Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2025

 

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद  2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने  भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते  चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी  पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या  आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या जी-20 कार्यक्रमाचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 कार्यक्रमात जगाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक नेते एकाच ठिकाणी जमले होते, तर आज देशातील तरुण भारताच्या पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एकत्र जमले आहेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या निवासस्थानी तरुण खेळाडूंना भेटल्याचा एक किस्सा सांगताना पंतप्रधानांनी एका क्रीडापटूने “जगासाठी, तुम्ही कदाचित पंतप्रधान असाल, परंतु आमच्यासाठी तुम्ही परम मित्र आहात” असे म्हटल्याचे अधोरेखित केले.  मैत्रीतील सर्वात मजबूत दुवा विश्वास आहे असे सांगून पंतप्रधानांनी भारतातील तरुणांसोबतच्या मैत्री संबंधावर भर दिला. भारतीय युवकांवर आपला प्रचंड विश्वास असून या विश्वासातूनच माय भारतच्या निर्मितीला प्रेरणा दिली आणि विकसित भारत युवा नेते संवादाची पायाभरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील तरुणांची क्षमता लवकरच भारताला विकसित राष्ट्र बनवेल, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय मोठे असले तरीही ते अशक्य नाही, असे सांगून नकार घंटा वाजवणाऱ्यांचे  मत त्यांनी खोडून काढले. कोट्यवधी तरुणांच्या सामूहिक प्रयत्नांनी प्रगतीची चाके फिरली की राष्ट्र निश्चितपणे आपले लक्ष्य गाठेल, असे ते म्हणाले.

“इतिहास आपल्याला शिकवतो आणि प्रेरणा देतो”, असे मोदी म्हणाले आणि राष्ट्रे तसेच गटांनी, मोठी स्वप्ने आणि संकल्पांसह त्यांचे ध्येय साध्य केल्याची अनेक जागतिक उदाहरणे अधोरेखित केली. अमेरिकेतील 1930 च्या आर्थिक संकटाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की अमेरिकी नागरिकांनी नवीन करार निवडला आणि केवळ संकटावर मात केली एव्हढेच नव्हे  तर त्यांच्या विकासालाही गती दिली. त्यांनी सिंगापूरचाही उल्लेख केला, ज्याने जीवनातील मूलभूत संकटांचा सामना केला. मात्र, शिस्त आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे त्यांचे जागतिक आर्थिक आणि व्यापार केंद्रात रूपांतरण झाले. भारताकडेही यासारखीच उदाहरणे असून स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यानंतरच्या अन्न संकटावर मात केली याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मोठी उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती एका कालमर्यादेत साध्य करणे अशक्य नसल्याचे त्यांनी भर सांगितले. ध्येय स्पष्ट असल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही आणि आजचा भारत याच मानसिकतेने काम करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

गेल्या दशकभरातील दृढनिश्चयाद्वारे उद्दिष्टे साध्य करण्याच्या अनेक उदाहरणांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की भारताने खुल्याजागी शौचापासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प केला आणि 60 महिन्यांत 60 कोटी नागरिकांनी हे लक्ष्य साध्य केले. भारतातील जवळपास प्रत्येक कुटुंबाला आता बँकिंग सेवा उपलब्ध आहेत आणि महिलांच्या स्वयंपाकघरांना धुरापासून मुक्त करण्यासाठी 100 दशलक्षाहून अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. विविध क्षेत्रांमध्ये भारत आपले लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वीच साध्य करत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या काळात, जग लसींसाठी संघर्ष करत असताना, भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेआधीच लस विकसित केली. भारतातील प्रत्येकाचे  लसीकरण करण्यासाठी 3-4 वर्षे लागतील असे भाकीत असतानाही, देशाने विक्रमी वेळेत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली असे ते पुढे म्हणाले. भारत हा नियत कालमर्यादेच्या नऊ वर्षे आधीच पॅरिस कराराच्या वचनबद्धतेची पूर्तता करणारा पहिला देश ठरला आहे अशी माहिती देत  पंतप्रधानांनी हरित ऊर्जेबाबत भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत असले तरी भारत अंतिम मुदतीपूर्वी ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे असे त्यांनी नमूद केले. हे प्रत्येक यश प्रेरणादायी आहे आणि भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे असे ते पुढे म्हणाले.

“मोठी उद्दिष्टे साध्य करणे ही केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही तर यासाठी प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे”, असे मोदी म्हणाले आणि राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विचारविमर्ष, दिशा आणि स्वामित्व यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि सादरीकरणांमध्ये भाग घेतलेल्या तरुणांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत युवा नेतृत्व संवाद या प्रक्रियेचे उदाहरण देते, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या निबंधाच्या पुस्तकात आणि त्यांनी पुनरावलोकन केलेल्या दहा सादरीकरणांमध्ये दिसून येत असलेल्या विकसित भारताच्या उद्दिष्टाच्या स्वामित्वाबद्दल त्यांनी युवकांचे कौतुक केले. युवकांनी सुचवलेले उपाय हे वास्तव आणि अनुभवावर आधारित आहेत आणि देशासमोरील आव्हानांबाबत त्यांची व्यापक समज यातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले. तज्ज्ञ, मंत्री आणि धोरणकर्ते यांच्याशी झालेल्या चर्चेत तरुणांची विस्तृत विचारसरणी आणि सक्रिय सहभागाची त्यांनी प्रशंसा केली. भारत युवा नेतृत्व संवादातील कल्पना आणि सूचना आता देशाच्या विकासाला दिशा देणाऱ्या राष्ट्रीय धोरणांचा भाग बनतील अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. त्यांनी तरुणांचे अभिनंदन केले आणि एक लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत  त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

विकसित भारताबाबत आपला दृष्टीकोन सामायिक करताना आणि त्याच्या आर्थिक, धोरणात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक सामर्थ्यावर जोर देताना, विकसित भारतात अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्हींची भरभराट होईल आणि चांगले शिक्षण आणि उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.  पंतप्रधानांनी असे अधोरेखित केले की, भारताकडे जगातील सर्वात मोठी कुशल युवा कार्यबळ असण्याची अप्रतिम संधी आहे, जी युवकांच्या स्वप्नांना खुले अवकाश प्राप्त करून देईल . त्यांनी असेही सांगितले की, या ध्येयाच्या साध्यतेसाठी प्रत्येक निर्णय, पाऊल आणि धोरण समृद्ध भारताच्या ध्येयाशी सुसंगत असले पाहिजे. तसेच, हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण देश आगामी अनेक दशकांपर्यंत जगातील सर्वात तरुण राष्ट्र असणार आहे. जागतिक कंपन्या भारतीय युवकांच्या सामर्थ्याची स्तुती करत आहेत, कारण त्यांच्या योगदानामुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते,” असे मोदी यांनी सांगितले.

युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे तीन महान विचारवंत महर्षी अरविंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि होमी जे. भाभा यांचा उल्लेख करत, मोदी म्हणाले की भारतीय युवक आता जागतिक पातळीवर प्रमुख कंपन्यांचे नेतृत्व करत त्यांच्या क्षमतांचे जगाला दर्शन घडवत आहेत. पंतप्रधानांनी ‘अमृत काळ’ म्हणजेच पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले आणि आशा व्यक्त केली की, भारतीय युवक विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणतील. त्यांनी भारतीय युवकांच्या कामगिरीचे  उदाहरण दिले, जसे की भारत स्टार्ट अपमध्ये जगातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आहे, उत्पादन क्षेत्रात प्रगती करत आहे, डिजिटल इंडिया जागतिक पातळीवर अग्रगण्य होत  आहे, एवढेच नाही तर क्रीडा क्षेत्रातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे की, अशाच प्रकारे जेव्हा भारतीय युवक अशक्य गोष्टी शक्य करतील, तेव्हा विकसित  भारताचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल.

पंतप्रधानांनी भारत सरकारच्या युवकांना सक्षम बनवण्याच्या कटिबद्धतेवर जोर देत सांगितले की, भारतात दर आठवड्यात एक नवीन विद्यापीठ आणि दररोज एक नवीन आय.टी.आय. उभे राहिले. तर  प्रत्येक तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा   आणि दररोज दोन नवीन महाविद्यालये सुरू झाली. पंतप्रधानांनी सांगितले की भारतात आता 23 आयआयटी आहेत, आणि गेल्या दहा वर्षांत आयआयआयटींच्या संख्येत 9 वरून 25 पर्यंत वाढ झाली आहे. आयआयएमच्या संख्येतही 13 वरून 21 पर्यंत वाढ झाली आहे. त्यांनी एम्सची  संख्या जवळजवळ दुप्पट झाल्याचे नमूद केले. भारताच्या शैक्षणिक संस्थांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही वाढत आहेत. 2014 क्यूएस रँकिंग मध्ये 9 असलेल्या उच्च शिक्षण संस्थांची संख्या आज 46 वर पोहोचली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या शैक्षणिक संस्थांची वाढती ताकद ही समृद्ध भारताच्या निर्मितीसाठीची एक महत्त्वाची पायाभूत रचना आहे.

पंतप्रधानांनी 2047 पर्यंत समृद्ध भारत घडवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी दररोज लक्ष्य ठरवणे आणि सतत प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या रूपात उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत 250 दशलक्ष लोक गरिबीपासून मुक्त झाले आहेत आणि त्यांना विश्वास आहे की संपूर्ण देश देखील लवकरच गरिबीमुक्त होईल. भारताच्या 500 गिगावॅट नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याच्या लक्ष्याचा आणि 2030 पर्यंत भारतीय रेल्वेचे नेट-झीरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या लक्ष्याचा त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधानांनी भारताच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टावर जोर दिला. ते म्हणाले की, भारत अंतराळशक्ती म्हणून सुद्धा झपाट्याने प्रगती करत आहे, आणि 2035 पर्यंत भारताने स्वतःचे एक अंतराळ स्थानक स्थापनेसाठी योजना आखल्या गेल्या आहेत. त्यांनी चांद्रयानच्या यशाचा आणि गगनयानाच्या तयारीचा उल्लेख केला, ज्याचे अंतिम ध्येय म्हणजे चंद्रावर भारतीय अंतराळवीर  उतरवणे हे आहे. मोदींनी सांगितले की, अशा महत्त्वाकांक्षी ध्येयांच्या साध्यतेमुळे 2047 पर्यंत समृद्ध भारत घडवण्याचा मार्ग मोकळा होईल.

पंतप्रधानांनी आर्थिक विकासाचा दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामावर भाष्य केले. अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच  जीवनाच्या सर्व पैलूंवर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की,  या शतकाच्या पहिल्या दशकात भारत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. पण त्या वेळी अर्थव्यवस्थेचा आकार लहान असल्याने, कृषीसाठीची अर्थसंकल्पातील तरतुद फक्त काही हजार कोटी होती आणि पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींपेक्षा कमी तरतुद होती. त्यावेळी बहुतेक गावांमध्ये योग्य रस्ते नव्हते, आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेची स्थिती खराब आणि प्राथमिक सुविधांमध्ये वीज आणि पाणी मोठ्या प्रमाणात अनुपलब्ध होते, असे नमुद करीत  मोदी म्हणाले की, दोन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत प्रवेश केल्यानंतर, भारताची पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पातील तरतुद दोन लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होती.तथापि, देशाने रस्ते, रेल्वे, विमानतळ, कालवे, गरीबांसाठी घरे, शाळा आणि रुग्णालये यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अनुभवल्या. त्यांनी पुढे म्हटले की, भारत जलद गतीने तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनत असताना, विमानतळांची संख्या दुप्पट झाली, वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वेचे आगमन झाले, आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होऊ लागले. जागतिक स्तरावर भारताने फाईव्ह जी ची सेवा वेगाने  सुरू केली. हजारो ग्राम पंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवले गेले, आणि 300,000 हून अधिक गावांमध्ये रस्ते बांधले. पंतप्रधानांनी नमूद केले की, 23 लाख कोटी रुपयांचे विना  तारण मुद्रा कर्ज तरुणांना प्रदान करण्यात आले, आणि जगातील सर्वात मोठी मोफत आरोग्य योजना, आयुष्मान भारत, सुरू करण्यात आली आहे.  त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी हजारो कोटी रुपये थेट जमा करण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. गरीबांसाठी चार कोटी पक्की घरे बांधली गेली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थव्यवस्था वाढल्यानंतर विकासात्मक उपक्रमांनी गती घेतली आहे. यामुळे अधिक संधी निर्माण झाल्या आणि प्रत्येक क्षेत्र आणि सामाजिक वर्गावर खर्च करण्याची क्षमता वाढली, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारत आता चार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या जवळ आल्याचे नमुद करताना पंतप्रधान  म्हणाले की, वर्तमान पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पातील तरतूद 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एक दशकापुर्वी तरतुदीच्या तुलनेत ही तरतूद जवळजवळ सहा पट जास्त आहे. 2014 च्या संपूर्ण पायाभूत सुविधा अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा रेल्वेवर अधिक खर्च केला जात आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, अर्थसंकल्पातील ही वाढलेली तरतूद बदलत्या भारताच्या चित्रात  स्पष्टपणे दिसून येते, ज्यामध्ये भारत मंडपम एक सुंदर उदाहरण आहे.

“भारत जलद गतीने पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे जात आहे, जे विकास आणि सुविधांचा मोठा विस्तार करेल,” असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील दशकाच्या शेवटी भारत दहा ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यावर पोहोचेल, असेही ते म्हणाले. त्यांनी तरुणांना अर्थव्यवस्था वाढल्याने येणाऱ्या अनेक संधींबद्दल प्रोत्साहित केले. ते म्हणाले की, युवकांची पिढी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे परिवर्तन घडवेल आणि तीच या परिवर्तनाची सर्वात मोठी लाभार्थी असेल. पंतप्रधानांनी तरुणांना जोखीम घेण्याचा सल्ला देताना त्यांना सुरक्षित  मानसिकतेतून बाहेर पडण्यास सांगितले आणि यासाठी युवा नेत्यांच्या संवादात सहभागी झालेल्यांचे उदाहरण दिले. जीवनाचा हा मंत्र युवकांना यशाच्या नवीन उंचीवर नेईल, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या भविष्याच्या आराखड्यामध्ये विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. तरुणांनी या निर्धाराला ज्या ऊर्जा, उत्साह, आणि समर्पणाने स्वीकारले आहे त्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की,  विकसित भारतासाठीच्या कल्पना अमूल्य, उत्कृष्ट, आणि सर्वोत्तम आहेत. त्यांनी तरुणांना या कल्पना देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात नेण्याचे, प्रत्येक जिल्हा, गाव, आणि शेजारील तरुणांना विकसित भारताच्या भावनेने जोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या वचनाची पुनरावृत्ती केली आणि प्रत्येकाला या ठरावासाठी जगण्याचे आणि समर्पित होण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांनी भारताच्या सर्व तरुणांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचा पुनरुच्चार केला.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्य मंत्री जयंत चौधरी, रक्षा खडसे देखील इतर मान्यवरांसमवेत कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभुमी

पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित कऱण्याची 25 वर्षांची परंपरा खंडीत करणे हा विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी राजकारणाशी संबंधित नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून घेण्याचे तसेच विकसित भारत साकार  करण्यासाठी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने, यावर्षीच्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या भावी नेत्यांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि सक्षम करण्यासाठी आरेखित अनेकविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. नवोन्मेषी तरुण नेते, भारताच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या दहा विषयक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी दहा पॉवरपॉईंट सादरीकरणे पंतप्रधानांच्या समोर सादर करतील. भारताच्या काही सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देण्याकरीता युवा नेत्यांद्वारे प्रस्तावित नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाय या सादरीकरणात दर्शवतात.

पंतप्रधानांच्या हस्ते, सहभागींनी दहा विषयांवर लिहिलेल्या उत्तम निबंधांचे संकलनही प्रसिद्ध करण्यात आले. या विषयांमध्ये तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि कृषी असे विविध क्षेत्रांचा समावेश होता.

अनोख्या वातावरणात, पंतप्रधानांनी तरूण नेत्यांबरोबर भोजनही घेतले. ज्यामुळे त्यांना स्वतःच्या कल्पना, अनुभव आणि महत्त्वाकांक्षा थेट पंतप्रधांनांना सामायिक करण्याची संधी मिळाली. या वैयक्तिक संवादामुळे प्रशासन आणि युवा आकांक्षा यांच्यातील दरी सांधता येईल. सहभागींमध्ये मालकी आणि जबाबदारी दोन्हीची सखोल जाणीव निर्माण होईल.

11 जानेवारीपासून सुरु झालेल्या या संवादादरम्यान, तरूण नेते स्पर्धा, उपक्रम आणि सांस्कृतिक आणि संकल्पनाधारित सादरीकरणामध्ये सहभागी होतील. यामध्ये मार्गदर्शक आणि क्षेत्र तज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखालील संकल्पविषयांवरील विचारविनिमय याचाही समावेश आहे. तसेच, आधुनिक प्रगतीचे प्रतीक असणाऱ्या भारताचा कलावारशाचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

विकसित भारत युवा नेतृत्व संवादात सहभागासाठी तीन हजार उत्साही आणि प्रेरित तरुणांची निवड करण्यात आली, जे विकसित भारत आव्हानाच्या माध्यमातून निवडले गेले, अत्यंत काटेकोरपणे तयार कऱण्यात आलेल्या, सर्वात प्रेरित आणि गतिमान तरूण आवाज ओळखण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी गुणवत्ताआधारित बहुस्तरीय निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील सहभागींसाठी तीन पायऱ्यांचा समावेश होता. पहिली पायरी, विकसित भारत प्रश्नमंजुषा, जी सर्व राज्यांतल्या तरुणांसाठी 12 भाषांमध्ये राबवण्यात आली आणि त्यात सुमारे 30 लाख तरुणांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषेत पात्र ठरलेले दुसऱ्या टप्प्यात निबंध फेरीत पोचले, ज्यात त्यांनी ‘विकसित भारताचे’ स्वप्न साकार कऱण्यासाठी महत्त्वपूर्ण दहा विषयांवर आपले विचार व्यक्त केले. त्यापैकी 2 लाखाहून अधिक निबंध सादर झाले. तिसऱ्या टप्प्यात, राज्यफेरीत 25 उमेदवार कठीण व्यक्तिगत स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी समोर आले. प्रत्येक राज्याने राष्ट्रीय कार्यक्रमासाठी गतिमान संघ स्थापन करून त्यातील सर्वोच्च तीन उमेदवारांना निवडले.

राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील शीर्ष 500 संघाचं प्रतिनिधित्व करणारे विकसित भारत आव्हानातले 1500 सहभागीं, राज्यस्तरीय युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विज्ञान तंत्रज्ञानातील नवोन्मेष प्रदर्शन यांच्या माध्यमातून निवडलेले 1000 सहभागी तसंच विविध क्षेत्रात आपल्या अभूतपूर्व योगदानासाठी आमंत्रित 500 अग्रेसर सहभागी  या संवादात सहभागी आहेत.

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Shraddha/Sandesh/Gajendra/Nitin/Vijayalaxmi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai