Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पंतप्रधान कार्यालयात स्वच्छतेच्या दिशेने केलेले प्रयत्न


स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पंतप्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियान पंधरवड्याची आज सांगता झाली. या अभियानाअंतर्गत 10,000 हून अधिक फाईली काढून टाकण्यात आल्या आणि महत्त्वाच्या असलेल्या 1000 फाईली भारतीय राष्ट्रीय पूराभिलेख खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आल्या.

पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान कार्यालयाच्या पश्चिमेकडील प्रवेश द्वारा जवळील बागेची साफ-सफाई आणि सौंदर्यीकरण करण्यात आले. भंगार आणि निरुपयोगी वस्तू टाकून देण्यात आल्या व ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.

मे 2014 मध्ये पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान कार्यालयाचे परिक्षण केले होते आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून उत्पादकतेत वाढ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्विकारल्यानंतर राबवण्यात आलेला हा तिसरा मोठा उपक्रम आहे.

पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करत उत्पादकता व स्वच्छतेसंबंधी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये पावती आणि फाईलींच्या प्रक्रियेच्या प्रमाणीकरणाचा समावेश आहे. कार्यालयात प्रत्यक्ष येणाऱ्या याचिका आणि ऑनलाईन येणाऱ्या याचिका वेगवेगळ्या करण्यात आल्या आहेत तसेच “इलेक्ट्रॉनिक मेल व्यवस्थापन प्रणाली” सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे याचिकांच्या प्रक्रियेला लागणारा एक महिन्यांचा कालावधी कमी होऊन एका दिवसावर आला आहे. याशिवाय, ऑन लाईन व्ही व्ही आय पी पत्र निरिक्षण प्रणाली, बैठक व्यवस्थापन प्रणाली आणि डॅश बोर्ड प्रणाली सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रणाली क्षमतेत वृद्धि झाली आहे आणि एखाद्या कामासाठी लागणारा वेळ देखील कमी झाला आहे.

मे 2014 पासून 1 लाखांहून अधिक फाईली काढून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे दोन खोल्या वैकल्पिक वापरासाठी उपलब्ध झाल्या आहेत. उपयोगात नसणाऱ्या वस्तूंचा लिलाव केल्यामुळे देखील दोन खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. कार्यालयीन वातावरण अधिकाधिक चांगले करण्यासाठी नवीन वर्कस्टेशन स्थापित करण्यात येत आहेत.

या प्रयत्नांमुळे साऊथ ब्लॉकमधे पंतप्रधान कार्यालयात 1800 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी झाली आहे. यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक विभागाच्या 50 अधिकाऱ्यांसाठी जागा उपलब्ध झाली आहे, जे याआधी साऊथ ब्लॉक मध्ये कार्यालयीन जागा उपलब्ध नसल्यामुळे रेल भवनमधून कामकाज करत होते.

स्वच्छतेसाठी आणि प्रणालीमधील सुधारणांसाठी राबवण्यात आलेले हे अभियान पंतप्रधानांच्या आदर्शांनी प्रेरीत असल्याचे येथे स्पष्टपणे निदर्शनाला येत आहे.

S. Mhatre / S.Tupe / M. Desai