व्यासपीठावर उपस्थित केंद्र सरकारमधील माझे सहकारी, मोबाईल आणि दूरसंचार उद्योगाशी संबंधित सर्व मान्यवर, सन्माननीय पाहुणे, बंधुंनो आणि भगिनींनो!
सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भेट होणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. 21 व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या जगात या कार्यक्रमात कोट्यवधी लोकांचे भाग्य बदलण्याची क्षमता आहे. एक काळ होता जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करत असू, तर त्याचा अर्थ पुढचे दशक, किंवा 20-30 वर्षांनंतरचा काळ, किंवा मग पुढचे शतक असा असायचा. मात्र, आज प्रत्येक दिवशी तंत्रज्ञानात वेगाने होत जाणाऱ्या परिवर्तनामुळे आपण म्हणतो, ‘भविष्य आता इथेच अवतरले आहे.’
आत्ता काही मिनिटांपूर्वी मी या प्रदर्शनात असलेले काही स्टॉल बघितले. या प्रदर्शनात मी त्याच भविष्याची झलक बघितली. दूरसंचार असो, तंत्रज्ञान असो, अथवा दळणवळण, 6G असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो, सायबर सुरक्षा असो, सेमीकंडक्टर्स असोत, ड्रोन किंवा अंतराळ क्षेत्र असो, खोल समुद्र असो, हरित तंत्रज्ञान असो, किंवा मग दुसरे क्षेत्र, येणारा काळ पूर्णपणे वेगळा असणार आहे. आणि ही अमल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, की आपली तरुण पिढी देशाच्या भविष्याचे नेतृत्व करत आहे, आपल्या तंत्रज्ञान क्रांतीची नायक बनत आहे.
मित्रांनो,
तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी आपण इथे 5G च्या उद्घाटनासाठी जमलो होतो. त्या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित होऊन भारताकडे बघत होते. शेवटी भारतात सर्वात वेगाने 5G सेवा सुरु झाल्या होत्या. मात्र त्या यशानंतर देखील आम्ही थांबलो नाही. भारताच्या प्रत्येक नागरीकापर्यंत 5G पोहोचविण्याचे काम आम्ही सुरु केले. म्हणजे आम्ही ‘सुरवात’ ते ‘सेवा पुरवठा’ या पातळीला पोचलो.
मित्रांनो,
5G ची सुरवात झाल्यानंतर एक वर्षातच भारतात जवळजवळ 4 लाख 5G बेस स्टेशन्स बनले आहेत. यात देशातील नव्वद टक्के शहरे आणि ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या समाविष्ट आहे. भारतात गेल्या एक वर्षात मिडीयन मोबाईल ब्रॉडबँडचा वेग जवळ जवळ 3 पट वाढला आहे. मोबाईल ब्रॉडबँडच्या वेगाचा विचार केला तर, भारतात एक काळ असा होता, एकशे अठरा पासून, आपण तिथेच अडकलो होतो, आज त्रेचाळीसाव्या स्थानावर आलो आहोत. आपण केवळ भारतात वेगाने 5G चाच विस्तार करत नाही आहोत, तर 6Gच्या क्षेत्रात देखील नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपल्याकडे 2G च्या काळात काय झाले होते, कदाचित नव्या पिढीला माहित नसेल. पण त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण, माध्यमं तेच धरून ठेवतील आणि दुसरी कुठलीच माहिती जनतेला देणार नाहीत. मात्र हे नक्की सांगेन, की आमच्या काळात 4Gचा विस्तार झाला, पण एकही डाग सुद्धा लागला नाही. मला विश्वास आहे आता 6G मध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल.
आणि मित्रांनो,
इंटरनेट जोडणी आणि वेग यात फक्त आकड्यांनी सुधारणा होत नाही. इंटरनेट जोडणी आणि वेग यांच्यात सुधारणा, जगण्याची सुलभता देखील वाढवतात. जेव्हा इंटरनेटचा वेग वाढतो, तेव्हा विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी सहजतेने ऑनलाईन जोडले जाऊ शकतात. जेव्हा इंटरनेटचा वेग वाढतो, तेव्हा डॉक्टरांशी टेलीमेडिसिनसाठी जोडले जाताना रुग्णांना त्रास होत नाही. जेव्हा इंटरनेटचा वेग वाढतो, तेव्हा पर्यटकांना एखादे ठिकाण शोधण्यासाठी नकाशांचा वापर करण्यात त्रास होत नाही. जेव्हा इंटरनेटचा वेग वाढतो, तेव्हा तेव्हा शेतकरी अधिक सुलभतेने शेतीचे नवीन तंत्रज्ञान शिकू शकतात, समजून घेऊ शकतात. जोडणीचा वेग आणि उपलब्धता, सामाजिक आणि आर्थिक दोनही प्रकारचे मोठे परिवर्तन घडवून आणते.
मित्रांनो,
प्रत्येक क्षेत्रात आमचा ‘लोकशाहीकरणा’च्या शक्तीवर विश्वास आहे. भारतात विकासाचा लाभ प्रत्येक वर्गाला, प्रत्येक क्षेत्राला मिळावा, भारतात स्रोतांचा लाभ सर्वांना मिळावा, सर्वांना सन्मानजनक आयुष्य मिळावे आणि सर्वांपर्यंत तंत्रज्ञानाचे लाभ पोचावे, या दिशेने आम्ही वेगाने काम करत आहोत, आणि माझ्या दृष्टीने हा सर्वात मोठा सामाजिक न्याय आहे.
नागरिकांसाठी, भांडवलाची उपलब्धतता, स्रोतांची उपलब्धता आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. मग ते मुद्रा योजने अंतर्गत विनातारण कर्ज असो, की स्वच्छ प्रसाधनगृहे, अथवा JAM Trinity मुळे होणारे थेट लाभ असोत. यात एक गोष्ट समान आहे.
यामुळे देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून दिले जात आहेत, जे पूर्वी मिळणे कठीण होते. आणि निश्चितपणे यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे.
भारत नेट प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 2 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडण्यात आले आहे.
आपल्या अटल टिंकरिंग लॅबमागे देखील हीच कल्पना आहे. 10 हजार प्रयोगशाळांच्या माध्यमातून सुमारे 75 लाख मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत. मला विश्वास आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये शंभर 5G यूझ केस लॅब सुरू करण्याच्या या अभियानातून देखील असाच विस्तार होणार आहे. नव्या पिढीला जोडण्याचा हा एक खूप मोठा उपक्रम आहे. आपले युवक कोणत्याही क्षेत्राशी जितके जास्त जोडले जातील तितक्या त्या क्षेत्राच्या विकासाच्या आणि त्या व्यक्तीच्या विकासाच्या संधी देखील अधिक असतील. या प्रयोगशाळा भारतातील युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती साध्य करण्याचा आत्मविश्वास देतात. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपले युवक, त्यांची उर्जा, त्यांचा उत्साह आणि त्यांच्या उद्यमशीलतेद्वारे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करू शकतात. बर्याचदा ते एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे अशा गोष्टी करून दाखवतील, ज्याबद्दल ते तंत्रज्ञान तयार करणाऱ्यांनी देखील कधी विचार केला नसेल. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पाहत होतो, आपल्या देशातील लोक कसे विचार करू शकतात आणि ड्रोनचा असा वापर देखील केला जाऊ शकतो, हे रामायणात दाखवले जात होते, हनुमानजींना वनौषधी आणण्यासाठी जायचे होते, तर त्यांनी हनुमानजींना ड्रोनवरून पाठवले. म्हणूनच हे अभियान आपल्या युवकांमध्ये नवोन्मेष संस्कृतीला चालना देण्याच्या दिशेनं एक स्वागतार्ह पाऊल आहे.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांमध्ये, भारतातील सर्वात महत्त्वाच्या यशोगाथांमध्ये आपल्या स्टार्टअप परिसंस्थेने खूप महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. इथे स्टार्टअपवाले काय करत आहेत? फार कमी वेळात, आपण युनिकॉर्नचे शतक साजरे केले आहे आणि आपण जगातील अव्वल -3 स्टार्टअप परिसंस्थांपैकी एक बनलो आहोत. 2014 मध्ये आपल्याकडे, मी 2014 का म्हणत आहे तुम्हाला माहिती आहे ना , ती तारीख नाही, तो एक बदल आहे. 2014 पूर्वी भारतात काही शेकड्यांमध्ये स्टार्टअप होते, मात्र आता ही संख्या 1 लाखाच्या आसपास पोहोचली आहे. स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया मोबाइल काँग्रेसने ASPIRE कार्यक्रम सुरू केला आहे ही देखील खूप चांगली गोष्ट आहे. मला विश्वास आहे की तुमचे हे पाऊल भारतातील युवकांना खूप उपयुक्त ठरेल.
मात्र मित्रहो,
या टप्प्यावर आपण किती दूरवर आलो आहोत आणि कोणत्या परिस्थितीत आपण इथपर्यंत पोहचलो आहोत हे देखील लक्षात ठेवावे लागेल. तुम्हाला 10-12 वर्षांपूर्वीचे मोबाईल फोन्स आठवतात. त्याकाळी जुन्या मोबाईल फोनची स्क्रीन वारंवार हँग व्हायची, असे व्हायचे ना , सांगा मला . तुम्ही स्क्रीन कितीही स्वाइप केलीत, कितीही बटणे दाबली तरी काही परिणाम व्हायचा नाही, बरोबर आहे ना ? आणि त्यावेळच्या सरकारचीही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था किंवा तत्कालीन सरकारच ‘हँग अप’ मोडमध्ये होते. आणि परिस्थिती इतकी बिघडली होती की रीस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता…बॅटरी चार्ज करूनही उपयोग नव्हता, बॅटरी बदलूनही काही उपयोग नव्हता. 2014 मध्ये, लोकांनी असे कालबाह्य फोन सोडून दिले आणि आता आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. या बदलामुळे काय झाले तेही स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावेळी आपण मोबाईल फोन्सचे आयातदार होतो, आज मोबाईल फोन्सचे निर्यातदार आहोत. त्यावेळी मोबाईल निर्मिती क्षेत्रात आपले अस्तित्व अगदी नगण्य होते. मात्र, आज आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाईल उत्पादक आहोत. इलेक्ट्रॉनिक निर्मितीसाठी तेव्हा कुठलाच स्पष्ट दृष्टीकोन नव्हता. आज आपण इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करत आहोत. तुम्ही पाहिले आहे की गुगलने देखील अलीकडेच घोषणा केली आहे की ते त्यांचे पिक्सेल फोन भारतात बनवतील. सॅमसंगच्या ‘फोल्ड फाइव्ह’ आणि ऍपलच्या आयफोन 15 ची याआधीच भारतात निर्मिती सुरू झाली आहे. आज आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे की संपूर्ण जग मेड इन इंडिया फोन वापरत आहे.
मित्रहो,
आज मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आपण आपले हे यश आणखी पुढे नेण्याची गरज आहे. टेक इकोसिस्टममध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींच्या यशासाठी, आपण भारतात एक मजबूत सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्र तयार करणे महत्त्वाचे आहे. सेमीकंडक्टर्सच्या विकासासाठी, सरकारने आधीच सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू केली आहे.
आज जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्यांनी भारतीय कंपन्यांबरोबर सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे सेमीकंडक्टर मिशन केवळ देशांतर्गत मागणीच नव्हे तर जगाच्या गरजाही पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गक्रमण करत आहे.
मित्रांनो,
विकसनशील देशाकडून विकसित देशापर्यंतचा प्रवास जर कोणती गोष्ट वेगवान करू शकत असेल तर ते तंत्रज्ञान आहे. देशाच्या विकासासाठी आपण जितके अधिकाधिक तंत्रज्ञान वापरू तितकी आपण विकासाकडे वाटचाल करू. डिजिटल तंत्रज्ञानात हे घडताना आपण अनुभवत आहोत, ज्यात भारत कोणत्याही विकसित देशापेक्षा मागे नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही त्याला तंत्रज्ञानाशी जोडत आहोत. आम्ही क्षेत्रनिहाय वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. लॉजिस्टिकसाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा, आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, कृषी क्षेत्रासाठी अॅग्री स्टॅक असे अनेक व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. सायंटिफिक रिसर्च क्वांटम मिशन आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनमध्येही सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. स्वदेशी डिझाइन आणि तंत्रज्ञान विकासाला आम्ही निरंतर चालना देत आहोत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (इंटरनॅशनल टेलीकॉम युनियन) आणि भारतीय मोबाईल काँग्रेस मिळून शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी नवोन्मेष आणि उद्योजकता या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करत आहेत हे जाणून मला आनंद झाला.
मित्रांनो,
या सर्व प्रयत्नांमध्ये, एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे मला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. हा पैलू म्हणजे सायबर-सुरक्षा आणि नेटवर्क पायाभूत सुविधांची सुरक्षितता. सायबर सुरक्षेची गुंतागुंत काय आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात हे आपण सर्व जाणताच. जी-20 शिखर परिषदेतही याच भारत मंडपम मध्ये सायबर सुरक्षेच्या जागतिक धोक्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. सायबर सुरक्षेसाठी संपूर्ण उत्पादन मूल्य साखळीत आत्मनिर्भरता अत्यंत आवश्यक आहे. हार्डवेअर असो, सॉफ्टवेअर असो किंवा कनेक्टिव्हिटी असो, जेव्हा आमच्या मूल्य साखळीतील प्रत्येक गोष्ट आमच्या राष्ट्रीय डोमेनमध्ये असेल तेव्हा ती सुरक्षित ठेवणे आमच्यासाठी सोपे होईल. त्यामुळे आज या मोबाईल काँग्रेसमध्ये आपण जगातील लोकशाही समाजांना अडचणीत आणणाऱ्यांपासून कसे सुरक्षित करू शकतो यावरही चर्चा करणे आवश्यक आहे.
मित्रांनो,
भारताने तंत्रज्ञानाच्या अनेक संधी दीर्घ काळापासून गमावल्या आहेत. यानंतर, अशीही वेळ आली जेव्हा आम्ही आधीच विकसित तंत्रज्ञानामध्ये आमची प्रतिभा दाखवली. आमच्या माहिती तंत्रज्ञान सेवा उद्योगाचाही विस्तार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण आता 21व्या शतकाचा हा काळ भारताच्या वैचारिक नेतृत्वाचा काळ आहे. आणि मी हे इथे बसलेल्या प्रत्येकाला आणि शंभर लॅबच्या उद्घाटनाला उपस्थित तरुणांना सांगत आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, मी जेव्हा काही बोलतो तेव्हा ती ग्वाही असते आणि म्हणूनच मी वैचारिक नेतृत्वाविषयी बोलत आहे. विचारवंत नेते असे नवे मापदंड घालू शकतात, ज्याचे जग पुढे अनुसरण करेल.
मित्रांनो,
आपण काही क्षेत्रांमध्ये वैचारिक नेते बनलो आहोत. उदाहरणार्थ, युपीआय हे आपल्या वैचारिक नेतृत्वाचे फलित आहे, जे आज डिजिटल पेमेंट प्रणालीत संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे. इतकेच कशाला, कोविड काळात, आपण राबवलेल्या कोविन उपक्रमाची आजही जगभरात वाखाणणी होते. हीच ती वेळ आहे जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट अवलंब आणि अंमलबजावणी करणारे होण्याबरोबरच तंत्रज्ञानाचे वैचारिक नेतृत्व बनलेच पाहिजे. भारताकडे तरुण लोकसंख्येचे सामर्थ्य आहे, चैतन्यशील लोकशाहीचे सामर्थ्य आहे.
मी भारतीय मोबाइल काँग्रेसच्या लोकांना, विशेषत: तरुण सदस्यांना निमंत्रण देतो की, त्यांनी हा मार्ग स्वीकारावा, वाटचाल करावी, मी आपल्यासोबत आहे. आज, ज्या वेळी आपण विकसित भारत बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, अशा वेळी वैचारिक नेतृत्व म्हणून पुढे जाण्याचे हे संक्रमण संपूर्ण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते.
आणि मला खात्री आहे, आणि हा माझा विश्वास तुमच्या क्षमतेमुळे आहे. तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या क्षमतेवर, तुमच्या या समर्पणावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की आम्ही हे करू शकतो, नक्कीच करू शकतो. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी देशातील, दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी भारत मंडपम मध्ये यावे आणि हे जे प्रदर्शन भरले आहे त्यात तंत्रज्ञानात रुची असणाऱ्यांसाठी, भविष्यात तंत्रज्ञान जीवनातील नवनवीन क्षेत्रात कसे सामावले जाणार आहे हे समजून घेण्याची खूप मोठी संधी आहे. मी सर्वांना विनंती करेन, मी सरकारच्या सर्व विभागांना विनंती करेन की त्यांच्या तंत्रज्ञान पथकांनीही येथे येऊन या गोष्टी पहाव्यात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
***
SushamaK/RadhikaA/SushamaK/VasantiJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the India Mobile Congress. https://t.co/wY1CG1Hw5A
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023
The future is here and now. pic.twitter.com/vEn9txsuNE
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
We initiated the effort to bring 5G connectivity to every Indian citizen. pic.twitter.com/Ew3NGbQPyP
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
We are not only rapidly expanding 5G in India, but are also making strides toward establishing ourselves as frontrunners in the realm of 6G. pic.twitter.com/PwIaj6jxpO
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
We believe in the ‘power of democratisation’ in every sector. pic.twitter.com/uRys4vlDqb
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
India's semiconductor mission is progressing with the aim of fulfilling not just its domestic demands but also the global requirements. pic.twitter.com/dfNzlyarbX
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
Technology is the catalyst that expedites the transition from a developing nation to a developed one. pic.twitter.com/x3ZLShTqma
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
The 21st century marks an era of India's thought leadership. pic.twitter.com/NMQ6iu31Ik
— PMO India (@PMOIndia) October 27, 2023
While we are expanding 5G coverage at quick pace, we are also working towards making India a leader in 6G technology. pic.twitter.com/TDHVfjPkJz
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023
Enhancing a culture of innovation among our youth… pic.twitter.com/3bfhagwX6X
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023
A special request to the youth of India… pic.twitter.com/Zyg4GyoJ4H
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023
2014 से पहले भारत की अर्थव्यवस्था Outdated Phone की तरह ‘हैंग हो गया’ वाले मोड में आ गई थी। इसके बाद भारत में जो बदलाव आया, वो दुनिया के सामने है। pic.twitter.com/ZkMbRbKZ57
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023