Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सॅन होजे, कॅलिफोर्निया येथील डिजीटल इंडिया स्नेहभोजनाप्रसंगीचे 26 सप्टेंबर 2015 रोजीचे पंतप्रधानांचे भाषण

सॅन होजे, कॅलिफोर्निया येथील डिजीटल इंडिया स्नेहभोजनाप्रसंगीचे 26 सप्टेंबर 2015 रोजीचे पंतप्रधानांचे भाषण

सॅन होजे, कॅलिफोर्निया येथील डिजीटल इंडिया स्नेहभोजनाप्रसंगीचे 26 सप्टेंबर 2015 रोजीचे पंतप्रधानांचे भाषण


शंतनू, जॉन, सत्या, पॉल, सुंदर आणि व्यंकटेश तुम्हा सर्वांचे आभार.

तुम्हा सर्वांचे फार आभार !

मला खात्री आहे की हे पूर्व-नियोजित नाही. पण, व्यासपीठावर तुम्हाला भारत-अमेरिकादरम्यानच्या डिजीटल अर्थव्यवस्थेचे परिपूर्ण चित्र पाहायला मिळेल.

सर्वांना शुभसंध्या !

जर, जगाला नवा आयाम देण्यासाठी एका छताखाली कुठले संमेलन असेल तर हे आहे. मी याठिकाणच्या किंवा भारतातील सरकारी कार्यालयांविषयी सांगत नाही. कॅलिफोर्निया येथे येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. सूर्यास्त होताना पाहण्यासाठीचे हे जगातील कदाचित सर्वात शेवटचे ठिकाण असावे. पण, हे असे ठिकाण आहे ज्याठिकाणी नवनवीन संकल्पनांनी दिवसाची सुरुवात होते.

तुम्ही सर्वजण आजच्या संध्यासमयी आमच्यासोबत आहात ही अतिशय सन्मानाची बाब आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना मी दिल्ली आणि न्यूयॉर्कमध्ये भेटलो आहे, तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भेटलो आहे.

नव्या जगातील हे नवे शेजारी आहेत.

जर फेसबूक देश असेल तर, तर तो जगातील लोकसंख्यने तिसरा मोठा आणि सर्वाधिक जोडलेला देश असेल.

गुगलने आज शिक्षकांना कमी-प्रेरणादायी आणि आजोबांना जास्त आळशी बनवले आहे. ट्वीटरमुळे प्रत्येकजण पत्रकार झाला आहे.

आज तुम्ही जागे आहात की झोपला आहात, ही स्थिती महत्त्वाची नाही तर तुम्ही ऑनलाईन आहात की ऑफलाईन आहात हे महत्वाचे आहे. आजच्या तरुणाईसमोर सर्वात मोठा वादविवादाचा मुद्दा आहे तो अँड्रॉईड, आयओएस की विंडोज वापरायचे.

संगणकापासून ते संवादापर्यंत, मनोरंजनापासून शिक्षणापर्यंत, कागदपत्रांच्या प्रिंटींगपासून ते उत्पादनांच्या प्रिंटींगपर्यंत, आणि आता इंटरनेटचा वापर हा अगदी कमी काळात झालेला दीर्घ प्रवास आहे.

स्वच्छ ऊर्जेपासून ते उत्तम आरोग्यसेवा आणि सुरक्षित दळणवळण, तुम्ही काम करत असलेली प्रत्येक गोष्ट बदलत आहे.

आफ्रिकेत फोनच्या माध्यमातून पैशाचे हस्तांतरण होत आहे. लहान द्वीप राष्ट्रांना यामुळे साहसी प्रवास करावा लागत नाही तर आता सर्व एका क्लीकवर मिळत आहे.

भारतात दूर खेडेगावातील महिलेलासुद्धा आपल्या नवजात शिशूची काळजी घेणे सोपे झाले आहे. ग्रामीण भागातील बालकाला शिक्षण सहज उपलब्ध झाले आहे.

छोटा शेतकरीही आज आपल्या जमिनीच्या ताब्याविषयी आणि बाजारपेठेत मिळणाऱ्या किंमतीविषयी आश्वस्त झाला आहे. समुद्रावर मासेमारीसाठी जाणारा मच्छीमारही आज चांगल्या प्रमाणात मासळी पकडतो. तर, सॅन फ्रान्सिस्कोमधील तरुण उद्योजक स्काईपच्या माध्यमातून भारतातील आजारी आजीसोबत संवाद साधून तिचा भार हलका करतो.

हरियाणातील एका पित्याने सुरू केलेल्या “सेल्फी विथ डॉटर” या उपक्रमाने आंतरराष्ट्रीय जगताचे लक्ष वेधून घेतले.

