Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद


व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रीमंडळातील सहकारी, सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व गुरुजन,

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या कृष्णजन्मही आहे आणि राधाकृष्णन यांचाही जन्मदिन आहे आणि याच कारणामुळे मला आज विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. कधी कधी लोकांना वाटते की शिक्षक दिनानिमित्त मी विद्यार्थ्यांशी का संवाद साधतो ? माझा असा अनुभव आहे की, विद्यार्थीच शिक्षकांची ओळख असतात. विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने आपल्या पराक्रमाने आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्‍वल करतात. आपल्या जीवनाला आकार देण्यात आपल्‍या आईचा आणि आपल्या शिक्षकांचे योगदान नाही, असे न मानणाऱ्या व्यक्ती या जगात विरळाच असतील. ज्यांची चरित्र अथवा आत्मचरित्र आपण वाचली असतील अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या गोष्टीचा उल्लेख आवर्जून असतो की आई जन्म देते आणि गुरु जीवन देतो, जीवन जगण्याची दिशा दाखवतो. आपल्या मनावरही शिक्षकांचा इतका प्रभाव असतो, की जर आपण आठव्या इयत्तेत शिकत असलो आणि जर का आपल्या एखाद्या शिक्षकाने आपल्याला सांगितले, की रात्री झोपतांना उशी अमूक एका प्रकारे ठेवा, तेव्हा आपण त्यांना कधीही असे विचारले नसेल की हा विचार तुम्ही कुठुन आणलात, कुठे वाचला होतात, कुठल्या शास्त्रात आहे, कुठल्या डॉक्टरने सांगितलयं ? पण आपल्या मनावर शिक्षकांचे सांगणे एवढे ठसते की आपण जेव्हा झोपायला जातो, तेव्हा ते शिक्षक आठवतात, ती उशी आठवते आणि आपण ते कधीच विसरु शकत नाही, जन्मभर विसरु शकत नाही.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, त्यांच्या बालपणी आपल्या शिक्षकांनी सांगितलेली अशी एखादी तरी गोष्ट असतेच जी आपल्या जीवनाचा भाग बनलेली असेल. पण आपण जवळजवळ सर्वचजण आपल्या शिक्षकांनी सांगितलेली एखादी कठोर गोष्ट हमखास विसलेले असू आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे जे महात्म्य आहे आणि शिक्षकांच्या जीवनात विद्यार्थ्यांचे जे महत्व आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि जोपर्यंत आपसातील हे सामंजस्य विकसित होत नाही, तोपर्यंत एक दरी कायम राहील.
कधी कधी मला वाटते की, ज्या शिक्षक मित्रांना लिखाणाची सवय आहे, त्यांनी त्यांच्या जीवनातील आठवणीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी लिहिले पाहिजे, जसे की जेव्हा मी शिक्षक होतो, तेव्हा पाचव्या इयत्तेत असा एक विद्यार्थी होता, जो अमुक एक करत होता, तेव्हाच आपल्याला कळेल की तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात किती गुंतला होता. निकाल आल्यानंतर चांगले गुण मिळवणारा विद्यार्थीच दिसून येईल आणि बाकीचे विद्यार्थी दिसलेच नाहीत, तर मी मानतो की, तो शिक्षक अपूर्ण आहे आपण एक विसरता कामा नये की, एका ठराविक वयानंतर विद्यार्थी सर्वाधिक वेळ व्यतीत करतो, तो आपल्या शिक्षकांबरोबरच. याचवेळी विद्यार्थी आपल्या कुटुंबाबरोबर कमी वेळ घालवतो आणि त्यामुळेच या काळात शिक्षकांची जबाबदारी अधिकच वाढते.

जीवनातल्या सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतरही डॉक्टर राधाकृष्णन यांची आपल्यातील शिक्षक कायम जागृत ठेवला. जर का शिक्षक हाडाचा शिक्षक असेल तर त्याला वयाच बंधन नसतं तो कधीही निवृत्त होत नाही. आपण पाहिले असेल, की गावात 80-90 वर्षांचे आणि शिक्षक असलेले पणजोबा असतील, जे आपल्या पतवंडांना शिकवत असतील. पतवंड सांगत असेल की आता अभ्यासक्रम बदलला आहे आणि तरीही पणजोबा सांगत असतील, की नाही, हे शिकलेच पाहिजे. त्यांच्या नसानसात भिनलेलं हे शिक्षकत्व आहे, जे त्यांना हे काम करण्याची प्रेरणा देते.

आपल्याला आणि आपल्यापैकी अनेक जण आणि सर्वच विद्यार्थी मित्र, ज्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या काळात जगण्याची संधी मिळाली नाही. पण आपण डॉ. अब्दुल कलाम यांना जवळून पाहिले आहे. ते पण भारताचे राष्ट्रपती होते आणि ते ही मुलांवर खूप प्रेम करत असत. आणि तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. तुम्हाला लोकांनी कशा प्रकारे स्मरणात ठेवले पाहिजे असे विचारले असता, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगितले होतं, की लोकांना माझी आठवण ठेवायची असेल , तर ती त्यांनी एका शिक्षकाच्या रुपातच ठेवावी आणि त्यांच्यासाठी हे केवळ पोकळ शब्द नव्हते. राष्ट्रपती पदावरुन निवृत्त झाल्‍यावर, दुसऱ्याच दिवशी ते चेन्नईला रवाना झाले आणि चेन्नईत जाऊन त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्यांनी अंतिम श्वास घेतला. याचाच अर्थ असा की त्यांच्या अंतर्मनातील शिक्षकाचा तो एकवटलेला समर्पित भाव एवढा अत्युतम होता की ते आपल्या जीवनात एक क्षणही विद्यार्थ्यांपासून वेगळे राहू शकले नाहीत, विद्येच्या मार्गापासूनही दूर जाऊ शकले नाहीत आणि प्रत्येक क्षण नव्या प्रतिभेचा शोध घेत राहिले.

आपल्याला या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, की केवळ आपल्या देशातच नाही, तर जगभरातल्या अनेक देशात वेगवेगळ्या स्वरुपात शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षणाची जी व्यवस्था आहे, ती कायम चेतनामय राहिली पाहिजे, ही या मागची भावना आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती आदर, शिक्षकांचे शिक्षणाप्रती असलेले समर्पण आणि विद्यार्थी-शिक्षकांमधील हा आपलेपणाचा भाव ही अशी जोडी आहे, जी आपल्याला केवळ ज्ञानच देत नाही, तर जीवन जगण्याची कलाही शिकवते आणि स्वप्न साकारण्याची सवयही लावते.

मला एकदा कोणीतरी एक अनुभव सांगितला होता. आंगणवाडीमध्ये काम करणारी एक सेविका होती. ती जास्त शिकलेली नव्हती, पांचवी-सातवीच शिकलेली असेल… अंगणवाडीत येणारी मुलं गाणी म्हणणं, खेळणं अशा उपक्रमात रमतात. पण या महिलेला आंगणवाडी सेविकेला या मुलांप्रती इतकं ममत्व होतं की गरीब असूनही तिने काम सुरु केलं. गुरु, संस्‍कार कसे करतात ते पहा. गरीब घरात जुनी साडी जेवढया लांबवर ओढता येईल तिथपर्यंत ओढून त्यावर झोपतात नंतर भांडीवाल्याला ती देऊन काही भांडी घेता येतील असा विचार करतात. कोणती ना कोणतीतरी वस्तू विकत घेण्याच्या प्रयत्नात राहतील. या गरीब आंगणवाडी सेविकेने काय केलं आपल्या जुन्या साडीचे छोटे तुकडे करुन त्याच्या कडा नीट करुन त्याचे लहान लहान रुमाल केले. बाजारात जाऊन स्वत:च्या पैशांनी सेफ्टी पिना आणल्या. तिच्या आंगणवाडीत जी 20-20 मुलं येत होती, त्यांना अंगणवाडीत येताना त्यांच्या कपडयांवर, सेफ्टी पिनने हे हात रुमाल लावायची आणि मुलांना शिकवायची की कसे हात पुसायचे, कसे नाक पुसायचे, हात रुमालाचा वापर कसा करायचा याचे शिक्षण नियमित दयायची. मुलं घरी परत जाताना ते रुमाल काढून घेऊन आपल्या घरी नेऊन दुसऱ्या दिवशी धुऊन आणायची. एका गुरुनं मुलांच्या जीवनावर केवढा मोठा संस्कार केला ते तुम्हीच सांगा हे जे गुंतणं आहे. हा जो भक्तीभाव असतो त्‍याची वृत्ती बनते आणि त्यातूनच आपल्याला जशा प्रकारचे जीवन हवे असते ते जीवन बनते.

कुंभार जसा मातीचा गोळा घेऊन त्याला आकार देतो एका हाताने सावरत त्याला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षकही बालकाच्या आयुष्याला आकार देतो आज शिक्षकदिनी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांप्रती तो आदरभाव आवश्यक आहे आणि शिक्षकांच्या मनातही विद्यार्थ्यांबद्दल विशेष भाव आवश्यक आहे. हा व्यवसायाप्रमाणे नाही हा त्यापेक्षा विशेष पेशा आहे. एखाद्या डॉक्टरनं कठीण ऑपरेशन करुन कोणाला जीवनदान दिलं तर वर्तमानपत्रात त्याची बातमी येते. मात्र शिक्षक आपल्या कारकीर्दीत असे शंभर डॉक्टर घडवितो त्या शिक्षकाकडे कोणाचं लक्ष जात नाही. आपल्याला चांगले डॉक्टर मिळाले असतील, चांगले अभियंते मिळाले असतील, चांगले शास्त्रज्ञ मिळाले असतील तर त्यामागे कोणता ना कोणता गुरु असेल शिक्षक असेल ज्यानं त्यांना घडविले असेल आणि तो शिक्षक देशनिर्मितीच्या कार्यात गुंतला असेल. आज या घडीला त्यांच्या या तपश्चर्येचं स्मरण करण्याचा दिवस आहे.

मी लहान होतो तेव्हा गावात शिक्षक आदरस्थानी असे. घरात कोणतंही शुभकार्य असेल तर घरातले लोक मुलांना सांगत की हे शिक्षकांसाठी ठेव, त्यांना देऊन ये. हा प्रसाद त्यांना दे. थोडक्यात संपूर्ण गावात त्यांना सन्मानजन्य वागणूक मिळण्याची व्यवस्था असे.

आपल्याला ही व्यवस्था पुन्हा विकसित करायला हवी. प्रत्येक गोष्ट पैशामुळे होत नाही, काही गोष्टी संस्कारामुळे होतात, आपुलकीनं होतात अशा कार्यक्रमातून या गोष्टींना उजाळा देण्याचा त्यांना व्यापक रुप देण्याचा प्रयत्न आहे.

याआधीही शिक्षक दिन साजरा केला जात असे. तेव्हा काही शाळांत एखाद दुसरा उत्साही शिक्षक डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगत असे. नाहीतर विद्यार्थ्यांना, शिक्षक बनायची संधी दिली जात असे. विद्यार्थीही काय विचार करत की शिक्षक बनायचं म्हणजे कपडे बदलणे. शालेय गणवेशात येण्याऐजी आज शिक्षकांच्या वेशात यायचं. मुली असतील तर त्यांनी साडी नेसून यायचं. त्यानंतर वर्गात जाऊन एखादी गोष्ट शिकवायची आणि आनंद मानायचा यापुढे काही होत नसे. या प्रेरक पर्वाला या व्यवस्थेला पुन्हा झळाळी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचं महत्त्व कसं वृध्दींगत करता येईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

विद्यार्थ्यांबरोबर गप्पागोष्टी करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कारण बालमन आपल्याला जेवढं शिकवतं तेवढं कोणीच शिकवत नाही. बालकाचं निरीक्षण अचूक असतं. बालक ज्या दृष्टीकोनातून एखाद्या घटनेकडे पाहतो तो दृष्टीकोन म्हणजे त्या घटनेचा खरा आरसा असतो. देशभरातल्या बालकांशी संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली आहे. मी या विभागाचा आभारी आहे.

आज येथे आणखी दोन कामं झाली आहेत. वित्त मंत्रालयानं डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ 125 रुपयाचं आणि 10 रुपयांचं नाणं काढलं आहे, आणि दुसरं म्हणजे कला उत्सव या संकेतस्थळाचं उद्‌घाटन करण्यात आलं आहे. आपल्या देशात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही युवा-महोत्सव असतो, पण आता काळ बदलला आहे. लहान-लहान मुलातही इतके गुण असतात त्यांना संधी मिळायला हवी देशासाठी केवळ यंत्रवत मानव तयार करायचे नाहीत. आपण कितीही शिकलो, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचं कितीही ज्ञान घेतलं, तरी आपण यंत्रमानव बनता कामा नये. आपल्यामध्ये संवेदना जागृत राहिल्या पाहिजेत आणि कलेतून, साधनेतून त्या येतात. कलेमधून साक्षात्कार घडतो. कलेमुळे जीवनात सहजता येते. कलेवाचून जीवन यांत्रिक बनते. या कला उत्सवाच्या माध्यमातून शालेय मुलांना संधी मिळावी त्यांची प्रतिभा बहरावी. पण हा केवळ नृत्य-नाटय कार्यक्रम नव्हे यामागे एक कल्पना आहे. आपण एक संकल्पना निश्चित केली, बेटी बचाओ बेटी पढाओ मग त्या कला उत्सवात जितक्या नाटयकृती येतील त्या याच विषयावर आल्या पाहिजेत, जेवढी गाणी येतील ती याच विषयावर यायला हवीत, नृत्य असतील तर याच विषयावरची हवीत. संपूर्ण देशात कला उत्सवाबरोबर एक सामाजिक उत्तरदायित्वाचं वातावरणही निर्माण व्हावं यासाठी ते संकेतस्थळावर ठेवण्यात आलं आहे.

देशातल्या सर्व शाळेतले लोक या माध्यमातून आपसात जोडले जावेत आणि कला उत्सवाला खरोखरच एक उत्सवाचं रुप मिळावे अशी मी अपेक्षा करतो.

मी पुन्हा एकदा डॉ. राधाकृष्णन यांना नमन करतो. देशातल्या सर्व गुरुजनांना नमन करतो. पीढी घडवायचं, देशाचा विकास करायचं आपलं काम आहे आपण सर्वांनी मिळून हे काम करावं ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.

N.Chitale+J.Patankar/S.Tupe