Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधानांचा प्रतिसाद


लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषाणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी आज प्रतिसाद नोंदवला. चर्चेत सहभागी उपयुक्त मुद्दयांची भर घातल्याबद्दल त्यांनी सदनातील विविध सदस्यांचे आभार मानले.

जनशक्ती अर्थात लोकांच्या शक्तीमध्ये काहीतरी विशेष असल्याचे नमूद करत या जनशक्तीमुळे एका गरीब कुटुंबात जन्मलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, असे ते म्हणाले.

देशात असे आपल्यासारखे अनेक लोक असतील ज्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढयात देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी मिळाली नाही, मात्र ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला, आणि ते भारतात, भारताची सेवा करण्यासाठी जगत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. जनशक्तीवरच्या विश्वासामुळे चांगले परिणाम हाती येतील, असे सांगत आपल्या लोकांची अंतर्गंत शक्ती ओळखून त्याचे कौतुक करा आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन चला, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले.

अर्थसंकल्पाच्या तारखेत बदल करण्याबाबत स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की, त्यामुळे निधीचा अधिक चांगला वापर करता येऊ शकेल. देशात परिवहन क्षेत्रासाठी सध्या एक नवा सर्वसमावेशक दृष्टिकोन हवा आहे, जो केवळ केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनच देणे शक्य आहे.

आपण कामकाजाला सुरुवात केल्यापासून कामकाजात झालेल्या बदलाबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. घोटाळयांमध्ये किती पैसा गमावला याच्या चर्चा पूर्वी होत असत आता किती काळा पैसा परत मिळवला याच्या चर्चा होतात, असेही त्यांनी नमूद केले.

आपला लढा गरीबांसाठी आहे आणि गरीबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीचा हा लढा असाच सुरु राहील असे पंतप्रधानांनी घोषित केले. सरकार केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून निर्णय घेत नाही तर देशाचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च ध्येय आहे, असे ते म्हणाले.

विमुद्रीकरणाची स्वच्छ भारत मोहिमेशी तुलना करताना विमुद्रीकरण ही भ्रष्टाचार आणि काळया पैशापासून भारताला मुक्त करण्याची स्वच्छता मोहिम आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

विमुद्रीकरणाशी संबंधित नियमांमध्ये झालेल्या वारंवार बदलांमुळे करण्यात आलेल्या टिकेलाही पंतप्रधानांनी उत्तर दिले. या प्रक्रियेतून पळवाटा काढणाऱ्यांच्या विरोधात एक पाऊल पुढे राहण्याच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक होते असे ते म्हणाले. मनरेगा योजनेचे नियमही हजार वेळा बदलण्यात आले होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

शेतकऱ्यांना सुविधा आणि लाभ देण्याच्या दृष्टीने पीक विमा योजनेसारखी पावले उचलण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

देशाच्या संरक्षण दलाचे कौतुक करतांना देशाचे संरक्षण करण्यास ती सर्वतोपरी सक्षम आहेत, असे ते म्हणाले.

B.Gokhale/M.Pange/Anagha