तुम्ही सर्वजण करत असलेल्या कामामुळे हे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी माझे सरकार आल्यापासून आम्ही गरीबीविरोधात लढण्यासाठी, समावेशन आणि सबलीकरणाच्या नव्या युगासाठी संचारजाळे आणि मोबाईल फोन्सचा वापर करत आहोत, अल्पावधीतच 180 दशलक्ष नवी बँक खाती उघडली गेली. गरीबांसाठी थेट लाभ हस्तांतरीत योजना सुरू केल्या आहेत. बँकेपर्यंत न पोहचलेल्यांसाठी रक्कमेची तरतूद केली आहे. गरीबातील गरीब व्यक्तीला विम्याचा लाभ सहज मिळत आहे, तर सूर्यास्ताकडे झुकलेल्यांसाठी आम्ही निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे.

अंतराळ संशोधन तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर करुन, आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये सुशासनासाठी आणि जलद विकासासाठी 170 ऍप्लीकेशन्स निश्चित केली आहेत.

न्यूयॉर्कमध्ये मेट्रो प्रवासादरम्यान फोनवर भारतातील एखाद्या ग्रामीण भागातल्या कुशल कारागिराची कलाकुसर पाहून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. जेंव्हा झेक गणराज्यातील एखाद्या सदूर रुग्णालयातील रुग्णावर दिल्लीतून हृदय शस्त्रक्रिया केली जात असेल, जसे मी बिष्केकमध्ये पाहिले. आम्हाला जाणीव आहे, आम्ही अशा गोष्टींची निर्मिती करत आहोत, जेणेकरुन आमचे आयुष्य बदलले आहे.

ज्या वेगाने लोक डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, त्याने आमच्या वय, शिक्षण, भाषा आणि उत्पन्नाविषयीच्या पारपंरिक समजांना तडा बसला आहे. मला गुजरातमधील एका खेडेगावात आदिवासी महिलांसोबत झालेला संवाद आठवतो. दूध शीतकरण प्रकल्पाच्या माझ्याकडून होत असलेल्या उदघाटनावेळी त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे फोटो घेण्यासाठी त्या मोबाईल फोनचा वापर करत होत्या. हे फोटो घेऊन तुम्ही काय करणार, असे मी त्यांना विचारले. त्यांनी दिलेले उत्तर माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. त्यांनी सांगितले या फोटोंची संगणकावरुन प्रिंट घेणार आहेत. हो, त्या डिजीटल जगताच्या भाषेशी अवगत होत्या.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वॉटसऍप ग्रूप केला आहे, त्यावर शेतीसंबंधी माहितीची देवाणघेवाण केली जाते.

निर्मात्यांपेक्षा आज ग्राहकच एखाद्या उत्पादनाची उपयुक्तता ठरवत आहे. जग जरी त्याच प्राचीन प्रेरणेनुसार चालत असले तरी. मानवी संघर्ष आणि यशोगाथा आपण कायम पाहत राहू. मानवी वैभव आणि शोकांतिकाही पाहायला मिळतील.

मात्र, आज या डिजीटल युगात आपल्याला लोकांचे आयुष्य बदलण्याची संधी मिळाली आहे, जी दोन दशकांपूर्वी अवघड बाब वाटत होती. नुकत्याच पार पडलेल्या शतकापेक्षा निश्चितच आपल्याला यात वेगळेपण दिसून येते. आजही काही लोकांना वाटत असेल की डिजीटल अर्थव्यवस्था ही श्रीमंत, शिक्षित लोकांसाठीच आहे. पण, तुम्ही टॅक्सीचालकाला विचारा अथवा एखाद्या फेरीवाल्याला विचारा की त्याला फोनपासून काय मिळाले, ही चर्चा याठिकाणीच थांबेल. माझ्या मते तंत्रज्ञान हे सबलीकरणाचे साधन आहे जे आशा आणि संधी यांना जोडणारा सेतू आहे. सोशल मिडीयामुळे सामाजिक अडथळे दूर होत आहेत. तो लोकांना ओळखीच्या आधारे नाही तर मानवी मूल्यांच्या आधारे जोडण्याचे काम करतो.

आज, तंत्रज्ञान विकसित होत आहे ज्यामुळे नागरिक सक्षम होत आहे आणि एकेकाळी लोकशाहीत त्यांची घटनात्मक शक्ती काढून घेतली होती. तंत्रज्ञानामुळे सरकारांना मोठ्या प्रमाणात तपशील जाहीर करावा लागत आहे आणि 24 तासात नाही तर 24 मिनिटांमध्ये उत्तर द्यावे लागत आहे.

सोशल मिडीयाच्या विस्ताराचा प्रचंड वेग पाहिला तर तुमचा विश्वास बसणार नाही की ज्यांना आशा नव्हती त्यांच्या आयुष्यात वेगाने परिवर्तन झाले आहे. म्हणूनच मित्रांनो याच श्रद्धेतून डिजिटल इंडियाचा जन्म झाला आहे.

भारताच्या परिवर्तनासाठी हा महत्वाचा घटक ठरला आहे, कदाचित मानवी इतिहासात यापूर्वी कधीही नव्हता असा. यामुळे केवळ समाजातील दुर्बल, दूरस्थ आणि गरिबातील गरीब व्यक्तीचे आयुष्य बदलले असे नव्हे तर राष्ट्राची काम करण्याची आणि जगण्याची पद्धती बदलली आहे.

35 वर्षे वयापेक्षा कमी अशी 800 दशलक्ष युवकांची संख्या असलेला देश परिवर्तन आणि साध्यतेसाठी उत्सूक आणि उतावीळ झाला आहे.

आम्ही शासनपद्धती बदलू, जी अधिक पारदर्शक, जबाबदार, सहज उपलब्ध आणि सहभागात्मक असेल. मी ई-गव्हर्न्सबद्दल बोललो, जो चांगल्या सरकारसाठी प्रभावी आणि कमी खर्चिक असा आहे.

मी आता एम-गव्हर्न्स किंवा मोबाईल गव्हर्न्स बद्दल बोलणार आहे. ज्या देशात एक अब्ज लोकांकडे सेल फोन्स आहेत आणि स्मार्ट फोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, अशा देशासाठी हाच मार्ग आहे. विकास हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक करणे आणि व्यापक जन चळवळ निर्माण करण्याचे यात सामर्थ्य आहे. यामुळे शासन सर्वांच्या आवाक्यात येईल.

माय गव्ह.इन (MyGov.in) नंतर मी नुकताच नरेंद्र मोदी मोबाईल ऍप सुरू केला आहे. यामुळे मला लोकांसोबत राहण्यास मदत होत आहे. त्यांच्या सूचना आणि तक्रारींवरुन मला खूप काही शिकता आले.

प्रत्येक कार्यातील कागदपत्रांपासून नागरिकांना मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही पेपरलेस व्यवहार झालेले पाहू इच्छितो. प्रत्येक नागरिकाची वेगवेगळ्या विभागातील कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही डिजीटल लॉकर ही संकल्पना वापरणार आहोत.

ई-बिझ पोर्टलसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना व्यापार करणे सुलभ होईल त्यामुळे त्यांची ऊर्जा सरकारी प्रक्रियेवर नाही तर आपल्या उद्दिष्टांवर खर्ची होईल.

विकासाचा वेग आणि व्यापकता वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

माहिती, शिक्षण, कौशल्य, आरोग्यसेवा, जीवनपद्धती, आर्थिक समावेशकता, लघु आणि ग्रामीण उद्योग, महिलांसाठी संधी, नैसर्गिक स्रोतांचे जतन, वितरीत स्वच्छ ऊर्जा, या सर्व नवीन शक्यता आहेत ज्या विकासाचे नवे प्रारुप म्हणून समोर आल्या आहेत.

पण, यासाठी आपल्याला डिजीटल अंतर कमी करुन डिजीटल साक्षरता वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे.

तंत्रज्ञान सर्वांसाठी सहज उपलब्ध, सर्वांना परवडेल आणि मुल्यवर्धित असेल याची आपण खात्री दिली पाहिजे.

आम्ही आमच्या 1.25 अब्ज नागरिकांना डिजीटलच्या माध्यमातून जोडले पाहिजे. गेल्या वर्षी ब्रॉडबॅण्डच्या वापरात भारतभर 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. हीच पुढे वाढत न्यायची आहे.

राष्ट्रीय फायबर नेटवर्कचे जाळे विस्तारणे आणि त्यामाध्यमातून 6 लाख खेड्यांना ब्रॉडबॅण्डने जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय ब्रॉडबॅण्डच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीबरोबरच आय-वे उभारणीलाही महत्व आहे.

आम्ही वाय-फाय सुविधा केंद्रांचा विस्तार करणार आहोत. उदाहरणार्थ, केवळ विमानतळावर मोफत वाय-फाय असणार नाही तर रेल्वे स्थानकांवरही मोफत वाय-फाय उपलब्ध असेल. गुगलच्या सहकार्याने आम्ही थोड्याच दिवसांमध्ये 500 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहोत.

आम्ही गावांमध्ये आणि शहरांमध्ये सामुदायिक सेवा केंद्रांची उभारणी करणार आहोत. स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत.
आमची खेडी स्मार्ट आर्थिक केंद्रे झाली पाहिजेत आणि आमचा शेतकरी बाजारपेठेशी योग्यरितीने जोडला जाईल व त्याला नैसर्गिक संकटाचा कमीत कमी सामना करावा लागेल.

माझ्या दृष्टीने सुलभता म्हणजे सर्व माहिती स्थानिक भाषांमध्ये पुरवणे होय. 22 राजभाषा असलेल्या देशात ही प्रचंड मोठी व तितकीच महत्वाची बाब आहे.

आमच्या यशासाठी उत्पादन आणि सेवांची परवडणाऱ्या दराने उपलब्धता महत्वाची आहे. याला अनेक आयाम आहेत. आम्ही भारतात उत्पादनक्षेत्राला चालना देऊ जेणेकरुन परवडण्याजोगी उत्पादने तयार होतील. हाच आमच्या मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया, डिजाईन इन इंडिया योजनेचा भाग आहे.

तंत्रज्ञानाचा आमच्या आयुष्यात शिरकाव झाला म्हणजे आम्हाला तपशीलाची गोपनीयता, सुरक्षितता, बौद्धीक संपदेचे रक्षण, सायबर सुरक्षा याला महत्वाचे स्थान देत आहोत.

म्हणूनच डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार काहीसा तुमच्यासारखाच विचार करत आहे.

म्हणून, सेवांसाठी पायाभूत सुविधा पुरवताना, उत्पादननिर्मितीपासून ते मनुष्यबळ विकासापर्यंत, सरकारला मदत करण्यापासून ते डिजीटल साक्षरता वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, डिजीटल इंडिया तुमच्यासारख्या सायबर जगतासाठी फार मोठी संधी आहे.

हे कार्य फार मोठे आहे, मोठी आव्हाने आहेत. पण, आम्हाला माहित आहे, नवीन रस्त्यांशिवाय आम्ही नवीन ध्येय गाठू शकत नाही.

आमच्या स्वप्नातील बहुतांश भारताची अजून बांधणी व्हावयाची आहे. म्हणून, आम्हाला आता तो मार्ग चोखाळण्याची संधी आहे.

आणि आमच्याकडे यशस्वी होण्यासाठी प्रतिभा, उद्योजक आणि कौशल्य आहे.
भारत-अमेरिका दरम्यान असलेल्या भागीदारीची शक्ती आपल्या पाठिशी आहे.
ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भारत-अमेरिकेने एकत्रितरित्या कार्य केले आहे. तंत्रज्ञानाचे अमर्याद सामर्थ्य त्यांच्यामुळे आम्हाला माहित झाले आहे.

मोठ्या उद्योजकांपासून ते तरुण उद्योजकांपर्यत, प्रत्येकजण डिजीटल इंडियाच्या यशोगाथेचा वाटेकरी होऊ शकतो.

मानवतेच्या एक षष्टांश असलेल्या लोकांसाठी शाश्वत विकास ही जगासाठी आणि आपल्या वसुंधरेसाठी मोठे कार्यदल ठरणार आहे.

आज आपण भारत-अमेरिका भागीदारीबद्दल बोलत आहोत, ही या शतकाची व्याख्या बदलणारी भागीदारी आहे. ती दोन मुख्य कारणांवर आधारित आहे. दोन्ही इथे कॅलिफोर्नियात पाहायला मिळतील.

आपण सर्वजण जाणतो की या शतकाची दिशा अत्यंत गतीशील असा आशिया पॅसिफिक प्रदेश ठरवणार आहे. भारत आणि अमेरिका जगातील दोन सर्वात मोठे लोकशाही देश या दोन्ही प्रदेशांच्या दोन टोकांवर वसलेली आहेत.

या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि भरभराट याची जबाबदारी आमची आहे.
आमचे संबंध हे युवाशक्ती, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पनांच्या माध्यमातून ओळखले जाणार आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यानची भागीदारी प्रज्वलित होणार आहे आणि दोन्ही देशांमध्ये भरभराट निर्माण होणार आहे.

आणखी म्हणजे, या डिजीटल युगात जगाचे भविष्य अधिक शाश्वत बनवण्यासाठी आम्ही आपल्या मुल्यांवर आणि भागीदारीवर जोर दिला पाहिजे.

धन्यवाद.

S.Thakur/M. Desai