Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2021

नमस्कार मित्रांनो,

मान्यवर महोदय, अब्दुल्ला शाहिद जी !

आपण अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! आपण या अध्यक्षपदी विराजमान होणे ही सर्वच विकसनशील देश आणि विशेषत: छोट्या बेटांवरील देशांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग, गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठया महामारीचा सामना करत आहे. या भयंकर महामारीत ज्यांनी आपले प्राण गमावले अशा सर्वांना मी या व्यासपीठावरुन श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो.

माननीय अध्यक्ष महोदय,

मी एका अशा देशाचे प्रतिनिधित्व करतो आहे , ज्याला, ‘लोकशाहीची जननी’ म्हणून गौरवले जाते. आमच्या देशाला हजारो वर्षांची लोकशाही परंपरा लाभली आहे. या 15 ऑगस्टला भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. आमची विविधता हीच आमच्या सक्षम लोकशाहीची ओळख आहे.

एक असा देश, जिथे डझनभर भाषा आहेत, शेकडो बोलीभाषा आहेत, वेगवेगळे राहणीमान, खाद्यपदार्थ आहेत. विविधरंगी लोकशाहीचे एक उत्तम उदाहरण आहे.

ही भारताच्या लोकशाहीचीच ताकद आहे, ज्यामुळे, एका लहानसा मुलगा, जो कधीकाळी रेल्वेस्थानकावरील चहाच्या दुकानात आपल्या वडलांना मदत करत असे, तो आज भारताचा पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करतो आहे.

सर्वाधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर गेली सात वर्षे, भारताचा पंतप्रधान या नात्याने, सरकारचा प्रमुख म्हणून, देशबांधवांची सेवा करतांना मला 20 वर्षे झाली आहेत.

आणि माझ्या आजवरच्या अनुभवावरुनच मी आज सांगतो आहे-

होय, लोकशाही प्रत्यक्षात अमलात येऊ शकते. होय, लोकशाही प्रत्यक्षात अमलात आली आहे. 

अध्यक्ष महोदय,

एकात्म मानवतावादाचे प्रणेते, पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानवतावाद म्हणजे- संपूर्ण मानवतेचे एकत्रित सहजीवन. म्हणजेच, व्यक्ती ते समष्टिपर्यंतचा विकास आणि विस्ताराचा सहप्रवास !

आपल्या स्व चा- व्यक्तीचा विस्तार म्हणजे, व्यक्तीपासून समाजाकडे, देशाकडे आणि संपूर्ण मानवतेकडे जाण्याचा प्रवास, आणि हा विचार अंत्योदयाला समर्पित आहे.आज अंत्योदयाची व्याख्या करायची झाल्यास, ‘जिथे कोणीही मागे राहणार नाही’ असा समाज, असे म्हणावे लागेल.

याच भावनेतून आज भारत एकात्मिक, समान विकासाच्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहे. विकास- जो सर्वसमावेशक असेल, सर्वंकष असेल, सर्वव्यापक असेल, सर्वपोषक असेल, यालाच आमचे प्राधान्य आहे.

गेल्या सात वर्षात, भारतात  अशा 43 कोटी लोकांपेक्षा जास्त जणांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे, जे आतापर्यंत या सुविधेपासून वंचित होते. आज 36 कोटींपेक्षा अधिक लोकांना विमा सुरक्षा कवच मिळाले आहे, ज्यांनी आधी कधी या सुविधेचा विचारही केला नव्हता.

50 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत उपचारांची सुविधा देऊन, भारताने त्यांना  दर्जेदार आरोग्य सुविधेशी जोडले आहे. भारताने तीन कोटींपेक्षा अधिक पक्की घरे तयार करुन, बेघर कुटुंबांना घरांचे मालक बनवले आहे.

माननीय अध्यक्ष महोदय

भारतातील 50 कोटींहून अधिक लोकांना मोफत उपचार सुविधा देऊन देशाने त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधेशी जोडून घेतले आहे. भारताने 3 कोटी पक्क्या घरांची उभारणी केल्यामुळे, बेघर कुटुंबे आता घरमालक झाली आहेत.

राष्ट्राध्यक्ष महोदय,

प्रदूषित पाणी ही केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात आणि विशेषतः गरीब आणि विकसनशील देशांमधील मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी, भारतात आम्ही 17 कोटीहून अधिक घरांना नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोठी मोहीम चालवतो आहोत.

जगातील अनेक मोठ्या संस्थांनी हे मान्य केले आहे की कोणत्याही देशाच्या विकासासाठी, त्या देशातील नागरिकांकडे त्यांची जमीन आणि घरांच्या मालकीहक्काची नोंद असणे महत्त्वाचे आहे. जगातील मोठमोठ्या देशांमध्ये देखील, ज्यांच्याकडे त्यांच्या जमिनी आणि घरांचे मालकी हक्क नाहीत असे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.

आम्ही आज, भारतातील 6 लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने जमिनीचे मॅपिंग करून लाखो लोकांना त्यांची घरे आणि जमिनी यांच्या मालकीबाबतच्या डिजिटल नोंदी वितरीत करण्याच्या कामात गुंतलो आहोत.

ह्या डिजिटल नोंदी मालमत्तेबाबतचे वादविवाद कमी करण्यासोबतच लोकांना उधारी अथवा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अधिक सुविधा निर्माण करून देत आहेत.

राष्ट्राध्यक्ष महोदय,

आज, जगातील दर सहावा मनुष्य भारतीय आहे. जेव्हा भारतीयांची प्रगती होते तेव्हा संपूर्ण जगाच्या विकासाला मोठी चालना मिळते.

जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा देखील विकास होतो. जेव्हा भारतात सुधारणा होते तेव्हा जगात परिवर्तन होते.

भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित अभिनव संशोधनांमुळे जगाला मोठी मदत होऊ शकते. आपली तंत्रज्ञानाधारित साधनांची झेप आणि त्यांची किफायतशीर किंमत हे दोन्ही अतुलनीय आहे.

आपल्या यूपीआय अर्थात एकीकृत भरणा मंचामुळे आज, भारतात प्रत्येक महिन्याला साडेतीन अब्जांहून अधिक आर्थिक व्यवहार होत आहेत. को-विन हा भारताचा लसीकरण व्यवस्था मंच, एका दिवसात कोविड प्रतिबंधक लसीच्या लाखो मात्रा सुरळीतपणे दिल्या जाण्यासाठी डिजिटल पाठींबा पुरवतो आहे.

अध्यक्ष महोदय,

सेवा परमो धर्म:

सेवा परमो धर्म: या तत्वावर जगणारा  भारत, मर्यादित  संसाधने असूनही लसीकरण विकास आणि निर्मितीसाठी समर्पित वृत्तीने कार्यरत आहे.

मला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला माहिती द्यायची आहे की भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस  विकसित केली आहे जी  12 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सर्वांना देता येऊ शकते.

आणखी एक m-RNA लस विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. भारतातील वैज्ञानिक, कोरोनावर  नाकावाटे देण्यात येणारी लस निर्माण करण्यात गुंतले आहेत. मानवतेप्रति आपली जबाबदारी ओळखून भारताने पुन्हा एकदा जगातील गरजू देशांना लसींच्या मात्रांचा पुरवठा करायला सुरुवात केली आहे.

मी आज जगभरातील लस उत्पादकांना देखील आमंत्रित करतो.

या, भारतात लस निर्माण करा.

अध्यक्ष महोदय,

आज आपण सर्वजण जाणतो की मानवी जीवनात तंत्रज्ञानाला किती महत्व आहे. मात्र बदलत्या जगात लोकशाही मूल्यांसह तंत्रज्ञान, हे सुनिश्चित करणे देखील आवश्यक आहे.

भारतीय वंशाचे डॉक्टर्स, संशोधक, अभियंते, व्यवस्थापक, कुठल्याही देशात असो, आपली लोकशाही मूल्ये त्यांना मानवतेची सेवा बजावण्यात नेहमीच प्रेरणा देतात.  आणि हे आपण या  कोरोना काळातही पाहिले आहे.

अध्यक्ष महोदय,

कोरोना महामारीने जगालाही हा धडा दिला आहे की जागतिक अर्थव्यवस्था आता अधिक वैविध्यपूर्ण बनवायला हवी. यासाठी जागतिक मूल्य साखळीचा  विस्तार आवश्यक आहे.

आमचे आत्मनिर्भर भारत अभियान याच भावनेने प्रेरित आहे. जागतिक औद्योगिक वैविध्यकरणासाठी भारत जगातील एक लोकशाहीप्रधान आणि विश्वासू भागीदार बनत आहे.

आणि या अभियानात, भारताने अर्थव्यवस्था आणि पर्यावरण व्यवस्था या दोन्हीत उत्तम समतोल साधला आहे.  मोठ्या आणि विकसित देशांच्या तुलनेत पर्यावरण कृती संबंधी भारताचे प्रयत्न पाहून तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल. आज भारत, अतिशय जलद गतीने 450 गीगावॉट नवीकरणीय ऊर्जेच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला जगातील सर्वात मोठे ग्रीन हाइड्रोजन हब बनवण्याच्या अभियानात आम्ही सक्रिय आहोत.

अध्यक्ष महोदय,

आपल्याला आपल्या भावी पिढयांना उत्तर द्यावे लागणार आहे की जेव्हा निर्णय घेण्याची वेळ होती , जगाला दिशा दाखवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते तेव्हा काय करत होते ?आज जगासमोर मागास विचारसरणी आणि उग्रवादाचा धोका वाढत आहे.

या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला विज्ञान आधारित, तर्कसंगत आणि प्रगतिशील विचारांना विकासाचा पाया बनवावे लागेल.

विज्ञान आधारित दृष्टिकोन मजबूत करण्यासाठी भारत,अनुभव आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. आमच्याकडे शाळांमध्ये हजारो अटल टिंकरिंग लैब्स सुरु करण्यात आले आहेत, इंक्यूब्येटर्स उभारले आहेत आणि एक मजबूत स्टार्ट-अप परिसंस्था विकसित झाली आहे.

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारत 75 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार आहे जे भारतीय विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तयार करत आहेत.

अध्यक्ष महोदय,

दुसरीकडे, मागास विचारांसह जे देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत त्यांनी हे समजून घ्यायला हवे की त्यांच्यासाठीही दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवादाचा प्रसार आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी होणार नाही हे  सुनिश्चित करणे खूप आवश्यक आहे.

आपल्याला या गोष्टीसाठी देखील सतर्क राहावे लागेल की तिथल्या नाजूक स्थितीचा लाभ कोणताही   देश आपल्या स्वार्थासाठी एक साधन म्हणून वापरण्याचा  प्रयत्न करणार नाहीत.

सध्या अफगाणिस्तानमधील जनतेला, तिथल्या महिला आणि मुलांना तिथल्या अल्पसंख्यकांना मदत करण्याची गरज आहे आणि आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. 

अध्यक्ष महोदय,

आपले महासागर हे देखील आपला सामायिक वारसा आहेत. म्हणूनच आपण हे लक्षात घ्यायला हवे की तिथल्या संसाधनांचा आपण योग्य वापर करू,  गैरवापर  करणार नाही. आपले महासागर आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा देखील आहेत. त्यांचे  विस्तार किंवा बहिष्कृत करण्याच्या स्पर्धेपासून आपल्याला संरक्षण करावेच लागेल.

नियम आधारित जागतिक व्यवस्था सशक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकसुरात  आवाज उठवायला हवा. सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेदरम्यान झालेल्या  विस्तृत सहमतीने  जगाला सागरी सुरक्षेच्या बाबतीत पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आहे.

भारताचा महान तत्त्वज्ञ आर्य चाणक्याने काही शतकांपूर्वी सांगितले आहे की, योग्य काम जर योग्य वेळी घडत नसेल तर काळ हाच त्या कामातील यशाचा नाश करतो.

संयुक्त राष्ट्रसंघाला स्वत:ला कालसुसंगत ठेवायचे असेल तर स्वतःची परिणामकारकता वाढवणे , विश्वासार्हता वाढवणे भाग आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या भूमिकेवर आज कित्येक प्रश्न विचारले जात आहेत. हवामानबदल आणि कोविड महामारी या दोन्ही संकटांच्या वेळेला हे आपण बघितले आहे. सध्या जगात अनेक ठिकाणी सुरू असलेले सुरू असलेले छुपे युद्ध म्हणजेच दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील संकट यामुळे ह्या प्रश्नांचे गंभीरता वाढली आहे. कोविडचा आरंभ आणि व्यवसायसुलभता संदर्भातील जागतिक क्रमवारी यांमुळे जागतिक प्रशासकीय संस्थांनी कित्येक दशकांच्या अविरत प्रयत्नांनी मिळवलेल्या विश्वासाला गालबोट लागले. 

जागतिक सुव्यवस्था, जागतिक कायदे आणि जागतिक मूल्ये यांच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना आपण सतत बळ देत राहणे आवश्यक आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त गुरुदेव रवींद्रनाथ टागोरजी यांच्या शब्दांनी मी समारोप करत आहे.

शुभोकोर्मो-पोथे / धोरोनिर्भोयोगान, शोबदुर्बोलसोन्शोय /होकओबोसान। (Shubho Kormo-Pothe/ Dhoro nirbhayo gaan, shon durbol Saunshoy/hok auboshan)

आपल्या पवित्र कार्य-मार्गावर निर्भयपणे मार्गक्रमण करत रहा. सर्व दुर्बलता आणि शंका विरून जावोत.

हा संदेश आत्ताच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांना जसा लागू पडतो तसाच तो प्रत्येक जबाबदार राष्ट्रालाही लागू पडतो. जग आरोग्यसंपन्न सुरक्षित आणि समृद्ध बनावे म्हणून जगातील शांतता आणि सुसंवाद यांच्या भरभराटीसाठी आपण सर्वजण झगडत राहू याची मला खात्री आहे.

शुभेच्छा 

खूप खूप धन्यवाद

नमस्कार

* * *

M.Chopade/Radhika/Sushma/Sanjana/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com