Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (3 सप्टेंबर 2016)

व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (3 सप्टेंबर 2016)


महामहिम, पंतप्रधान न्युमेन झुआन फुक,

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,

मी आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल, महामहिम, आपले आभार. आज सकाळी हो ची मिन्ह यांचे निवासस्थान आपण स्वत: उपस्थित राहून मला दाखवल्याबद्दल आभार. मला ही विशेष संधी दिल्याबद्दल आभार. हो ची मिन्ह हे विसाव्या शतकातलं एक उत्तुंग व्यक्तीमत्व होतं. व्हिएतनामच्या कालच्या राष्ट्रीय दिनानिमित्त व्हिएतनाममधल्या जनतेचं मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

भारत आणि व्हिएतनाम यांच्या समाजात 2000 वर्षांपासून प्राचीन संबंध आहेत. भारतातून व्हिएतनाममध्ये बौध्द तत्वज्ञानाचं आगमन आणि व्हिएतनामची प्राचीन हिंदू चाम मंदिरे यांची साक्ष देतात. माझ्या पीढीतल्या लोकांसाठी, व्हिएतनामला आमच्या मनात विशेष स्थान आहे. वसाहतवाद्यांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवतांना व्हिएतनामी जनतेनं दाखवलेले शौर्य स्फूर्तीदायी आहे. राष्ट्र उभारणीप्रती तुमची कटिबध्दता तुमच्या शक्तीचे दर्शन घडवते. तुमच्या निष्ठेची भारत प्रशंसा करतो. तुमच्या यशाने आनंदित होतो आणि तुमच्या या वाटचालीत भारत सदैव तुमच्यासोबत राहीला आहे.

मित्रहो,

पंतप्रधान न्युमेन झुआन फुक यांच्यासमवेत झालेली चर्चा व्यापक आणि फलदायी राहिली. द्विपक्षीय संबंधासह बहुआयामी सहकार्याबाबतही विस्तृत चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यालाही उभय पक्षांनी मान्यता दिली. या विभागातले दोन महत्वपूर्ण देश म्हणून दोन्ही देशांना ज्या बद्दल चिंता वाटते अशा प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबतही हे संबंध व्यापक करणं गरजेचं आहे. या विभागातल्या वाढत्या आर्थिक संधीचा उपयोग करण्यालाही दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे. समोर येणाऱ्या प्रादेशिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य करण्याची गरजही दोन्ही देशांनी जाणली आहे. धोरणात्मक भागीदारीवरुन सर्वंकष धोरणात्मक भागीदारी ही नवी उंची गाठण्याच्या निर्णयातून उभय देशातल्या भविष्यातल्या सहकार्याचा मार्ग आणि उद्देश प्रतीत होत आहे. यामुळे द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा आणि अधिक गती मिळेल. आपल्या प्रयत्नांमुळे या भागातल्या स्थैर्य आणि भरभराटीसाठीही आपले योगदान राहणार आहे.

मित्रहो,

जनतेच्या आर्थिक भरभराटीसाठीच्या प्रयत्नांना त्यांच्या सुरक्षिततेची जोड हवी. यासाठी पंतप्रधान न्युमेन झुआन फुक आणि मी संरक्षण संबंध अधिक व्यापक करण्याला सहमती दिली. किनाऱ्याजवळच्या भागात गस्त घालण्यासाठीच्या गस्तीनौकांच्या बांधणीसाठीचा आज याआधी झालेला करार म्हणजे आपल्या संरक्षण संबंधांना भरीव आकार देण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे. व्हिएतनामला संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यासाठी पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्स देऊ करण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. थोड्या वेळापूर्वी स्वाक्षऱ्या झालेले करार आपल्या सहकार्यातले वैविध्य आणि सखोलता दर्शवतात.

मित्रहो,

व्हिएतनाम जलदगतीने विकास आणि ठोस आर्थिक प्रगती साधत आहे.

व्हिएतनाम आपल्या जनतेचे सबलीकरण आणि भरभराट साधू इच्छितो, आपल्या कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या, उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्ण शोधांना प्रोत्साहन देण्याच्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करण्याच्या, जलदगती विकासासाठीच्या नव्या संस्थागत क्षमता निर्माण करण्याच्या आणि आधुनिक राष्ट्र घडवण्याच्या व्हिएतनामच्या या वाटचालीत भारत आपल्या सव्वाशे कोटी नागरिकांसमवेत व्हिएतनामचा भागीदार म्हणून साथ देत आहे. भागीदारीला नवा आयाम देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान न्युमेन झुआन फुक आणि मी मिळून आज अनेक निर्णय घेतले. न्हा त्रांग इथे दूरसंवाद विद्यापीठात सॉफ्टवेअर पार्क उभारण्यासाठी भारताने पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे अनुदान देऊ केले आहे. अंतराळ सहकार्याविषयीच्या कराराच्या चौकटीमुळे व्हिएतनामच्या विकासाच्या उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीने व्हिएतनाम, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसमवेत कार्य करु शकेल. द्विपक्षीय वाणिज्यिक संबंध वृध्दींगत करणे हे आमचे धोरणात्मक उद्दीष्ट आहे. 2020 पर्यंत 15 अब्ज डॉलर्सचं व्यापारी उद्दीष्ट गाठण्यासाठी व्यापार आणि व्यवसायाच्या नव्या संधी हस्तगत केल्या जातील. व्हिएतनाममधले सध्याचे भारतीय प्रकल्प आणि गुंतवणूकीचे सुलभीकरण करण्याची अपेक्षा मी व्यक्त केली आहे. तसेच भारत सरकारच्या विविध उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व्हिएतनामच्या कंपन्यांना मी निमंत्रित करतो.

मित्रहो, व्हिएतनाम आणि भारत यांच्या जनतेमधले संबंध शतकानुशतकं चालत आलेले आहे. हुनोई इथे भारतीय सांस्कृतिक केंद्र लवकरच स्थापन होऊन कार्यरत होईल अशी मी आशा करतो. मायसन इथल्या चाम स्मारकाचं जतन आणि जीर्णोध्दारासाठी भारतीय पुरातत्व विभाग लवकरच काम सुरु करणार आहे.

मित्रहो,

ऐतिहासिक संबंध, भौगोलिक स्थान, सांस्कृतिक बंध आणि धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून भारतासाठी असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट नेशन्स अर्थात आसियान महत्त्वाचे आहे. ॲक्ट इस्ट धोरणाच्या ते केंद्रस्थानी आहे. भारतासाठी आसियानचा समन्वयक म्हणून व्हिएतनामच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात भारत-आसियान भागीदारी दृढ करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.

महामहिम,

आपण थेट यजमान आहात. व्हिएतनामच्या जनतेनं दाखवलेल्या प्रेमाने माझे मन भावूक झाले आहे. आपल्या संबंधांना गती देण्यावर आपले लक्ष केंद्रीत असले पाहिजे. तुमच्या आदरातिथ्याचा मी लाभ घेतला आहे. तुमचे आणि व्हिएतनामच्या नेतृत्वाचे भारतात आदरातिथ्य करण्यात मला आनंद होईल. भारतात तुमचं स्वागत करण्याची मी अपेक्षा करतो.

धन्यवाद.

B.Gokhle/N.Chitle/V.Deokar