Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ आणि मेरा युवा भारतच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ आणि मेरा युवा भारतच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

भारत माता की – जय !

गेल्या 75 वर्षांत जेवढा मोठा आवाज कर्तव्य पथावर घुमला नसेल, त्याहीपेक्षा अधिक मोठ्या आवाजात माझ्याबरोबर बोला –

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अमित भाई, किशन रेड्डी, अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, मीनाक्षी लेखी, निशीथ प्रामाणिक, देशभरातून येथे आलेले माझे सर्व तरुण सहकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनो!

आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य पथ ऐतिहासिक महायज्ञाचा साक्षीदार होत आहे.12 मार्च 2021 रोजी  दांडी यात्रा निघाली होती,12 मार्च 2021 रोजी  गांधीजींच्या प्रेरणेतून साबरमती आश्रमापासून सुरु झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आता  31ऑक्टोबर  2023, आज सरदार साहेबांच्या जयंतीदिनी इथे त्याचा समारोप होत आहे, हा समारोपाचा क्षण आहे. ज्याप्रमाणे दांडी यात्रा सुरु झाल्यानंतर देशवासीय त्यात सहभागी होत गेले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने इतका व्यापक लोकसहभाग पाहिला की नवा इतिहास रचला गेला.

दांडी यात्रेने स्वतंत्र भारताची ज्योत अधिक प्रज्वलित केली होती. 75 वर्षांचा हा प्रवास समृद्ध भारताचे स्वप्न साकार करणारा कालखंड ठरत आहे. 2 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या महोत्सवाची सांगता ‘मेरी माटी , मेरा देश’ अभियानाने होत आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारकाची पायाभरणीही झाली आहे. हे स्मारक भावी पिढ्यांना या ऐतिहासिक आयोजनाची  कायम आठवण करून देईल. उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल काही राज्ये, मंत्रालये आणि विभागांना पुरस्कारही देण्यात आले आहेत. मी सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि त्या राज्यातील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

एकीकडे, आज आपण एका महा-उत्सवाची सांगता करत आहोत, तर  त्याच वेळी, आपण एक नवीन संकल्प देखील सुरू करत आहोत. आज ‘माझी युवा भारत संघटना’ म्हणजेच ‘माय भारत’ची पायाभरणी करण्यात आली आहे. 21 व्या शतकात राष्ट्र उभारणीत ‘माझी युवा भारत संघटना’ मोठी भूमिका बजावणार आहे. यासाठी मी देशाचे आणि विशेषतः देशातील तरुणांचे अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान हे भारतातील तरुण कसे संघटित होऊ शकतात आणि प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानासोबत देशातील प्रत्येक गावातून, गल्लीतून कोट्यवधी तरूण जोडले गेले आहेत. अगणित भारतीयांनी त्यांच्या अंगणातील आणि शेतातील माती स्वतःच्या हातांनी अमृत कलशात भरली आहे. देशभरातून साडेआठ हजार अमृत कलश आज येथे पोहोचले आहेत. या अभियानांतर्गत कोट्यवधी भारतीयांनी पंचप्रणाची प्रतिज्ञा घेतली आहे. अभियानाच्या संकेतस्थळावर कोट्यवधी भारतीयांनी त्यांचे सेल्फीही अपलोड केले आहेत.

मित्रहो,

अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की मातीच का? मातीने भरलेले कलशच का? एका कवीने म्हटले आहे –

यह वह मिट्टी जिसके रस से, जीवन पलता आया,

जिसके बल पर आदिम युग से,मानव चलता आया।

यह तेरी सभ्यता संस्कृति, इस पर ही अवलंबित,

युगों-युगों के चरण चिह्न, इसकी छाती पर अंकित।

अनेक महान संस्कृती लोप पावल्या. मात्र भारताच्या मातीत जे चैतन्य आहे, भारताच्या मातीत जी प्राणशक्ती आहे, तिने या देशाला प्राचीन काळापासून आजतागायत संरक्षित ठेवले आहे. ही ती माती आहे जी आपल्या आत्म्याला देशाच्या कानाकोपऱ्यात आत्मीयता आणि अध्यात्माद्वारे जोडते. या मातीची शपथ घेऊन आपले वीर स्वातंत्र्यासाठी लढले. या मातीशी संबंधित अनेक किस्से  आहेत. शंभर वर्षांपूर्वी याच मातीत एक लहान मुलगा लाकूड पेरत होता. आणि जेव्हा त्याच्या वडिलांनी विचारले की तो काय पेरतोय, तेव्हा तो म्हणाला की तो बंदूक पेरत आहे. वडिलांनी विचारले की बंदुकीचे काय करणार, तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन. त्याच मुलाने मोठे होऊन जे सर्वोच्च बलिदान दिले, ते गाठणे आजही कठीण आहे. ते मूल दुसरे कोणी नसून वीर शहीद भगतसिंग होते. याच मातीसाठी एक सैनिक म्हणाला होता-

”दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त,

मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी”

शेतकरी असेल, शूर सैनिक असेल, असे कुणी आहे का ज्याचे रक्त आणि घाम यात मिसळलेला नाही. या मातीबद्दल असे म्हटले आहे की, चंदन ही या देशाची माती आहे, प्रत्येक गाव हे तपोभूमी आहे. माती स्वरूप हे चंदन आपल्या कपाळावर लावण्याची आपली सर्वांचीच इच्छा असते. हेच आपल्या मनात 24 तास चालू असते.

जो माटी का कर्ज़ चुका दे, वही ज़िन्दगानी है।।

जो माटी का कर्ज़ चुका दे, वही ज़िन्दगानी है।।

म्हणूनच इथे जे अमृत कलश आले आहेत, त्यातील मातीचा प्रत्येक कण अमूल्य आहे. आपल्यासाठी सुदामाच्या शिदोरीतील पोह्यांप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे शिदोरीतल्या पोह्यांच्या मुठीत इहलोकाची संपत्ति समाहित होती, त्याचप्रमाणे या हजारो अमृत कलशांमध्ये देशातील प्रत्येक कुटुंबाची स्वप्ने, आकांक्षा, अगणित संकल्प आहेत.  देशातील प्रत्येक घर-अंगणातून जी माती इथे पोहचली आहे, ती आपल्याला कर्तव्य भावनेचे स्मरण करून देत राहील. ही माती आपल्याला विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आणखी परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. 

संकल्प आज हम लेते हैं जन जन को जाके जगाएंगे,

सौगंध मुझे इस मिट्टी की, हम भारत भव्य बनाएंगे।

मित्रहो, 

या मातीबरोबर देशभरातून जी रोपे आली आहेत, त्यातून इथे अमृत वाटिका उभारण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन आताच करण्यात आले आहे. ही अमृत वाटिका, भावी पिढयांना एक भारत, श्रेष्ठ भारतची प्रेरणा देईल. खूप कमी लोकांना हे माहित असेल की नव्या संसद भवनात ‘जन जननी जन्मभूमि’ नावाची एक कलाकृती आहे. देशभरातील 75 महिला कलाकारांनी देशाच्या प्रत्येक राज्यातील मातीपासून याची निर्मिती केली आहे. ती देखील आपणा सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव जवळपास एक हजार दिवस चालला. या एक हजार दिवसांनी भारताच्या युवा पिढीवर सर्वात मोठा आणि सकारात्मक प्रभाव पाडला आहे. त्यांनी युवा पिढीला स्वातंत्र्याच्या मूल्याची जाणीव करून दिली आहे.

मित्रांनो,

तुमच्यासारखी मी सुद्धा, आजच्या पिढीने गुलामगिरी अनुभवली नाही. स्वातंत्र्यासाठीची ती तळमळ, ती जिद्द आणि त्यागही अनुभवलेला नाही. आपल्यापैकी अनेकांचा जन्म स्वातंत्र्यानंतरच झाला. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेला मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे. अमृत महोत्सवादरम्यान मलाही बरीच नवीन माहिती मिळाली. या काळात अनेक आदिवासी योद्ध्यांची नावे समजली. 

संपूर्ण देशाला उमगले की गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नाही असा एकही क्षण गेला नाही. कोणताही प्रदेश, कोणताही वर्ग या आंदोलनांपासून अलिप्त राहिला नाही. जेव्हा मी दूरदर्शनवर स्वराज मालिका पाहत होतो, त्यावेळच्या माझ्या भावना मी देशातील तरुणांमध्ये देखील पाहत आहे. या महोत्सवाने स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक कथांना उजाळा दिला आहे.

मित्रांनो,

संपूर्ण देशाने अमृत महोत्सवाला लोकोत्सव बनवले होते. हर घर तिरंगा अभियानाचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. देशातील कोट्यवधी कुटुंबांना पहिल्यांदाच जाणवले की त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या गावाचेही स्वातंत्र्यात सक्रिय योगदान होते. इतिहासाच्या पुस्तकात जरी त्याचा उल्लेख नसला तरी आता प्रत्येक गावात बांधलेल्या स्मारकांमध्ये आणि शिलालेखांमध्ये तो कायमचा कोरला गेला आहे. एक प्रकारे अमृत महोत्सवाने भावी पिढ्यांसाठी इतिहासाचे हरवलेले पान जोडले आहे.

स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय असलेल्या लढवय्यांचा जिल्हानिहाय डेटाबेसही तयार करण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू असो, वरकुटी चेन्नईया असो, तंट्या भिल्ल असो, तिरोत सिंह असो, अशा अनेक योद्ध्यांबद्दल जाणून घेण्याची संधी संपूर्ण देशाला मिळाली आहे. कित्तूरची राणी चेन्नम्मा, राणी गैडिनलियू, राणी वेलू नचियार, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, वीरांगना झलकारी बाई यांच्यापर्यंत देशाच्या स्त्री शक्तीला अमृत महोत्सवादरम्यान आम्ही वंदन केले. 

माझ्या कुटुंबियांनो,

जेव्हा हेतू प्रामाणिक असतो आणि राष्ट्र प्रथम ही भावना शिरोधार्य असते, तेव्हा त्याचे परिणामदेखील उत्तमात उत्तम मिळतात. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात भारताने ऐतिहासिक कामगिरीही साध्य केली आहे. शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा, कोरोना कालावधीचा आपण यशस्वीपणे सामना केला. या काळात आम्ही विकसित भारताच्या निर्मितीचा आराखडा तयार केला. अमृत महोत्सवादरम्यानच भारत जगातील 5वी मोठी आर्थिक शक्ती बनला. अमृत महोत्सवादरम्यानच मोठी संकटे असतानाही तो जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असणारा देश बनला. भारताने आपले चंद्रयान चंद्रावर उतरवले. भारताने ऐतिहासिक जी-20 शिखर परिषदेचे आयोजन केले. आशियाई खेळ आणि दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 100 पदकांचा विक्रम नोंदवला.

अमृत महोत्सवादरम्यानच भारताला 21व्या शतकातील संसदेची नवी इमारत मिळाली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक नारीशक्ती वंदन कायदा करण्यात आला. भारताने निर्यातीचे नवे विक्रम केले. कृषी उत्पादनात नवा विक्रम केला. या काळात वंदे भारत गाड्यांचाही अभूतपूर्व विस्तार झाला. रेल्वे स्थानकांचा कायापालट करणारी अमृत भारत स्थानक मोहीम सुरू झाली. देशाला पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रेन नमो भारत मिळाली. देशभरात 65 हजारांहून अधिक अमृत सरोवर बांधले गेले. भारतात मेड इन इंडिया 5G सुरु झाले आणि त्याचा सर्वात जलद विस्तार झाला. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनही याच काळात सुरू करण्यात आला. अगणित गोष्टी मी तुमच्यापुढे मांडू शकतो. 

माझ्या कुटुंबियांनो

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाने राजपथ ते कर्तव्यपथाचा प्रवासही पूर्ण केला आहे. गुलामगिरीची अनेक प्रतिकेही आपण काढून टाकली. आता कर्तव्य मार्गाच्या एका टोकाला आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. आता आपल्या नौदलाकडे छत्रपती वीर शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नवा ध्वज आहे. आता अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील बेटांना स्वदेशी नावे मिळाली आहेत.

या अमृत महोत्सवादरम्यान आदिवासी गौरव दिनाची घोषणा करण्यात आली. याच अमृत महोत्सवादरम्यान साहेबजादांच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस जाहीर करण्यात आला. अमृत महोत्सवादरम्यानच 14 ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून देशात पाळण्यात आला. 

माझ्या कुटुंबियांनो,

असे म्हणतात की – ‘अंतः अस्ति प्रारंभः’ म्हणजेच जिथून शेवट होतो, तिथून काहीतरी नवीन सुरूवातही होते. अमृत महोत्सवाची सांगता होत असताना ‘माय भारत’ संघटनेचा प्रारंभ होत आहे. माझी युवा भारत संघटन, माय भारत संघटना ही भारताच्या युवा शक्तीचा जयघोष आहे. हे देशातील प्रत्येक तरुणाला, एका मंचावर, एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे एक खूप मोठे माध्यम बनेल. यामुळे राष्ट्र उभारणीत देशातील तरुणांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित होईल. तरुणांसाठी जे विविध कार्यक्रम राबवले जातात त्या सर्वांचा त्यात समावेश केला जाणार आहे. आज माय भारत हे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. आजच्या तरुणांना मी सांगेन की, तुम्ही याच्याशी जास्तीत जास्त जोडले जा. भारताला नवीन उर्मी द्यावी, भारताला पुढे नेण्याचा संकल्प करावा, पुरुषार्थ गाजवावा, शौर्य दाखवावे आणि संकल्पपूर्ती करावी.

मित्रांनो,

भारताचे स्वातंत्र्य हे आपल्या समान संकल्पांची पूर्तता आहे. आपल्याला सर्वांनी मिळून त्याचे निरंतर रक्षण करायचे आहे. 2047 पर्यंत देशाला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना आपल्याला भारताला विकसित देश बनवायचे आहे. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होताना आजचा हा विशेष दिवस देशाला स्मरणात राहील. आम्ही घेतलेला संकल्प, येणार्‍या पिढीला दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आपल्याला आपले प्रयत्न अधिक वाढवायचे आहेत. विकसित देश होण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अमृत महोत्सवाच्या समारोपाने विकसित भारताच्या अमृतकाळाचा नवा प्रवास आपण सर्व मिळून सुरू करूया. तुमच्या स्वप्नांना संकल्प बनवा, तुमच्या संकल्पाला कठोर परिश्रमांची जोड द्या, 2047 मध्ये संकल्पांची पूर्ती करूनच दाखवा. तरुणांनो, हा संकल्प घेऊन वाटचाल करूया.

माझ्यासोबत म्हणा आणि आज या माझा युवा भारत संघटनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगतो की तुमचा मोबाईल फोन काढा, त्याचा फ्लॅश चालू करा. चोहीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा नवा रंगही, हा नवा उत्साहसुद्धा, ही नवी संधीदेखील आहे, माझ्यासोबत म्हणा-

भारत माता की -जय !

भारत माता  की -जय !

वंदे मातरम् !

वंदे मातरम् !

वंदे मातरम् !

खूप खूप धन्यवाद.

* * *

H.Akude/Sushma/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai