Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिल्वासा येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिल्वासा येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिल्वासा येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिल्वासा येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,

आज प्रधान सेवक म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्यामध्ये उपस्थित झालो आहे. पण त्यापूर्वी देखील हे दमण असेल, दीव असेल किंवा सिल्वासा असेल, येथील ही गावे असतील, ही काही माझ्यासाठी नवी नाहीत. कित्येकदा येथे येण्याची संधी मिळाली आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या रस्त्यांवर कधी स्कूटरवरून फिरण्याची संधी मिळायची. येथील जेवण-खाण, रितीरिवाज, येथील नागली, हे सर्व काही जुने, जेव्हा कधी मी येथे येतो तेव्हा मला आठवत राहाते. तुमच्या प्रेमाने मला भरून टाकले आहे.

मित्रांनो 2017 मध्ये जेव्हा एप्रिल महिन्यात मी तुमच्यात आलो होतो तेव्हा अनेक प्रकल्पांचे भूमीपूजन केले होते. इतक्या कमी वेळात त्यातल्या बहुतेक प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे आणि आज त्यातील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येत आहे याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे. आज जेव्हा पुन्हा एकदा मी तुमच्यामध्ये उपस्थित असताना 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प, येथील दळणवळण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण, पर्यटन, संस्कृती, परंपरा या सर्व पैलूंशी संबंधित येथील उद्योगांना चालना देण्यासाठी आज येथे नवे औद्योगिक धोरण आणि माहिती तंत्रज्ञान धोरण देखील सुरू करण्यात आले आहे. नव्या वर्षात या सर्व भेटींबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

बंधु आणि भगिनींनो, ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन वाटचाल करणारे केंद्र सरकार विकासाच्या पंचसूत्रीसाठी पूर्णपणे समर्पित आहे. बालकांना शिक्षण, युवकांना रोजगार, ज्येष्ठ नागरिकांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन आणि प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांकडे लक्ष पुरवणं हा आमच्या विकासाचा राजमार्ग आहे. गेल्या पाच वर्षात दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या भागांनी विकासाची नवी उंची गाठली आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. या दोन्ही भागांची स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आज दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या दोन्ही भागांनी स्वतःला हागणदारीमुक्त भाग म्हणून जाहीर केले आहे. आज दोन्ही भागांमधील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन आहे आणि दोन्हीही भाग केरोसिनमुक्त भाग म्हणून जाहीर झाले आहेत. आज दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व घरांमध्ये विजेच्या जोडण्या आहेत. पाण्याच्या जोडण्या आहेत. आज या दोन्ही भागात राहणारे जे गरीब प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळवण्यासाठी पात्र होते, त्यांना घरे मंजूर झाली आहेत. आज दोन्हीही भागांमधील जे लोक आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी बनण्यासाठी पात्र होते, त्यांना गोल्ड कार्ड जारी करण्यात आलेली आहेत.

मित्रांनो, जर मी गेल्या तीन वर्षांविषयी सांगायला गेलो तर हे सांगेन की या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. नऊ हजार कोटी… तुम्ही कल्पना करू शकता की आपले भाग कुठून कुठे पोहोचले आहेत. या निधीतून अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. अनेकांना पूर्ण करण्यात आले आहे. याच मालिके अंतर्गत आज येथे आरोग्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले आहे. तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली एक मागणी देखील पूर्ण झाली आहे. दादरा नगर हवेली दमण आणि दीव या भागांना आज देश स्वतंत्र झाल्यापासून इतक्या वर्षांनी आपले पहिले वैद्यकीय महाविद्यालय मिळाले आहे. आजपर्यंत दोन्ही केंद्रशासित राज्यांना एका वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी केवळ 15 जागा मिळत होत्या. आता प्रयत्नपूर्वक 150 जागा एकाच जागी मिळणाऱ्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरूवात होत आहे. याचा अर्थ असा नाही की नंतरच्या काळात केवळ 150 जागांवरच भागवले जाईल. जसे काम वाढेल विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढेल.

बंधु आणि भगिनींनो, हा देखील प्रयत्न सुरू आहे की कोणताही वेळ वाया न घालवता एका पर्यायी इमारतीच्या माध्यमातून याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येऊ शकेल. मला हे देखील सांगण्यात आले आहे की वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी सिल्वासा येथे निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुमारे अडिचशे आणि दमण येथे परिचारिकांच्या 50 जागांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रयत्नांमुळे युवा सहकाऱ्यांना तर फायदा होईलच पण त्याचबरोबर आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्यामध्ये मदत होणार आहे.

मित्रांनो, 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तयार होणाऱ्या या महाविद्यालया व्यतिरिक्त आरोग्य आणि निरोगी जीवन केंद्रांचे येथे जे जाळे उभारण्यात येत आहे त्यामुळे नेहमीच्या आजारांवर देखील घराच्या जवळच उपचार शक्य होणार आहेत. आयुष्मान भारत योजनांतर्गत अशा प्रकारच्या अनेक आरोग्य आणि निरोगी जीवन केंद्रांचे देखील येथे लोकार्पण करण्यात आले आहे.

बंधु आणि भगिनींनो, काही वेळापूर्वीच येथे आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या काही लाभार्थ्यांना कार्ड देण्यात आली आहेत. जगातील या सर्वात मोठ्या आरोग्य निगा योजनेची आज जगभरात चर्चा होत आहे. लोक या योजनेला मोदी केअर म्हणत आहेत. कारण या योजनेमुळे दररोज देशभरात दहा हजारांहून जास्त गरीबांना मोफत उपचार मिळत आहेत. या योजनेला सध्या 100 दिवसांपेक्षा थोडा जास्त कालावधी झाला आहे आणि इतक्या कमी कालावधीत आतापर्यंत सुमारे सात लाख गरीब रुग्णांना उपचार मिळाले आहेत.

मित्रांनो, औषधांबरोबरच शिक्षणाच्या सुविधांचा देखील विस्तार करण्यात येत आहे. काही वेळापूर्वीच येथे शिक्षणाशी संबंधित नव्या संस्था तुम्हाला समर्पित करण्यात आल्या आहेत. दीवच्या एज्युकेशन हबमुळे, येथील सर्व व्यवस्था येथील युवकांना घराच्या जवळच चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतील.

बंधु आणि भगिनींनो, औषधे आणि शिक्षणाबरोबरच सरकार यावर देखील भर देत आहे की कोणताही गरीब बेघर राहता कामा नये. डोक्यावर छपराविना त्याचे आयुष्य असू नये, त्याला राहण्यासाठी पक्के घर असले पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गाव आणि शहरातील गरिबांना आपले स्वतःचे पक्के घर देण्यासाठी एक व्यापक अभियान देशभरात चालवले जात आहे. या संकल्पाच्या दिशेने एक पाऊल उचलताना दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये आज अनेक घरांचे लोकार्पण करण्यात आले आहे. याशिवाय नव्या घरांच्या निर्मितीच्या कामाचे भूमीपूजनही काही वेळापूर्वीच करण्यात आले आहे, ज्यामध्ये दमणच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांसाठी तयार करण्यात आलेल्या गृह प्रकल्पाचाही समावेश आहे. आज ज्यांच्या घरांचे स्वप्न साकार झाले आहे आणि ज्यांची घरे बांधण्यात येत आहेत त्यांना मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देत आहे. नव्या वर्षात त्यांचे नव्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

मित्रांनो, गेल्या साडेचार वर्षात दादरा नगरहवेली सारख्या लहान भागात एक हजारपेक्षा जास्त शहरी गरिबांच्या घरांसाठी काम करण्यात आले आहे, घरे बांधण्यात आली आहेत. गेल्या साडेचार वर्षात ज्या बांधिलकीने ज्या निर्धाराने आणि ज्या प्रमाणात गरिबांची घरे बांधण्याचे काम सुरू आहे ती अभूतपूर्व आहे. पूर्वीच्या सरकारला आपल्या पाच वर्षांच्या काळात केवळ 25 लाख घरे बांधता आली होती, त्या तुलनेत आमच्या सरकारने आता पाच वर्षात एक कोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त घरांची उभारणी पूर्ण केली आहे. कुठे पाच वर्षात 25 लाख आणि कुठे पाच वर्षात एक कोटी 25 लाखांपेक्षा जास्त…

बंधु आणि भगिनींनो, या केवळ चार भिंती नाहीत, तर यामध्ये सौभाग्य योजने अंतर्गत वीजेची मोफत जोडणी देखील मिळते. शौचालय असते, स्वयंपाकघरात उज्वला योजने अंतर्गत मोफत एलपीजी गॅसची जोडणी दिली जाते. दादरा नगरहवेलीविषयी बोलायचे झाले तर येथे 13 हजार भगिनींना मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. याच प्रकारे अनेक सुविधा गरीबांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त सिद्ध होऊ लागल्या आहेत. सामान्य माणसाचे जीवन अगदी सहज आणि सुलभ व्हावे यासाठी देशात स्मार्ट व्यवस्थांची निर्मिती केली जात आहे. सिल्वासा आणि दीव शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी अनेक योजनांवर काम सुरू आहे. येथे रस्ते असावेत, गल्ल्या असाव्यात, मलनिस्सारण आणि पाण्याची व्यवस्था असावी, साफसफाईच्या सोयी असाव्यात या प्रत्येक पातळीवर काम होत आहे. काही वेळापूर्वीच स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले आहे.

मित्रांनो, सिल्वासा तर या संपूर्ण भागाच्या आर्थिक घडामोडींचे उर्जा केंद्र आहे. अनेक उद्योग येथे आहेत आणि भविष्यात देखील येथे अनेक प्रकारच्या उद्योगांच्या निर्मितीची संभावना आहे. सिल्वासा महानगरपालिकेची इमारत असेल, मलनिस्सारण प्रकल्प असेल, दळणवळण सोपे करणारे प्रकल्प असतील, हे सर्व येथील जनतेचे जीवन सुलभ करणार आहेत.

मित्रांनो, सिल्वासा बरोबरच दमण आणि दीवच्या विकासाला देखील गती मिळाली आहे. दमण गंगेवर बनलेला नवा पूल, नव्या मलनिस्सारण वाहिन्या आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसारख्या सुविधांमुळे दमणवासियांचे जीवन सुकर होणार आहे. दुसरीकडे मोठ्या दमणमध्ये बांधलेली सागरी भिंत आता समुद्राच्या लाटांच्या माऱ्यापासून तुमचे रक्षण करणार आहे. यामुळे जमिनीची धूप होण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे. मित्रांनो गेल्या वेळी मी जेव्हा येथे आलो होतो तेव्हा अनेक आदिवासी कुटुंबांमध्ये जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. आज देखील काही बांधवांना जमिनीची अधिकार पत्रे सोपवण्याची संधी मला उपलब्ध झाली आहे.

बंधु आणि भगिनींनो, जमीन असो, जंगलातील उत्पादन असो, शिक्षण असो, खेळाशी संबंधित गुणवत्ता असो, प्रत्येक स्तरावर आदिवासींच्या कल्याणासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. वनधन योजने अंतर्गत वनामधील जी उत्पादने आहेत त्यांना आणखी चांगला भाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांची योग्य प्रकारे प्रसिद्धी करण्यासाठी देशभरात केंद्रे बनवली जात आहेत. आदिवासी बंधुभगिनी वनांमधून जी उत्पादने गोळा करतात त्यांना योग्य किंमत मिळाली पाहिजे यासाठी समर्थन मूल्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

मित्रांनो, आदिवासींच्या उत्पन्नाबरोबरच त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी देखील गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत. आज देखील येथे इतिहास आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित अनेक प्रकल्पांचा प्रारंभ झाला आहे. सांस्कृतिक केंद्र असोत, प्राचीन किल्ल्यांचे संरक्षण असो , दीवमध्ये आयएनएस कुकरीशी संबंधित स्मारक स्थळ असो, निश्चितच ही बाब स्थानिक संस्कृतीचे संरक्षण आणि त्याच्या प्रचार- प्रसारात सिद्ध होणार आहे.

मित्रांनो, संस्कृती आणि गौरव, इतिहासातील ही स्मारके आपल्या भावनांची राखणदार तर आहेतच पण त्याचबरोबर ती युवकांसाठी रोजगारांच्या अनेक संधी देखील निर्माण करत आहेत. ती पर्यटनाला बळ देतात. दादरा आणि नगरहवेलीमध्ये पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. या भागाला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सरकार शक्य असलेले सर्व प्रयत्न करत आहे. सिल्वासामध्ये बनलेल्या दमण गंगा नदी प्रकल्पामागे हीच भावना होती. आता येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे आणखी एक केंद्र येथे बनून तयार आहे. याशिवाय येथे 200 चौरस किलोमीटचे राखीव वनक्षेत्र देखील आहे. हे वनक्षेत्र पर्यटन उद्योगासाठी वरदान आहे. मधुबन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलक्रीडांच्या प्रकारांमध्ये वाढ करता येऊ शकते. दादरा आणि नगरहवेलीमध्ये इंटरनेटच्या सेवा जास्त चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात यासाठी येथील प्रमुख पर्यटन केंद्रे आणि महत्त्वाच्या जागांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मित्रांनो, पर्यटनाबरोबरच पारंपरिक रोजगाराची साधने आणि संसाधनांला बळकटी दिली जात आहे. नील क्रांती योजनेंतर्गत मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे. मच्छिमार बंधुभगिनींना मासे पकडणे सोपे व्हावे, त्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मच्छिमारांच्या कौटुंबिक जुन्या पद्धतीच्या नौकांच्या जागी आधुनिक मोटरबोटी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. मत्स्य उत्पादनापासून व्यापारापर्यंतच्या व्यवस्था अधिक चांगल्या बनवण्यासाठी मच्छिमारांना सुलभ आणि स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करण्यासाठी एका विशेष निधीची स्थापना करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बंधु आणि भगिनींनो आज गरिबांसाठी, आदिवासींसाठी, मध्यमवर्गासाठी जितक्या योजना सुरू आहेत, त्यांचे मूळ ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रात आहे, हीच आमची प्रेरणा आहे. तर ज्या पक्षाने अनेक दशके सरकार चालवले तो पक्ष प्रत्येक कामात आपला म्हणजेच आपल्या कुटुंबाचा फायदा बघत होता. हेच कारण आहे की त्यामध्ये जास्तीत जास्त नावावर जोर देण्यात आला आहे.

मित्रांनो, या जुन्या सरकारी संस्कारकर्त्यां सवयी आम्ही बदलल्या आहेत. आम्ही नावाऐवजी कामावर लक्ष दिले आहे. आज सरकारी योजनांचे नाव काय असते आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा अनेक योजना आहेत. पण कुठेही मोदींचे नाव नाही आहे. आमची नीयत जनतेच्या विकासाची आहे हेच यातून दिसून येते, कुटुंबाच्या विकासाची ना आमची संस्कृती आहे ना आमचा उद्देश आहे आणि माझ्या साठी हे सव्वाशे कोटी लोकच माझे कुटुंब आहे आणि या सव्वाशे कोटी देशवासीयांचे कल्याण हाच माझ्यासाठी कल्याणाचा मार्ग आहे.

मित्रांनो हीच स्वच्छ नीयत आणि स्पष्ट धोरण यांना जरा खुपत आहे. मोदी सरकार जुन्या संस्कारांना बदलू लागल्याने यांना त्रास होऊ लागला आहे. त्यांची अडचण ही आहे की मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात इतकी कठोर कारवाई का करत आहेत. केली पाहिजे की नाही केली पाहिजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढले पाहिजे की नाही लढले पाहिजे? देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? यांची डोकेदुखी ही आहे की सत्तेच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या दलालांना मोदींनी बाहेर हाकलून का दिले. त्यांना यासाठी राग येत आहे की गरिबांचा अधिकार हिरावून घेणाऱ्या, त्यांचे रेशन, त्यांचे निवृत्तीवेतन, त्यांना मिळणारे अधिकार हडपणाऱ्या दलालांना मोदी हाकलून देत आहेत आणि याच रागामधून हे लोक एक महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती अशी आहे की जे लोक पूर्वी काँग्रेसवर सातत्याने टीका करायचे, दोष द्यायचे ते लोक देखील एका व्यासपीठावर आले आहेत.

मित्रांनो, ही महाआघाडी केवळ मोदींच्या विरोधात नाही तर देशाच्या जनतेच्या विरोधात देखील आहे. सध्या तर हे पूर्णपणे एकत्र देखील झालेले नाहीत. पण आपापल्या वाट्यासाठी कशा त्यांच्या वाटाघाटी, घासाघीस, आढावा आणि व्यवहार सुरू आहेत. हे देखील देशाचा युवक, देशाचा शेतकरी, देशाच्या महिला, पहिल्यांदाच मतदान करणार असलेला देशातील तरुण वर्ग या घडामोडी अतिशय बारकाईने पाहात आहे आणि त्यांच्या डोळ्यात कोणीही धूळ फेकू शकणार नाही.

मित्रांनो, या लोकांचे जग मोदी द्वेषाने सुरू होते आणि मोदींना शिव्या देऊन संपते. माझे जग, माझी पहाट सव्वाशे कोटी देशवासीयांच्या कल्याणाच्या संकल्पाने होते आणि दिवसभर घाम गाळून जेव्हा रात्री झोपी जातो, तेव्हा मनात हेच विचार असतात की आज किती चांगले काम केले. माझा आदि तोच आहे आणि अंत तोच आहे. यांचे जग आपल्या कुटुंबातील भाऊ, भाचे यांना पुढे नेण्यावर केंद्रित आहे आणि मोठ्या अभिमानाने त्याची घोषणा केली जात आहे. बंधु आणि भगिनींनो माझे जग तर माझे सव्वाशे कोटी देशवासी प्रगती करतील यासाठीच वेढलेले आहे. यांच्या जगात भारताच्या विकासाचा दृष्टिकोन नाही आहे. भारताच्या भविष्याचा विचार नाही आहे. तर दुसरीकडे भारताला 21व्या शतकातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्याचा माझा प्रयत्न आहे.

बंधु आणि भगिनींनो, आपले कुटुंब, आपली सल्तनत वाचवण्यासाठी यांनी कितीही आघाड्या बनवल्या तरी आपल्या कर्मांपासून त्यांना पळून जाता येणार नाही. त्यांची कुकर्मे प्रत्येक वळणा वळणावर त्यांचा पाठलाग करत आहेत, ते वाचू शकणार नाहीत. केवळ मोदींना विरोध हाच यांच्या स्वार्थी राजकारणाला वर्तमानपत्रांमध्ये जागा देईल, प्रसारमाध्यमांमध्ये ते झळकत राहतील, पण देशाच्या जनतेच्या हृदयात, देश उद्ध्वस्त करणारे कधीही जागा मिळवू शकणार नाहीत. बंधु आणि भगिनींनो तुम्हाला कदाचित माहित नसेल की जे लोक जनतेपासून दूर फेकले जातात, जनता जेव्हा त्यांचे वागणे बदलू लागते, जेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागते तेव्हा ते अस्वस्थ- व्याकुळ होतात. आता कलकत्त्याचे बघा ना…. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा केवळ एक आमदार आहे, किती? केवळ एक आमदार. पण तिथे भाजपापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण भारतभरातील लोक एकत्र झाले आहेत. एक आमदार असलेल्या पक्षाने, त्यांची झोप उडवली आहे कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. केवळ एक आमदार असूनही भारतामधली सगळी जमात तिथे एकत्र आली आहे आणि वाचवा वाचवा चे नारे देत आहे. पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पार्टीचे मी अभिनंदन करेन, एका आमदाराने, इतक्या लहानशा पक्षाने चुकीचे काम करणाऱ्यांची झोप उडवली आहे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे, घाबरून सर्व एकत्र झाले आहेत.

बंधु आणि भगिनींनो, हे लोक हुकूमशहाच नाहीत, पश्चिम बंगाल असो, केरळ असो, प्रत्येक नाक्यानाक्यावर जुलूमशाही आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्षाला त्यांचा कार्यक्रम करण्यावर प्रतिबंध लावले जातात, सर्व प्रकारची लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवली जाते, लोकशाहीचा गळा घोटला जातो आणि मग तिथे हे लोक एकत्र होऊन लोकशाही वाचवण्याची भाषणे देतात, तेव्हा मला इतकेच सांगायचे आहे की जेव्हा मी संपूर्ण पश्चिम बंगालचे चित्र पाहतो तेव्हा मी केवळ इतकेच सांगेन लोकशाहीचा खून करणारे, पंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांना ठार मारणारे, जेव्हा लोकशाही वाचवण्याची भाषआ करतात, तेव्हा माझ्या तोंडातून शब्द येतात “ वाह क्या सीन है” मित्रांनो ही लढाई सकारात्मक विचारसरणी आणि नकारात्मक दृष्टीकोन यांच्या दरम्यानची आहे. ही लढाई विकास आणि भ्रष्टाचार यांच्या दरम्यानची लढाई आहे, ही लढाई जनता आणि महाआघाडी यांच्यातील आहे.

बंधु आणि भगिनींनो, सकारात्मक विचारांच्या साथीने योग्य प्रयत्न हाच भारत निर्मितीचा मार्ग आहे. याच मार्गावर आपल्याला सर्वांना देशातील प्रत्येक नागरिकाला जलद गतीने चालायचे आहे. हीच सकारात्मकता नव्या वर्षात आपल्या मनामनात आणि मेंदूमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात वाढत चालली आहे. याच भावनेने देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या निर्णयाने आपण पुढे चाललो आहोत आणि बंधु आणि भगिनींनो तुम्ही पाहात असाल की मी सकाळपासून चालू लागलो आहे. भारतीय सैन्याला ‘ मेक इन इंडिया’ चा फायदा मिळावा, भारतीय लष्कराकडे मजबूत असा देशात बनलेला रणगाडा असावा, कधी सकाळी मला चिंता असते ती देशाच्या लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याची तर आज आता या ठिकाणी दीव दमण मध्ये येथील जनसुरक्षेसाठी, येथील युवा पिढीला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. बंधु आणि भगिनींनो एकीकडे लोक कलकत्त्यात एकत्र येऊन आपापले पक्ष वाचवण्याचा आटापिटा करत आहेत आणि दुसरीकडे मी तुमच्यात येऊन देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व काही समर्पित करून निव्वळ त्यामागे लागलो आहे. हा फरक आहे मित्रांनो, हा फरक स्पष्ट आहे, ते स्वतःला वाचवण्यासाठी आधार शोधत फिरत आहेत आणि मी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन निघालो आहे आणि आज एवढ्याश्या लहानशा दीव दमणमध्ये लाखोंच्या संख्येने येऊन तुम्ही जो आशीर्वाद दिला जे प्रेम दिले हीच भारताची वृत्ती आहे. हे दीव दमण म्हणजे लघु भारत आहे. भारताचा एखादा कोपरा असा नसेल जिथे लोक राहात नसतील. मी आता येत होतो, गाडीमधून येत होतो, पण दोन्ही बाजूला एक लघु भारत मी पाहिला. देशाच्या प्रत्येक राज्यातील लोक आपापले पोशाख घालून उभे होते, मी पायी चालत त्यांना नमस्कार करत तुमच्यामध्ये पोहोचलो बंधुंनो, कारण आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे. बंधु आणि भगिनींनो, आपल्या पक्षासाठी जीव देण्याची तयारी असणारे अनेक लोक असतील, देशासाठी आपला जीव देण्याची तयारी असलेले आम्ही तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी समर्पित आहोत, तुमच्या आशीर्वादासाठी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. माझ्या सोबत तुम्ही संपूर्ण ताकदीनिशी बोला,

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

खूप – खूप धन्‍यवाद।

B.Gokhale/S.Patil/D. Rane