Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वागत या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

स्वागत या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन


नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2023

 

गुजरातमधील स्वागत या राज्यस्तरीय तंत्रज्ञान आधारित तक्रार निवारण उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी  दूरदृश्य प्रणालीद्वारे  सहभागी झाले होते. या योजनेला यशस्वी 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, गुजरात सरकार स्वागत सप्ताह साजरा करत आहे.

यावेळी पंतप्रधानांनी या योजनेच्या जुन्या लाभार्थ्यांशी संवादही साधला.

यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी स्वागत योजना सुरु करण्यामागचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे, नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निवारण तर करता आलेच, शिवाय मोठमोठ्या समुदायांच्या प्रश्नांनाही वाचा फोडता आली.

“सरकारचा दृष्टीकोन मैत्रीपूर्ण असावा तरच सामान्य नागरिक सहजपणे त्यांच्या समस्या सरकारसमोर मांडू शकतील”, असे पंतप्रधान म्हणाले. स्वागत उपक्रम आपल्या अस्तित्वाची 20 वर्षे पूर्ण करत असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आधीच्या अनुभवांची आठवणही केली.

नागरिकांचे परिश्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीला दिलेला उत्तम प्रतिसाद, यामुळेच स्वागत सारखे उपक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही योजनेच्या यशस्वितेचे प्राक्तन, त्यामागचे उद्दिष्ट आणि योजना राबवण्यामागची दृष्टी याद्वारे ठरत असते, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. जेव्हा 2003 साली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार अनुभव नव्हता, आणि सत्ता सर्वांना बदलून टाकते अशा टीकेचा त्यांनाही सामना करावा लागला, याची आठवण त्यांनी सांगितली. पण, सत्तेची जबाबदारी आल्यावरही आपण आपली कार्यपद्धती बदलायची नाही, याबद्दल माझ्या मनात स्पष्टता होती, असे त्यांनी सांगितले. “मी पक्के ठरवले होते, की मी स्वतःला खुर्चीच्या बंधनात बांधून घेणार नाही. मी लोकांमध्येच राहीन, आणि त्यांच्यातलाच एक बनून काम करत राहीन.” असे ते म्हणाले. याच निश्चयातून त्यांनी राज्यव्यापी तंत्रज्ञान आधारित तक्रार निवारण यंत्रणा (SWAGAT) स्थापन केली. लोकशाही संस्थांमध्ये सामान्य नागरिकांच्या विचारांचे स्वागत व्हावे, मग ते कायदे असोत किंवा उपाय असोत, ही स्वागतची कल्पना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “लोकांचे जीवनमान सुखकर करणे आणि प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवणे या विचारांवर स्वागत उपक्रम उभा आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारने प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुजरातच्या सुशासन मॉडेलने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.  ई-पारदर्शकता आणि ई-उत्तरदायित्व  म्हणून स्वागतच्या   माध्यमातून  सुशासनाचे प्रमुख उदाहरण सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.  संयुक्त राष्ट्रांकडून  स्वागतची   खूप प्रशंसा झाली आणि सार्वजनिक सेवेसाठी प्रतिष्ठित पुरस्कारही प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.2011 मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात स्वागतमुळे  गुजरातला भारत सरकारकडून ई-प्रशासनासाठी  सुवर्ण पुरस्कार मिळाला होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

“आम्ही स्वागतच्या माध्यमातून गुजरातच्या लोकांची सेवा करू शकलो हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार हा आहे  ”, असे पंतप्रधान म्हणाले.  स्वागतमध्ये आम्ही एक व्यावहारिक प्रणाली तयार केली.स्वागत अंतर्गत सार्वजनिक सुनावणीची पहिली यंत्रणा  ब्लॉक आणि तालुका स्तरावर तयार करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आणि राज्यस्तरावरची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेतल्याची माहिती त्यांनी  दिली. उपक्रम आणि योजनांचा प्रभाव आणि व्याप्ती  तसेच अंमलबजावणी करणार्‍या संस्था  आणि अंतिम लाभार्थी यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी त्यांना खूप मदत झाली. स्वागतने  नागरिकांना सक्षम केले आणि विश्वासार्हता संपादित केली , असे त्यांनी सांगितले.

स्वागत कार्यक्रम आठवड्यातून एकदाच होत असला तरी शेकडो तक्रारी असल्याने त्यासंबंधीचे काम महिनाभर चालायचे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ज्यांच्या तक्रारी इतरांपेक्षा जास्त वेळा नोंदवल्या गेल्या असे जर काही विशिष्ट विभाग, अधिकारी किंवा प्रदेश असतील तर त्या समजून घेण्यासाठी ते स्वतः विश्लेषण करत असत अशी माहितीही  पंतप्रधानांनी दिली. “एक सखोल विश्लेषण केल्यांनतर गरज भासल्यास धोरणांमध्ये सुधारणाही करण्यात आल्या”, “यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली.” असे मोदी म्हणाले.  समाजातील सुशासनाचे मोजमाप हे सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते आणि हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे, असे त्यांनी नमूद केले.

