि आतिथ्याचा अनुभव येईल. जो आम्हाला 2016 च्या स्वित्झर्लंड दौऱ्यात अनुभवता आला हेाता.

सर्व स्तरावर घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याची दोन्ही देशांची इच्छा बघून मला खूप प्रसन्न वाटत आहे.
मित्रांनो,

आज आम्ही द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर व्यापक आणि सार्थ चर्चा केली. या भेटीमुळे आमचे मजबूत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत.

भारत आणि स्वित्झर्लंडसाठी भौगोलिक प्रसार आणि निरस्त्रीकरणासारखे विषय खूपच महत्त्वपूर्ण आहेत. या संदर्भात भारताला एमटीसीआरमध्ये सामील करून घेण्यासाठी स्वित्झर्लंडने दिलेल्या समर्थनाबद्दल खूप आभारी आहे.
आम्ही भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्यात झालेल्या व्यापार आणि आर्थिक सहकार्य करारावरही चर्चा केली. या करारातल्या अटींबाबत याआधीच चर्चेला प्रारंभ झाला आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे. दोन्ही बाजूंनी हा करार पूर्णत्वाला नेण्याबाबत कटीबद्धता दर्शवली आहे. आज जगासमोर आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता हा गहन चिंतेचा विषय आहे. मग ते काळा पैसा असो, हवाला असो किंवा हत्यारं आणि अंमली पदार्थांशी संबंधित पैसा असो. या जागतिक शापाला नष्ट करण्यासाठी स्वित्झर्लंडसोबतचे आमचे सहकार्य सुरूच आहे.

गेल्यावर्षी करारांसंबंधी माहितीच्या स्वयंचलित हस्तांतरणाबाबतच्या संयुक्त जाहीरनाम्यावर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या अंतर्गत स्वित्झर्लंडमधील अंतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही माहिती आम्हाला आपोआप उपलब्ध केली जाईल. थेट परदेशी गुंतवणूक आमच्या आर्थिक संबंधाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे आणि भारत स्विस गुंतवणूकदारांचे विशेष स्वागत करतो. यासंदर्भात एका नव्या द्विपक्षीय गुंतवणूक संधींबाबत चर्चा सुरू ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत आपमचे एकमत झाले आहे. भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या कंपन्यांसमोर अनेक संधी आहेत.

आज दोन्ही देशांतल्या व्यावसायिक क्षेत्रातल्या प्रतिथयश व्यक्तींशी झालेल्या चर्चेत आम्हाला असे जाणवले की त्यांच्यात परस्पर फायदा होण्यासाठी व्यावसायिक सहकार्य सतत वाढतं ठेवण्याची पूर्ण इच्छा आहे, भारतीय पारंपारिक औषधं, विशेषत: आयुर्वेद, आरोग्य आणि निरोगीपणाला चालना देण्यासाठी ते मोठी भूमिका बजावू शकतात. स्वित्झर्लंडने आयुर्वेदाला मान्यता दिल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि या महत्त्वपूर्ण क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य या क्षेत्रात लाभ व्हावा यासाठी संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला होता, ज्याचा पाच हजाराहून अधिक भारतीयांना फायदा झाला आहे. या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी आम्ही आणखी सहकार्य करण्याबाबत उत्सूक आहोत.

मित्रांनो,

वातावरण बदल या सर्वात मोठ्या आव्हानाचा सर्व जग सामना करत आहे. एकत्र परंतु भिन्न जबाबदारीचा सिद्धांत लक्षात घेऊन आम्ही पॅरीस करार लागू करण्याबाबत आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या पध्दती विकसित करण्यासाठी सहकार्याने काम करण्याबाबत सहमती झाली आहे. भारताला आपल्या स्वच्छ ऊर्जेच्या वाढच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अणु पुरवठादार गटाच्या अर्थात एनएसजीच्या सदस्यत्वामुळे सहाय्य होईल. या संदर्भात एनएसजी सदस्यत्व मिळण्यासाठी स्वित्झर्लंडच्या सातत्यपूर्ण समर्थनाबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देत आहे.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि 2022 पर्यंत 175 गिगा वॅट नवीकरणीय ऊर्जाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे आमचे प्रयत्न स्वच्छ ऊर्जा आणि हरित भविष्याच्या प्रती भारताची कटिबद्धता दर्शवते आहे.

महोदया,

मला विश्वास आहे की आपली भेट, आपले संबंध नवीन उंचीवर नेण्यासाठी सहाय्यक ठरेल. अत्यंत सार्थ चर्चेसाठी मी राष्ट्राध्यक्ष महोदयांना धन्यवाद देत आहे. येणाऱ्या काळात आपल्या सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.

मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो तसेच भारतातला आपला प्रवास सार्थक होवो अशी इच्छा व्यक्त करतो.
तुम्हाला खूप-खूप धन्यवाद!

B.Gokhale/J.Patankar/P.Kor