Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर 2021 

 

नमस्कार !

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा ! ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’साठी आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी समर्पित केला, त्या  राष्ट्रनायक सरदार वल्लभ भाई पटेल यांना आज देश श्रद्धांजली अर्पण करत आहे.

सरदार पटेल जी केवळ  इतिहासातच नाही तर आपल्या देशवासियांच्या हृदयात देखील आहेत . आज देशभरात एकतेचा  संदेश घेऊन पुढे जात असलेले आपले ऊर्जावान सहकारी भारताच्या अखंडतेप्रति अखंड भावनेचे प्रतीक आहेत. ही भावना आपण देशाच्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या  राष्ट्रीय एकता संचलनात,  स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होत असलेल्या आयोजनामध्ये पाहत आहोत.

मित्रांनो,

भारत केवळ  एक भौगोलिक प्रदेश नाही तर आदर्श, संकल्पना, सभ्यता-संस्कृतीच्या  उदार मानकांनी  परिपूर्ण राष्ट्र आहे. धरतीच्या ज्या भूभागावर आपण  130 कोटींहून  अधिक भारतीय राहत आहोत तो  आपला आत्मा, आपली स्वप्ने. आपल्या आकांक्षांचा अखंड भाग आहे. शेकडो वर्षांपासून भारताच्या समाजात , परंपरांमध्ये लोकशाहीचा जो मजबूत पाया विकसित झाला , त्याने ‘एक भारत’ची  भावना समृद्ध केली आहे. मात्र आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचे आहे की नावेत बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला नावेची काळजी घ्यावीच लागते.  आपण एकत्र राहू , तेव्हाच देश आपली उद्दिष्टे प्राप्त करू शकेल.

मित्रांनो,

सरदार पटेल यांना नेहमी वाटत असे की भारत सशक्त व्हावा, भारत सर्वसमावेशक व्हावा, भारत  संवेदनशील व्हावा आणि  भारत सतर्क देखील व्हावा, विनम्र देखील व्हावा आणि  विकसित देखील व्हावा. त्यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले. आज त्यांच्या प्रेरणेमुळे  भारत, बाह्य आणि अंतर्गत , सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम होत आहे. गेल्या  7 वर्षांमध्ये देशाने अनके दशकांपासूनचे जुने कायदे रद्द करून मुक्ती मिळवली आहे, राष्ट्रीय एकता संवर्धन करणाऱ्या आदर्शाना नवी उंची दिली आहे.

जम्मू-कश्मीर असेल, ईशान्य प्रदेश असेल किंवा दूर  हिमालयातील एखादे गाव असेल, आज सर्वच प्रगतिपथावर अग्रेसर आहेत. देशात  आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्यामुळे  भौगोलिक आणि  सांस्कृतिक दरी मिटविण्याचे काम करत आहे. जेव्हा देशातील लोकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागत असेल तर मग काम कसे चालेल? जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचणे सुलभ होईल तेव्हा लोकांच्या मनातील अंतर देखील दूर होईल , देशाची एकता  वाढेल. ‘‘एक भारत’ -श्रेष्ठ भारत’ची हीच भावना मजबूत करत  आज देशात सामाजिक, आर्थिक आणि  संवैधानिक एकीकरणाचा  महायज्ञ सुरु आहे.  जल-थल-नभ-अंतरिक्ष, प्रत्येक आघाडीवर भारताचे  सामर्थ्य आणि  संकल्प अभूतपूर्व आहे. आपल्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भारत आत्मनिर्भरतेच्या नव्या अभियानाच्या दिशेने  वाटचाल करत आहे.

आणि मित्रांनो,

अशा वेळी आपण सरदार साहेबांची एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी. ते म्हणाले होते –

”By common endeavour
we can raise the country
to a new greatness,
while a lack of unity will expose us to fresh calamities”

एकतेचा अभाव नवीन संकट घेऊन येतो तर सर्वांचे सामूहिक प्रयत्न देशाला नव्या उंचीवर घेऊन जातात. स्वतंत्र भारताच्या निर्मितीत सर्वांचे प्रयत्न जितके प्रासंगिक तेव्हा होते त्यापेक्षा कितीतरी अधिक स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या या कालखंडात होणार आहेत. स्वातंत्र्याचा हा  अमृतकाळ विकासाच्या अभूतपूर्व गतीचा आहे, कठीण उद्दिष्टे साध्य करण्याचा आहे.  हा अमृतकाळ सरदार साहेबांच्या स्वप्नातील भारताच्या नवनिर्माणाचा आहे.

मित्रांनो,

सरदार साहेब आपल्या देशाला एका शरीराच्या रूपात पहायचे , एक जिवंत गोष्ट म्हणून पहायचे . म्हणूनच त्यांच्या ‘एक भारत’ चा अर्थ हा देखील होता की ज्यात सर्वांसाठी एकसमान संधी असेल.

एक समान स्वप्न पाहण्याचा अधिकार असेल. अनेक दशकांपूर्वी , त्या काळातही त्यांच्या आंदोलनांची ताकद ही देखील होती की  त्यात  महिला-पुरुष, प्रत्येक  वर्ग, प्रत्येक पंथाची सामूहिक ऊर्जा असायची . म्हणूनच , आज जेव्हा आपण ‘एक भारत’ बाबत बोलतो तेव्हा त्या’एक भारत’ चे  स्वरूप काय असायला हवे ? त्या ‘एक भारत’ चे स्वरूप असायला हवे -एक असा  भारत, जिथल्या महिलांजवळ अनेक संधी असतील.  एक असा  भारत, जिथे दलित, वंचित, आदिवासी-वनवासी, देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला  एक समान मानेल ! एक असा  भारत, जिथे घर, वीज , पाणी यांसारख्या सुविधांमध्ये भेदभाव नव्हे तर  एक-समान अधिकार असेल !

हेच संपूर्ण देश आज साध्य करत आहे.

या दिशेने तो नवनवीन उद्दिष्टे निश्चित करत आहे.  आणि हे सर्व घडत आहे

याला कारण आज देशाच्या प्रत्येक संकल्पात सर्वांचे प्रयत्न(सब का प्रयास) सहभागी आहेत.

मित्रांनो,

जेव्हा सर्व जण एकत्रितपणे प्रयत्न करतात, तेव्हा त्यातून काय ‘परिणाम’ दिसतात, हे आपण देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही पाहिले आहे.

नवीन ‘कोविड’ रुग्णालयापासून ते ‘व्हेंटिलेटर’पर्यंत, ‘आवश्यक औषधांच्या निर्मिती’पासून ते 100 कोटी लसींच्या मात्रा  देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करेपर्यंत, हे सर्व प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक सरकारने, प्रत्येक उद्योगाने, म्हणजेच प्रत्येकाने केलेल्या  प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे.

सब का प्रयास याच भावनेला ‘भारत’ स्वावलंबी बनवण्याचा आधारस्तंभ बनवून, आता विकासाचा वेग वाढवण्याचा  प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.

अलीकडेच सरकारी विभागांच्या सामायिक शक्तीला पंतप्रधानांनी ‘गती शक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या रूपात एका व्यासपीठावर आणले आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या या सामूहिक परिणामामुळे भारत हे गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

शासनाबरोबरच समाजाची गती शक्तीही सामील झाली तर, अनेक मोठमोठे संकल्प साध्य करणे अवघड नाही, सर्वकाही शक्य आहे. आणि म्हणूनच, आज हे महत्त्वाचे आहे की जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा त्याचा आपल्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांवर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे.

उदाहरणार्थ शाळा-महाविद्यालयातून  अभ्यास करणाऱ्या तरुणांनी  आपल्याला कोणत्या क्षेत्रात नवनिर्मिती करणे शक्य आहे,यांचा विचार करून लक्ष्य निर्धारित करावे.  यश-अपयश आपापल्या जागी आहे, पण प्रयत्न करणे अत्यंत  महत्वाचे आहे.  त्याचप्रमाणे, जेव्हा आपण बाजारात आपली खरेदी करतो तेव्हा आपल्याला आवडी-निवडीचा विचार करताना  स्वावलंबी भारताच्या प्रयत्नात आपण त्याला सहकार्य करत आहोत की त्याउलट तर करत नाही हे पहावे.  भारतातील  उद्योग परदेशी कच्चा माल किंवा घटकांवर अवलंबून राहण्याचे लक्ष्य देखील साध्य करू शकतो.

आमचे शेतकरी देखील  देशाच्या गरजांनुसार शेतीत  नवनवीन प्रयोग आणि नवीन पिकांचा अवलंब  करून भारताला स्वावलंबी बनवण्यात आपला सहभाग मजबूत करू शकतात. 

आपल्या देशातील सहकारी संस्था सुध्दा लहान शेतकऱ्यांचे सबलीकरण  करू शकतात, आपल्या लहान शेतकऱ्यांवर आपण जितके जास्त लक्ष केंद्रित करू, त्यांच्या भल्यासाठी आपण पुढे येऊ,तितका   गावागावातील दुर्गम ठिकाणीही आपण नवा विश्वास निर्माण करू शकू. याच दिशेने संकल्प करण्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे.

मित्रांनो,

या गोष्टी सामान्य वाटू शकतात, परंतु त्यांचे परिणाम दूरगामी असतील.

आपण गेल्या काही वर्षांत पाहिले की,स्वच्छतेसारख्या सामान्य समजल्या जाणाऱ्या विषयांना देखील लोकसहभागाने कशा प्रकारे देशाचे सामर्थ्य बनवले.   एक नागरिक या नात्याने म्हणून जेव्हा आपण ‘एक भारत’ या भावनेने पुढे गेलो तेव्हा आपल्याला यशही मिळाले  आणि भारताच्या उत्कर्षात आपणही आपले योगदान दिले.  आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे – जर उद्देश चांगला असेल तर लहानात लहान  काम देखील  महान असते.  देशसेवेत जो आनंद आहे, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही.  देशाच्या अखंडतेसाठी आणि एकतेसाठी आपली नागरी  कर्तव्ये पूर्ण करणे, हीच सरदार पटेलांना आपली ‘खरी श्रद्धांजली’ आहे.

आपल्या संकल्पसिद्धीतून प्रेरणा घेऊन आम्ही  पुढे जाऊ , देशाच्या एकतेला, देशाच्या श्रेष्ठत्वाला नव्या उंचीवर नेऊ,याच कामनेसह आपणा सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

* * *

S.Patil/Sushma/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com