लखनौ येथे एकत्र जमलेल्या माझ्या युवा मित्रांना माझा नमस्कार! तुम्हा सर्वांना, देशातील युवकांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजचा हा दिवस प्रत्येक भारतीय युवकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, नवे संकल्प हाती घेण्याचा दिवस आहे, आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने भारताला अशी ऊर्जा मिळाली होती, जिच्या तेजाने आजही भारत ऊर्जावान आहे. एक अशी ऊर्जा जी सदैव आम्हाला प्रेरणा देत आहे, आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे.
मित्रांनो, स्वामी विवेकानंद भारताच्या युवकांना आपला गौरवास्पद भूतकाळ आणि वैभवसंपन्न भविष्याला सांधणारा एक भक्कम दुवा समजत असत. विवेकानंद म्हणत असत की तुमच्या आत सगळ्या शक्ती आहेत, त्या बाहेर येऊ द्या, प्रकट करण्यावर विश्वास ठेवा की तुम्ही काहीही करु शकता. स्वतःवर ठेवलेला हा विश्वास आणि असाध्य वाटणाऱ्या गोष्टीनाही साध्य करण्याचा संदेश, आजही युवकांसाठी तेवढाच प्रासंगिक आहे, तितकाच औचित्यपूर्ण आहे आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आज भारतातील तरुणांनाही हा संदेश नीट समजला आहे, म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवत हा तरुण पुढे वाटचाल करतो आहे, प्रगती करतो आहे.
आज नवनवीन संशोधन, इनक्यूबेशन आणि स्टार्ट-अप अशा नव्या कंपन्यांचे नेतृत्व आज भारतातील तरुण करत आहे. आज भारत स्टार्ट अप इकोसिस्टीमच्या क्रमवारीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये समाविष्ट झाला आहे, यामागे कोणाची मेहनत आहे? तर ती तुमचीच मेहनत आहे. तुमच्यासारख्या युवकांची मेहनत आहे. आज भारत एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याच्या कंपन्या बनवणारा जगातला तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे, तर यामागे कोणाची ताकद आहे, तुमच्यासारख्याच देशातील युवकांचीच! माझ्या देशातील तरुणाईची ताकद!
मित्रांनो, 2014 च्या आधी आपल्या देशात दरवर्षी सरासरी चार हजार पेटंट मिळत असत. आता याची संख्या दरवर्षी 15 हजार पेटंटपर्यंत वाढली आहे. म्हणजे जवळपास चौपट!
मित्रांनो, 26 हजार नवे स्टार्ट अप सुरु होणे हे जगातील कोणत्याही देशाचे स्वप्न असू शकेल, मात्र आज भारतात हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. मग यामागे भारतातील युवकांची शक्तीच आहे, त्यांची स्वप्ने आहेत . आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातील युवकांनी त्यांची स्वप्ने देशाच्या गरजांशी जोडली आहेत, देशाच्या आशा-आकांक्षाशी जोडली आहेत. देशाच्या निर्मितीचे काम माझे काम आहे, माझ्यासाठी आहे आणि मलाच ते पूर्ण करायचे आहे. या भावनेने आज भारताचा युवक भारलेला आहे.
मित्रांनो, आज देशातील युवक नवनवे ॲप्स बनवत आहे, कारण त्यांचेही आयुष्य सुकर व्हावे आणि देशवासियांनाही त्यातून मदत व्हावी. आज देशातील युवक हॅकेथॉनच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, देशातील हजारो समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, प्रश्नांची उत्तरे शोधतो आहे. आज देशातील युवक बदलत्या कार्य आणि कार्यशैलीच्या अनुरूप नवनवे उपक्रम सुरु करत आहे. स्वतः काम करतो आहे, धोके पत्करतो आहे. धाडस करतो आहे आणि इतरांनाही रोजगार देतो आहे.
आज देशातील युवक हे बघत नाही की ही योजना कोणी सुरु केली, उलट तो स्वतःच नेतृत्व करायला पुढे येतो आहे. स्वच्छ भारत अभियानाचीच गोष्ट घ्या ना! या चळवळीचे नेतृत्व आमचे युवकच तर करत आहेत. आज आपल्या आजूबाजूचा, वसाहतीतला, शहरातला, समुद्रकिनाऱ्यावरचा कचरा, घाण स्वच्छ करण्याच्या कामात आमचा युवकच आघाडीवर आहे.
मित्रांनो, आज देशातील युवकांच्या सामर्थ्यातून नव्या भारताची निर्मिती होत आहे. एक असा भारत, ज्यात ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ म्हणजे उद्योगपूरक वातावरण आणि “ईझ ऑफ लिव्हिंग” म्हणजेच सुकर जीवनमान अशा दोन्ही गोष्टी असतील. एक असा भारत, ज्यात लाल दिव्याची संस्कृती नाही, ज्यात प्रत्येक व्यक्ती समान आहे, प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. एक असा नवा भारत, ज्यात संधीही आहेत आणि संधी पूर्ण करण्यासाठी, झेप घेण्यासाठी मोकळे आकाशही आहे!
मित्रांनो, आज 21 व्या शतकातील हा कालखंड, एकविसाव्या शतकातील हे दशक भारतासाठी खूप सौभाग्य घेऊन आले आहे. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की भारताची अधिकाधिक लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. या संधीचा आपण पूर्ण लाभ घ्यायला हवा. या दृष्टीने गेल्या काही वर्षात भारताने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत अनेक धोरणे आखली आहेत. युवाशक्तीला खऱ्या अर्थाने राष्ट्रशक्ती बनवण्याचा व्यापक प्रयत्न आज देशात बघायला मिळतो आहे कौशल्य विकासापासून ते मुद्रा लोन पर्यंत, प्रत्येक ठिकाणी युवकांची मदत केली जात आहे. स्टार्ट-अप इंडिया असो, फिट-इंडिया चळवळ असो किंवा मग खेलो इंडिया असे, सगळे उपक्रम युवाकेंद्रीत आहेत.
मित्रांनो, निर्णयक्षमतेच्या नेतृत्वात युवकांचा सक्रीय सहभाग वाढावा, यावर देखील आम्ही भर दिला आहे. तुम्ही ऐकलंच असेल की अलिकडेच डीआरडीओ म्हणजेच, संरक्षण संशोधनाशी संबंधित पाच युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या प्रयोगशाळांमध्ये संशोधनापासून व्यवस्थापनाशी संबंधित सगळ्या गोष्टींचे नेतृत्व 35 वर्षापेक्षा कमी वयाच्या युवा वैज्ञानिकांच्या हाती देण्यात आले आहे. तुम्ही कधी विचारही केला असेल,की एवढ्या महत्वाच्या प्रयोगशाळांची जबाबदारी 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांना सुपूर्द करायची. मात्र आमचा तोच विचार आहे, तोच दृष्टीकोन आहे. आम्ही प्रत्येक पातळीवर, प्रत्येक क्षेत्रात याच प्रकारचा प्रयोग करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत.
मित्रांनो, युवकांमध्ये अद्भूत क्षमता असते, ते समस्यांवर मात करण्यासाठी दरवेळी नवनवे तोडगे काढतात. युवकांचा हाच विचार आम्हाला शिकवण देतो की समस्यांना भिडा, त्यांचा सामना करा, त्या सोडवा… देश पण आज याच विचारांवर चालतो आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आले आहे, रामजन्मभूमीचा शेकडो वर्षे सुरु असलेला वाद संपला आहे. तीन वेळा तलाक प्रथेच्या विरोधात कायदा तयार झाला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आज प्रत्यक्षात अस्तित्वात आला आहे. आणि देशात पूर्वी एक विचारप्रवाह असाही होता की दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काहीही करु नये, गप्प बसावे. आज आपण सर्जिकलस्ट्राईक पण बघतो आणि एअर स्ट्राईकही!
मित्रांनो, आमचे सरकार युवकांसोबत आहे. युवकांच्या आकांक्षा, युवकांच्या स्वप्नांसोबत आहे. तुमचे यश सशक्त, सक्षम आणि समृद्ध भारताचा संकल्प पूर्ण करेल. आणि आज मी या प्रसंगी तुम्हाला आणखी एक आग्रह करु इच्छितो, आणि तो यासाठी करतो आहे कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली देश यात यशस्वी करावा असा माझा विशेष आग्रह आहे आणि विवेकानंद यांच्या जयंतीदिनी हा संकल्प करणे आपली जबाबदारी आहे.
तुम्हा सर्वांना माहिती आहेच की वर्ष 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याला जेव्हा 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलेल्या स्वतंत्रतेच्या वेड्या वीरांनी समृद्ध भारताचे स्वप्न बघितले होते, आपले तारुण्य त्यांनी त्यासाठी खर्च केले होते. त्या महापुरुषांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला अजून अनेक कामे करायची आहेत. त्यापैकी एका कामासाठी मी आज तुम्हाला आग्रह करतो आहे. आपल्या माध्यमातून संपूर्ण देशात हे आंदोलन चालावे या अपेक्षेने आग्रह करतो आहे. आपण 2022 पर्यंत तरी निदान जितकी शक्य आहेत तितकी स्थानिक उत्पादने विकत घ्यावी, असे करु शकतो का? असे केल्याने तुम्ही कळत-नकळत एखाद्या युवा उद्योजकाचीच मदत कराल. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी व्हावे, याच सदिच्छांसह मी माझे भाषण संपवतो.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा आणि भारतमातेचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद जी यांच्या चरणांना मी वंदन करतो.
खूप खूप धन्यवाद!
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
Sharing my message for the National Youth Festival in Lucknow. Highlighted a variety of issues including the thoughts of Swami Vivekananda and our Government’s efforts towards empowering India’s youth. https://t.co/SQ29QqmNNH
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2020