नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 साठी सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयातील कर्मचारी वर्ग आणि इतर गट ‘क’ कर्मचारी (आर पी एफ /आर पी एस एफ कर्मचारी वगळून) यांचा समावेश आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 11,07,346 रेल्वे कर्मचाऱ्यांना 1968.87 कोटी रुपयांचा उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वेची कामगिरी अत्यंत उत्तम राहिली. रेल्वेने 1509 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक आणि जवळपास 6.5 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.
या विक्रमी कामगिरीसाठी अनेक घटकांचे योगदान लाभले आहे. यामध्ये केंद्र सरकारने रेल्वेतील पायाभूत सेवांमध्ये भांडवली खर्चासाठी केलेली विक्रमी गुंतवणूक, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.
उत्पादनाशी निगडीत बोनसमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
* * *
R.Aghor/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai