Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वैश्विक आयुर्वेद महोत्‍सवातील पंतप्रधानांचे भाषण

वैश्विक आयुर्वेद महोत्‍सवातील पंतप्रधानांचे भाषण


आपल्या सगळ्यांचे अभिनंदन.

नमस्कार!

मंत्रिमंडळातील माझे सहकारी

किरेन रिजिजूजी, मुरलीधरनजी, वैश्विक आयुर्वेद महोत्सवाचे महासचिव डॉ. गंगाधरनजी, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकरजी, डॉ. संगीता रेड्डीजी.

प्रिय मित्रांनो,

चौथ्या वैश्विक आयुर्वेद महोत्‍सवास संबोधित करताना मला आनंद होत आहे. या महोत्सवात अनेक तज्ज्ञ महानुभाव आपले अनुभव आणि विचार मांडणार आहेत हे जाणून खूप चांगले वाटले. यात प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांची संख्या 25 हून अधिक आहे हा एक चांगला संकेत आहे. आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीबाबत लोकांमधे रस वाढू लागल्याचेच हे निदर्शक आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या क्षेत्रात जगभर काम करणाऱ्यांची प्रशंसा करु इच्छितो. त्यांच्या ध्येयासक्त समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चयाने संपूर्ण मानवतेला लाभ होणार आहे.

मित्रांनो,

निसर्ग आणि पर्यावरणाप्रती सन्मानभाव व्यक्त करणाऱ्या भारतीय संस्कृतीशी आयुर्वेदाची नाळ जोडलेली आहे. आपल्या ग्रथांत आयुर्वेदाचे पुढील शब्दात गौरवपूर्ण वर्णन केले आहे : हिता-हितम् सुखम् दुखम्, आयुः तस्य हिता-हितम्। मानम् च तच्च यत्र उक्तम्, आयुर्वेदस्य उच्यते।

अर्थात, आयुर्वेद अनेक पैलूंचा विचार करते. निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य यास  सुनिश्चित करते. आयुर्वेदाचे वर्णन समग्र मानव विज्ञान असे केले जाऊ शकते. रोपांपासून ते आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत, शारिरीक सक्षमतेपासून ते मानसिक स्वास्थ्यापर्यंत आयुर्वेद तसेच पारंपरिक चिकीत्सा पद्धतींचा अपार प्रभाव आहे.

मित्रांनो,

असेही म्हटले जाते की, ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं’. अर्थात, वर्तमानातल्या शारिरीक आजारांवर उपचार करण्याबरोबर, एकूणच आरोग्याचे रक्षणही आयुर्वेद करते. त्यामुळेच आयुर्वेद, रोगापेक्षा निरामय निरोगीपणाबद्दल अधिक विचार करते यात आश्चर्य नाही. कोणी वैद्यांकडे गेल्यास त्यांना औषधांबरोबरच काही मंत्र-सूत्रही दिले जातात जसे की,

– भोजन करें आराम से, सब चिंता को मार। चबा-चबा कर खाइए, वैद्य न आवे द्वार॥ अर्थात, कोणत्याही तणावाशिवाय निश्चिंत मनाने भोजनाचा आनंद घ्यावा. प्रत्येक घासाचा आस्वाद घ्यावा, प्रत्येक घास ध्यैर्यपूर्वक चावावा.असे केल्याने आपल्याला पुन्हा कधीच वैद्यराजांना बोलवावे लागणार नाही. अर्थात आपण निरामय निरोगी राहाल.

मित्रांनो,

मी, जून 2020 मध्ये फायनान्शियल टाइम्समध्ये  एक लेख वाचला होता.

शीर्षक होते – कोरोना व्हायरस गीव्‍स ‘हेल्‍थ हॅलो’ प्रोडक्‍ट्स अ बूस्‍ट, म्हणजे, कोरोना विषाणूमुळे आरोग्यवर्धक उत्पादनांना प्रोत्साहन. यात हळद, आले आणि इतर मसाल्यांचा उल्लेख केला होता. कोविड-19 वैश्विक महामारीमुळे यांची मागणी सातत्याने वाढत आहे. सद्य परिस्थिती, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधे जागतिक पातळीवर अधिक लोकप्रिय ठरण्यासाठी उपयुक्‍त काळ आहे.

याप्रती लोकांचा रस वाढत आहे. आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही औषध तसेच चिकित्सा पद्धती तंदुरुस्‍तीसाठी महत्वपूर्ण आहेत हे सारे जग आता बघत आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदाचे लाभ लोक जाणू लागले आहेत. ते काढा, तुळस, काळी मिरी यांना आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवू लागले आहेत.

मित्रांनो,

पर्यटन क्षेत्राची आज कैक वैशिष्टय आहेत. परंतु भारत आपणांस विशेषकरुन वेलनेस टुरिजम म्हणजेच आरोग्यदायी पर्यटनाची सुविधा देऊ करत आहे. मी पुनरूच्चार करतो, वेलनेस टूरिजम, या आरोग्यदायी पर्यटनाचा मूळ सिद्धान्त आहे – आजारावर उपचार आणि भविष्यासाठी तंदुरुस्ती. आणि मी ज्या वेलनेस टुरीजमबद्दल  बोलतो आहे त्याचा सर्वात मजबूत स्तंभ आहे आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती. कल्पना करा, आपण केरळसारख्या हिरवाईने बहरलेल्या सुंदर राज्यामधे शरीर शुद्धीकरणाच्या पद्धतींचा लाभ घेत आहात. कल्पना करा, तुम्ही उत्तराखंडातल्या पर्वतांवर झुळझुळ वाऱ्याच्या सान्निध्यात विहंगम नदीकिनारी योग करत आहात, कल्पना करा तुम्ही पूर्वोत्तर राज्यामधल्या हिरव्यागार जंगलामधे आहात. तुम्ही जर आपल्या जीवनातील ताणतणावांनी हैराण झाला असाल तर समजून जा, भारताच्या कालातीत संस्कृतीचा अवलंब करण्याची सुयोग्य वेळ आली आहे. तुम्हाला जेव्हाही आपल्या शारिरीक आजारांवर किंवा मानसिक शांततेसाठी उपचार करायचे असतील तर भारतात या.

मित्रांनो,

आयुर्वेदाच्या लोकप्रियतेमुळे आपल्यापुढे चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. आपण या संधी गमावता कामा नयेत. आधुनिकतेशी पारंपरिकतेचा मेळ घातल्याचे अनेक लाभ झाले आहेत.तरुण पिढी आयुर्वेदीक उत्पादनांचा उपयोग करत आहे. प्रमाणाधारित आधुनिक चिकित्सा पद्धतींबरोबर आयुर्वेदालाही एकिकृत करावे ही मागणी वाढते आहे. याबरोबरच आरोग्यदायी ठरणारी पूरक आयुर्वेदीक उत्पादनेही चर्चेत आहेत. वैयक्तीक देखभाल श्रेणीतील उत्पादने आयुर्वेदकेन्द्री आहेत. या उत्पादनांच्या आवरणशैलीतही खूप सुधारणा झाली आहे. मी, आपल्या शिक्षणतज्ञांना आवाहन करतो की त्यांनी आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतींबाबत गहन संशोधन करावे.

चैतन्याने सळसळत्या आपल्या स्टार्ट अप समुदायाने आयुर्वेदीक उत्पादनांवर लक्ष्य केन्द्रीत करावे असा आग्रह मी करतो. मला विशेषत: आपल्या तरुणांचे कौतुक करायचे आहे, त्यांनी आपला पारंपरीक चिकित्सा पद्धतींचा ठेवा जगाला समजेल अशा भाषेत सादर करण्याचा विडा उचलला आहे. आपल्या भूमीचे  नैतिकतत्व आणि इथल्या तरुणांची उद्यमशीलता चमत्कार घडवू शकते असे वाटल्यास आश्चर्य नाही.

मित्रांनो,

आयुर्वेदाच्या या विश्वाला सरकारकडून पूर्ण पाठिंबा राहील असे आश्वासन मी देतो. भारताने राष्ट्रीय आयुष मिशनची स्थापना केली आहे. रास्त दरात आयुष सेवा उपलब्ध करणे आणि या माध्यमातून संबंधित चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक व्यवस्था सक्षम करण्याचे कामही हे मिशन करत आहे. आयुर्वेद, सिद्ध, यूनानी आणि होमियोपॅथी औषधांचा दर्जा राखणे, त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष ठेवणे, कच्च्या मालाची नेहमी उपलब्धता राहावी याची काळजी घेणे याचीही सुविधा हे मिशन प्रदान करत आहे. सरकार देखील गुणवत्ता नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुर्वेद आणि अन्‍य भारतीय चिकित्सा पद्धतींबाबत आमचे धोरण सुरुवातीपासूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक चिकित्सा धोरण 2014-2023 च्या अनुरूप आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनच्या (जागतिक पारंपरिक चिकित्सा केन्द्र) स्थापनेचीही घोषणा केली आहे. आम्ही या पावलाचे स्वागत करतो.

आयुर्वेद आणि चिकित्‍सा पद्धतींचे अध्ययन करण्यासाठी विविध देशातले विद्यार्थी खूप पूर्वीपासून भारतात येत आहेत हे जाणून तुम्हाला आनंद होईल.

विश्वकल्याणाचा व्यापक विचार करण्याची हीच सुयोग्य वेळ आहे. खरे तर या विषयावर एका वैश्विक शिखर सम्मेलनाचे आयोजन केले जाऊ शकते. येणाऱ्या काळात आयुर्वेद आणि आहाराबाबतही आपण विचार करायला हवा. आयुर्वेदासंबंधित अन्न आणि आरोग्यासाठी आवश्यक अन्न याबाबत आपण विचार करायला हवा. आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक असेल की, काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राने 2023 हे अंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केले. आपणही भरड धान्याच्या  लाभांबाबत जागृती करुया.

मित्रांनो,

महात्मा गांधीजींच्या एका उद्धरणासह मी माझे म्हणणे संपवतो. ते म्हणतात ” मला वाटते आयुर्वेद सर्वाधिक प्रासंगिक आहे.

हे भारतातल्या त्या प्राचीन विज्ञानांमधले एक आहे जे हजारो गावातल्या लाखो लोकांच्या उत्तम आरोग्यास सुनिश्चित करते.

मी प्रत्येक नागरिकाला आयुर्वेदाच्या सिद्धांतांनुसार जीवन जगण्याचा सल्ला देतो. औषधनिर्मिती शास्र, दवाखाने आणि वैद्यराज हे सगळे आयुर्वेदाची सर्वोत्तम सेवा देण्यासाठी समर्थ व्हावेत हेच माझे आशीर्वाद आहेत.”

महात्‍मा गांधीजींनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी हे म्हटले होते. मात्र त्यांची भावना वर्तमानातही चपखल ठरते. या! आयुर्वेदातल्या आपल्या वैभवशाली कामगिरीबद्दल सर्वांना माहिती देत राहूया.

संपूर्ण जगाला आपल्या भूमीपर्यंत आणण्यात सक्षम असा प्रेरणास्रोत आर्युवेदास बनवूया.आपल्या युवकांसाठी ही समृद्धीची एक संधीही निर्माण करु शकते. या सम्मेलनाच्या संपूर्ण सफलतेची कामना करतो. सहभागी झालेल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.

धन्‍यवाद.

खूप खूप धन्‍यवाद.