Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंगापूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहिम,

पंतप्रधान ली सिन लुंग,

मान्यवर प्रतिनिधी,

माध्यम सदस्य,

सर्व प्रथम मी पंतप्रधान ली यांचे त्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल, भारताबरोबर संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आमच्या वैयक्तीक मैत्रीबद्दल आभार मानतो.

भारत-सिंगापूर संबंध खऱ्या अर्थाने धोरणात्मक भागिदारीच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. आमच्या संबंधांमध्ये कुठेही दडपण नाही, तर प्रेम, सौहार्द आणि विश्वास आहे. आज आमच्यात झालेल्या चर्चेत पंतप्रधान ली आणि मी आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील वाटचाली बाबत चर्चा केली.

आमच्या सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा दुसरा आढावा पूर्ण झाल्याबद्दल मला विशेष आनंद झाला आहे. मात्र आम्हा दोघांच्याही मते दुसरा आढावा हे आमचे उद्दिष्ट नाही, तर केवळ एक पडाव आहे. आमचे कार्यकारी अधिकारी लवकरच या करारात सुधारणा करण्यासाठी आणि या कराराचे नुतनीकरण करण्यासाठी चर्चा करतील.

सिंगापूर हा भारतासाठी परदेशी थेट गुंतवणुकीचा एक महत्वपूर्ण स्रोत आहे आणि भारतासाठी परदेशात करायच्या गुंतवणुकीसाठी प्राधान्य क्षेत्र आहे. भारतीय कंपन्या सिंगापूरचा वापर आसियान प्रांत आणि अन्य देशांसाठी स्प्रींग बोर्ड म्हणून करतात या बद्दल मला आनंद वाटतो. सिंगापूर मधील कंपन्यांची भारतातील गुंतवणूक वाढत आहे. भारताची प्रगती सिंगापूरला त्यांच्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अतुलनीय संधी उपलब्ध करुन देत आहे. काल संध्याकाळी सिंगापूर मधील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या गोलमेज चर्चेत भारताप्रती त्यांचा विश्वास पाहून मला आनंद झाला.

भारत आणि सिंगापूर दरम्यान हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे. उभय देश लवकरच द्विपक्षीय हवाई सेवेचा आढावा घेतील.

आमची डिजिटल भागिदारी सुरु झाल्याबद्दल आम्हा दोघांनाही खुप आनंद झाला आहे. अमर्यादित शक्यतांसह नैसर्गिक भागिदारीचे हे क्षेत्र आहे. रुपे, युपीआय आणि भिम आधारीत रेमिटन्स ॲपचा काल संध्याकाळी सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला. यातून डिजिटल भारत आणि या भागिदारीतील आमच्या तजेलदार भावनेची प्रचिती येते. डिजिटल भारत अंतर्गत आम्ही भारतात डेटा सेंटर धोरण निर्माण करणार आहोत.

नान यांग तंत्रज्ञान विद्यापीठात आज अनेक करारांवर माझ्या समक्ष स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. ज्यामुळे उच्च शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल. कौशल्य विकास, नियोजन आणि शहर विकास क्षेत्रातील आमच्या सहकार्यात चांगली प्रगती झाली आहे.

भारतातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी नवीन उपाययोजना आम्ही ठरवल्या आहेत. काल आणि आज आम्ही जे करार केले त्यामुळे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचेल. यामुळे ग्रामीण क्षेत्रासह भारतातील युवकांना लाभ मिळेल.

आमच्या धोरणात्मक भागिदारीत संरक्षण आणि सुरक्षेच्या महत्वावर आम्ही भर दिला आहे. या संबंधांमधील सातत्यपूर्ण वाढीचे आम्ही स्वागत करतो. सिमबेक्सच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त मी भारत आणि सिंगापूरच्या नौदलांचे अभिनंदन करतो. लवकरच आम्ही त्रिपक्षीय नौदल सराव सुरु करु. नियमित सराव आणि नौदल सहकार्य लक्षात घेऊन नौदलांदरम्यान पूर्ण झालेल्या लॉजेस्टिक कराराचे मी स्वागत करतो.

आगामी काळात सायबर सुरक्षा, दहशतवाद आणि उग्रवादाचा सामना करणे हे आपल्या सहकार्याचे महत्वपूर्ण क्षेत्र राहील. आपल्या देशांसाठी हे सर्वात मोठे धोके आहेत असे आम्ही मानतो.

जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांबाबत मी आणि पंतप्रधान ली यांनी चिंता व्यक्त केली. सागरी सुरक्षेबाबत आमच्या तत्वांचा आम्ही पुनरुच्चार केला आणि नियम आधारीत व्यवस्थेप्रती आमची कटिबद्धता अधोरेखित केली.

खुल्या, स्थिर आणि पारदर्शक आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धतीच्या गरजेवर आमचे एकमत झाले.

आसियान एकता, त्याचे केंद्र आणि प्रादेशिक शाश्वती आसियान प्रणित संस्थांच्या माध्यमातून राखण्याच्या महत्वावर आम्ही भर दिला. आरसीईपी करार लवकर पूर्ण करण्याबाबत भारताची कटिबद्धता मी व्यक्त केली आणि योग्य संतुलित आणि सर्वसमावेशक करार असेल, अशी आशाही व्यक्त करतो.

आज संध्याकाळी शांग्रीला संवादादरम्यान भारत-प्रशांत क्षेत्रामध्ये शांतता आणि समृद्धीबाबत भारताचा दृष्टीकोन मला मांडायचा आहे. शांग्रीला चर्चेसाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान ली यांचे आभार मानतो.

नेतृत्वाच्या यशस्वी बदलाबाबत मी पंतप्रधान ली आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. मला माहिती आहे की सिंगापूरचे नवीन नेते त्यांचा महान वारसा यापुढेही सुरु ठेवतील. आणि त्याच भावनेने तसेच जनसेवा करण्याच्या उद्देशाने या देशाला पुढे नेतील.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/S.Kane/D.Rane