Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रामानुजाचार्य टपाल तिकीट प्रकाशन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

रामानुजाचार्य टपाल तिकीट प्रकाशन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


थोर समाजसुधारक आणि संत  रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त तिकिटाचे प्रकाशन करताना मला आनंद होत आहे. मला ही संधी मिळाली हा माझा सन्मान मानतो.

सर्वसमावेशक समाज,धर्म आणि तत्वज्ञान हा  संत रामानुजाचार्य यांच्या जीवनाचा संदेश आहे. जे काही आहे आणि जे काही असेल ते म्हणजे ईश्वराचा आविष्कार अशी संत रामानुजाचार्य यांची धारणा होती. त्यांना मानवात ईश्वराचा आणि ईश्वरात मानवाचा साक्षात्कार झाला. ईश्वराचे सर्व भक्त समान आहेत असे ते मानत.

जातीभेद आणि उच्च-नीच भेदभाव हा धर्म आणि  समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाने यातले आपले उच्च किंवा नीच स्थान स्वीकारले होते अशा काळात,रामानुजाचार्य यांनी, व्यक्तिगत आयुष्यात आणि  धार्मिक शिकवणीतही त्याविरोधात बंडखोरी केली.

संत रामानुजाचार्य यांनी केवळ उपदेश केला, केवळ मार्ग दाखवला असे नव्हे तर आपल्या जीवनातही त्याचे आचरण केले. मनाने, वाचेने आणि कर्माने स्वीकार करण्याविषयी, आपल्या पुराण शास्त्रात जसे लिहिले आहे त्यानुसार आचरण करून त्यांनी आपले जीवन म्हणजे उपदेश ठरवला.त्यांच्या मनात जे वसत होते,  तेच वदत आणि कर्मही तेच होते. संत रामानुजाचार्य यांचे एक वैशिष्ट्य होते, जेव्हा वाद निर्माण होत असे तेव्हा ते परिस्थिती आणखी बिघडण्यापासून रोखत आणि समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करत. ईश्वराला  जाणून घेण्यासाठीचा द्वैतवाद आणि अद्वैतवाद यापेक्षा वेगळा असा मधला विशिष्टाद्वैत यातलाच  दुवा होता.

समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या प्रत्येक परंपरेच्या विरोधात रामानुजाचार्य होते.अशी व्यवस्था मोडण्यासाठी, ती बदलण्यासाठी ते पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत.

मुक्ती आणि मोक्षाचा मंत्र सर्वासाठी सांगण्याला त्यांना मनाई करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी एक सभा बोलावून, प्रत्येक वर्गातल्या लोकांसमोर त्याचा उच्चार केला. ज्या मंत्रामुळे त्रासातून मुक्ती मिळते तो मंत्र केवळ एकाकडे का राहावा असे त्यांचे म्हणणे होते.ते इतके विशाल अंतःकरणाचे होते. स्वामी विवेकानंदानी संत श्री रामानुजाचार्य यांच्याविषयी म्हटले आहे – शोषण करणे हा कर्माचा भाग आहे असे मानले जात असे त्या काळात शोषितांसाठी आक्रंदन करणारे विशाल हृदय असणारे  संत.

संत रामानुजाचार्य यांनी त्या काळात प्रचलित असणारे वाईट  पूर्वग्रह मोडून काढले. काळाच्या पुढे त्यांचे विचार होते.

एका अर्थाने, संत रामानुजाचार्य म्हणजे सहस्त्रकातले तपस्वी होते, ज्यांनी हजारो वर्षापूर्वी, शोषितांच्या दबलेल्या आशा आकांक्षांचा विचार केला. समाज हितकारी आणि परिपूर्ण बनवण्यासाठी, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत ,दिव्यांगांचा समाजात समावेश करण्याची गरज त्यांनी जाणली होती.

गरिबांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी,दलितांसाठी ते साक्षात ईश्वर बनून आले. एके काळी,तिरुचिरापल्ली मध्ये श्रीरंगम मंदिर प्रशासन एका विशेष जातीकडे होते. म्हणूनच मंदिराची पूर्ण प्रशासकीय व्यवस्थाच त्यांनी बदलली होती. त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना मंदिर प्रशासनात सहभागी केले.महिलांकडे काही जबाबदारी सोपवली गेली. मंदिर म्हणजे त्यांनी नागरिक कल्याण आणि जनसेवा केंद्र बनवले. मंदिरांना त्यांनी गरिबांना भोजन, औषधें, कपडे आणि निवासाची व्यवस्था करणारी एक संस्था बनवले. त्यांचे सुधारणावादी आदर्श आजही, काही मंदिरात रामानुज-कूट म्हणून आढळतात.

त्यांच्या जीवनात अशी असंख्य उदाहरणे आपल्याला आढळतील.जाती व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी त्यांनी अशा व्यक्तीला आपला गुरु केले, ज्या व्यक्तीला समाजाने गुरु बनण्यासाठी योग्य मानले नव्हते.त्यांनी आदिवासींपर्यंत जाऊन जागृती केली, त्यांच्या सामाजिक जीवनात सुधारणा घडवण्यासाठी काम केले.