सरकारमधील प्रस्थापित मार्गांचे अनुसरण करण्याची जुनी धारणा स्वागत उपक्रमाने बदलली, असे पंतप्रधान म्हणाले. ” प्रशासन हे जुने नियम आणि कायद्यांपुरते मर्यादित नसून, नवोन्मेष  आणि नवीन कल्पनांमुळे प्रशासन घडत असते हे आम्ही सिद्ध केले आहे “, असे त्यांनी सांगितले. 2003 मध्ये त्यावेळच्या सरकारांनी ई-प्रशासनाला  फारसे प्राधान्य दिले नव्हते . कागदी दस्तऐवज आणि  प्रत्यक्ष फाइल्समुळे खूप विलंब आणि त्रास होत असे  तसेच  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या व्यवस्थेशी खूप कमी लोक परिचित होते. “या परिस्थितीत गुजरातने भविष्यवेधी   कल्पनांवर काम केले. आणि आज स्वागतसारखी यंत्रणा प्रशासनाच्या  अनेक उपाययोजनांची  प्रेरणा बनली आहे, याची आठवण मोदी यांनी करून दिली. अनेक राज्ये या प्रकारच्या यंत्रणेवर  काम करत आहेत. केंद्रात सरकारच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आम्ही प्रगती (PRAGATI) नावाची यंत्रणाही तयार केली आहे. गेल्या 9 वर्षांत प्रगतीने  देशाच्या वेगवान विकासात मोठी भूमिका बजावली आहे. ही कल्पना देखील ‘स्वागत’ च्या संकल्पनेवर आधारित आहे.   ‘प्रगती’ मंचाच्या माध्यमातून सुमारे 16 लाख  कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा आढावा आपण घेतला आहे आणि यामुळे अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.  

भाषण संपवताना पंतप्रधानांनी बीज अंकुरत जाऊन त्याचा मोठा वृक्ष होतो हे उदाहरण दिले. प्रशासनात हजारो अभिनव संशोधने घडवून आणण्यासाठी ‘स्वागत’ ही संकल्पना मार्ग तयार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशासारखे प्रशासन विषयक उपक्रम साजरे करण्यातून या उपक्रमांना नवे जीवन आणि उर्जा मिळते आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “लोकाभिमुख प्रशासनाचे मॉडेल होऊन हा मंच लोकांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवेल,” असे  पंतप्रधान भाषणात शेवटी म्हणाले.  

 

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून  स्वागत (State Wide Attention on Grievances by Application of Technology-  राज्यव्यापी तंत्रज्ञान आधारित तक्रार निवारण यंत्रणा   ) या उपक्रमाची सुरुवात केली होती. राज्यातील जनतेच्या समस्या सोडविणे ही कोणत्याही मुख्यमंत्र्याची सर्वात पहिली जबाबदारी आहे यावर असलेल्या त्यांच्या गाढ विश्वासाच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला.याच निश्चयासह आणि जीवन जगण्यातील सुलभता वाढवण्याच्या बाबतीत तंत्रज्ञानामध्ये असलेल्या क्षमतेचा लवकर प्रत्यय आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारच्या पहिल्याच तक्रार निवारण यंत्रणेची सुरुवात केली.  

नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांतील तक्रारी वेगवान, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक आणि प्रशासन यांच्या दरम्यान सेतू म्हणून काम करणारी यंत्रणा असावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. काही काळ ‘स्वागत’  यंत्रणेची अंमलबजावणी झाल्यानंतर या यंत्रणेचा सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तनकारी प्रभाव दिसून आला आणि आता ही यंत्रणा लोकांच्या तक्रारी कागदविरहित, पारदर्शक आणि तंटामुक्त पद्धतीने सोडविण्यासाठी परिणामकारक साधन झाली आहे.

‘स्वागत’ यंत्रणेचे वैशिष्ठ्य  म्हणजे ही यंत्रणा सामान्य नागरिकाला त्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी मदत करते. दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि त्यात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधतात. तक्रारी सोडविण्यासाठी जलद कार्यवाहीच्या माध्यमातून जनता आणि प्रशासन यांच्यादरम्यान असलेली दरी भरून काढण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या यंत्रणेमध्ये, प्रत्येक तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवरील निर्णय कळवला जाईल याची सुनिश्चिती करण्यात येते. प्रत्येक तक्रारीवर काय कार्यवाही होत आहे याचे तपशील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातात. या यंत्रणेच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींपैकी 99% हून अधिक तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.

‘स्वागत’ ऑनलाईन यंत्रणेचे चार घटक आहेत: राज्यस्तरीय ‘स्वागत’, जिल्हास्तरीय ‘स्वागत’,  तालुकास्तरीय ‘स्वागत’, आणि गाव पातळीवरील ‘स्वागत’. मुख्यमंत्री स्वतः राज्यस्तरीय ‘स्वागत’ कार्यक्रमात भाग घेऊन जनतेच्या तक्रारींची सुनावणी घेतात. जिल्हा तहसीलदार जिल्हास्तरीय ‘स्वागत’चे तर मामलेदार आणि पहिल्या दर्जाचा अधिकारी तालुकास्तरीय ‘स्वागत’चे संचालन करतात. गाव पातळीवरील ‘स्वागत’ यंत्रणेमध्ये गावातील नागरिक त्यांच्या तक्रारी दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेदरम्यान तलाठी यांच्याकडे सादर करतात आणि त्यांच्या तक्रार निवारणासाठी त्यांचा समावेश तालुकास्तरीय ‘स्वागत’मध्ये करण्यात येतो. यासोबतच, जनतेसाठी लोकफरियाद नावाचा आणखी एक उपक्रम देखील राबविण्यात येतो ज्याच्या माध्यमातून नागरिक त्यांच्या तक्रारी ‘स्वागत’ मंचाकडे दखल करतात.

गेल्या काही वर्षांच्या काळात, ‘स्वागत’ ऑनलाईन कार्यक्रमाला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये सरकारी सेवांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिसाद या मूल्यांमध्ये सुधारणा केल्याबद्दल वर्ष 2010 मध्ये देण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सरकारी सेवा पुरस्काराचा समावेश आहे.  

 

 

 

 

 

* * *

S.Kakade/Radhika/Sonal C/Sanjana/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai