राजस्थानच्या सर्व कुटुंबीयांना माझा राम राम!
विकसित भारत विकसित राजस्थान या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये यावेळेस राजस्थानच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लाखो मित्र सहभागी झाले आहेत. मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी मुख्यमंत्री जी यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी तंत्रज्ञानाचा एवढा अप्रतिम वापर करून लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आपण जयपुर मध्ये ज्या प्रकारे स्वागत सत्कार केला त्याचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमत आहे. एवढेच नाही तर फ्रान्स मध्ये सुद्धा त्याचीच चर्चा ऐकू येत आहे.आणि हीच तर राजस्थानच्या लोकांची खरी ओळख आहे.
आमच्या राजस्थानच्या बंधू-भगिनी ज्याप्रमाणे प्रेम अर्पण करतात, कोणतीच कसर ते शिल्लक ठेवत नाहीत. जेव्हा विधानसभेच्या मतदानाच्या वेळी मी राजस्थानमध्ये येत होतो तेव्हा मला आशीर्वाद देण्यासाठी आपण कशाप्रकारे गर्दी करत होतात.
आपल्या सर्वांनी मोदीच्या हमीवर विश्वास ठेवला, आपण सर्वांनी डबल इंजिनची सरकार स्थापन केली. आणि आपण पहा की, या डबल इंजन सरकारने एवढ्या गतीने काम करणे सुरू केले आहे. आज राजस्थानच्या विकासासाठी जवळजवळ 17 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, सौरऊर्जा, पाणी आणि एलपीजी यासारख्या विकास कार्याशी निगडित आहेत. हे प्रकल्प राजस्थानच्या हजारो युवकांना रोजगार मिळवून देणार आहेत. मी या प्रकल्पांसाठी राजस्थान मधील सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्याला आठवत असेल, लाल किल्ल्यावरून मी म्हटले होते- हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यानंतर आज भारताजवळ हा सुवर्णकाळ आलेला आहे. भारताजवळ ती संधी चालून आलेली आहे, जेव्हा तो दहा वर्षांपूर्वीची निराशा सोडून आता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चालू लागला आहे.
आपण लक्षात घ्या, 2014 पूर्वी देशात कशा प्रकारची चर्चा सुरू होती? काय ऐकायला मिळत होते? वृत्तपत्रांमधून काय वाचायला मिळत होते? तेव्हा संपूर्ण देशात होणाऱ्या मोठमोठ्या घोटाळ्यांचीच चर्चा होत होती. तेव्हा सतत होणाऱ्या बॉम्बस्फोटांविषयीच चर्चा होत होती.
देशातील लोक विचार करत होते की आता आमचे काय होणार, देशाचे काय होणार? कसेबसे जीवन जगत राहू, जशी तशी नोकरी टिकावी, काँग्रेसच्या राज्यात सगळीकडे तेव्हा हेच वातावरण होते. आणि आज आपण काय चर्चा करत आहोत. कोणत्या उद्दिष्टांविषयी चर्चा करत आहोत. आज आपण विकसित भारताची, विकसित राजस्थान विषयी बोलत आहोत. आज आपण मोठे मोठे स्वप्न पाहत आहोत. मोठे संकल्प घेत आहोत आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तन मन लावून प्रयत्न करत आहोत.
जेव्हा मी विकसित भारता विषयी बोलतो, तेव्हा हे केवळ एका शब्दा पुरते मर्यादित नाही, हे केवळ भावनेच्या भरात केलेले वक्तव्य नाही. हे प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान समृद्ध करण्याचे अभियान आहे. हे गरिबीला मुळापासून संपवून टाकण्याचे अभियान आहे. हे तरुणांसाठी चांगले रोजगार निर्माण करण्याचे अभियान आहे. हे देशांमध्ये आधुनिक सुविधा निर्माण करण्याचे अभियान आहे.
मी काल रात्रीच परदेश दौऱ्यावरून परत आलो आहे. यूएई आणि कतार मधील मोठमोठ्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. आज ते सुद्धा भारतामध्ये होत असलेली प्रगती पाहून आश्चर्यचकित झाले आहे. आज त्यांना सुद्धा विश्वास झालेला आहे की भारतासारखा विशाल देश मोठी स्वप्ने बघू शकतो, एवढेच नाही तर त्या स्वप्नांना पूर्ण सुद्धा करू शकतो.
बंधू आणि भगिनींनो,
विकसित भारतासाठी विकसित राजस्थानची निर्मिती होणे खूपच गरजेचे आहे. आणि विकसित राजस्थान साठी रेल्वे, रस्ते, वीज, पाणी यासारख्या महत्त्वपूर्ण सुविधांचा वेगाने विकास होणे सुद्धा गरजेचे आहे. जेव्हा या सुविधा निर्माण होतील तेव्हा शेतकरी-पशुपालकांना लाभ होणार आहे.
राजस्थानमध्ये उद्योग येतील, कारखाने उभे होतील, पर्यटन वाढेल,अधिक गुंतवणूक होईल, तेव्हा स्वाभाविक आहे, जास्तीत जास्त नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होतील. जेव्हा रस्ते निर्माण होत असतात, रेल्वे मार्ग तयार होत असतात, रेल्वे स्थानके निर्माण होत असतात, जेव्हा गरिबांसाठी घरे बनवले जातात, जेव्हा पाणी आणि गॅस यांची पाईपलाईन टाकली जाते, तेव्हा या विकास कार्याशी संबंधित प्रत्येक उद्योगांमध्ये सुद्धा रोजगार वाढत असतो.
तेव्हा दळणवळण कार्याशी निगडित मित्रांना रोजगार मिळेल. आणि यासाठीच यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा आम्ही 11 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी ठेवलेले आहेत. हे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळापेक्षा 6 पटीने जास्त आहे. तर जेव्हा हे पैसे खर्च होतील तेव्हा राजस्थानमध्ये सिमेंट, दगड, सिरॅमिक यासारख्या प्रत्येक उद्योगांना फायदा होईल.
बंधू आणि भगिनींनो,
मागच्या दहा वर्षांमध्ये राजस्थानमधील गावातील रस्ते असोत, नाहीतर राष्ट्रीय महामार्ग असोत, अथवा एक्सप्रेस-वे असोत, आपण पाहिले असेल अभूतपूर्व गुंतवणूक केली गेली आहे. आज राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून ते पंजाब पर्यंत सर्व भाग रुंद आणि आधुनिक महामार्गांशी जोडले जात आहेत.
आज ज्या रस्त्यांची पायाभरणी आणि लोकार्पण झालेली आहे, त्यामध्ये उदयपुर, टोंक, सवाई-माधोपुर, बुंदी, अजमेर, भीलवाड़ा आणि चित्तौड़गढ़ या शहरांची कनेक्टिविटी आणखी चांगली होईल. एवढेच नाही तर या रस्त्यांमुळे हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्याशी कनेक्टिविटी आणखी मजबूत होईल. आज पण इथे रेल्वेच्या विद्युतीकरणाबरोबरच दुरुस्ती संदर्भात अनेक प्रकल्पांचे लोकार्पण झालेले आहे.
बांदीकुई पासून आग्रा किल्ल्यापर्यंत च्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेहंदीपुर बालाजी आणि आग्र्याला जाणे येणे आणखीन सुलभ होणार आहे.जयपुर मध्ये खातीपुरा स्थानक सुरू झाल्याने आता आणखी जास्त रेल्वे गाड्या सुरू होतील, ज्यामुळे प्रवाशांना खूप सोयी सुविधा प्राप्त होतील.
मित्रांनो,
काँग्रेसच्या बरोबर एक खूप मोठी समस्या ही आहे की ते दूरगामी विचारांच्या बरोबरीने सकारात्मक धोरणे बनवू शकत नाहीत. काँग्रेस ना भविष्याला ओळखू शकते आणि नाही भविष्यासाठी त्यांच्याजवळ कोणता आराखडा आहे.
काँग्रेसच्या या विचारसरणीमुळे भारत आपल्या वीज व्यवस्थेविषयी निंदनीय झालेला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात विजेच्या कमतरतेमुळे संपूर्ण देशात कित्येक तासापर्यंत अंधार होत होता. जेव्हा वीज येत होती ती सुद्धा खूपच कमी वेळेसाठी उपलब्ध होत होती. कोट्यवधी गरीब कुटुंबीयांच्या घरामध्ये तर वीज जोडण्या सुद्धा मिळालेल्या नव्हत्या.
मित्रांनो,
विजेच्या अभावाने कोणताही देश विकसित होऊ शकत नाही. आणि काँग्रेस ज्या वेगाने या संकटावर कार्य करत होती त्या पद्धतीने वीज समस्येवर तोडगा निघण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागला असता. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर देशाला विजेच्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी लक्ष्य केंद्रित केले. आम्ही धोरणे बनवली, निर्णय घेतले. आम्ही सौर ऊर्जेसारख्या वीज उत्पादनासाठी नवीन नवीन क्षेत्रांवर भर दिला. आणि आज पहा परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे आज भारत सौरऊर्जा, सोलर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याच्या बाबतीत जगामध्ये अग्रणी देशांमध्ये समाविष्ट झालेला आहे.
आपल्या राजस्थानवर सूर्यदेवाची असीम कृपा आहे. त्यामुळे राजस्थानला वीज उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. आज येथे एका सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आणि दोन प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे वीज तर मिळेलच शिवाय हजारो तरुणांना रोजगारही मिळेल.
मित्रहो,
प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जा निर्माण करावी, सौर ऊर्जेचे उत्पादन घ्यावे आणि अतिरिक्त वीज विकून कमाई देखील करावी असा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने आणखी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ही योजना आहे- पीएम सूर्य घर. याचा अर्थ – मोफत वीज योजना. याअंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची व्यवस्था करण्याची तयारी सरकार करत आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला देशभरातील 1 कोटी कुटुंबांना जोडण्यात येईल. छतावर सौर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात थेट मदत पाठवेल. आणि यासाठी 75 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे. त्यांच्या घरासाठी वीज मोफत मिळणार आहे. सौर पॅनल बसवण्यासाठी बँकांकडून स्वस्त आणि सुलभ कर्जही दिले जाईल. मला सांगण्यात आले आहे की राजस्थान सरकारने देखील 5 लाख घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्याची योजना आखली आहे. दुहेरी इंजिनचे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांचा खर्च कमी करण्यासाठी किती काम करत आहे हे यावरून दिसून येते.
मित्रहो,
विकसित भारत बनवण्यासाठी आपण देशातील चार वर्गांना मजबूत करण्याचे काम करत आहोत. हे वर्ग आहेत- तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. आमच्यासाठी या चार मोठ्या जाती आहेत. मला आनंद आहे की या वर्गांच्या सक्षमीकरणासाठी मोदींनी जी ग्यारंटी दिली होती , ती दुहेरी इंजिन सरकार पूर्ण करत आहे . राजस्थानच्या भाजपा सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी 70 हजार रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. मागील सरकारच्या काळात वारंवार पेपरफुटीच्या घटनांमुळे तुम्ही सतत त्रस्त होतात. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार बनताच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेपर लीक करणाऱ्यांविरोधात संसदेत कडक कायदा केला आहे. हा कायदा बनल्यानंतर पेपर लीक माफिया चुकीची कामे करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील.
मित्रहो,
राजस्थान भाजपाने गरीब कुटुंबातील बहिणींना 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन देखील पूर्ण करण्यात आले आहे. राजस्थानातील लाखो भगिनींना याचा लाभ मिळत आहे. मागील सरकारच्या काळात जल जीवन मिशनमधील घोटाळ्यांमुळे राजस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. आता यावर वेगाने काम सुरू झाले आहे. आजही राजस्थानमध्ये प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राजस्थानच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये आधीपासून मिळत होते. आता भाजप सरकारने त्यात दोन हजार रुपयांची वाढ केली आहे. प्रत्येक क्षेत्रात एक एक करून आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करत आहोत. आम्ही आमच्या ग्यारंटी बाबत गंभीर आहोत. म्हणूनच लोक म्हणतात- मोदींची ग्यारंटी म्हणजे ग्यारंटी पूर्ण होण्याची ग्यारंटी.
मित्रहो,
प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्क लवकर मिळावेत आणि कोणीही वंचित राहू नये हा मोदींचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही विकास भारत संकल्प यात्राही सुरू केली होती . या यात्रेत राजस्थानातील कोट्यवधी मित्र सहभागी झाले आहेत. या काळात पावणे तीन कोटी लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राजस्थानमध्ये अवघ्या एका महिन्यात 1 कोटी नवीन आयुष्मान कार्ड बनले आहेत. किसान क्रेडिट कार्डसाठी 15 लाख शेतकरी लाभार्थींनी नोंदणी केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी सुमारे 6.5 लाख शेतकरी मित्रांनीही अर्ज केले आहेत. आता त्यांच्या बँक खात्यातही हजारो रुपये येणार आहेत. या यात्रेदरम्यान सुमारे 8 लाख भगिनींनी उज्ज्वला गॅस जोडणीसाठी नोंदणी केली आहे. यापैकी सव्वा दोन लाख जोडण्या जारी देखील केल्या आहेत. आता या बहिणींनाही 450 रुपयांचे सिलिंडर मिळू लागले आहेत. इतकेच नाही तर 2-2 लाख रुपयांच्या ज्या विमा योजना आहेत , त्यात राजस्थानमधील सुमारे 16 लाख लोक जोडले गेले आहेत.
मित्रहो,
जेव्हा मोदी तुम्हाला दिलेली अशी आश्वासने पूर्ण करतात तेव्हा काहींची झोप उडते. तुम्ही काँग्रेसची स्थिती पाहत आहात. तुम्ही अलिकडेच काँग्रेसला धडा शिकवला आहे. पण ते मान्य करतच नाहीत. आजही त्यांचा एकच अजेंडा आहे – मोदींना शिव्या द्या. जो कुणी मोदींना जास्तीत जास्त शिव्या देईल , त्यांना काँग्रेस तितक्याच ताकदीने जवळ घेते . ते विकसित भारताचा उल्लेखही करत नाहीत – कारण मोदी त्यासाठी काम करत आहेत. ते मेड इन इंडियाचा उल्लेख टाळतात – कारण मोदी त्याला प्रोत्साहन देतात. ते व्होकल फॉर लोकल बोलत नाहीत – कारण मोदी त्यासाठी आग्रही आहेत. भारत जेव्हा 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो तेव्हा संपूर्ण देशाला आनंद होतो , मात्र काँग्रेसच्या लोकांना आनंद होत नाही.
जेव्हा मोदी सांगतात की पुढल्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची ताकद बनेल, तेव्हा संपूर्ण देशात आत्मविश्वास ठासून भरतो , मात्र काँग्रेसवाले यातही निराशाच शोधत असतात. मोदी काहीही म्हणोत, मोदी काहीही करोत , ते त्याच्या उलट म्हणतील, उलट करतील. भले, देशाचे मोठे नुकसान झाले तरी चालेल. काँग्रेसकडे एकच अजेंडा आहे – मोदी विरोध, तीव्र मोदी विरोध. ते मोदींच्या विरोधात अशा गोष्टी पसरवतात, ज्यामुळे समाजात फूट पडेल. जेव्हा एखादा पक्ष घराणेशाही आणि वंशपरंपरेच्या दुष्ट चक्रात अडकतो तेव्हा त्याचेही तेच होते. आज सर्वजण काँग्रेसची साथ सोडत आहेत, तिथे एकच कुटुंब दिसत आहे. असे राजकारण युवा भारताला अजिबात प्रेरणा देत नाही. विशेषत: देशातील नवमतदार, ज्यांची स्वप्ने मोठी आहेत, ज्यांच्या आकांक्षा मोठ्या आहेत, जो विकसित भारताच्या संकल्पनेच्या पाठीशी उभा आहे. विकसित राजस्थान, विकसित भारताचा मार्गदर्शक आराखडा अशा प्रत्येक नवमतदारासाठी आहे. म्हणूनच आजकाल देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. लोक म्हणत आहेत – यावेळी एनडीए 400 पार. राजस्थानचाही मोदींच्या गारंटीवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे विकास कामांसाठी खूप खूप अभिनंदन.
खूप-खूप धन्यवाद.
***
NM/VikasY/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
विकसित भारत के निर्माण में समृद्ध राजस्थान की अहम भूमिका है। इसी कड़ी में 'विकसित भारत-विकसित राजस्थान' कार्यक्रम को संबोधित कर रहा हूं। https://t.co/CeFWsmJHey
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2024
आजादी के बाद आज भारत के पास ये स्वर्णिम कालखंड आया है।
— PMO India (@PMOIndia) February 16, 2024
भारत के पास वो अवसर आया है जब वो दस साल पहले की निराशा को छोड़कर अब पूरे आत्मविश्वास से आगे बढ़ रहा है। pic.twitter.com/OFna4ubHQr
जब मैं विकसित भारत की बात करता हूं, तो ये केवल शब्द भर नहीं है, ये भाव भर नहीं है।
— PMO India (@PMOIndia) February 16, 2024
ये हर परिवार का जीवन समृद्ध बनाने का अभियान है।
ये गरीबी को जड़ से मिटाने का अभियान है: PM pic.twitter.com/HRuzrDcOET
आज भारत, सौर ऊर्जा से बिजली पैदा करने के मामले में दुनिया में अग्रणी देशों में आ चुका है। pic.twitter.com/RqRMWo2aLk
— PMO India (@PMOIndia) February 16, 2024
विकसित भारत बनाने के लिए हम देश के 4 वर्गों को मजबूत बनाने में जुटे हैं।
— PMO India (@PMOIndia) February 16, 2024
ये वर्ग हैं- युवा, महिला, किसान और गरीब।
हमारे लिए यही 4 सबसे बड़ी जातियां हैं: PM pic.twitter.com/lwfkbfPn6H