Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.


नमस्कार जी!

तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान जिष्णु देव वर्मा जी, ओदिशाचे राज्यपाल श्री हरि बाबू जी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री श्रीमान उमर अब्दुल्ला जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, ओदिशाचे मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णव जी, जी किशन रेड्डी जी, डॉ. जीतेंद्र सिंह जी, व्ही. सोमैया जी, रवनीत सिंह बिट्टू जी, बंडी संजय कुमार जी, अन्य मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, अन्य महानुभाव तसेच बंधू आणि भगिनींनो!

आज गुरु गोविंद सिंह जी यांचा प्रकाश उत्सव आहे. त्यांचे विचार आणि त्यांचे जीवन आपल्याला समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याची प्रेरणा देत आहेत. मी सर्वांना गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश उत्सवाच्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

2025 या वर्षाच्या प्रारंभापासूनच भारताची संपर्क सुविधा विस्तार भरधाव गतीने होत आहे. काल मी दिल्ली एनसीआर मध्ये नमो भारत रेल्वेच्या प्रवासाचा शानदार अनुभव घेतला, तसेच दिल्ली मेट्रोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा प्रारंभ केला. काल भारताने खूप मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे, आपल्या देशात आता मेट्रोचे जाळे एक हजार किलोमीटरहून अधिक विस्तारले गेले आहे. आज इथे कैक कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. उत्तरेला जम्मू काश्मीर, पूर्वेला ओडिशा आणि दक्षिणेतील तेलंगणा, आज देशाच्या एका मोठ्या भागासाठी ‘नव्या युगातील संपर्क सुविधा क्षेत्रासाठी’ खूप महत्त्वाचा दिवस आहे. या तीनही राज्यांमध्ये आधुनिक विकासाची सुरुवात झाली असून यातून हे दिसून येते की, संपूर्ण देश आता एक साथ, पावलाशी पाऊल जोडून पुढे जात आहे. आणि हाच ‘सबका साथ, सबका विकास’ चा मंत्र आहे, जो विकसित भारताच्या स्वप्नात विश्वासाचे रंग भरत आहे. मी आज या निमित्ताने या तिन्ही राज्यातील लोकांना आणि सर्व देशवासीयांना या प्रकल्पांसाठी शुभेच्छा देत आहे. हा देखील योगायोग आहे की, आज आपल्या ओदिशाचे मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण माझी जी यांचा वाढदिवस देखील आहे. मी आज आपणा सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे.

मित्रांनो,

आज देश विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नरत आहे, आणि यासाठी भारतीय रेल्वेचा विकास होणे महत्त्वाचे आहे. मागचे एक दशक भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक परिवर्तनाचे होते, हे आपण पाहिले आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सर्वांच्या नजरेत भरण्याजोगे परिवर्तन घडले आहे. यामुळे देशाची प्रतिमा बदलत आहे, आणि देशवासियांचे मनोबल देखील वाढत आहे.

मित्रांनो,

भारतात रेल्वेच्या विकासाला आम्ही चार मानकांनुसार पुढे नेत आहोत. पहिले मानक – रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, दुसरे मानक – रेल्वेच्या प्रवाशांना आधुनिक सुविधा प्रदान करणे, तिसरे मानक – देशातील कानाकोपऱ्यापर्यंत रेल्वेचा संपर्क, चौथे मानक – रेल्वेमध्ये रोजगार निर्मिती आणि उद्योगांना समर्थन. आजच्या या कार्यक्रमातही याच दृष्टिकोनाची झलक पाहायला मिळते. भारतीय रेल्वेला 21 व्या शतकातील आधुनिक रेल्वे बनवण्यात हे नवे विभाग, नवे रेल्वे टर्मिनल महत्त्वपूर्ण योगदान देतील. यातून देशात आर्थिक समृद्धीची परिसंस्था विकसित करण्यात मदत होईल, रेल्वेच्या कार्यान्वयनात मदत मिळेल, गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त संधी तयार होतील आणि नवे रोजगार देखील निर्माण होतील.

मित्रांनो,

2014 मध्ये आम्ही भारतीय रेल्वेला आधुनिक बनवण्याचे स्वप्न घेऊन कामाची सुरुवात केली होती. वंदे भारत रेल्वेची सुविधा, अमृत भारत आणि नमो भारत रेल्वे सुविधा, आता भारतीय रेल्वेची नवी ओळख बनत आहेत. आजचा आकांक्षी भारत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उपलब्धी प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगून आहे. आज लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास देखील कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याची इच्छा असते. त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागात उच्च गतीने धावणाऱ्या रेल्वेंची मागणी वाढत आहे. आज पन्नास हून अधिक मार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत. 136 वंदे भारत सेवा प्रवाशांचा प्रवास सुखद बनवत आहेत. आता दोन-तीन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ पाहत होतो. आपल्या प्रायोगिक प्रवासामध्ये वंदे भारत रेल्वेचे नवे स्लीपर कोच 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत आहेत या संदर्भातला तो व्हिडिओ होता. हे पाहून केवळ मलाच नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखद अनुभूती झाली असेल. अशा सुखद अनुभवांची ही तर केवळ सुरुवात आहे, आता ती वेळ दूर नाही जेव्हा भारतात पहिली बुलेट ट्रेन धावेल.

मित्रांनो,

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना आपल्या पहिल्या स्थानकापासून ते अंतिमस्थानकापर्यंतच्या प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव मिळवून देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी देशात 1300 हून अधिक अमृतस्थानकांचा कायाकल्प देखील केला जात आहे. मागच्या दहा वर्षात रेल्वे संपर्काचा देखील अद्भुत विस्तार झाला आहे. 2014 पर्यंत देशांमध्ये 35 टक्के, केवळ पस्तीस टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते. आज भारत रेल्वे मार्गांच्या शंभर टक्के विद्युतीकरणाच्या जवळ पोहोचला आहे. आम्ही रेल्वेची पोहोच देखील निरंतर वाढवत आहोत.

गेल्या दहा वर्षांमध्ये 30 हजार किलोमीटरपेक्षा अधिक नवीन रेल्वेरुळ टाकले गेले, शेकडो उड्डाणपूल आणि भूमिगत पुलांची निर्मिती करण्यात आली. ब्रॉड गेज मार्गांवरही मानवविरहीत रेल्वे फाटके आता बंद झाली आहेत. त्यामुळे दुर्घटनांमध्येही घट झाली आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. देशात समर्पित मालवाहातूक मार्गिकांसारख्या आधुनिक रेल्वे जाळ्याचे कामही वेगाने पूर्णत्वाला जात आहे. या विशेष मार्गिकेच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य रेल्वेमार्गावरील ताण कमी होईल आणि उच्च वेगवान रेल्वे वाहातुकीच्या संधींत वाढ होईल.

देशबांधवांनो,

देशात मेड इन इंडियाला प्रोत्साहन दिले जात आहे, त्याच धर्तीवर रेल्वेचा कायापालट करण्याचे अभियान राबवले जात आहे, मेट्रोगाड्या, रेल्वेगाड्यांसाठी नवीन डबे तयार केले जात आहेत, रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास केला जात असून, स्थानकांवर सौरउर्जा पॅनेल लावले जात आहे, ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’/’एक स्थानक, एक उत्पादन’ योजनेचे स्टॉल सुरु होत आहेत, त्यामुळे रेल्वेमध्येही लाखो रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. गेल्या दहा वर्षात लाखो युवकांना रेल्वेमध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे. ज्या कारखान्यांमध्ये रेल्वेच्या नव्या बोग्यांची निर्मिती केली जात आहे, त्यासाठी येणारा कच्चा माल हा दुसऱ्या कारखान्यांमधून येतो आहे, ही बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. वाढत्या मागणीचा इथे अर्थ होतो की रोजगाराच्या अधिक संधींची उपलब्धता. रेल्वेशी निगडीत लागणाऱ्या विशेष कौशल्यांचा विचार करता देशात याआधीच गती-शक्ती विद्यापीठाचीही स्थापना करण्यात आली आहे.

मित्रांनो,

रेल्वेजाळे आज विस्तार होत असताना, त्याच प्रमाणात नवी मुख्यालये आणि विभागही निर्माण केले जात आहेत. जम्मू काश्मिरसह हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या अनेक शहरांनाही जम्मू विभागाचा फायदा होणार आहे. त्यामुळे लेह-लड्डाखच्या लोकांचीही सोय यामुळे होणार आहे.

मित्रांनो,

रेल्वे संरचनेमध्ये आपले जम्मू आणि काश्मिर नव्या विक्रमाची नोंद करते आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गाची चर्चा पूर्ण देशामध्ये होते आहे. या प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मिरी देशातल्या इतर भागांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाई. या प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात उंच रेल्वेचा अर्धगोलाकार पूल- चिनाब पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. तारांच्या जोडणीवर आधारित अंजी खड्ड पूल देशातला अशा प्रकारचा पहिला पूल आहे, जे या प्रकल्पाचाच एक भाग आहेत आणि अभियांत्रिकीचं अतुलनीय उदाहरण आहे. यामुळे या क्षेत्राची आर्थिक प्रगती होईल आणि भरभराटीला प्रोत्साहन मिळेल.

मित्रांनो,

भगवान जगन्नाथाच्या कृपाशिर्वादानं आपल्या ओडिशामध्ये नैसर्गिक संसाधनांचे भांडार आहे. मोठा समुद्र किनारा लाभला आहे. ओडिशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची मोठी शक्यता आहे. आज ओडिशात रेल्वेच्या नव्या मार्गाशी निगडीत अनेक प्रकल्पांचं बहुतांश काम सुरू झाले आङे. यासाठी ७० हजारपेक्षा अधिक गुंतवणूक केली जात आहे. राज्यात 7 गती शक्ती कार्गो टर्मिनलच्या कामांना सुरुवात झाली ज्यामुळे व्यापार आणि उद्योगव्यवसायाला चालना मिळत आहे. आजही ओडिशातल्या रायगडा रेल्वे विभागाचा शिल्यान्यास करण्यात आला. त्यामुळे या प्रदेशातली रेल्वेची पायाभूत संरचना अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे ओडिशामध्ये पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला प्रोत्साहन मिळेल. विशेषतः जिथे आदिवासींची संख्या अधिक असलेल्या दक्षिण ओडिशाला, त्याचा खूप फायदा होणार आहे. जनमन योजनेअंतर्गत ज्या अतिमागास आदिवासी क्षेत्राचा विकास केला जात आहे, त्यांच्यासाठी ही संरचना वरदान ठरणार आहे.

मित्रहो,

आज मला, तेलंगणातल्या चर्लपल्ली न्यू टर्मिनल स्थानकाच्या उद्घाटनाची संधी मिळाली. बाह्य वळण मार्गाशी हे स्थानक जोडले गेल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळणार आ. स्थानकावर आधुनिक प्लॅटफॉर्म, लिफ्ट, सरकते जिने यांसारख्या सुविधा आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे हे स्थानक सौर उर्जेवर चालवले जाते आहे. हे नव्या रेल्वे टर्मिनल, सध्या अस्तित्त्वात असलेल्या सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचिगुडा स्थानकावरचा ताण कमी करेल त्यामुळे लोकांनाही प्रवास अधिक सोयिस्कर होणार आहे. म्हणजेच जीवन सुलभतेबरोबरच व्यवसाय सुलभतेलाही प्रोत्साहन मिळणार आहे.

मित्रहो,

देशात सद्यस्थितीत आधुनिक संरचना निर्मितीचा महायज्ञ सुरू आहे. भारतात महामार्ग, जलमार्ग, मेट्रोचे जाळे  वेगाने विस्तारत आहे. देशाच्या विमानतळांवर सर्वोत्तम सुविधा प्राप्त होत आहेत. 2014 मध्ये देशातल्या विमानतळांची संख्या 74 होती, त्यात वाढ होऊन ती 150 पेक्षा जास्त झाली आहे. 2014 पर्यंत केवळ 5 शहरांमध्ये मेट्रोची सोय होती, आज 21 शहरांमध्ये मेट्रो आली आहे. या निकष आणि वेगाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय रेल्वेला देखील सातत्याने अद्ययावत केले जात आहे.

मित्रहो,

ही सर्व विकासकामे, प्रत्येक देशवासियांसाठी मोहिम झालेल्या विकसित भारताच्या पथदर्शी प्रकल्पाचा भाग आहेत. आपण सर्व मिळून या दिशेने अधिक वेगाने प्रगती करु याचा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा या सर्व प्रकल्पांसाठी देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो.

खूपखूप आभार!

***

JPS/VSS/SM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai