मथेन वन्दामि।
जगभरातील सर्व जैन अनुयायी आणि भारताच्या संत परंपरेचे वाहक असलेल्या सर्व धर्म निष्ठावंतांना मी वंदन करतो. या कार्यक्रमाला अनेक पूज्य संतजन उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचे दर्शन, आशीर्वाद आणि सहवास मला अनेकवेळा लाभला आहे. गुजरातमध्ये असताना वडोदरा आणि छोटा उदयपूरच्या कंवाट गावातही संतवाणी ऐकण्याची संधी मला मिळाली. आचार्य पूज्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी यांच्या 150 व्या जयंती वर्षांची सुरुवात झाली तेव्हा आचार्यजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. आज पुन्हा एकदा मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हा संतांमध्ये सहभागी झालो आहे. आज आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी यांना समर्पित एक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे ही संधी माझ्यासाठी दुप्पट आनंद घेऊन आली आहे. पूज्य आचार्यजींनी आपल्या जीवनात कार्याच्या माध्यमातून, भाषणातून आणि तत्त्वज्ञानातून प्रतिबिंबित केलेल्या आध्यात्मिक चेतनेशी लोकांना जोडण्याचा, टपाल तिकीट आणि नाण्यांचे प्रकाशन हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न आहे.
दोन वर्ष चाललेल्या या सोहळ्याचा आता समारोप होत आहे. या दरम्यान तुम्ही श्रद्धा, अध्यात्म, देशभक्ती आणि देश शक्ती वाढवण्यासाठी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद आहे. संतजन, आज जग युद्ध, दहशत आणि हिंसाचाराचे संकट अनुभवत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने, जग त्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन शोधत आहे. अशा परिस्थितीत भारताची प्राचीन परंपरा, भारताचे तत्त्वज्ञान आणि आजच्या भारताचे सामर्थ्य जगासाठी मोठी आशा बनत आहे. आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर महाराज यांनी दाखवलेला मार्ग, जैन गुरूंची शिकवण, हा या जागतिक संकटांवर उपाय आहे. आचार्यजी ज्या प्रकारे अहिंसा, एकांतवास आणि परित्याग या तत्वांना अनुसरून जीवन जगले आणि लोकांमध्ये या प्रती विश्वास निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले गेले, ते आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. फाळणीच्या भीषण काळातही त्यांचे शांतता आणि सौहार्दाचे आवाहन स्पष्टपणे दिसून आले. भारताच्या फाळणीमुळे आचार्य श्रींना चातुर्मासाचा उपवास सोडावा लागला होता .
एकाच ठिकाणी राहून साधनेचे हे व्रत किती महत्त्वाचे आहे हे तुमच्यापेक्षा चांगले कोणाला माहीत आहे. मात्र स्वत: पूज्य आचार्य यांनीही भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि बाकी लोक ज्यांना सर्व काही सोडून इथे यावे लागले, त्यांच्या सुखाची आणि सेवेची त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली.
मित्रांनो,
आचार्यांनी परित्यागाचा जो मार्ग सांगितला, स्वातंत्र्य चळवळीत पूज्य महात्मा गांधींनीही तो अवलंबला. परित्याग म्हणजे केवळ त्याग नव्हे, तर सर्व प्रकारच्या आसक्तींवर नियंत्रण ठेवणे देखील परित्याग आहे. आपल्या परंपरेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी प्रामाणिकपणे काम करून सर्वांच्या कल्याणासाठी अधिक चांगले कार्य करता येते हे आचार्य श्रींनी दाखवून दिले आहे.
मित्रांनो,
गच्छाधिपती जैनाचार्य श्री विजय नित्यानंद सुरीश्वर जी वारंवार सांगतात की गुजरातने देशाला 2-2 वल्लभ दिले आहेत. हा देखील योगायोग आहे की, आज आचार्यजींचा 150 वा जयंती उत्सव पूर्ण होत आहेत आणि काही दिवसांनी आपण सरदार पटेल यांची जयंती, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणार आहोत. आज ‘स्टॅच्यू ऑफ पीस‘ (शांततेचा पुतळा) हा संतांच्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी (एकतेचा पुतळा) हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. आणि हे केवळ उंचच पुतळे नाहीत तर ते एक भारत, श्रेष्ठ भारताचे सर्वात मोठे प्रतीक देखील आहेत.सरदार साहेबांनी तुकड्यांमध्ये विभागलेला , संस्थानांमध्ये विभागलेला भारत एकसंध केला. आचार्यजींनी देशाच्या विविध भागात फिरून भारताची एकता आणि अखंडता, भारताची संस्कृती बळकट केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या चळवळी झाल्या, त्या काळातही त्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसोबत मिळून काम केले.
मित्रांनो,
आचार्य जी म्हणायचे की “आर्थिक समृद्धीवर देशाची समृद्धी अवलंबून असते, स्वदेशीचा अवलंब करून भारताची कला, भारताची संस्कृती आणि भारताचे सुसंस्कार जिवंत ठेवता येतील”. धार्मिक परंपरा आणि स्वदेशी यांना एकत्र प्रोत्साहन कशाप्रकारे देता येईल, यासंदर्भात त्यांनी शिकवण दिली. त्यांचे कपडे पांढरे असायचे, पण त्याचबरोबर ते कपडे खादीचेच असायचे. हे त्यांनी आयुष्यभर अंगिकारले. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा अशाप्रकारचा संदेश आजही स्वातंत्र्याच्या अमृत काळातही अत्यंत समर्पक आहे. आत्मनिर्भर भारतासाठी प्रगतीचा हा मूलमंत्र आहे. त्यामुळे आचार्य विजय वल्लभ सुरीश्वरजींपासून ते आत्ताचे गच्छाधिपती आचार्य श्री नित्यानंद सुरीश्वर जी यांच्यापर्यंत हा जो मार्ग दृढ झाला आहे, तो आपल्याला आणखी बळकट करायचा आहे. पूज्य संत, तुम्ही भूतकाळात जी समाजकल्याण, मानवसेवा, शिक्षण आणि जनजागृतीची समृद्ध परंपरा विकसित केली आहे, तिचा निरंतर विस्तार होत राहिला पाहिजे, ही आज देशाची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण विकसित भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यासाठी देशाने पाच संकल्प केले आहेत. या पाच संकल्पांच्या सिद्धीमध्ये तुम्हा संतांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण नागरी कर्तव्ये कशाप्रकारे सक्षम करू शकतो यासाठी संतांचे मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचे आहे. यासोबतच देशात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर भर असायला हवा, भारतातील जनतेने बनवलेल्या वस्तूंना मान-सन्मान मिळायला हवा,.यासाठी तुमच्याकडून जागृती अभियान ही देशाची मोठी सेवा आहे. तुमचे बहुतेक अनुयायी व्यापार-व्यवसायाशी संबंधित आहेत. ते केवळ भारतात बनवलेल्या वस्तूंचा व्यापार करतील, खरेदी-विक्री करतील, भारतात बनवलेल्या वस्तूच वापरतील हा त्यांनी घेतेलेला संकल्प महाराज साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. सर्वांचे प्रयत्न, सर्वांसाठी, संपूर्ण देशासाठी असावेत हा प्रगतीचा मार्ग आचार्यश्रींनी ही आपल्याला दाखवला आहे. आपण हा मार्ग प्रशस्त करत राहू या, या सदिच्छांसह पुन्हा एकदा सर्व संतजन यांना माझा प्रणाम!
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!
***
ST/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Tributes to Shree Vijay Vallabh Surishwer Ji Maharaj on his Jayanti. https://t.co/KVMAB5JRmA
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2022