Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत वैश्विक आरोग्य सुविधांविषयीच्या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी मांडलेली मते


संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत वैश्विक आरोग्य सुविधांविषयी पहिल्यांदाच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत 23 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली मते मांडली.

भारताने आरोग्य सुविधा व्यापक स्‍तरावर पोहोचवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. आरोग्याचा अर्थ केवळ आजारांपासून मुक्ती ऐवढाच नाही, तर निरोगी आयुष्य हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आरोग्य या विषयाकडे भारत सर्वसमावेशक दृष्टीकोनातून बघतो आणि आरोग्य सुविधेशी निगडीत चार मुख्य पैलुंवर आम्ही काम करतो आहोत.

प्रतिबंधात्मक आरोग्य चिकित्सा

परवडणाऱ्या आरोग्य सेवा

आरोग्य सेवा सुविधांच्या पुरवठ्यात सुधारणा

आरोग्य योजनांशी मिशन मोडवर अंमलबजावणी

सरकारने योग, आयुर्वेद आणि निरोगी शरीर यावर विशेष भर देत, देशभरात 1,25,000 आरोग्य केंद्रे सुरु केली आहेत, असे मोदी म्हणाले. या केंद्रांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य चिकित्सा, जीवनशैलीमुळे होणारे आजार जसे मधुमेह, रक्तदाब, नैराश्य यापासून सुटका करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्याशिवाय ई-सिगारेट्सवर बंदी, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि लसीकरण कार्यक्रमातूनही आरोग्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सर्वांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी भारताने जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना-आयुष्मान भारत लागू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 50 कोटी गरीबांना वर्षभरात 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. देशभरात सध्या 5 हजार पेक्षा अधिक जनऔषधी केंद्रे उभारण्यात आली असून, तिथे 800 पेक्षा अधिक महत्वाची औषधे स्वस्त दरात उपलब्ध आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

देशात उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत, असे ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पोषक आहार अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत माता आणि बालकांच्या पोषण आहारात सुधारणा केली जाते. 2025 पर्यंत देशातून क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. हवेतील प्रदूषण आणि प्राण्यांमुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारने मोहिम हाती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताचे प्रयत्न केवळ देशापुरतेच मर्यादित नाहीत, तर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आफ्रिकी देशांसह इतर अनेक देशांमध्ये माफक दरात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी काम करत आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

या बैठकीची संकल्पना ‘वैश्विक आरोग्य सुविधा : निरोगी जग बनवण्याच्या दिशेने वाटचाल’ अशी होती. या अंतर्गत वैश्विक स्तरावर व्यापक आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या दिशेने गतीमान प्रयत्न केले जाणार आहेत. 2030 या वर्षापर्यंत संपूर्ण जगात आरोग्य सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व देशांच्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि जागतिक समुदायाला एकत्र करण्याचा याद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या 160 सदस्य देशांचे प्रतिनिधी भाषण करणार आहेत.

2015 साली या सर्व राष्ट्र प्रमुखांनी केलेल्या संकल्पानुसार 2030 पर्यंत संपूर्ण जगात आरोग्य सुविधा पोहोचवल्या जाणार आहेत. यात आर्थिक धोक्यांपासून संरक्षण, उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवांची उपलब्धता आणि सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार, स्वस्त औषधे तसेच लसी सर्वांसाठी उपलब्ध करणे, या उद्दिष्टांचा समावेश आहे.

*******

B.Gokhale/R.Aghor/D.Rane