Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनातील ठळक मुद्दे

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनातील ठळक मुद्दे

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनातील ठळक मुद्दे


70व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

1) आजच्या या विशेष दिनी 125 कोटी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाला माझ्या शुभेच्छा. ही ऊर्जा येत्या काळात राष्ट्राला विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मार्गदर्शक ठरो.

2) महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरु यांच्यासह स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या अगणित वीरांचेही आपण स्मरण करतो.

3) भारतासमोर अनेक समस्या आहेत. हे खरे असले तरीही या समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता आपल्यात आहे.

4) आज कार्यापेक्षा सरकारच्या कार्य संस्कृती विषयी मी बोलू इच्छितो.

5) मागील सरकार शंका-कुशंकांनी घेरले गेले होते, मात्र आता असे नाही. आताचे सरकार आशा-आकांक्षांनी वेढले आहे.

6) स्वराजाचे सुराजात रुपांतर करणे ही आपली जबाबदारी आहे, त्याग, शिस्त आणि ठाम निर्णयाशिवाय याची पूर्तता होऊ शकत नाही.

7) आज धोरणाविषयी नव्हे, तर व्हिजन अर्थात आगामी काळातल्या धोरणांबाबतच्या दृष्टीबाबत मी बोलणार आहे. कामाचा वेग नव्हे, तर प्रगतीच्या खऱ्याखुऱ्या अनुभवाविषयी बोलणार आहे.

8) सुराज म्हणजे सामान्य माणसाची प्रगती, सामान्य माणसांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांप्रती संवेदनशील असलेले सरकार. जबाबदारी आणि उत्तरदायीत्व ही अशा सुराजाची मुळं आहेत.

9) आयकर अधिकाऱ्यांना घाबरणारी जनता विशेषत: मध्यम वर्गीय कुटुंबिय या परिस्थितीत आम्हाला बदल घडवायचा आहे.

10) देशातल्या दोन कोटी लोकांनी पारपत्रासाठी अर्ज केले आहेत. गरीब माणसालाही एक अथवा दोन आठवड्यात पारपत्र मिळत आहे.

11) यापूर्वी भारतात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी, व्यवसायाची नोंदणी करायची असल्यास त्यासाठी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागत असे. मात्र, या सरकारने ही प्रक्रिया इतकी सुलभ केली की, जुलैमधे 900हून अधिक रजिस्ट्रेशन करण्यात आली.

12) गट क आणि ड’साठी सुमारे 9 हजारपेक्षा जास्त जागांसाठी मुलाखती घेण्याची पद्धत रद्द करण्यात आली.

13) गेल्या 70 वर्षात जनतेच्या अपेक्षात बदल झाला आहे. धोरणे आणि खर्चाची आकडेवारी जाहीर करणे पुरेसे नाही. हाती प्रत्यक्ष काय लागले आहे हे आम्हाला दाखवायला लागेल.

14)या आधी प्रतिदिनी ग्रामीण भागात 55-77 किलोमीटर रस्ते तयार होत असत. आता प्रतिदिनी 100 किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार होतात.

15) एक राष्ट्र, एक ग्रीड आणि एक दर यावर आम्ही काम करत आहोत.

16) नवीकरणीय ऊर्जेवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.

17) सौर ऊर्जा क्षेत्रात 116 टक्के वाढ झाली आहे. ही अभुतपूर्व बाब आहे.

18) यापूर्वीच्या 30,000-35,000 किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या ऐवजी आता प्रतिदिनी किमान 50,000 किलोमीटरसाठी पारेषण वाहिन्या टाकल्या जातात.

19) गेल्या 60 वर्षात 14 कोटी लोकांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करुन देण्यात आला, तर केवळ गेल्या सात महिन्यात चार कोटी जनतेला या गॅस जोडण्या देण्यात आल्या.

20)निराशावादाकडे असलेला आपला कल नष्ट केल्यास आपल्याला चैतन्य मिळू शकते. संस्‍थात्मक पतजाळ्यात 21 कोटी लोकांना आणणे ही अशक्यप्राय कोटीतली गोष्ट वाटू शकेल, मात्र हे प्रत्यक्षात घडले आहे.

21) 18 हजार खेड्यांपैकी 10 हजारपेक्षा जास्त खेड्यांचे विद्युतीकरण झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव ते आपल्याबरोबर अनुभवत आहेत.

22)दिल्लीपासून केवळ तीन तासाच्या अंतरावर असणाऱ्या हाथरसमधल्या खेड्यात वीज पोचायला 70 वर्ष लागली.

23)एलईडी बल्ब 50 रुपयाला आपल्या सरकारने उपलब्ध करुन दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

24) चाबहार बंदरासाठी इराण, अफगाणिस्तान आणि भारत एकत्रित आल्याने अशक्य ती गोष्ट शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

25)चलनफुगवट्याचा दर 6 टक्क्यापर्यंत आम्ही काबूत ठेवला. देशात गेली सलग दोन वर्ष दुष्काळाचा मुकाबला करावा लागत आहे. डाळींचे उत्पादन ही चिंतेची बाब बनली आहे. अशातही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला आणि गरीब माणसाच्या थाळीची किंमत त्याला परवडेल अशी राखली.

26)गुरुगोविंद सिंगजी यांची 350वीं जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांनी म्हटले आहे, “ज्याने इतरांची सेवा केली नाही, त्याचे हात पवित्र असल्याचा विचार कसा केला जाऊ शकतो?” आपल्या शेतकऱ्यांना असे काम केले आणि गेल्या वेळेपेक्षा यावेळी डाळींचा पेरा दीडपटीने जास्त केला. सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे निराशेच्या परिस्थितीतही शेतकऱ्याने हे काम केले आहे.

27)आपल्या शास्त्रज्ञांनी उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या 131 प्रजातींचा शोध लावला आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. खतांचा तुटवडा ही बाब आता इतिहास जमा झाली आहे.

28)सरकारविषयी जग काय म्हणत यापेक्षा देशाची प्रतिमा काय आहे, याला मी जास्त महत्त्व देतो. पक्षापेक्षा राष्ट्र जास्त महत्त्वाचे आहे.

29)शासन सातत्यपूर्ण बाब आहे. आधीच्या सरकारने चांगले काम केलेले असेल, तर आम्ही ते पुढे सुरुच ठेऊ. प्रगतीच्या माध्यमातून बैठका घेतांना आधीच्या सरकारांनी सुरु केलेले 118 प्रकल्प ठप्प पडल्याची बाब लक्षात आली. यामुळे 10 लाख कोटी रुपयांचे 270 प्रकल्प अडकून पडले होते. हा क्रिमीनल हलगर्जीपणा असून, यातून बाहेर पडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

30)जेव्हा सुस्पष्टता असते, हेतू स्वच्छ असतो, तेव्हा निर्णय ठामपणाने होतात. उत्तर प्रदेशाबाबत बोलतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देण्यांबाबत नेहमी छापून येत असे. यावेळी आतापर्यंत या शेतकऱ्यांची 95 टक्के देणी चुकती करण्यात आली आहेत. उज्ज्वला योजने अंतर्गत 50 लाख कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

31) जागतिक अर्थ व्यवस्थेत आघाडीच्या स्थानी राहण्यासाठी आपण जागतिक तोडीचे राहायला हवे. व्यवसाय करण्यासाठी सुलभता आणणाऱ्या इझ ऑफ डूईंग बिझीनेस या उपक्रमाबाबत मानांकन देणाऱ्या संस्थांनी भारताची प्रशंसा केल्याचे आपण गेल्या काही दिवसात पाहिले असेलच.

32)रामानुजाचार्य यांनी म्हटले आहे, “एकाच दृष्टीने सर्वांकडे पहा, कोणाचाही अपमान करु नका.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधींजीनीही असेच म्हटले आहे. समाजाने भेदभाव केला तर समाज विखुरला जाईल. केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, तर सामाजिक समता जास्त महत्त्वाची आहे. सामाजिक कुप्रथांविरोधात आपल्याला एकत्रित लढा द्यायला हवा.

33)वस्तू आणि सेवा करामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल. या विधेयकाच्या मंजुरीबद्दल सर्व पक्षांचे आभार.

34) निर्णय अथवा गोष्टी लांबणीवर टाकण्यावर या सरकारचा विश्वास नाही. ‘वन रँक वन पेंशन’ अर्थात ‘समान हुद्दा समान निवृत्ती वेतन’ या वचनाची पूर्तता आम्ही केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज आम्ही खुले केले. यासंदर्भातल्या वचनाची पूर्तताही आम्ही केली.

35)विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. सर्वांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. सर्वांशी मिळून मिसळून रहाणे, या वैशिष्ट्यामुळे आपली संस्कृती सातत्यपूर्ण राहीली आहे.

36)आपल्या देशात हिंसाचाराला थारा नाही. हा देश दहशतवाद आणि नक्षलवाद कदापी सहन करणार नाही.

37)पेशावरमधल्या शाळेत निष्पाप मुलांची हत्या झाली, त्यावेळी भारतातल्या प्रत्येक शाळेला दु:ख झाले होते, प्रत्येक खासदारांच्या डोळ्यातही आसवे होती. यातून मानवी मूल्य प्रतिबिंबीत होत आहेत. याचवेळी दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणारी दुसरी बाजूही पहा.

38)दारिद्रयाशी लढा द्या, असे माझे शेजाऱ्यांना सांगणे आहे. दारिद्रयाशी लढा दिल्यानेच आपली एकत्रित भरभराट होईल.

39)गेल्या काही दिवसात बलुचिस्तान, पाक व्याप्त काश्मिरमधल्या गिलगिट इथल्या जनतेने माझे आभार मानले आहेत. ही बाब सव्वाशे कोटी भारतीय जनतेसाठी अभिमानास्पद आहे. बलुचिस्तान तसेच पाक व्याप्त काश्मिरातल्या गिलगिट मधल्या जनतेचे मी आभार मानतो.

40) स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

41)दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबांचा प्रतिवर्षी एक लाख रुपयांपर्यंतचा आरोग्यविषयक खर्च सरकार सोसणार आहे.

42) स्वातंत्र्य सैनिकांविषयी बोलतांना थोडक्या व्यक्तिंचाच इतरांपेक्षा वारंवार उल्लेख केला जातो. आपल्या आदिवासी बांधवांनी दिलेला लढा काहीसा अज्ञातच राहीला आहे. बिरसा मुंडा यांचे नाव आपण ऐकले असेलच. येत्या काही दिवसात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास संग्रहालयात मांडण्याचा आमचा विचार आहे.

43) एक समाज, एक अभियान, एक उद्दिष्ट

44) ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’

N. Sapre/N. Chitale/ D. Rane