Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद एनसीव्हीटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था एनएसडीए यांच्या विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद एनसीव्हीटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था एनएसडीए यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली.

तपशिल

एनसीव्हीटी दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणातील संस्थांच्या कामकाजाचे नियमन करेल आणि या संस्थांच्या कामकाजासाठी किमान निकष स्थापित करेल. एनसीव्हीटीच्या प्रमुख कार्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश असेल.

· निर्णायक संस्था, मूल्यमापन संस्था आणि कौशल्य संबंधित माहिती पुरवठादारांची मान्यता आणि नियमन

· निर्णायक संस्था आणि क्षेत्रीय कौशल्य परिषदांद्वारे विकसित पात्रतांना मंजुरी

· निर्णायक संस्था आणि मूल्यमापन संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे अप्रत्यक्ष नियमन

· संशोधन आणि माहितीचा प्रसार

· तक्रार निवारण

या परिषदेत अध्यक्षांशिवाय कार्यकारी आणि बिगर कार्यकारी सदस्य देखील असतील. सध्याच्या दोन संस्थांच्या विलिनीकरणातून एनसीव्हीटीची स्थापना करण्याचा प्रस्ताव असून सध्याच्या पायाभूत सुविधा आणि संसाधनाचा बहुतांश वापर केला जाईल. याशिवाय सुरळीत कामकाजासाठी अन्य पदांचीही निर्मिती केली जाईल. नियामक सर्वोत्तम नियमन प्रक्रियांचा अवलंब करेल. जेणेकरून त्याचे कामकाज आणि संचलन व्यावसायिकरित्या आणि कायद्यानुसार सुनिश्चित केले जाईल.

लाभ

या संस्थागत सुधारणांमुळे गुणवत्ता सुधारेल आणि कौशल्य विकास कार्यक्रमांची बाजारपेठ, प्रासंगिकता वाढेल. यामुळे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची विश्वासार्हता वाढेल आणि त्यातून खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. यातून व्यावसायिक शिक्षणाची मूल्य आणि कुशल मनुष्यबळ वाढवण्याची दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल. तसेच भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायला बळ मिळेल.

एनसीव्हीटी भारताची कौशल्य परिसंस्थेची एक नियामक संस्था आहे. याचा देशातील व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणांशी संबंधित सर्व व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडेल. कौशल्य आधारित शिक्षणाची कल्पना विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शैक्षणिक अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देईल. यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा सातत्यपूर्ण पुरवठा होऊन व्यावसायिक सुलभता वाढीस लागेल, अशी आशा आहे.

N.Sapre/S.Kane/P.Kor