Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी मधील पंडित दिन दयाळ उपाध्याय स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण


हर हर महादेव !!!

महाशिवरात्री, विजया एकादशी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

येथे मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो !!

गंगेच्या तीरावर आज एक अद्भुत संयोग जुळून आला आहे. अवधूत बाबा भगवान राम यांचे तपोस्थान या तीरावर आहे तर आता दीनदयाळ उपाध्याय यांचे स्मृती स्थळ देखील गंगेच्या दुसऱ्या तीरावर विकसित केले आहे.

मित्रांनो, गंगा जेव्हा काशीमध्ये प्रवेश करते तेव्हा ती उन्मुक्त होऊन आपल्या दोन्ही भुजा पसरवते.

एका बाजूला धर्म, दर्शन आणि अध्यात्माची विशाल संस्कृती विकसित झाली आहे तर दुसरीकडे अर्थात या तीरावर सेवा, त्याग, समर्पण आणि तपस्या मुर्तिमान झाली आहे

या तीरावर सिद्धयोगी अवधूत बाबा भगवान राम यांनी तप आणि साधनेचे पारंपारिक रूप बदलून सेवेचे एक नवीन तपोस्थान निर्माण केले आहे.

आज या क्षेत्रात दीनदयाळजी यांचे स्मृती स्थळ उभे राहिल्यामुळे, या जागेचे ‘पडाव’ हे नाव अधिक सार्थक होत आहे.

एक असा पडाव जिथे सेवा, त्याग, विरक्ती आणि लोकहित एकत्र येऊन एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होईल.

मला विश्वास आहे की, हे क्षेत्र आयुष्याचा खरा हेतू जाणून तो समजून घेऊन त्याला प्राप्त करण्यासाठी संकल्प भूमी म्हणून कार्य करेल.

 

मित्रांनो,

ज्यांच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय सदैव प्रेरणास्थानी राहिले त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे एखादे स्वप्न साकार होण्याचा दिवस आहे.

येथे जे स्मृतीस्थळ उभारले आहे, उद्यान बांधले आहे, त्यांची भव्य प्रतिमा स्थापन केली आहे, भावी पिढीला या सगळ्यातून दिन दयाळजी यांचे आचार आणि विचारातून प्रेरणा मिळत राहील.

 

बंधू आणि भगिनींनो,

ज्यांच्या मनात दलित, पीडीत, शोषित, वंचित, दिन-दुबळ्या समाजातील एकाही व्यक्तीसाठी जरी वेदना आहे, करुणा आहे अशा सगळ्यांसाठी ही भूमी प्रेरणा भूमी आहे, प्रेरणा स्थळ आहे. जे देशभक्तीच्या रंगात रंगले आहेत, ज्यांच्या जीवनात पक्षाच्या वरती देश आहे स्वतःपेक्षा अधिक सगळ्यांची काळजी आहे अशा देशभक्तीमध्ये रंगलेल्या कोट्यावधी लोकांसाठी हे तीर्थक्षेत्र आहे जिथून देशासाठी जगण्याची, देशासाठी लढण्याची, आणि देशासाठी आपले आयुष्य पणाला लावण्याची प्रेरणा मिळत राहील. मी आज या भूमीला नमन करतो, त्या पुण्यात्म्याला नमन करतो. आणि मला विश्वास आहे की दिन दयाळ जी यांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथून ते आम्हाला सदैव आशीर्वाद देत असतील, आम्हाला निरंतर प्रेरणा देत असतात कारण आम्ही समाजातील अगदी तळागाळातील व्यक्तीसाठी, समाजातील दिन दुबळ्या व्यक्तीसाठी, दलित, पीडीत, शोषित, वंचित लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य वेचू, आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडू.

 

मित्रांनो,

दिन दयाळ उपाध्याय यांनी आपल्याला अंत्योदयाचा मार्ग दाखवला. म्हणजे जी व्यक्ती समाजाच्या अगदी शेवटच्या रांगेत आहे तिचा देखील उदय झाला पाहिजे. याच विचारातून प्रेरणा घेत 21व्या शतकातील भारत अंत्योदयाचे काम करत आहे. जो विकासाच्या शेवटच्या पायरीवर उभा आहे, त्याला विकासाच्या पहिल्या पायरीवर आणण्याचे काम सुरु आहे.

मग ते पूर्वांचल असो, पूर्व भारत असो, देशातील 100 हून अधिक आकांशी जिल्हे असो, सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकासकार्य सुरु आहे.

याच शृंखलेत आज या पवित्र क्षणी वाराणसी सह संपूर्ण पूर्वांचलला लाभकारक अशा अंदाजे 1200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला. यात मोठे रुग्णालय, शाळा आणि शैक्षणिक संस्था, रस्ते, उड्डाणपूल, पाणी योजना, उद्यान आणि शहरांच्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

सामान्य लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, सोयी-सुविधा, भक्ती आणि रोजगाराशी निगडीत या सर्व प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे, वाराणसी आणि पूर्वांचल मधील लोकांचे हार्दिक अभिनंदन करतो.

हे सर्व प्रकल्प म्हणजे मागील 5 वर्षांपासून काशीसह संपूर्ण पुर्वांचलचा कायाकल्प करण्यासाठी केलेल्या संकल्पाचा एक अतूट भाग आहे. या वर्षांमध्ये वाराणसीत अंदाजे 25 हजार कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत किंवा त्यांचे काम जलद गतीने सुरु आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात या काशी नगरीत विकास काम सुरु आहेत, म्हणजे याच्या मागे महादेवाचीच इच्छा आहे, भोलेनाथांचा आशीर्वाद आहे.

ही सर्व काम करण्याची जबाबदारी भोलेनाथांनी आपल्यावर सोपवली आहे हे आपल्या सगळ्यांचे सौभाग्य आहे. बनारस सह संपूर्ण पूर्वांचलला या सर्व कामांचा खूप मोठा फायदा होत आहे. विशेषतः पायभूत सुविधांच्या बाबतीत सरकारने रस्ते, महामार्ग, जलमार्ग, रेल्वे या सगळ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पूर्वांचल एक्सप्रेस वे वर योगीजींची टीम वेगाने काम करत आहे. या संपूर्ण  लवकरच याचा लाभ मिळेल.

आज येथे चौकाघाट-लहरतारा मार्गावरील पुलाचे लोकार्पण देखील करण्यात आले. पूर्वीची स्थिती तुम्हाला माहित आहे. कैंट रेल्वे स्थानक असो, बीएचयु असो, बस स्थानक असो, विमानतळ असो या सर्व ठिकाणी ये-जा करण्यात किती त्रास व्हायचा, किती वाहतूक कोंडी असायची. आता या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. या चौपदरी पुलामुळे आता लहरतारा-इलाहाबाद आणि चौकाघाट-दीनदयाळ उपाध्याय नगरचा रस्ता देखील जोडला आहे. याशिवाय वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या 16 रस्त्यांचे देखील आज लोकार्पण करण्यात आले. प्रयागराज, मिर्जापूर, जौनपुर, गाजीपूर, आजमगढ, गोरखपूर, बलीया ते बिहारहून प्रवास करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल. ज्यांना सारनाथ सह इतर पर्यटन स्थळांना भेट द्यायची आहे, त्यांना देखील या रस्त्यांमुळे फायदा होईल.

 

मित्रांनो,

काशीसह संपूर्ण क्षेत्रात सुरु असलेल्या कनेक्टीव्हिटीच्या कामांमुळे, तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांसह रोजगार निर्मितीच्या देखील मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः पर्यटनावर आधारित रोजगार, ज्यात काशी आणि आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्षमता असलेल्या पर्यटन-आधारित रोजगाराला चालना मिळणार आहे. पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येक स्तरातील व्यक्ती कमीतकमी गुंतवणूक करून अधिकाधिक पैसे कमावतो. हेच कारण आहे, आज जेव्हा भारतातील 5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या चर्चा होत आहे, त्यात पर्यटन हा महत्वाचा भाग आहे. भारताकडे निसर्गासह हेरीटेज पर्यटनाची देखील खूप मोठी ताकद आहे, ज्याला 21व्या शतकाचे रूप देण्यात येत आहे. विशेषतः, काशीसह आमच्या श्रद्धेशी निगडीत सर्व स्थळांना नवीन गरजांनुसार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले जात आहे.

सारनाथचे सौंदर्यीकरण असो, गंगा किनाऱ्यांचे सौंदर्यीकरण असो, आज काशीमध्ये येणारा प्रत्येक भाविक, प्रत्येक पर्यटक येथून जाताना एक सुखद अनुभव घेऊन जात आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे पंतप्रधान देखील येथे आले होते. येथील अद्भुत वातावरणाच्या दिव्य भावनेने ते मंत्रमुग्ध झाले. तुम्ही सोशल मिडीयावर पाहिले असेल की त्यांनी काशीच्या मित्रांचे खूप कौतुक केले आहे.

 

मित्रांनो,

काशी विश्वनाथ धामशी निगडीत प्रकल्पांच्या कामांची देखील तुम्हाला माहिती आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अन्न्छत्र भवनाचे देखील आज लोकार्पण करण्यात आले. या भवनाच्या निर्मितीमुळे, भाविकांना प्रसाद आणि भोजन वितरणात होणारी गैरसोय आता कायमची दूर होईल. काशी विश्वनाथ धाम मध्ये अशी अनेक कार्ये वेगाने सुरु आहेत. लवकरच भोलेनाथांचे एक भव्य-दिव्य आणि आकर्षक प्रांगण आपल्या सर्वांसमोर असेल.

याचप्रकारे, अयोध्येमध्ये श्री राम जन्मभूमीमध्ये भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. आता ही ट्रस्ट श्री राम धाम निर्मितीचे कार्य जलद गतीने सुरु करेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

श्रद्धा आणि अध्यात्माशी निगडीत देशभरातील सर्व मोठी केंद्र विकसित करण्यासोबतच भाविकांना आणि पर्यटकांना सुविधा पुरविण्याचे काम देखील सुरु आहे. विशेषतः येथे भाविकांना निरंतर कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी काम सुरु आहे.

याच शृंखलेत आज बाबा विश्वनाथ यांच्या नगरीला ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरशी जोडणाऱ्या काशी-महाकाल एक्स्प्रेसला देखील आज हिरवा झेंडा दाखवला. आता काशीत बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेतल्यानंतर उज्जैन येथे महाकालचे दर्शन करू शकतील आणि त्याच ट्रेनने पुढे इंदोरला जाऊन ओंकारेश्वर मध्ये देखील श्रद्धा सुमन अर्पित करू शकतील.

एवढेच नाही तर ही रेल्वे सेवा प्रयागराज, लखनौ, कानपूर, झांसी, बिना, संत हिरादास सारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वाच्या क्षेत्रांना देखील जोडेल. भोलेनाथाच्या भक्तांसाठी महाशिवरात्री निमित्त ही एक विशेष भेट आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

काशी आस्था आणि अध्यात्मा सोबतच ज्ञानाचे देखील मुख्य केंद्र आहे. मागील 5 वर्षात बीएचयु सारख्या ज्ञान आणि विज्ञानाच्या मोठ्या केंद्रांचा विस्तार करण्यात आला आहे. आज येथे वैदिक ज्ञान-विज्ञानापासून आधुनिक चिकित्सेशी निगडीत अनेक सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. आज वाराणसी, पूर्वांचल खूप मोठे वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील आधुनिक उपचारांसाठी येथे अनेक रुग्णालये बांधली जात आहेत. पूर्वी ज्या आजारांच्या उपचारासाठी दिल्ली आणि मुंबईला जावे लागायचे, त्या आजारांवरील उपचार आता येथेच उपलब्ध होत आहेत. उत्तर प्रदेशसह पूर्व भारतातील खूप मोठ्या प्रदेशाला याचा व्यापक फायदा मिळत आहे. बीएचयु मध्ये आज ज्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण झाले, त्याचे भूमिपूजन 2016 च्या अखेरीस मीच केले होते. 430 खाटांची सुविधा असलेले हे रुग्णालय केवळ 21 महिन्यांच्या कालावधीत काशी आणि पुर्वांचल मधील लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. कबीरचौरा मध्ये जिल्हा महिला रुग्णालयातील 100 खाटांच्या प्रसूती विभागामुळे शहरातील महिलांना खूप मदत होईल.

योगिजी आणि त्यांच्या चमूने उत्तर प्रदेश मध्ये वैद्यकीय महविद्यालय आणि आयुष्मान योजनेंतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्र निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. यासोबतच मागील 2-3 वर्षात शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेशी निगडीत जे प्रयत्न केले आहेत त्यामुळे एन्सेफलायटीस सारख्या आजारांशी सामना करण्यासही मदत मिळाली आहे.

 

मित्रांनो,

मागील पाच ते साडे पाच वर्षात आम्ही जे साध्य केले आहे, आता त्याला अधिक वेगाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. स्वच्छता अभियान आम्हाला सुरु ठेवायचे आहे. तसेच जल जीवन अभियाना अंतर्गत आगामी 5 वर्षात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आम्हाला संपूर्ण शक्तीने काम करायचे आहे.

मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, हे काम करण्यासाठी अर्थसंकल्पाचा अडथळा येणार नाही किंवा मग सरकारचा मानस देखील कमकुवत होणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन बनारसचा कायापालट करण्याची महादेवांची इच्छा पूर्ण करण्याचे कार्य पार पाडूया.

 

बंधू आणि भगिनींनो,

मोठ्या शहरांपेक्षा, बनारस सारखी द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी शहरे बदलत्या भारतातील देशाच्या विकास गाथेत नवीन अध्याय जोडण्याचे काम करतील.

ज्याप्रकारे दिन दयाळजी अंत्योदया विषयी बोलायचे त्याचप्रमाणे देशातील छोट्या शहरांचा विकास झाला तर ते देशाच्या विकासाला नवीन उंचीवर घेऊन जातील.

या छोट्या शहरांना आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा झाला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधेवर 100 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला जाईल अशी घोषणा केली आहे. यातील खूप मोठा हिस्सा देशातील छोट्या छोट्या शहरांना मिळणार आहे.

 

मित्रांनो,

दिन दयाळजी सांगायचे की, आत्मनिर्भरता आणि स्वयं सहाय्यता सर्व योजनांच्या केंद्र स्थानी असावी. त्यांच्या या विचारांना सरकारी योजना आणि सरकारी कार्यसंस्कृती मध्ये समविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही बघा, मेक इन इंडियाच्या केंद्रस्थानी आत्मनिर्भरता आहे. आज रेल्वेच्या डब्ब्यांपासून, मोबाईल फोन आणि आधुनिक शस्त्र-अस्त्रांपर्यंत सगळ्याची निर्मिती भारतात होऊ लागली आहे. पूर्वांचलसह संपूर्ण उत्तर प्रदेशात मागील 5 वर्षात अनेक नवीन कारखाने उभे राहिले आहेत.

याचप्रमाणे, स्टार्ट अप इंडियाच्या केंद्रस्थानी देखील आत्मनिर्भरता आहे. मागील 5 वर्षात अंदाजे 26 हजार नवीन स्टार्ट अपची नोंदणी झाली आहे, ज्यामुळे भारताच्या युवकांनीच भारतातील लाखो युवकांना रोजगार दिला आहे. मुद्रा योजनेच्या केंद्रस्थानी देखील आत्मनिर्भरता आणि स्वयं सहाय्यता आहे. या योजनेने संपूर्ण देशात जवळजवळ साडे पाच नवीन उद्योजक तयार केले आहेत. वाराणसीच्या अंदाजे साडे सहा मित्रांना अंदाजे 3 हजार कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आधार देखील स्वयं सहाय्यताच आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेशच्या जवळपास 2 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे 12 हजार कोटी जमा केले आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

आमचे सरकार समाजातील शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, विकासाचे फायदे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर काम करत आहे.

तुम्हीच सांगा, ते 50 कोटींहून अधिक देशवासी ज्यांना आज आयुष्मान भारत योजने अंतर्गत 5 लाख रुपयांचे मोफत उपचार शक्य झाले आहेत, ते कोण आहेत? 70 वर्षांपासून हे सगळे विकासाच्या शेवटच्या पायरीवरच होते. आज देशात अंदाजे 90 लाख गरीब रुग्णांवर उपचार झाले आहेत, त्यापैकी उत्तर प्रदेशातील 3 लाख आणि वाराणसीतील 16 हजार लोकं आहेत.

देशातील ते 11 कोटी मित्र देखील त्या शेवटच्या पायरीवरच होते, ज्यांच्या घरात पहिल्यांदाच शौचालय बांधले आहे. देशातील ती 8 कोटींहून अधिक कुटुंब देखील शेवटच्या पायरीवर होती, ज्यांना पहिल्यांदाच उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे. यात देखील उत्तर प्रदेशातील अंदाजे दीड कोटी आणि वाराणसीच्या अंदाजे पावणे दोन लाख कुटुंबाना याचा फायदा मिळाला आहे. यात देखील जवळपास 50 लाख माझ्या दलित बंधू भगिनींची कुटुंब आहेत, ज्यांना उज्वला चे गॅस कनेक्शन मिळाले आहे.

देशातील अंदाजे ज्या 2 कोटी लोकांना पक्के घर मिळाले आहे, ते देखील शेवटच्या पायरीवर उभे असलेले लोकं होते.

आज ज्या 24 कोटी देशवासियांना 4 लाख रुपयांपर्यंतचा अपघात आणि आयुर्विमा मिळत आहे, ते देखील शेवटच्या पायरीवर उभे होते.

ज्या कोट्यवधी शेतकरी, श्रमिक, छोटे व्यापारी यांना वयाच्या 60 वर्षांनंतर 3 हजार रुपयांची मासिक पेंशनची सुविधा निश्चित केली आहे, ते देखील विकासाच्या शेवटच्या पायरीवर उभे होते.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कालावधी पर्यंत या शेवटच्या पायरीला कायम ठेवले होते, कारण त्यांच्या समस्या सोडवण्यात नाही तर त्या तशाच कायम ठेवण्यातच त्याचे राजकीय हित होते. परंतु आता परिस्थिती बदलत आहे, देश बदलत आहे.

जो शेवटच्या पायरीवर होता, आता त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

महादेवाच्या आशीर्वादाने, आज देश ते निर्णय देखील घेत आहे जे नेहमीच दुर्लक्षित ठेवले जायचे. जम्मू-काश्मीर मधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा असो, वर्षानुवर्षे देश या निर्णयाची वाट बघत होता.

देशहितासाठी हे निर्णय गरजेचे होते आणि जगभरातील सर्व स्तरावर दबाव असून देखील आम्ही या निर्णयांवर ठाम राहिलो आणि ठाम राहू.

आज बाबा भोलेनाथांच्या नगरीत, अवधूत बाबा भगवान राम यांच्या सानिध्यात, दिन दयाळजींच्या स्मृती मध्ये, मी काशीच्या लोकांना, देशवासियांना मी खात्री देतो की देशासाठी ही सर्व कामे निरंतर सुरु राहतील.

इतक्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिल्याबद्दल, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !!!

भारत माता की जय !!!

भारत माता की जय !!!

भारत माता की जय !!!

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor