Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचे  पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा (एनडीएमपी)चे प्रकाशन केले. देशात अशा प्रकारे बनवलेला हा पहिला राष्ट्रीय आराखडा आहे.

आपत्तीतून सावरुन पूर्वस्थितीला चटकन येणे आणि जीवितहानी तसेच मालमत्तेचे नुकसान टाळणे हा या आराखडयामागचा उद्देश आहे.

आपत्तीचा धोका ओळखणे, यासंदर्भात प्रशासन सुधारणे, आपत्तीचा धोका कमी करण्यासंदर्भात गुंतवणूक आणि आपत्तीला तोंड देण्यासाठीची सज्जता, इशारा लवकर देणे तसेच आपत्तीनंतर व्यवस्था पूर्वपदावर आणणे या चार संकल्पनावर प्राधान्याने आराखडा आधारित आहे.

आराखडयाची ठळक वैशिष्टये

आपत्ती व्यवस्थापनाच्या अटकाव, उपशमन प्रतिसाद आणि भरपाई या सर्व पैलूंवर या आराखडयात लक्ष पुरविण्यात आले आहे. सरकारची सर्व खाती आणि एजन्सी यामध्ये सुसंवाद साधण्यावर आराखडयात भर देण्यात आला आहे. पंचायत आणि नागरी स्थानिक संस्था स्तराच्या तसेच शासनाच्या सर्व स्तरांची भूमिका आणि जबाबदाऱ्या या आराखडयात निश्चित करण्यात आल्या आहेत. या आराखडयात विभागीय दृष्टीकोन ठेवण्यात आल्यामुळे केवळ आपत्ती व्यवस्थापनासाठीच नव्हे तर विकासात्मक नियोजनासाठीही हा आराखडा उपयुक्त ठरेल.

आपत्ती व्यवस्थापनातल्या सर्व टप्प्यावर प्रमाणबध्द रीतीने अंमलबजावणी करता येईल अशाच पध्दतीने या आराखडयाची रचना करण्यात आली आहे.

आपत्तीचा इशारा लवकर देणे, माहितीचा प्रसार, वैद्यकीय काळजी, इंधन, वाहतूक, शोध आणि बचाव इत्यादी महत्त्वाच्या पैलूंकडेही आराखडयात लक्ष पुरविण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवचिकता तसेच स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी, वसूलीसाठी या आराखडयात चौकट देण्यात आली आहे.

आपत्तीला तोंड देण्यासाठी समाजाला तयार करण्यासाठी या आराखडयात माहिती, शिक्षण आणि दळणवळणाच्या गरजेवर भर देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापनातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

N.Chitale/B.Gokhale