Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय युध्द स्मारक बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व भारतीय जवानांच्या स्मरणार्थ नवी दिल्ली येथे इंडिया गेटजवळ प्रिन्सेस पार्क येथे राष्ट्रीय युध्द स्मारक आणि राष्ट्रीय युध्द संग्रहालय बांधायला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.

या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो पूर्ण व्हायला पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात 22,500 हून अधिक जवानांनी राष्ट्रहितासाठी आणि देशाची एकात्मता व सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्यासाठी हौतात्म्य पत्करले. मात्र स्वातंत्र्याच्या 69 वर्षांनंतरही या शहीदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सशस्त्र दलांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे.

प्रकल्पावर अधिकारदत्त सुकाणू समिती देखरेख ठेवेल. समितीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण सचिव असतील, असे या बैठकीत ठरवण्यात आले. प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण व्हावा यासाठी सुकाणू समितीच्या सहाय्याला प्रकल्प व्यवस्थापक पथक असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय युध्द स्मारक आणि संग्रहालयाच्या देखरेखीसाठी व्यवस्थापक मंडळ स्थापन करण्यात येईल.

हौतात्म्य पत्करलेल्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी अत्यंत कृतज्ञतेने हे सरकार युध्द स्मारक आणि संग्रहालय बांधत आहे. या स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या मनात हे स्मारक राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करेल. तसेच मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर जवानांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक व्यक्त करण्याची संधी आपल्या प्रचंड मोठ्या देशातल्या नागरिकांना मिळेल.

सरकारला असे वाटते की शहीदांची समर्पित वृत्ती, राष्ट्रउभारणीतले अखंड कार्य आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ ठरता कामा नये. त्यांच्या बलिदानामुळे भारतमाता समृध्द झाली आहे. हे स्मारक आपल्याला आपल्या महान देशासाठी समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रेरणा देईल.

S. Kulkarni/S.Tupe