Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाल किल्ला येथे सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतल्या लाल किल्ला येथे 23 जानेवारी 2019 ला सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्‌घाटन करणार आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेवरील संग्रहालयाचे उद्‌घाटन करण्यासाठी पंतप्रधान कोनशिलेचे अनावरण करतील. पंतप्रधान संग्रहालयालाही भेट देतील. याद-ए-जालियान संग्रहालयाला (जालियानवाला बाग आणि पहिले महायुद्ध यावरील संग्रहालय) भेट देतील.

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यात 1857 वरील, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरावरील संग्रहालयाला आणि भारतीय कलेवरील दृश्यकला संग्रहालयाला देखील पंतप्रधान भेट देतील.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेवरील संग्रहालय, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा संपूर्ण इतिहास दर्शवतील. सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित विविध वस्तू संग्रहालयात आहेत. यात नेताजींनी वापरलेली लाकडी खुर्ची आणि तलवार, पदके, बिल्ले, गणवेष आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

ज्या महत्वाच्या वास्तूंसाठी पायाभरणी केली होती, त्या वास्तूंच्या उद्‌घाटनाची परंपरा पंतप्रधान मोदी यांनी इथेही चालू ठेवली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारच्या 75व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त 21 ऑक्टोबर 2018 ला पंतप्रधानांनी या संग्रहालयाची पायाभरणी केली होती. यानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.

आपात्कालीन स्थितीतल्या मोहिमांमध्ये उत्कृष्ट कार्य बजावणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाच्या पुरस्काराची घोषणाही पंतप्रधानांनी केली होती. राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे राष्ट्रार्पणही यावेळी झाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या मूल्यांना आणि आदर्शाला 30 डिसेंबर 2018 ला अंदमान-निकोबार बेटांवर पुन्हा उजाळा दिला. नेताजींनी भारतीय भूमीवर तिरंगा फडकावण्याला 75 वर्ष झाल्याच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी टपाल तिकीट, नाणे आणि फर्स्ट डे कव्हरचे अनावरण केले. नेताजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंदमानमधल्या युवकांनी कशा प्रकारे स्वातंत्र्यसमरात स्वत:ला झोकून दिले त्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. 150 फूट ध्वजस्तंभावर फडकावण्यात आलेला ध्वज 1943 ची स्मृती जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. नेताजींच्या सन्मानार्थ रॉस आयलंडचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे ठेवण्यात आले आहे.

तत्पूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची भेट घेऊन नेताजींशी संबंधित भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या फाइल्स उघड करण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी जानेवारी 2018 मध्ये नेताजींशी संबंधित फाइल्सच्या 100 डिजिटल प्रतींचे भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखाच्या डोमेनवर अनावरण केले.

याद-ए-जालियान संग्रहालय 13 एप्रिल 1919 रोजी घडलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाची माहिती पुरवेल. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांच्या शौर्याचे, हौतात्म्याचे दर्शनही संग्रहालय घडवेल.

1857 च्या स्वातंत्र्यसमरावरील संग्रहालय, पहिल्या स्वातंत्र्यसमराचा इतिहास आणि या काळातील भारतीयांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा सांगेल.

दृश्यकला संग्रहालयात 16 व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या कालावधीतील भारतीय कलाकृती असतील.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान या संग्रहालयांना भेट देतील.

***

B.Gokhale/S.Kakade/D. Rane