Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण

शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024

महामहिम,

नमस्कार !

आजच्या सत्राची संकल्पना अतिशय प्रासंगिक आहे आणि भावी  पिढीच्या भविष्याशी निगडित आहे. नवी दिल्ली जी -20 शिखर परिषदेदरम्यान, आपण  शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी वाराणसी कृती आराखडा  स्वीकारला होता.

आपण 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा उत्पादन तिप्पट करण्याचा आणि  ऊर्जा कार्यक्षमतेचा दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले गेले आहे आणि  याचे आम्ही स्वागत करतो.

या संदर्भात, शाश्वत विकास अजेंडा साध्य करण्याप्रति  भारताची वचनबद्धता आणि केले जात असलेले  प्रयत्न मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. गेल्या एका दशकात 40 दशलक्षहून अधिक कुटुंबांसाठी आम्ही घरे बांधली आहेत.

गेल्या 5 वर्षात 120 दशलक्ष घरांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जात  आहे. 100 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून दिले  आहे आणि 115 दशलक्षाहून अधिक कुटुंबांसाठी शौचालये बांधण्यात  आली आहेत.

मित्रांनो,

आमचे प्रयत्न पारंपारिक भारतीय विचारांवर आधारित आहेत जे दोन्ही पुरोगामी आणि संतुलित आहेत. एक श्रद्धा आहे ,ज्यामध्ये पृथ्वीला माता, नद्यांना जीवनदायिनी  आणि वृक्षांना  देवासमान मानले जाते.

निसर्गाची काळजी घेणे हे आपले नैतिक आणि मूलभूत कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. भारत हा पहिला जी -20 देश आहे ज्याने पॅरिस करारांतर्गत केलेल्या वचनबद्धतेची  वेळेपूर्वी पूर्तता केली आहे.

आता आम्ही अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या दिशेने  वेगाने वाटचाल करत आहोत. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. त्यातील 200 गिगावॅट ऊर्जा निर्मिती आम्ही आधीच साध्य केली  आहे.

आम्ही हरित संक्रमण ही लोकचळवळ बनवली  आहे. जगातील सर्वात मोठ्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती (सोलर रूफ टॉप)  कार्यक्रमासाठी  अंदाजे 10 दशलक्ष कुटुंबांनी नोंदणी केली आहे.

आणि आम्ही केवळ  स्वतःचा विचार करत नाही. आम्ही  सर्व मानवजातीच्या हिताचा विचार करतो. जागतिक स्तरावर शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही मिशन लाईफ म्हणजेच पर्यावरण-स्नेही  जीवनशैलीचा प्रारंभ केला आहे. अन्नाची नासाडी  केवळ कार्बन फूटप्रिंटच वाढवत नाही तर उपासमार देखील वाढवते. या समस्येवरही आपल्याला काम करावे लागेल.

आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. 100 हून अधिक देश त्यात सामील झाले आहेत. “एक सूर्य, एक जग , एक ग्रीड ” उपक्रमांतर्गत आम्ही ऊर्जा कनेक्टिव्हिटीवर सहकार्य करत आहोत.

भारताने हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्राची स्थापना केली आहे तसेच  जागतिक जैवइंधन आघाडी देखील सुरु केली आहे . आम्ही भारतामध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती ही व्यापक मोहीम देखील राबवत  आहोत. महत्वपूर्ण खनिजांशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही चक्रीय  दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले आहे.

“एक पेड़ मां के नाम मोहिमेअंतर्गत आम्ही यावर्षी भारतात सुमारे एक अब्ज झाडे लावली आहेत. भारताने आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडी सुरू केली. या अंतर्गत आता आम्ही आपत्तीनंतरची पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणी यावरही लक्ष केंद्रित करत आहोत.

मित्रांनो,

ग्लोबल साऊथ  देशांसाठी आणि विशेषतः छोट्या  विकसनशील बेटांच्या  आर्थिक विकासाला प्राधान्य दिले जात आहे . डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव पाहता, संतुलित आणि योग्य ऊर्जा मिश्रणाची गरज अधिक महत्त्वपूर्ण बनली आहे.

म्हणूनच ग्लोबल साऊथमध्ये  ऊर्जा संक्रमणासाठी किफायतशीर  आणि खात्रीशीर हवामान वित्तपुरवठा अधिक महत्त्वाचा बनला आहे. तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा करण्याच्या विकसित देशांच्या वचनबद्धतेची वेळेवर पूर्तता करणे देखील आवश्यक आहे.

भारत आपले यशस्वी अनुभव सर्व मित्र देशांसोबत , विशेषत: ग्लोबल साऊथ सोबत सामायिक करत आहे. याच अनुषंगाने , तिसऱ्या ग्लोबल साउथ शिखर परिषदेदरम्यान, आम्ही ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्टची घोषणा देखील केली होती. मी तुम्हा सर्वांना  या उपक्रमात आमच्यासोबत सहभागी होण्याची  आणि आमच्या प्रयत्नांमध्ये आमच्यासोबत भागीदारी करण्याची विनंती करतो.

धन्यवाद.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai