Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वंदे भारत एक्स्प्रेस आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

वंदे भारत एक्स्प्रेस आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण


 

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

आज एकविसाव्या शतकातील भारतासाठी, शहरी दळणवळणासाठी आणि आत्मनिर्भर होत असलेल्या भारतासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. थोड्या वेळापूर्वी मी गांधीनगर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या अतिजलद गती प्रवासाचा अनुभव घेतला. हा प्रवास तसा तर काही मिनिटांचाच होता, मात्र हे क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद होते. ही देशातली तिसरी आणि गुजरात मधली पहिली वंदे भारत ट्रेन आहे. कालुपुर रेल्वे स्थानकापासून कालुपुर मेट्रो स्टेशन आणि पुन्हा तिथून अहमदाबाद मेट्रोने प्रवास करत मी थलतेज इथं पोहोचलो. म्हणजे कोणी बाहेरून वंदेभारत एक्स्प्रेसने इथे येत असेल तर तो ट्रेनमधून थेट मेट्रोत बसून शहरात आपल्या घरी जाऊ शकेल किंवा कामासाठी शहराच्या दुसऱ्या भागात देखील जाऊ शकेल. आणि या प्रवासाचा वेग इतका जलद आहे की माझा जो नियोजित कार्यक्रम ठरला होता त्यापेक्षा 20 मिनिटे अधिक मी थलतेजला पोहोचलो.

मी आज ट्रेन मध्ये प्रवास करत होतो, रेल्वे विभागाचे लोक अनेक वैशिष्ट्ये सांगत असतात, जाहिरात देखील करत असतात. वेग किती आहे, काय आहे, व्यवस्था काय आहे सगळं. पण आणखी एक मुद्दा आहे, ज्याच्याकडे कदाचित रेल्वे विभागाचं अजून लक्ष गेलं नाही. मला ते चांगलं वाटलं, हे मला सांगायचं आहे. ही जी वंदे भारत ट्रेन आहे, मी काही गणिताचा कोणी तज्ञ नाही, कोणी वैज्ञानिक नाही. मात्र, एक ढोबळ अंदाज मी बांधू शकतो की विमान प्रवास करत असताना आत जितका आवाज येतो, वंदे भारत ट्रेन मध्ये तो आवाज कदाचित शंभर पटींनी कमी झाला आहे. म्हणजे, याच्यापेक्षा शंभर पट आवाज विमानात येतो. विमानात जर बोलायचं असेल तर खूप त्रास होतो. मी वंदे भारत ट्रेन मध्ये बघत होतो. लोकांशी सहज गप्पा मारत होतो. कारण बाकीचा कुठलाच आवाज नव्हता. याचा अर्थ असा आहे, की ज्यांना विमान प्रवासाची सवय आहे, त्यांना जर का या आवाजा विषयी समजलं, तर, मला खात्री आहे, की ते विमानाला नाही तर, वंदे भारत ट्रेनला पसंती देतील, आणि माझे अहमदाबादच्या रहिवाश्यांना शत शत सलाम, नवरात्राचा उत्सव आहे, रात्रभर दांडिया सुरु आहे, आपलं शहर, आपलं गुजरात झोपलं नसेल, अशा नवरात्राच्या दिवसांत, अशा उकाड्यात, इतका विशाल जनसमूह, जनसागर मी पहिल्यांदाच बघितला आहे मित्रांनो. मी इथेच वाढलो, पण इतका मोठा कार्यक्रम अहमदाबादने केल्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. आणि म्हणूनच अहमदाबादच्या रहिवाश्यांना माझे शत शत सलाम. आणि याचा अर्थ हा आहे की मेट्रो म्हणजे काय, याची जाण अहमदाबादच्या रहिवाश्यांना आहे, मेट्रो काय आहे हे त्यांना माहित आहे. मी एकदा माझ्या नगर विकास मंत्र्यांशी बोललो होतो. मी म्हणालो की आपल्याला मेट्रो संपूर्ण देशात सुरु केली पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे, मात्र अहमदाबादचे रहिवासी सर्वात जास्त रिटर्न्स देतील, त्यांनी मला विचारलं की हे कसं काय? मी म्हणालो की अहमदाबादी हिशोबी असतात, ते विचार करतील की ऑटोरिक्षाने गेलो तर किती होतील, किती वेळ लागेल, किती उकाडा असेल, आणि मेट्रोने गेलो तर इतके होतील, ते लगेच मेट्रोत येतील. सर्वात जास्त आर्थिक लाभ मिळवून देतील, तर ते अहमदाबादचे प्रवासी. म्हणूनच तर आमच्या अहमदाबादमध्ये एके काळी, मी अहमदाबादचा ऑटोरिक्षावाला असं एक गाणं म्हणायचे. आता मेट्रोवाला असं गाणं म्हणतील. खरोखरच, आज अहमदाबादचं जितकं अभिनंदन केलं, जितके सलाम केले, जितक्या शुभेच्छा दिल्या तितक्या कमी आहेत. आज अहमदाबादने माझं मन जिंकलं आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

21व्या शतकातल्या भारताला देशाच्या शहरांतून नवी गती मिळणार आहे. आपल्याला बदलत्या काळानुरूप आणि बदलत्या गरजांप्रमाणे आपली शहरं देखील सातत्याने आधुनिक बनविणे गरजेचे आहे. शहरांत दळणवळण व्यवस्था आधुनिक असावी, सुलभ जोडणी असावी, दळणवळणाचे एक साधन दुसऱ्या साधनाला पूरक असावे, हे करणे खूप गरजेचे आहे, आणि गुजरातवर बारीक लक्ष ठेऊन असणारे लोक आहेत, तो तसाही एक चांगला समूह आहे, आणि हुशार समूह देखील आहे. त्यांच्या लक्षात असेल, जेव्हा मी इथे मुख्यमंत्री होतो, मला आता वर्ष आठवत नाही, अनेक वर्षांपूर्वी आम्ही अहमदाबादला बहु आयामी वाहतूक व्यवस्थेवर जागतिक शिखर परिषद घेतली होती. म्हणजे त्या वेळी सुद्धा माझ्या डोक्यात सुरु होतं. मात्र काही विषय भारत सरकारच्या अधिकारात असल्याने मी तेव्हा करू शकलो नाही. आता तुम्ही मला तिकडे पाठवलं आहे तर, मी हे केलं. पण मी आज हा विचार सत्यात उतरताना बघतो आहे आणि हाच विचार घेऊन गेल्या आठ वर्षांत देशातल्या शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी इतकी गुंतवणूक केली जाते आहे. आठ वर्षांत एका मागे एक, देशातल्या दोन डझन पेक्षा जास्त शहरांत मेट्रो एकतर सुरु झाली आहे, किंवा मग त्यावर वेगाने काम सुरु आहे. देशातल्या डझनावारी लहान शहरांना विमान सेवेने जोडले गेले आहे. उडान योजना लहान शहरांना विमान सेवा देण्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे. आपली जी रेल्वे स्थानकं आहेत, त्यांची स्थिती काय होती, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. आज गांधीनगर रेल्वे स्टेशन जगातल्या कुठल्याही विमानतळापेक्षा कमी नाही आणि दोन दिवसांपूर्वी भारत सरकारने अहमदाबाद स्टेशनच्या आधुनिकीकरणाला देखील मंजुरी दिली आहे.

 

मित्रांनो,

देशातल्या शहरांच्या विकासावर इतका जास्त भर, इतकी मोठी गुंतवणूक यासाठी केली जात आहे, कारण ही शहरे येणाऱ्या पंचवीस वर्षांत विकसित भारताची निर्मिती सुनिश्चित करणार आहेत. अहमदाबाद, सुरत, बडोदा, भोपाळ, इंदोर, जयपूर हीच सर्व शहरे भारताच्या 25 वर्षाचे भाग्य ठरवणार आहेत. ही गुंतवणूक केवळ दळणवळणापुरती मर्यादित नाही. तर डझनावारी शहरांत स्मार्ट सुविधा तयार होत आहेत, मुलभूत सुविधांचा विकास केला जातो आहे. मुख्य शहराच्या आसपासचा परिसर, उपनगरांचा विकास केला जात आहे. जुळ्या शहरांचा विकास कसा होतो, गांधीनगर, अहमदाबाद याचं उत्तम उदाहरण आहे. येणाऱ्या काळात गुजरातमध्ये अनेक जुळ्या शहरांच्या विकासाचा पाया तयार होत आहे. आता पर्यंत आपण फक्त न्यूयॉर्क, न्युजर्सी जुळ्या शहरांबद्दल ऐकत असायचो. माझा हिंदुस्तान मागे राहू शकत नाही, आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता. अहमदाबाद गांधीनगरच्या विकासाचं जुळ्या शहरांचं ते मॉडेल, त्याच धर्तीवर नजीकच्या भविष्यात आणंद – नडियाद, तिकडे भरूच – अंकलेश्वर, वलसाड आणि वापी, सूरत आणि नवसारी, वडोदरा – हालोल कालोल, मोरबी – वांकानेर आणि मेहसाणा कडी, अशी अनेक जुळी शहरे, गुजरातची ओळख अधिक सशक्त करणार आहेत. जुन्या शहरांची सुधारणा आणि त्यांचा विस्तार यावर भर देण्यासोबतच अशी नवी शहरे वसवली देखील जात आहेत, जी जागतिक व्यापार मागणीनुसार तयार होत आहेत. गिफ्ट सिटी देखील या प्रकारच्या प्लग अँड प्ले सुविधा असलेल्या शहराचं उदाहरण आहे.

 

मित्रांनो,

मला आठवतं, जेव्हा मी गिफ्ट सिटीबद्दल, कदाचित 2005 – 06 मध्ये बोललो होतो. आणि त्या वेळी जो माझा दृष्टीकोन होता, तो अनेक लोकांना वाटत होतं की अरे, हे काय बोलत आहेत, हे आपल्या देशात होऊ शकतं का? असं त्या वेळी लिहिलं गेलेलं मी वाचलं आहे आणि ऐकलं देखील आहे. आज गिफ्ट सिटी तुमच्या डोळ्यांसमोर उभी आहे, मित्रांनो, आणि बघता बघता हजारो रोजगार देणारं एक केंद्र बनत आहे.

 

मित्रांनो,

एक काळ असा होता, जेव्हा अहमदाबादमध्ये दळणवळणाचा अर्थ काय होता, आपल्या इथे दळणवळणाचा अर्थ फक्त लाल बस आणि लाल बस आणि ती नाही मिळाली तर शेवटी रिक्षावाला.

 

मित्रांनो,

जेव्हा मला गुजरातने आपली सेवा करण्याची संधी दिली तेव्हा माझं सौभाग्य होतं की आम्ही इथे BRT कॉरिडोरवर काम करू शकलो. तो सुद्धा देशातला पहिला प्रकल्प होता. मला तर BRT बसच्या पहिल्या प्रवासचा साक्षीदार होण्याचं सौभाग्य मिळालं होतं, आणि मला आठवतं लोक परदेशातून येत असत तेव्हा आपल्या कुटुंबाला सांगत या वेळी गुजरातला गेलात तर जरा BRT मध्ये प्रवास करा, खूप वाचलं, खूप ऐकलं आहे.

 

मित्रांनो,

तेव्हा देखील प्रयत्न हेच होते की सर्वसामान्य नागरिक, सामान्य लोक त्यांच्या सोयी कशा वाढतील. त्यांना सुलभ जोडणीचा लाभ कसा मिळेल. आणि लोकशाही आणि सरकारचं हे काम असतं की सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांनुसार आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या संकल्पासोबातच विकासाची यात्रा याच दोन रुळांवर चालणार आहे. आज तेच स्वप्न भव्य स्वरुपात साकार होताना आपण बघत आहोत. मी या प्रसंगी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

आज अहमदाबाद मेट्रोचा जवळपास 32 किलोमीटर परिसरात प्रवास सुरु झाला आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात मेट्रो सुरु झाली, तेव्हा पासून आज पर्यंत हे पहिल्यांदा झालं आहे, असा विक्रम बनला आहे की एकाच वेळी जवळजवळ 32 किलोमीटर प्रवासाचे लोकार्पण झाले आहे. याचे आणि एक वैशिष्ट्य आहे. रेल्वेमार्गाच्या वर मेट्रो मार्ग बनविण्यात अनेक आव्हानं होती तरी सुद्धा हे काम वेगाने पूर्ण झालं आहे. यामुळे मेट्रोसाठी अतिरिक्त जागेची गरज भासली नाही. आज मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे, तर दुसरा टप्पा गांधीनगरला जोडला जात आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान सुरु झालेली वंदे भारत ट्रेन देशाच्या दोन मोठ्या शहरांदरम्यानचा प्रवास आरामदायक देखील बनवेल आणि अंतर देखील कमी करेल. सामान्य एक्स्प्रेस ट्रेन अहमदाबादहून मुंबईला पोहोचायला जवळपास सात – साडे सात, आठ – साडे आठ तास घेते. कधी कधी याहून जास्त वेळ लागतो. शताब्दी ट्रेन सुद्धा कधी सहा साडे सहा, सात – साडे सात तास सुद्धा घेते. मात्र वंदे भारत ट्रेन आत जास्तीत जास्त साडे पाच तासातच अहमदाबादहून मुंबईला पोहोचवेल.

हळू-हळू यात आणखी सुधारणा होणार आहे आणि आज जेव्हा मी वंदे भारत गाडीची चेन्नई इथे रचना करणाऱ्या सर्व अभियंते, वायरमनफीटर, इलेक्ट्रिशियन, या सर्वांना भेटलो आणि मी त्यांना विचारले, तर म्हणाले, साहेब तुम्ही आम्हाला काम द्या, आम्ही याहून चांगले बनवू, याहून अधिक वेगवान बनवू, आणि लवकर बनवू. माझ्या देशातील अभियंते, तंत्रज्ञ यांचा हा आत्मविश्वास, त्यांचा हा भरवसा मला या गोष्टीवर विश्वासाने सांगण्यासाठी प्रेरित करत आहे की देश याहून अधिक वेगाने पुढे जाणार आहे. एवढेच नाही, अन्य गाड्यांच्या तुलनेत यात जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. मी एकदा काशीच्या स्थानकावर विचारत होतो. मी म्हटले, तुमचा वंदे भारत रेल्वे गाडीचा काय अनुभव आहे. तर म्हणाले सर्वाधिक तिकिटे वंदे भारतची विकली जात आहेत. मी म्हटले, ते कसे शक्य आहे? तर म्हणाले, गरीब लोक यातून जाणे पसंत करतात, मजुरी करणारे लोक या गाडीला पसंती देतात. मी विचारले का? त्यावर म्हणाले, साहेब, त्याची दोन कारणे आहेत. एक-सामान नेण्यासाठी आत बरीच जागा आहे. आणि दुसरे म्हणजे इतक्या लवकर पोहचते की गेल्याबरोबर कामाला लागतो. त्यामुळे तेवढ्या वेळात तिकिटाचे जे पैसे आहेत ते देखील भरून निघतात. हीच वंदे भारतची ताकद आहे.

 

मित्रांनो,

आज याप्रसंगी मी तुम्हा लोकांना हे देखील सांगू इच्छितो की दुहेरी इंजिनच्या सरकारचा लाभ अहमदाबाद प्रकल्पाला कसा झाला. जेव्हा बोटाद रेल्वे मार्गाची ओवरहेड स्पेस मेट्रो प्रकल्पासाठी वापरण्याचा विषय आला, तेव्हा केंद्र सरकारने त्यासाठी त्वरित मंजुरी दिली. यामुळे  वासणा-ओल्ड हाइकोर्ट मार्गावरील मेट्रोचे काम त्वरित सुरू होणे शक्य झाले. अहमदाबाद मेट्रोसाठी जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा मार्ग असा ठरवला  ज्यामुळे गरीबातील गरीबाला देखील लाभ होईल. तसेच हे जिथे सार्वजनिक वाहतुकीची सर्वात जास्त गरज आहे, जिथे अरुंद रस्त्यावरून जाताना खूप जास्त वेळ लागतो, तिथून मेट्रो जायला हवी याकडेही लक्ष दिले गेले.

अहमदाबाद मल्टीमॉडल कनेक्टिविटीचे केंद्र बनेल याकडे पूर्ण लक्ष दिले गेले. कालुपुर इथे आज मल्टीमॉडल हब निर्माण केले जात आहे. इथे बीआरटी स्थानकासमोरच आणि तळात सिटी बसेस उभ्या राहतील. टॅक्सी आणि खासगी गाड्यांसाठी वरच्या मजल्यावर सोय असेल. सरसपुर प्रवेशमार्गाच्या दिशेने नवे मेट्रो स्थानक आहे आणि अतिजलद रेल्वे स्थानकांना देखील  ड्रॉप आणि पिक अप, पार्किंग सारख्या सुविधांशी जोडले जात हे. कालुपुर रोड उन्नत पुलाला सरसपुर रोड उन्नत पुलाशी जोडण्यासाठी स्थानकासमोर  13 पदरी रस्ता बांधण्यात येईल. कालुपुर व्यतिरिक्त साबरमती बुलेट ट्रेन स्थानकालाही मल्टीमॉडल वाहतुकीचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे.

 

मित्रांनो,

शहरांमधील गरीबांची आणि मध्यमवर्गीयांची, बसगाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरापासून सुटका व्हावी, यासाठी सरकारने इलेक्ट्रिक बस तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी केंद्र सरकारने फेम योजना सुरू केली आहे. जेणेकरून पर्यावरणाचे देखील रक्षण होईल, लोकांना आवाजापासून मुक्ती मिळेल, धुरापासून मुक्ती मिळेल आणि अधिक वेग देखील मिळेल. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात  7 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक बसेसना मंजुरी देण्यात आली आहे. या बसेससाठी केंद्र सरकार सुमारे साडे तीन हजार कोटी रुपये खर्च करत आहे. गुजरातसाठी देखील आतापर्यंत साडे आठशे इलेक्ट्रिक बसेसना मंजुरी मिळाली असून यापैकी अनेक बसेस आज इथे रस्त्यांवर धावत आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

गेली कित्येक वर्षे आपल्याकडे शहरांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी, आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी गंभीर प्रयत्न झाले नाहीत. मात्र आजचा भारत वेग, गती आवश्यक मानतो, वेगवान विकासाची हमी मानतो. वेगासाठीचा हा आग्रह राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आराखड्यात स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणातही दिसून येतो आणि आपल्या रेल्वेचा वेग वाढवण्याच्या अभियानातही स्पष्ट होतो. आज देशातील रेल्वेचे जाळे, आज मेड इन इंडिया, वंदे भारत गाडी चालवण्यासाठी वेगाने तयार होत आहे. ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाड्या भारतीय रेल्वेची  दशा आणि दिशाही बदलेल असा मला पूर्ण विश्वास आहे. पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत. भारताच्या वंदे भारत गाडीचे वैशिष्ट्य हे आहै की ही गाडी अवघ्या 52 सेकंदात ताशी 100 किमी इतका वेग पकडते. आता जेव्हा चित्ता आला ना तेव्हा बहुतांश माध्यमांमध्ये याची चर्चा होती की चित्ता धावण्याची गती किती सेकंदात पकडतो. 52 सेकंदात ही गाडी वेग पकडते.

 

मित्रांनो,

आज देशातील रेल्वे जाळ्याचा खूप मोठा भाग मानवरहित फाटकांपासून मुक्त झाला आहे. पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका तयार झाल्यानंतर मालगाड्यांचा वेग देखील वाढेल आणि त्यांच्यामुळे प्रवासी गाड्यांना होणारा विलंब देखील कमी होईल. आणि मित्रांनो, जेव्हा मालगाड्यांचा वेग वाढेल, तेव्हा गुजरातमधील जी बंदरे आहेत ना आपली, ती यापेक्षा कित्येक पट  वेगाने काम करायला सुरुवात करेल. भारत जगभरात पोहचायला लागेल. आपला माल निर्यात होईल, आणि परदेशातून जे सामान येते, ते देखील आपल्याला वेगाने पुढे नेईल. कारण गुजरात भौगोलिक दृष्ट्या उत्तर भारताच्या अगदी जवळ आहे. भूभागाने वेढलेल्या भागाच्या जवळ आहे, म्हणून गुजरातच्या सागरी किनाऱ्याला सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण सौराष्ट्र आणि  कच्छला खूप जास्त लाभ होणार आहे.

 

मित्रांनो,

वेगाबरोबरच आज देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी  विचारप्रक्रियेत खूप मोठा बदल झाला आहे. गेल्या 8 वर्षांत आम्ही पायाभूत सुविधांची लोकांच्या आकांक्षांशी सांगड घातली आहे. एक काळ असा होता, जेव्हा निवडणुकीतला फायदा आणि तोटा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांबाबत घोषणा केल्या जात होत्या. निव्वळ राजकीय स्वार्थासाठी करदात्याचे उत्पन्न वापरले जात होते. दुहेरी इंजिन असणाऱ्या सरकारने ही विचारसरणी बदलली आहे. शाश्वत प्रगतीचा पाया मजबूत आणि दूरदर्शी विचाराने उभारलेल्या पायाभूत सुविधा आहेत, आज या विचाराने भारत काम करत आहे, भारत जगात आपले स्थान निर्माण करत आहे.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विकसित भारत निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीला आपल्याला अधिक गती द्यावी लागेल. गुजरातमध्ये दुहेरी इंजिन असलेले सरकार यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून हे  काम आपल्याला ज्यावेळी पूर्ण व्हायला हवे आहे त्यावेळी आपण प्रत्यक्षात उतरवू हा मी विश्वास देतो.

 

मित्रांनो,

आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. मात्र मी आज गुजरातच्या लोकांना आणखी एका कामासाठी विनंती करू इच्छितो.  मला माहित आहे, आता दोन-चार दिवसात जेव्हा मेट्रो सर्वांसाठी खुली केली जाईल तेव्हा लवकर जा, बघा, खूप लोक जातील. मात्र मला वाटते आपल्या, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे विद्यार्थी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी रेल्वेशी, शहर व्यवहार मंत्रालयाशी बोलून मेट्रोवाल्यांशी संवाद साधावा आणि अभ्यास करावा की इतके खोल खोदकाम करून ही रेल्वे स्थानके कशी बांधली असतीलकिती खर्च करावा लागला असेल? हे पैसे कुणाचे आहेत? आपला देशवासियांचा पैसा आहे. एकदा का आपण हे शिक्षण दिले की हे काम कसे झाले? किती मोठे झाले आहे? किती वेळेत झाले आहे? कोणकोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले आहे? हे मुलांच्या विकासासाठी देखील उपयुक्त ठरेल. आणि म्हणूनच माझा शिक्षण  विभागाला हा आग्रह असेल की मेट्रो स्थानकांची भेट ही केवळ मेट्रो गाडीतून प्रवास करण्यासाठी नाही, त्यांना हे दाखवावे लागेल हे कसे बनते? कसे चालते? काय काम करते? इतक्या खाली बोगदा कसा बांधला असेल? इतके लांबलचक बोगदे कसे बांधले असतील? यामुळे तंत्रज्ञानाद्वारे देशाची कशी प्रगती होत आहे, यावरचा त्यांचा विश्वास वाढेल आणि या पायाभूत सुविधांबाबत स्वामित्वाची भावना निर्माण होईल. जेव्हा तुम्ही देशाच्या नव्या पिढीला हे तुमचे आहे, हे तुमच्या भविष्यासाठी आहे असे सांगाल, तेव्हा माझ्या या युवकांना याची जाणीव होईल आणि परिणामी कधीही कुठल्याही आंदोलनात अशा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.  त्यांनाही तेवढेच दुःख होईल जेवढे त्याच्या स्वतःच्या घराच्या मालमत्तेचे नुकसान होते. त्याच्या सायकलचे जर थोडेफार नुकसान झाले तर त्याला ज्या वेदना होतात तितक्याच वेदना त्याला मेट्रोचे नुकसान झाल्यामुळे होणार आहेत. मात्र यासाठी आपल्या नव्या पिढीला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.  त्यांच्या संवेदना जागवा, वंदे भारत म्हटल्याबरोबर भारतमातेचे चित्र अंतर्मनात यायला हवे. माझ्या भारतमातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही वंदे भारत धावत आहे. ही वंदे  भारत देशालाही धावायला लावणार आहे. हा अभिमान, ही संवेदनशीलता, हे शिक्षणाचे नवनवीन माध्यम आहेत कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद आहे की मुलांना त्या ठिकाणी घेऊन जा आणि दाखवा, जर घरात मडके असेल तर त्याला सांगा कुंभाराकडे जाऊन ते मडके कसे तयार होते ते पहा. त्यांना ही मेट्रो स्थानके देखील दाखवायला हवीत. मेट्रोची संपूर्ण व्यवस्था समजावून सांगावी लागेल. तुम्ही बघा, त्या मुलांच्या मनात ती भावना असेल, त्यालाही कधीतरी वाटेल, आपण देखील इंजीनियर बनावे. मी देखील माझ्या देशासाठी काही काम करेन. अशी स्वप्ने त्यांच्या मनात रुजवता येतील. म्हणूनच मेट्रो केवळ फिरण्यासाठी नाही तर मेट्रो यशस्वी होण्यासाठी देखील उपयुक्त ठरायला हवी. याच एका अपेक्षेसह पुन्हा एकदा आज अहमदाबादवासियांना, गुजरातच्या लोकांना आणि देशवासियांना ही खूप मोठी भेट प्रदान करताना अभिमान वाटत आहे, आनंद वाटत आहे आणि तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. माझ्याबरोबर हात पूर्ण उंचावून पूर्ण ताकदीनिशी म्हणा,

भारत माता कीजय,

भारत माता कीजय,

भारत माता कीजय,

खूप-खूप  धन्यवाद !

***

S.Tupe/R.Aghor/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai