Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण

वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण


 

भारत माता की जय

केंद्रिय मंत्रीमंडळातील माझ्या सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, सुकांता मजुमदार आणि अन्य मान्यवर तसंच देशाच्या कोना कोपऱ्यातून इथं आलेले सर्व अतिथी आणि प्रिय मुलांनो,

आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

वीर साहिबजाद्यांनी ज्या परिस्थितीत देशासाठी बलिदान केलं त्या घटनेचं स्मरण आज आपण केलं पाहिजे. आजच्या युवा पिढीसाठीदेखील हे तितकंच गरजेचं आहे. यासाठी त्या घटनांची वारंवार आठवण काढणंदेखील आवश्यक आहे. सव्वातीनशे वर्षांपूर्वी वीर साहिबजाद्यांनी कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हाची परिस्थिती, 26 डिसेंबरच्या त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देणं आवश्यक आहे. साहिबजादा जोरावर सिंह आणि साहिबजादा फतेह सिंह वयानं खूप लहान होते परंतु त्यांची धाडसी वृत्ती आभाळालाही पुरुन उरणारी होती. साहिबजादा भावांनी मुघलांचे अत्याचार सहन केले पण ते दाखवलेल्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वजीर खानानं जेव्हा त्यांना भिंतीत गाडून टाकण्याचे आदेश दिले त्यावेळी न डगमगता ते त्याला सामोरे गेले. साहिबजाद्यांनी त्याला गुरू अर्जन देव, गुरू तेग बहादूर आणि गुरू गोविंद सिंह यांच्या शौर्याची आठवण करुन दिली. हे धाडस त्यांच्या श्रद्धेतून आलं होतं. साहिबजाद्यांनी प्रसंगी प्राणार्पण करणं स्वीकारलं मात्र आपल्या श्रद्धेपासून ते किंचितही ढळले नाहीत. कितीही संकटं आली, कितीही बिकट प्रसंग आले तरी देश आणि देशहितापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही हीच शिकवण आजच्या वीर बाल दिवसानं आपल्याला दिली आहे. देशासाठी केलेलं प्रत्येक काम हे शौर्यच आहे, देशासाठी जगणारी सर्व लहान मुलं, सगळी किशोरवयीन मुलं वीर बालकच आहेत.   

मित्रांनो,

वीर बाल दिवसाचं हे वर्ष अगदी खास आहे. या वर्षी भारतीय प्रजासत्ताक स्थापनेचं, आपल्या राज्यघटनेचं 75 वं वर्ष आहे. या 75 व्या वर्षात देशातल्या प्रत्येक नागरिकाला वीर साहिबजाद्यांकडून देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आहे. भारताला ज्या सशक्त लोकशाहीचा अभिमान आहे त्या लोकशाहीचा पाया वीर साहिबजाद्यांचं शौर्यबलिदान यामुळे भक्कम झाला आहे. आपल्या लोकशाहीतून आपल्याला अंत्योदयाची प्रेरणा मिळते. या देशात लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नाही ही शिकवण आपल्याला राज्यघटनेनं दिली आहे. सर्वांचंच कल्याण व्हावं असं सांगणाऱ्या सरबत दा भला या गुरूंच्या मंत्रातूनही हीच शिकवण मिळते. आपल्या देशातल्या गुरूंच्या परंपरेने आपल्याला सर्वांना समदृष्टीने पहा अशी शिकवण दिली आणि राज्यघटनाही आपल्याला हाच विचार आचरणात आणण्यास सांगते.  देशाची अखंडता आणि देशहिताचा विचार यांच्याशी कसलीही तडजोड करू नका अशी शिकवण वीर साहिबजाद्यांच्या जीवनातून मिळते आणि राज्यघटनादेखील भारताचं सार्वभौमत्त्व आणि ऐक्य सर्वतोपरी असल्याचंच सांगते. एकप्रकारे आपल्या लोकशाहीच्या भव्यतेत गुरूंची शिकवण, साहिबजाद्यांचा त्याग आणि देशाच्या एकतेचा मूलमंत्र सामावलेला आहे.

मित्रांनो,

प्राचीन काळापासून ते आजतागायत भारताच्या प्रगतीत युवाशक्ती नेहमीच अग्रेसर राहीली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून २१ व्या शतकांतल्या लोकचळवळींपर्यंत भारतातल्या युवा पिढीनं प्रत्येक चळवळीत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तुमच्यासारख्या युवा पिढीमुळेच संपूर्ण जग भारताकडे आशा अपेक्षांच्या दृष्टीकोनातून पाहात आहे. भारतात सध्या स्टार्टअपपासून विज्ञानापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून उद्योग क्षेत्रापर्यंत सगळीकडेच युवा पिढी नवी क्रांती घडवत आहे. आणि म्हणूनच आमच्या धोरणांमध्येही आम्ही युवा पिढीला बळ देण्याला प्राधान्य दिलं आहे. स्टार्टअप परिसंस्था, अंतराळ अर्थव्यवस्था, क्रीडा आणि स्वास्थ्य, वित्ततंत्रज्ञान आणि उद्योग, कौशल्यविकास आणि प्रशिक्षण योजना या सर्वच क्षेत्रांमधली धोरणं युवाकेंद्रित आहेत, युवा पिढीचं हित साधणारी आहेत. तरुण पिढीला देशाच्या विकासाशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या आत्मसामर्थ्याला सरकारचेही पाठबळ मिळते आहे.

माझ्या तरुण मित्रांनो,

वेगानं बदलणाऱ्या आजच्या जगाच्या गरजा नवीन आहेत, अपेक्षा नवीन आहेत आणि भविष्याविषयीचा आराखडादेखील नवीन आहे. जग आता यंत्रांना मागे टाकून मशिन लर्निंगच्या दिशेने वाटचाल करत आहे. आधीच्या संगणक प्रणालींच्या ऐवजी कृत्रिम प्रज्ञेचा वापर वाढतो आहे.

प्रत्येक आपण क्षेत्रात नवीन बदल आणि आव्हानांना तोंड देत असतो. म्हणून आपण आपल्या युवकांना भविष्यवेधी बनवायला हवे‌. आपण बघत आहात, याची तयारी आपल्या देशाने किती आधीपासून सुरू केली आहे. आपण नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली. आम्ही शिक्षणाला आधुनिक चौकटीत बसवले, त्याला मोकळे आकाश बनवले. आपले युवक केवळ पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित राहू नयेत यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. छोट्या मुलांमध्ये संशोधक वृत्ती बाणवण्यासाठी देशात दहा हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब सुरू केल्या आहेत. आपल्या युवकांना अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक संधी मिळाव्यात, समाजाच्याबाबतीत आपल्या जबाबदाऱ्या निभावण्याची भावना युवकांमध्ये वाढायला हवी यासाठी मेरा युवा भारत ही मोहीम सुरू केली गेली आहे.

बंधू भगिनींनो,

आज देशाचा एक अजून महत्त्वाचा प्राधान्यक्रम आहे तो म्हणजे फिट राहणे. देशातील युवक निरोगी असेल तेव्हाच देश सक्षम होईल. म्हणून आम्ही फिट इंडिया आणि खेलो इंडिया यासारख्या चळवळी चालवत आहोत. या सर्वांमुळे देशातील युवक पिढी मध्ये फिटनेसच्या बाबतीतील जागरूकता वाढत आहे. एक आरोग्यपूर्ण युवक पिढी आरोग्यपूर्ण भारताची निर्मिती करेल याच विचाराने आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाची सुरुवात केली जात आहे. हे अभियान पूर्णपणे लोकसहभागाने पुढे जाईल. कुपोषणमुक्त भारतासाठी ग्रामपंचायतींमध्ये निरोगी स्पर्धा, एक निकोप स्पर्धा असावी. सुपोषित ग्रामपंचायत विकसित भारताचा आधार बनावी हे आमचे उद्दिष्ट आहे.

मित्रहो,

वीर बाल दिवस आम्हाला प्रेरणा देतो आणि नवीन संकल्पनांसाठी प्रोत्साहन देतो. मी लाल किल्ल्याच्या सौधावरुन बोललो आहे. आता सर्वोत्कृष्ट हेच आपले मानक असायला हवे. मी आपल्या युवाशक्तीला सांगेन की ते ज्या क्षेत्रात आहेत तिथे

सर्वोत्कृष्ट घडवण्यासाठी काम करा. आपण जर पायाभूत सुविधांवर काम कराल तर असं करायला हवं की आमचे रस्ते, रेल्वेचे जाळे, आमची विमानतळ मुलभूत सुविधा जगात सर्वात उत्तम असायला हवी. जर आपण मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत असाल तर असे कराल की आपले सेमीकंडक्टर आपले इलेक्ट्रॉनिक्स, आपले ऑटोवाहने जगात सर्वोत्कृष्ट असतील. जर आपण टुरिझम म्हणजे पर्यटन क्षेत्रात काम करत असू तर असं करायला हवं की आपले पर्यटन स्थळ , आपल्या प्रवासाच्या सुविधा, आपले आदरातिथ्य जगात सर्वोत्कृष्ट असावे. जर आपण अंतराळ क्षेत्रात काम कराल तर ते असं करायला हवं की आपले उपग्रह, आपली नेवीगेशन टेक्नॉलॉजी, आपले अंतराळ संशोधन जगात सर्वोत्कृष्ट असावं. एवढे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे मनोबल हवे असते त्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला वीरबालकांकडून मिळते. आता भव्य लक्ष्य हाच आमचा संकल्प आहे‌. देशाचा आपल्या क्षमतेवर संपूर्ण भरंवसा आहे. मला माहित आहे भारतातील जो युवावर्ग सर्वात मोठ्या कंपन्यांचा भार सांभाळू शकतो, भारतातील जो युवक आपल्या संशोधनातून आधुनिक जगाला दिशा देऊ शकतो, जो युवा जगातील प्रत्येक मोठ्या देशात प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल रोवू शकतो तो युवक जेव्हा आज त्याला नवीन संधी मिळते आहे तेव्हा आपल्या देशासाठी काय करणार नाही ! म्हणून विकसित भारताचे लक्ष्य ठरलेले आहे. आत्मनिर्भर भारताचा यश निश्चित आहे.

मित्रहो,

काळ प्रत्येक देशातील युवकांना आपल्या देशाचे भाग्य बदलण्याची संधी देत असतो. एक असा कालखंड जेव्हा देशातील युवा वर्ग आपल्या हिमतीने आपल्या सामर्थ्याने देशाचा कायापालट करू शकतात. देशाने स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळी हे बघितले आहे. भारतातील युवकांनी तेव्हा विदेशी सत्तेची घमेंड नष्ट केली होती. जे लक्ष्य त्या वेळच्या युवकांनी समोर ठेवले ते साध्य केले. आता आजच्या युवकांच्या समोरसुद्धा विकसित भारत हे लक्ष्य आहे. या दशकात आपल्याला पुढील 25 वर्षाच्या वेगवान विकासाची पायाभरणी करायची आहे. म्हणून भारताच्या युवावर्गाला वेळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल प्रत्येक क्षेत्रात स्वतःला पुढे जायचं आहे आणि देशालाही पुढे न्यायचं आहे. मी याच वर्षी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सांगितलं की देशातील एक लाख अशा युवकांना मी राजकारणात आणू इच्छितो ज्यांच्या कुटुंबातील कोणीही सक्रिय राजकारणात नाही. पुढील 25 वर्षासाठी ही सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे. मी आपल्या युवकांना सांगेन की त्यांनी या मोहिमेचा भाग बनावे जेणेकरून देशाच्या राजकारणात एका नवीन पिढीचा उदय होईल. हा विचार घेऊन पुढील वर्षाची सुरुवात करताना समजा 2025 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या वेळी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे आयोजन सुद्धा होत आहे. संपूर्ण देशातून, गावागावातून, शहरातून, तसंच खेड्यापाड्यातून लाखो युवक स्वतः याचा भाग बनत आहेत. यामध्ये विकसित भारताच्या व्हिजनवर चर्चा होईल. त्याच्या रोडमॅपवर चर्चा होईल‌.

मित्रहो,

अमृतकाळाच्या 25 वर्षाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी हे दशक, पुढील पाच वर्षे अतिशय महत्त्वाची असणार आहेत. यामध्ये आम्हाला देशातील संपूर्ण युवाशक्तीचा उपयोग करायचा आहे. मला विश्वास आहे की आपणा साऱ्या मित्रमंडळींची साथ, आपले सहकार्य आणि आपली उर्जा भारताला अमर्याद उंचीवर घेऊन जाईल. या संकल्पासह पुन्हा एकदा आमच्या गुरूंना, वीर बालकांना, माता गुजरी हिला श्रद्धापूर्वक मान झुकवून प्रणाम करतो. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद!

***

JPS/S.Joshi/V.Sahajrao/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com