Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वन अर्थ वन हेल्थ – अॅडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण

वन अर्थ वन हेल्थ – अॅडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण


 

सन्माननीय मान्यवर, जगभरातील अनेक देशांतील आरोग्य मंत्री, पश्चिम आशिया, सार्क, आसियान आणि आफ्रिकी प्रदेशातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, मी भारतात आपले हार्दिक स्वागत करतो. माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि भारतीय आरोग्य सेवा उद्योगाचे प्रतिनिधी, नमस्कार!

मित्रांनो,
 

भारतीय शास्त्र सांगते:

सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥

याचा अर्थ: प्रत्येकजण सुखी होवो, प्रत्येकजण रोगमुक्त होवो, प्रत्येकासोबत चांगले घडू दे आणि कोणालाही दुःखाचा त्रास होऊ नये. ही सर्वसमावेशक दृष्टी आहे. हजारो वर्षांपूर्वी, जागतिक महामारी नसतानाही भारताचा आरोग्याप्रति दृष्टीकोन  सार्वत्रिक होता. आज जेव्हा आपण एक वसुंधरा एक आरोग्य  म्हणतो तेव्हा कृतीतही तोच विचार येतो.  आपला दृष्टीकोन  केवळ मानवांपुरता मर्यादित नाही.  त्याचा विस्तार आपल्या संपूर्ण परिसंस्थेपर्यंत होतो. वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत, मातीपासून नद्यांपर्यंत, जेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट निरोगी असते तेव्हा आपण निरोगी राहू शकतो.
मित्रांनो,

आजारपणाचा अभाव म्हणजे चांगले आरोग्य अशीच एक लोकप्रिय धारणा आहे.  मात्र, आरोग्याकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन आजारपणाचा अभाव इथेच थांबत नाही. रोगांपासून मुक्त होणे हा निरोगीपणाच्या मार्गावरचा एक टप्पा आहे. आमचे ध्येय सर्वांसाठी निरामयता आणि कल्याण आहे.  शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे आपले ध्येय आहे.

मित्रांनो,
‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेसह भारताने आपल्या जी20 अध्यक्षपदाचा प्रवास सुरू केला.  ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी लवचिक जागतिक आरोग्य सेवा प्रणालींचे महत्त्व आम्ही जाणले आहे. भारत, आरोग्यदायी वसुंधरेसाठी वैद्यकीय उपचारांशी संबंधित प्रवास आणि आरोग्य कर्मचार्‍यांची गतिशीलता महत्त्वाची मानतो.  वन अर्थ वन हेल्थ अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023  हा या दिशेने एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.  हा मेळावा भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेलाच ध्वनीत करतो. अनेक देशांतील शेकडो सहभागी येथे आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित घटक येथे असणे खूप चांगले आहे.  हे जग एक कुटुंब आहे अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.

मित्रांनो,
सर्वांगीण आरोग्यसेवेचा विचार केला तर भारताकडे अनेक प्रकारची महत्त्वाची ताकद आहे. आमच्याकडे प्रतिभा आहे.  आमच्याकडे तंत्रज्ञान आहे.  आमच्याकडे पाठपुराव्याची नोंद आहे.  आमच्याकडे परंपरा आहे.  मित्रांनो, प्रतिभेचा विचार केला तर भारतीय डॉक्टरांचा प्रभाव जगाने पाहिला आहे.  भारतात आणि बाहेरही, आमच्या डॉक्टरांचा त्यांच्या क्षमता आणि वचनबद्धतेसाठी सर्वत्र आदर केला जातो. त्याचप्रमाणे, भारतातील परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी देखील प्रसिद्ध आहेत. जगभरातील अनेक आरोग्यसेवा प्रणाली भारतीय व्यावसायिकांच्या प्रतिभेचा लाभ घेतात.  भारतामध्ये संस्कृती, हवामान आणि सामाजिक क्षेत्रात  प्रचंड विविधता आहे. भारतात प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकांना विविध अनुभवांनी पारंगत केले जाते. विविध परिस्थितींत गरजा पूर्ण करू शकणारी कौशल्ये विकसित करण्यात त्यांना यामुळे मदत होते.  त्यामुळे भारतीय आरोग्यसेवेच्या प्रतिभेने जगाचा विश्वास जिंकला आहे.

मित्रांनो,
शतकातील सर्वात मोठ्या महामारीने जगाला अनेक सत्यांची जाणीव करून दिली. परस्परांशी खोलवर जोडल्या गेलेल्या जगात देशांच्या सीमा आरोग्यासाठीचे धोके थोपवू शकत नाहीत हे या संकटकाळाने आपल्याला दाखवून दिले. संकटाच्या वेळी दक्षिणेकडील देशांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला आणि संसाधने कशी नाकारली गेली, हे देखील जगाने पाहिले. खरी प्रगती लोककेंद्रित असते. वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरीही जगातील शेवटच्या मैलावरील शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या उपलब्धतेची हमी आवश्यक आहे. याच संकटाच्या काळात अनेक राष्ट्रांना आरोग्य सेवा क्षेत्रातील विश्वासू भागीदाराचे महत्त्व कळले. लस आणि औषधांद्वारे जीव वाचवण्याच्या उदात्त कार्यात अनेक राष्ट्रांचा भागीदार असल्याचा भारताला सार्थ अभिमान आहे. भारतीय लसी आपल्या चैतन्यपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राने विकसित केल्या आहेत. आपण जगातील सर्वात मोठ्या आणि जलद कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे केंद्र बनलो आहोत. आपण 100 हून अधिक देशांमध्ये कोविड-19 प्रतिबंधक लसींचे 300 दशलक्ष डोस पाठवले आहेत. यातून आपली क्षमता आणि बांधिलकी दोन्ही दिसून येते. आपल्या नागरिकांसाठी चांगले आरोग्य इच्छिणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचे आपण विश्वासू मित्र बनून राहू.

मित्रांनो,
हजारो वर्षांपासून भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सर्वांगीण राहीला आहे. आपल्याकडे प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्याची मोठी परंपरा आहे. योग आणि ध्यानधारणा  यासारख्या प्रणाली आता जागतिक चळवळ बनल्या आहेत. योग आणि ध्यानधारणा  हे प्राचीन भारताने आधुनिक जगाला दिलेले वरदान आहेत. त्याचप्रमाणे, आपली आयुर्वेद चिकित्सा पद्धती ही संपूर्ण निरोगी आयुष्य प्रदान करणारी प्रणाली आहे. आयुर्वेद चिकित्सा पद्धती आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक पैलूंची काळजी घेते. जग तणाव आणि जीवनशैलीतील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर उपाय शोधत आहे. भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये यावर बरेच उपाय आहेत. भरड धान्याचा समावेश असलेला आपला पारंपारिक आहार देखील अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी मदत करू शकतो.

मित्रांनो,
प्रतिभा, तंत्रज्ञान, ट्रॅक रेकॉर्ड आणि परंपरा या वैशिष्ट्यांसह भारतामधील आरोग्यसेवा प्रणाली परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आहे. हे आपल्या देशातील  प्रयत्नांमध्ये दिसून येते. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. आयुष्मान भारत उपक्रमात 500 दशलक्ष लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. 40 दशलक्षाहून अधिक लोकांनी आधीच कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने या सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे आमच्या नागरिकांची सुमारे 7 अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे.

मित्रांनो,
आरोग्य विषयक आव्हानांना द्यावा लागणारा जागतिक प्रतिसाद वेगवेगळा असू शकत नाही. या आव्हानांना एकात्मिक, सर्वसमावेशक आणि संस्थात्मक प्रतिसाद देण्याची ही वेळ आहे. आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात आपण भर देत असलेल्या अनेक क्षेत्रांपैकी हे एक आहे. केवळ आपल्या नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी बनवणे हे आमचे ध्येय आहे. विषमता कमी करणे याला भारत प्राधान्य देतो. सेवेपासून वंचित असलेल्यांची सेवा करणे हीच आपली आस्था आहे. या संमेलनामुळे या दिशेने जागतिक भागीदारी आणखी मजबूत होईल, असा मला विश्वास आहे. आम्हाला आमच्या ”एक पृथ्वी-एक आरोग्य” या सामायिक अजेंड्यावर तुमची भागीदारी अपेक्षित आहे. या शब्दांनी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो  आणि उत्तम विचारविनिमय होईल अशी आशा करतो. खूप खूप धन्यवाद!

***

SushamaK/VinayakG/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai