Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सलग 200 वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचार या वर्तमानपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग

सलग 200 वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचार या वर्तमानपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आयोजित मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी या सोहळ्याच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे देखील प्रकाशन केले.

पंतप्रधानांनी मुंबई समाचारचे वाचक, पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना या ऐतिहासिक वर्तमानपत्राच्या 200 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या दोन शतकांच्या कालखंडात अनेक पिढ्यांच्या आयुष्यांना, त्यांच्या समस्यांना मुंबई समाचारने आवाज दिल्याच्या वस्तुस्थितीकडे निर्देश करत पंतप्रधानांनी याबद्दल मुंबई समाचारचे कौतुक केले.

त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे काम देखील मुंबई समाचारने केले आणि स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांची वाटचाल सर्व वयोगटातल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वर्तमानपत्राने केल्याची बाब त्यांनी नमूद केली. या वर्तमानपत्राची भाषा नक्कीच गुजराती होती मात्र त्यांची भूमिका राष्ट्रीय होती, असे ते म्हणाले. महात्मा  गांधी आणि सरदार पटेल देखील मुंबई समाचारचा संदर्भ देत असत असे पंतप्रधानांनी सांगितले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातच या वर्तमानपत्राचा वर्धापनदिन असणे एक सुखद योगायोग असल्याकडे लक्ष वेधले. म्हणूनच या प्रसंगी आपण भारतातील केवळ पत्रकारितेच्या उच्च दर्जाचा आणि देशभक्तीशी संबंधित पत्रकारितेचाच गौरव करत नसून, हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सोहळ्यामध्ये भर घालत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी यावेळी स्वातंत्र्यकाळातील आणि आणीबाणीच्या काळानंतर प्रस्थापित झालेल्या लोकशाही कालखंडातील वैभवशाली पत्रकारितेचे देखील स्मरण केले.

परकीयांच्या प्रभावामुळे जेव्हा हे शहर ‘बॉंबे’ झाले, तेव्हाही ‘मुंबई समाचार’ने आपली स्थानिक प्रादेशिक मुळे आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले नाहीत. तेव्हाही हे सर्वसामान्य मुंबईकरांचे वृत्तपत्र होते आणि आजही ते तसेच आहे- ‘मुंबई समाचार’- अशा शब्दात पंतप्रधानांनी या वृत्तपत्राच्या योगदानाचे स्मरण करून दिले. ‘मुंबई समाचार’ हे केवळ बातम्यांच्या प्रसाराचे माध्यम नसून, तो एक वारसा आहे. ‘मुंबई समाचार’ हे भारताचे तत्त्वज्ञान आणि भारताची अभिव्यक्ती आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. “संकटाच्या प्रत्येक वादळात भारत कसा खंबीरपणे उभा आहे, याची झलक आपल्याला ‘मुंबई समाचार’ मधून बघावयास मिळते” असेही ते म्हणाले.
भूतकाळाचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, “जेव्हा मुंबई समाचार सुरु झाला तेव्हा गुलामीचा अंधःकार अधिकाधिक बळावत चालला होता. गुजरातीसारख्या एखाद्या भारतीय भाषेतून वृत्तपत्र काढणे आणि चालवणे हे त्याकाळी अजिबात सोपे काम नव्हते. मात्र अशा काळातही, ‘मुंबई समाचार’ने भाषिक पत्रकारितेचा विस्तार केला” असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

भारताचा हजारों वर्षांचा इतिहास आपल्याला खूप काही शिकवितो असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारतभूमीचा स्वभाव स्वागतशील असून येथे जो कोणी येतो त्याला मा भारती कुशीत सामावून घेते आणि भरभराटाची पुरेशी संधी देते, असे त्यांनी स्पष्ट केले. पारशी समाजापेक्षा याचे अधिक चांगले उदाहरण कोणते असू शकेल, असा सवाल त्यांनी विचारला. स्वातंत्र्य चळवळीपासून ते भारताच्या नवनिर्माणापर्यंत पारशी भगिनी आणि बांधवांचे योगदान मोठे आहे. हा समुदाय संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान म्हणजे एक प्रकारे सूक्ष्म-अल्पसंख्याक असला तरी  क्षमता आणि सेवेच्या दृष्टीने मोठा आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या देणे, लोकांचे प्रबोधन करणे तसेच समाज आणि सरकारमध्ये काही उणिवा असतील, तर त्या समोर आणणे ही वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. प्रसारमाध्यमांना टीका करण्याचा अधिकार आहे. तसेच त्यांच्यावर सकारात्मक बातम्या समोर आणण्याची महत्त्वाची जबाबदारीही आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात म्हणजे गेल्या दोन वर्षांत पत्रकारांनी ज्या प्रकारे देशहितासाठी कर्मयोग्यांप्रमाणे काम केले ते कायम स्मरणात राहील, 100 वर्षांतल्या सर्वात मोठ्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताच्या माध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळे भारताला खूप मदत झाली, अशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले. डिजिटल पेमेंट आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या उपक्रमांना चालना देण्यासाठी माध्यमांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.

आपला देश एक समृद्ध परंपरा असलेला देश आहे जो वादविवाद आणि चर्चेच्या माध्यमातून पुढे जातो. हजारो वर्षांपासून सामाजिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपण निरोगी वादविवाद, निरोगी टीका आणि योग्य तर्क आयोजित करतो. अतिशय कठीण सामाजिक विषयांवर मनमोकळ्या आणि निरोगी चर्चा करण्याची भारताची प्रथा आपल्याला मजबूत करायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

1 जुलै 1822 रोजी फरदुंजी मर्झबंजी यांनी मुंबई समाचार साप्ताहिकची सुरुवात केली. पुढे 1832 मध्ये ते दैनिक बनले. गेल्या 200 वर्षांपासून हे वृत्तपत्र नियमित प्रकाशित होत आहे.

***

ST/ShaleshP/PradnyaJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com