Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)

संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)


नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2024

 

कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह  यांच्या  निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय  दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.

कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह आणि कुवेतचे युवराज अल  खालेद अल-सबाह अल –मुबारक  अल-सबाह यांनी बायान पॅलेस इथे 22 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारंभपूर्वक स्वागत केले. कुवेतचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’या कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल कुवेतचे अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे आभार  मानले. द्विपक्षीय, जागतिक, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या बहु पक्षीय मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी विचारांचे आदान-प्रदान केले.

पारंपरिक, घनिष्ट आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध आणि सर्वच क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याची इच्छा पाहता भारत आणि  कुवेत मधले संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’ स्तरावर नेण्याला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. हे दोन्ही देशांच्या सामायिक हिताचे आणि दोन्ही देशातल्या जनतेच्या परस्पर हिताचे आहे यावर या नेत्यांनी भर दिला. धोरणात्मक भागीदारी उभारल्यामुळे उभय देशांमधले दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध अधिक विस्तारतील आणि सखोलही होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे पंतप्रधान महामहीम शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल जबर अल मुबारक अल सबाह यांच्या समवेत द्विपक्षीय चर्चा केली. नव्याने स्थापित झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही  बाजूंनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, उर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान आणि जनते-जनतेमधले  संबंध यासह प्रमुख क्षेत्रात समग्र आणि व्यापक सहयोगाच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याप्रती आपली कटिबद्धता दर्शवली.

सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक साधर्म्य यांच्या पायावर उभारलेल्या शतकांपासूनच्या प्राचीन ऐतिहासिक संबंधांचे उभय पक्षांनी स्मरण केले. विविध स्तरावर सुरु असलेल्या चर्चेविषयी या नेत्यांनी समाधान व्यक्त केले, या चर्चा बहुआयामी द्विपक्षीय सहकार्याला वेग देण्यात आणि ते  कायम राखण्यात सहाय्य करत आहेत.मंत्री स्तरीय आणि वरिष्ठ अधिकारी स्तरावर नियमित द्विपक्षीय आदान-प्रदानाच्या माध्यमातून उच्च स्तरीय आदान- प्रदानाची सध्याची गती कायम राखण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला.

भारत आणि कुवेत यांच्या दरम्यान सहकार्य विषयक संयुक्त आयोगाच्या (जेसीसी) स्थापनेचे या नेत्यांनी स्वागत केले.  दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण आयामावर देखरेख आणि आढावा घेण्यासाठी जेसीसी ही संस्थात्मक यंत्रणा असेल आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री त्याचे प्रमुख असतील. आरोग्य, मनुष्य बळ आणि हायड्रोकार्बन क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या संयुक्त कृती गटांव्यतिरिक्त  विविध क्षेत्रात आपले द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्यासाठी व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि कौशल्य विकास, सुरक्षा आणि दहशतवादाला आळा, कृषी आणि संस्कृती या क्षेत्रात नव्या संयुक्त कृती गटांची स्थापना करण्यात आली आहे. जेसीसी आणि जेडब्ल्यूजीच्या लवकरच बैठका आयोजित करण्यावर दोन्ही पक्षांनी भर दिला.

व्यापार हा दोन्ही देशांमधला स्थायी दुवा आहे याची दखल दोन्ही पक्षांनी घेतली आणि द्विपक्षीय व्यापाराचे वैविध्यीकरण आणि व्यापार वृद्धीसाठीच्या संभाव्य क्षमता यावर दोन्ही देशांनी भर दिला. व्यापार शिष्टमंडळ आदान-प्रदानाला प्रोत्साहन आणि संस्थात्मक संबंध दृढ करण्याच्या गरजेवरही त्यांनी जोर दिला.

भारत ही जगातली वेगाने विकसित होणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे जाणत आणि गुंतवणूक करण्याची कुवेतची लक्षणीय क्षमता लक्षात घेत उभय पक्षांनी भारतात गुंतवणूक करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. परकीय थेट गुंतवणूक आणि परकीय संस्थात्मक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांचे कुवेतने स्वागत केले आणि तंत्रज्ञान, पर्यटन,आरोग्यसेवा,अन्न सुरक्षा,लॉजिस्टिक आणि इतर विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी स्वारस्य दर्शवले. कुवेतचे गुंतवणूक अधिकारी आणि  भारतीय संस्था, कंपन्या आणि निधी यांच्यात अधिक घनिष्ट संबंधांची आवश्यकता त्यांनी ओळखली. पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतवणूक आणि सहभागी होण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांच्या कंपन्यांना  प्रोत्साहन दिले.द्विपक्षीय गुंतवणूक कराराबाबत सध्या सुरु असलेल्या वाटाघाटीना  वेग देण्याचे आणि त्या पूर्णत्वाला नेण्याचे निर्देश त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधित यंत्रणांना दिले.

उर्जा क्षेत्रातली द्विपक्षीय भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर दोन्ही पक्षांनी चर्चा केली. द्विपक्षीय उर्जा व्यापाराबाबत समाधान व्यक्त करत तो अधिक व्यापक करण्याची क्षमता आहे यावर त्यांनी सहमती दर्शवली.अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम क्षेत्रात अधिक समन्वयासह ग्राहक-विक्रेता संबंधांवरून सहकार्य समावेशक भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याच्या मार्गांवर त्यांनी चर्चा केली.  तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन आणि खनन, शुद्धीकरण,अभियांत्रिकी सेवा, पेट्रोकेमिकल उद्योग, नवी आणि नविकरणीय उर्जा  क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या कंपन्यांना सहाय्य करण्यासाठी उभय पक्षांनी उत्सुकता दर्शवली. भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह कार्यक्रमात कुवेतच्या सहभागाबाबत  चर्चा करण्याला दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली.

भारत आणि कुवेत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारी मध्ये संरक्षण हा महत्वाचा घटक आहे याला उभय बाजूनी सहमती दर्शवली. संयुक्त लष्करी सराव,संरक्षण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षा,संरक्षण उत्पादनांचा संयुक्त विकास आणि उत्पादन यासह द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक भक्कम करण्यासाठी आवश्यक ढाचा पुरवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले.

सीमापार दहशतवादासह कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचा दोन्ही बाजूनी  निःसंदिग्धपणे निषेध केला आणि दहशतवादाला  मिळणारा थारा आणि आर्थिक पाठबळ रोखण्याचे आणि दहशतवादाचे प्रशिक्षण तळ उध्वस्त करण्याचे आवाहन केले. सुरक्षा विषयक सध्या सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्याबाबत समाधान व्यक्त करत दोन्ही बाजूंनी दहशतवादप्रतिबंधक मोहिमा,माहिती आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण,अनुभवांचे, उत्तम प्रथांचे आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान,क्षमता उभारणी यासंदर्भात सहकार्य वृद्धिंगत करण्याला तसेच कायदा अंमलबजावणी, मनी लॉड्रिंग, अंमली पदार्थ वाहतूक विरोधी आणि इतर  आंतरराष्ट्रीय  गुन्ह्यांविरोधात सहकार्य बळकट करण्याला उभय पक्षांनी सहमती दर्शवली. दहशतवादासाठी सायबर स्पेसचा वापर, सामाजिक सलोख्याला धोका, कट्टरतावाद रोखणे यासह सायबर  सुरक्षा क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे मार्ग आणि साधने यावर दोन्ही पक्षांनी चर्चा केली. 2024 नोव्हेंबर 4-5 रोजी कुवेतच्या यजमानपदाखाली आयोजित केलेल्या ‘दहशतवादाला प्रतिबंध आणि सीमा सुरक्षेसाठी लवचिक यंत्रणा उभारणी यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करणे- दुशांबे प्रक्रियेचा कुवेत टप्पा’ या चौथ्या उच्च स्तरीय परिषदेच्या फलनिष्पत्तीची भारताने प्रशंसा केली.

आरोग्य सहकार्य  हा द्विपक्षीय संबंधांचा महत्वाचा स्तंभ याची दखल दोन्ही बाजूनी घेतली आणि या महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्याप्रती कटीबद्धता व्यक्त केली. कोविड-19 महामारीच्या काळातल्या द्विपक्षीय सहकार्याची दोन्ही पक्षांनी प्रशंसा केली. कुवेत मध्ये भारतीय औषध निर्मिती कारखाना उभारण्याच्या शक्यतेबाबत त्यांनी चर्चा केली. औषध नियामक प्राधिकरणांमधल्या सामंजस्य कराराबाबत सध्या सुरु असलेल्या चर्चेमध्ये  वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही बाजूंनी उदयोन्मुख तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सखोल सहकार्याचा पाठपुरावा करण्याविषयी स्वारस्य व्यक्त केले. त्यांनी ई-गव्हर्नन्सला पुढे नेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी क्षेत्रातील धोरणे आणि नियमनांमध्ये दोन्ही देशांच्या उद्योग/कंपन्यांना सुविधा देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करत बी2बीअर्थात परस्पर व्यापार सहकार्याची चाचपणी करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. 

कुवैती बाजूने आपली अन्न-सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करण्याविषयी स्वारस्य व्यक्त केले. दोन्ही बाजूंनी भारतातील फूड पार्कमध्ये कुवैती कंपन्यांच्या गुंतवणुकीसह सहकार्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चे सदस्य होण्याच्या कुवेतच्या निर्णयाचे भारतीय बाजूने स्वागत केले, ज्यामुळे कमी-कार्बन वाढीच्या मार्गांचा विकास आणि तैनाती आणि शाश्वत ऊर्जा उपायांना चालना देण्यासाठी सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 

आयएसए अंतर्गत जगभरात सौर ऊर्जेची तैनाती वाढविण्याच्या दिशेने जवळून काम करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. दोन्ही देशांच्या नागरी हवाई प्राधिकरणांमध्येनुकत्याच झालेल्या बैठकांची दोन्ही बाजूंनी दखल घेतली. 

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय विमानउड्डाण आसन क्षमतेत वाढ आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचे मान्य केले. 2025-2029 साठी सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम (CEP)जो कला, संगीत आणि साहित्य महोत्सवांमध्येअधिक सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करेल त्याच्या नूतनीकरणाचे कौतुक करून, दोन्ही बाजूंनी लोकांचा लोकांशी संपर्क आणखी वाढवण्यासाठी आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

2025-2028 साठी क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरील कार्यकारी कार्यक्रमावर स्वाक्षरी केल्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. जे क्रीडा क्षेत्रातील परस्पर देवाणघेवाण आणि खेळाडूंच्या भेटी, कार्यशाळा, परिसंवाद आणि परिषदांचे आयोजन, दोन्ही राष्ट्रांमधील क्रीडा प्रकाशनांची देवाणघेवाण यासह सहकार्य मजबूत करेल.

दोन्ही देशांच्या उच्च शैक्षणिक संस्थांमधील संस्थात्मक संबंध आणि देवाणघेवाण मजबूत करणे यासह शिक्षण हे सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे दोन्ही बाजूंनी अधोरेखित केले. शैक्षणिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि डिजिटल लायब्ररी यामधील संधींचा शोध घेण्यातही दोन्ही बाजूंनी स्वारस्य व्यक्त केले. शेख सौद अल नासेर अल सबा कुवैती डिप्लोमॅटिक इन्स्टिट्यूट आणि सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस (एसएसआयएफएस) यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत उपक्रमांचा एक भाग म्हणून, दोन्ही बाजूंनी कुवेतमधील मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्लीतील एसएसआयएफएस येथे विशेष अभ्यासक्रम आयोजित करण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

दोन्ही बाजूंनी ही बाब विचारात घेतली की दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले शतकानुशतकांचे जुने संबंध ऐतिहासिक भारत-कुवेत संबंधांचे मूलभूत स्तंभ आहेत. कुवेतच्या नेतृत्वाने कुवेतमधील भारतीय समुदायाने त्यांच्या यजमान देशाच्या प्रगती आणि विकासासाठी केलेल्या भूमिकेबद्दल आणि योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले, कुवेतमधीलभारतीय नागरिक त्यांच्या शांततापूर्ण आणि कठोर परिश्रमशील स्वभावासाठी अत्यंतआदरणीय आहेत. 

कुवेतमधील भारतीय नागरिकांकडे त्यांच्या शांत आणि परिश्रमी स्वभावामुळे अतिशय आदराने पाहिले जात असल्याचे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील अतिशय विशाल आणि उत्साही भारतीय समुदाचे कल्याण आणि हितरक्षण सुनिश्चित केल्याबद्दल कुवेती नेतृत्वाकडे समाधानाची भावना व्यक्त केली. मनुष्यबळाचे एकत्रिकरण आणि सुयोग्य वापर या क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ काळापासून असलेले आणि ऐतिहासिक सहकार्याची खोली आणि महत्त्वावर दोन्ही बाजूंनी भर दिला. निर्वासित, कामगार एकत्रिकरण आणि परस्परहिताशी संबंधित कामगार आणि मनुष्यबळ संवादासोबतच मुत्सद्दी संवादांच्या नियमितबैठकांचे आयोजन करण्याबाबतही दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. 

संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचांवर दोन्ही बाजूंमधील उत्तम समन्वयाची दोन्ही पक्षांनी प्रशंसा केली. 2023 मध्येभारताच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO)अध्यक्षतेदरम्यान कुवेतच्या एससीओमध्ये ‘संवाद भागीदार’म्हणून प्रवेशाचे भारतीय बाजूने स्वागत केले. भारतीय बाजूने आशियाई सहकार्य संवाद (एसीडी) मध्ये कुवेतच्या सक्रीय भूमिकेची देखील प्रशंसा केली. कुवैती पक्षाने एसीडी चे प्रादेशिक संघटनेत रूपांतर करण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

यावर्षी जीसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्याबद्दल महामहीम अमीर यांचे पंतप्रधान अमीर यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली वाढत्या भारत-जीसीसी सहकार्याला आणखी बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही बाजूंनी भारत-जीसीसी रियाध येथे 9 सप्टेंबर2024 रोजी परराष्ट्र मंत्रिस्तरावर झालेल्या धोरणात्मक संवादासाठी प्रारंभिक भारत-जीसीसी संयुक्त मंत्रिस्तरीय बैठकीच्या फलनिष्पत्तीचे स्वागत केले. जीसीसीचे विद्यमान अध्यक्ष म्हणून अलीकडेच आरोग्य, व्यापार, सुरक्षा, कृषी आणि अन्न सुरक्षा, परिवहन, ऊर्जा, संस्कृतीसह इतर क्षेत्रांमध्ये अंगीकृत केलेल्या संयुक्त कृती योजने अंतर्गत भारत-जीसीसी सहकार्य अधिक बळकट करण्याला कुवेती बाजूने पूर्ण पाठिंब्याची हमी दिली. भारत-जीसीसी मुक्तव्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वावर देखील दोन्हीबाजूंनी भर दिला. 

संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांच्या संदर्भात, दोन्ही नेत्यांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एक प्रमुख घटक म्हणून समकालीन वास्तवांचे प्रतिबिंबित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रावर केंद्रितअसलेल्या प्रभावी बहुपक्षीय प्रणालीच्या महत्त्वावर भर दिला. दोन्ही बाजूंनी अधिक प्रतिनिधित्वकारक, विश्वासार्ह आणि प्रभावी बनवण्यासाठी सुरक्षा परिषद सदस्यत्वाच्या दोन्ही श्रेणींमध्ये विस्ताराद्वारे संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांची आवश्यकता अधोरेखित केली.

भेटीदरम्यान खालील कागदपत्रांवर स्वाक्षरी/देवाणघेवाण करण्यात आली, ज्यामुळे बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील तसेच सहकार्याच्या नवीन क्षेत्रांसाठी दालने खुली होतील:

  • संरक्षण क्षेत्रात भारत आणि कुवेतयांच्यातील सहकार्यविषयक सामंजस्य करार.
  • 2025-2029 या वर्षांसाठी भारत आणि कुवेतदरम्यान सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम.
  • भारत आणि कुवेत यांच्यातील 2025-2028साठी क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत सरकारचे युवा व्यवहारआणि क्रीडा मंत्रालय आणि कुवेत सरकारचे युवा आणि क्रीडा सार्वजनिक प्राधिकरण यांच्यातील कार्यकारी कार्यक्रम.
  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे(आयएसए) कुवेतचे सदस्यत्व. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल कुवेतच्या अमीरांचे आभार मानले. या भेटीने भारत आणि कुवेत यांच्यातील मैत्री आणि सहकार्याच्या अतिशय भक्कम नातेसंबंधांची पुष्टी झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबेरअल-सबाह,युवराज महामहीम शेख सबाह अल्-खालीद, अल-सबाह अल हमद अल-मुबारक अल सबाह आणि महामहीम शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-जाबेर अल-मुबारक अल-सबाह, कुवेतचे पंतप्रधान यांना देखील भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

 

* * *

S.Tupe/Nilima/Shailesh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai