Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या संविधान दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्‍ली, 26 नोव्‍हेंबर 2024

 

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना जी, न्यायमूर्ती बी. आर.  गवई जी, न्यायमूर्ती सुर्यकांत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अर्जुन राम मेघवाल जी, अटर्नी जनरल वेंकटरमणी जी, बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्र जी, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल जी, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गण, माजी न्यायाधीश वर्ग, उपस्थित इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष वर्ग,

आपणा सर्वाना संविधान दिवसाच्या खूप-खुप शुभेच्छा.भारताच्या संविधानाचे हे 75वे वर्ष अवघ्या देशासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे. भारताचे संविधान, संविधान सभेच्या सर्व सदस्यांना मी आदरपूर्वक नमन करतो.

मित्रहो,

लोकशाहीच्या या महत्वाच्या पर्वाचे आपण स्मरण करत असताना या तारखेला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आपण विसरू शकत नाही. या हल्ल्यातल्या मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. भारताच्या सुरक्षेला आव्हान  देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल या संकल्पाचा मी पुनरुच्चार करतो.

मित्रहो,

संविधान सभेच्या दीर्घ चर्चेदरम्यान भारताच्या प्रजासत्ताक भविष्यावर गंभीर चर्चा झाली होती.आपण ही चर्चा जाणताच. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते, संविधान हा केवळ वकिलांसाठीचा दस्तावेज नाही… त्याचा आत्मा हा नेहमीच युगाचा आत्मा आहे. बाबासाहेब ज्या आत्म्याबाबत बोलत होते तो अतिशय महत्वाचा आहे. देश-काळ-परिस्थिती नुसार योग्य निर्णय घेऊन आपणाला वेळोवेळी  संविधानाचा अर्थ लावता यावा ही तरतूद आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्याला दिली आहे. काळानुसार भारताच्या आकांक्षा, भारताची स्वप्ने नव्या शिखरावर जातील हे त्यांनी जाणले होते, स्वतंत्र भारत आणि भारताच्या नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील हे ते जाणत होते. म्हणूनच त्यांनी आपले संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक इतकेच त्याचे स्वरूप ठेवले नाही तर त्याचा एक सळसळता, अखंड प्रवाह केला.

मित्रहो,

आपले संविधान आपले वर्तमान आणि भविष्याचा मार्गदर्शक आहे. गेल्या 75 वर्षांत देशासमोर जी आव्हाने आली, त्या प्रत्येक आव्हानावर मात करण्याचा योग्य मार्ग आपल्या संविधानाने दाखवला आहे. याच काळात आणीबाणीसारखा कालखंडही आला आणि आपल्या संविधानाने लोकशाहीसमोर आलेल्या या आव्हानालाही तोंड दिले. आपल्या देशाच्या आवश्यकता, प्रत्येक अपेक्षा संविधानाने सार्थ केली आहे. संविधानातून मिळालेल्या याच शक्तीमुळे आज जम्मू – काश्मीरमधेही डॉ. बाबासाहेब यांचे संविधान  पूर्णपणे लागू झाले आहे. आज प्रथमच तिथे संविधान दिवस साजरा करण्यात आला आहे.  

मित्रहो,

आज भारत परिवर्तनाच्या मोठ्या काळातून मार्गक्रमण करत आहे, अशा महत्वाच्या काळात भारताचे संविधानच आपल्याला मार्ग दाखवत आहे, आपल्यासाठी मार्गदर्शक दीप बनले आहे.

मित्रहो,

मोठी स्वप्ने, मोठे संकल्प साकार करण्यातूनच भारताच्या भविष्याचा मार्ग साकारत आहे. आज प्रत्येक देशवासियाचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे – विकसित भारत. विकसित भारत याचा अर्थ आहे जिथे देशाच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार जीवन लाभेल, प्रतिष्ठीत जीवन लाभेल. सामाजिक न्यायाचेही हे अतिशय मोठे माध्यम आहे आणि ही संविधानाची भावना आहे. म्हणूनच मागच्या वर्षांमध्ये देशाच्या जनतेमध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता आणण्यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. जे कधी बँकेपर्यंत पोहोचूही शकले, अशा 53 कोटी पेक्षा जास्त भारतीयांची गेल्या 10 वर्षात बँक खाती उघडण्यात आली आहेत.

पिढ्यानपिढ्या बेघर असलेल्या 4 कोटी भारतीयांना गेल्या 10 वर्षात पक्की घरे मिळाली आहेत.वर्षानुवर्षे गॅसच्या प्रतीक्षेत असलेल्या 10 कोटीहून अधिक महिलांना गेल्या 10 वर्षात मोफत गॅस जोडणी मिळाली आहे. घरात नळ सुरू केला की पाणी येते, त्यामुळे आज आपले जीवन सुलभ झाले आहे. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही केवळ 3 कोटी घरांमध्येच नळाद्वारे पाणीपुरवठा होता. तेव्हा कोट्यवधी लोक आपल्या घरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करत होते. मला आनंद आहे की आमच्या सरकारने 5-6 वर्षात 12 कोटी पेक्षा जास्त घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा देत नागरिकांचे विशेष करून महिलांचे जीवन सुकर केले आहे, संविधानाचा उद्देश बळकट केला आहे.

मित्रहो,

आपल्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये प्रभू श्रीराम,सीता माता, हनुमान जी, भगवान बुद्ध,भगवान महावीर,गुरु गोविंदसिंह जी.. सर्वांची चित्रे आहेत हे आपण सर्व जाणतोच. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक या चित्रांना संविधानामध्ये यासाठी स्थान देण्यात आले जेणेकरून मानवी मुल्यांप्रती  ती आपल्याला सजग करत राहतील. ही मानवी मूल्ये आजच्या भारताची धोरणे आणि निर्णयांचे आधार आहेत. भारतीयांना त्वरित न्याय मिळावा यासाठी न्याय संहिता लागू करण्यात आली आहे. शिक्षा आधारित व्यवस्थेचे आता न्याय आधारित व्यवस्थेत रुपांतर झाले आहे.

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांची स्वत:ची ओळख निर्माण व्हावी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. दिव्यांगांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठीही आम्ही उपाययोजना केल्या आहेत.

मित्रहो,

देशातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यावर आज देशाचा बराच भर आहे. एक काळ असा होता की पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना आपण हयात आहोत हे सिद्ध करण्यासाठी बँकेत जावे लागे. आज ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळत आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिली जाते. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला भारतात मोफत आरोग्यसेवा मिळते. आज देशातील हजारो जनऔषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीत स्वस्त औषधे उपलब्ध आहेत.

एकेकाळी आपल्या देशात लसीकरणाची व्याप्ती 60 टक्क्यांहून कमी होती. दरवर्षी करोडो मुले लसीकरणापासून वंचित राहिली. मिशन इंद्रधनुषमुळे आता भारतात लसीकरणाची व्याप्ती 100 टक्के झाली आहे, हे माझ्यासाठी दिलासादायक आहे. आज दुर्गम खेड्यांमध्येही मुलांचे वेळेवर लसीकरण होत आहे. या प्रयत्नांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांची काळजी खूपच कमी झाली आहे.

मित्रहो,

सध्या देशात कशा प्रकारे काम केले जाते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे आकांक्षित जिल्हा अभियान. देशातील 100 हून अधिक जिल्हे जे मागासलेले म्हणून गणले गेले होते त्या जिल्ह्यांना आम्ही आकांक्षित जिल्हे म्हणून मान्यता दिली आणि या जिल्ह्यांच्या विकासाचा वेग वाढवला. आज देशातील अनेक आकांक्षित जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप चांगले काम होत आहे. आता या मॉडेलच्या आधारे आम्ही आकांक्षित जिल्हा कार्यक्रम देखील सुरू केला आहे.

मित्रहो,

आज देशात लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अडीच कोटी घरे संध्याकाळ झाली की अंधारात बुडून जायची कारण या घरांपर्यंत वीज पोहोचलीच नव्हती. या प्रत्येकाला मोफत वीज जोडणी देऊन देशाने त्यांचे आयुष्य उजळून टाकले आहे.

गेल्या काही वर्षांत, अगदी दुर्गम भागातही हजारो मोबाइल टॉवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तिथल्या लोकांना 4G/5G कनेक्टिव्हिटी मिळत आहे. पूर्वी अंदमान किंवा लक्षद्वीपला ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नव्हती. पाण्याखालील ऑप्टिकल फायबरने अशा बेटांवरही आता उत्तम वेगवान इंटरनेटसेवा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या देशात गावातील घरे आणि ग्रामीण भागातील जमिनींबाबत किती वाद झाले आहेत हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. जगभरातील विकसित देशांसाठी जमिनीच्या नोंदी हे मोठे आव्हान आहे, पण आजचा भारत यातही आघाडीवर आहे.

पीएम स्वामित्व योजनेअंतर्गत आज गावातील घरांचे ड्रोन मॅपिंग केले जात आहे आणि वैध कागदपत्रे दिली केली आहेत.

मित्रहो,

देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची झपाट्याने उभारणी होणे महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर देशाचा पैसाही वाचतो… आणि प्रकल्पाची उपयुक्तताही खूप वाढते.

हे लक्षात घेऊन प्रगती हा मंच तयार करण्यात आला असून त्याद्वारे पायाभूत प्रकल्पांचा नियमित आढावा घेतला जातो. यातील काही प्रकल्प 30-30, 40-40 वर्षांपासून प्रलंबित होते. मी स्वत: या बैठकांचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करतो. आतापर्यंत 18 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडसर दूर करण्यात आले आहेत.

प्रकल्प वेळेवर पूर्ण झाल्यामुळे लोकांच्या जीवनावर खूप सकारात्मक बदल होत आहेत.

मित्रहो,

डॉ. राजेंद्र प्रसादजी यांच्या शब्दांचा आधार घेऊन मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. 26 नोव्हेंबर… याच दिवशी 1949 मध्ये घटना समितीसमोर केलेल्या समारोपाच्या भाषणात डॉ. राजेंद्र प्रसादजी म्हणाले होते… भारताला आज देशाच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या प्रामाणिक लोकांच्या गटाचीच फक्त गरज आहे. राष्ट्र सर्वप्रथम मानणारी हीच भावना भारतीय राज्यघटनेला पुढील अनेक शतके जिवंत ठेवेल. 

राज्यघटनेने मला जे काम दिले आहे मी त्याच मर्यादेत राहण्याचा प्रयत्न केला आहे, कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

राज्यघटनेने ते काम दिल्यामुळे मी मर्यादेत राहून माझे मत मांडले आहे. फक्त इशारा पुरेसा असून याबद्दल  जास्त काही सांगायची गरज नाही.   

खूप खूप धन्यवाद.

 

* * *

H.Akude/Nilima/Prajna/D.Rane