म्हणूनच प्रत्येक धर्मातल्या,प्रत्येक वर्गातल्या लोकांनी संत रामानुजाचार्य यांच्या संदेशातून प्रेरणा घेतली.मेळकोट मंदिरात भगवंताची आराधना करणारी मुस्लिम राजकुमारी बीबी नचियर याचेच उदाहरण आहे.देशात  मोजक्याच लोकांना हे माहित असेल की हजार वर्षांपूर्वी, दिल्लीच्या सुलतानाची मुलगी बीबी नचियरची मूर्ती,संत रामानुजाचार्य यांनीच मंदिरात स्थापन केली होती. त्या काळी,संत रामानुजाचार्य यांनी सामाजिक समता आणि सद्भावनेचा केवढा मोठा संदेश आपल्या कार्यातून दिला.आजही बीबी नचियरच्या मूर्तीवर श्रद्धेने पुष्प अर्पण केली जातात. बीबी नचियरच्या मूर्तीप्रमाणेच संत रामानुजाचार्य यांचा संदेश आजही तितकाच समर्पक आहे.

संत रामानुजाचार्य यांचे जीवन आणि शिकवणीमुळे,भारतीय समाजाचे   उदार,आणि सहिष्णू  स्वरूप अधिक मजबूत झाले.बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या बहिष्कृत भारत या अंकात 3 जून 1927 ला एक संपादकीय लिहिले होता.90वर्षांपूर्वी लिहिलेला हे संपादकीय वाचल्यानंतर संत रामानुजाचार्य यांच्या प्रेरणादायी जीवनातल्या अनेक गोष्टी मनाला स्पर्शून जातात. बाबासाहेबांनी लिहिले होते,

‘हिंदू धर्मात समतेच्या दिशेने महत्वपुर्ण कार्य आणि समता लागू करण्यासाठी कोणी प्रयत्न केले असतील तर ते संत रामानुजाचार्य यांनी केले. त्यांनी कांचीपूर्ण नावाच्या एका बिगर ब्राम्हण व्यक्तीला आपले गुरु मानले. भोजन घातल्यानंतर रामानुजाचार्य यांच्या पत्नीने घर शुद्ध केले तेव्हा त्यांनी त्याचा विरोध केला.’

दलित गुरु घरी आल्यानंतर आपल्याच घरात शुद्धी करताना पाहून संत श्री रामानुजाचार्य खूप दुःखीही झाले आणि त्यांना खूप रागही आला. ज्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी ते अथक प्रयत्न करत होते त्या कुप्रथा त्यांच्या घरातूनच नष्ट झाल्या नव्हत्या.त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वाहून घेतले.मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, त्यांनी केवळ उपदेश केला नाही तर आपल्या कार्यातून तो उपदेश कृतीत उतरवला. त्या काळच्या समाजाचा जो दृष्टिकोन होता, त्यामध्ये संत श्री रामानुजाचार्य महिला सशक्तीकरणासाठी कसे कार्य करत होते याविषयी बाबासाहेबानी आपल्या अग्रलेखात लिहिले आहे.

त्यांनी लिहिले आहे,

‘तिरुवल्लीमध्ये शास्त्राविषयी एका महिलेसमवेत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी त्या महिलेला सांगितले की,आपण माझ्यापेक्षा खूपच ज्ञानी आहात.त्यानंतर संत श्री रामानुजाचार्य यांनी त्या महिलेची मुर्ती मंदिरात स्थापन केली. त्यांनी धनुर्दास नावाच्या त्या काळातल्या  एका अस्पृश्य व्यक्तीला आपला शिष्य केले. नदीवरून स्नान करून ते याच शिष्याच्या मदतीने परतत असत.’

विनम्रता आणि विद्रोही वृत्ती यांचा अदभूत संगम त्यांच्या ठायी होता.ज्या व्यक्तीचे घर दलित गुरूच्या प्रवेशानंतर शुद्ध करण्यात आले, ती व्यक्ती स्नानानंतर एका दलिताचा आधार घेऊन मंदिरात जात असे.ज्या काळात दलित महिलांना मोकळेपणाने बोलण्याचेही स्वातंत्र्य नव्हते त्या काळात एका दलित महिलेसमोर शास्त्रातल्या चर्चेत हरल्यानंतर, त्यांनी  मंदिरात त्या महिलेची मूर्ती बसवली.

म्हणूनच बाबासाहेब, संत रामानुजाचार्यांमुळे प्रभावित झाले होते. जे लोक बाबासाहेबांना जाणतात ते समजू शकतात की बाबासाहेबांच्या विचारावर आणि जीवनावर संत रामानुजाचार्यांचा किती प्रभाव होता. एक हजार वर्षापर्यंत,वेग वेगळ्या कालखंडात ज्यांचे जीवन प्रेरणादायी ठरले अशा फारच कमी व्यक्ती आहेत असे मला वाटते. संत रामानुजाचार्य यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक हजार वर्षे इतक्या दीर्घ काळात सामाजिक आंदोलने झाली.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, राजस्थान आणि गुजरातमध्ये वल्लभ संप्रदाय, मध्य भारत आणि बंगालमध्ये चैतन्य संप्रदाय आणि आसाममध्ये शंकर देव यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

संत रामानुजाचार्य यांच्या वचनांनी प्रभावित होऊनच गुजराती आदिकवी आणि संत नरसी मेहता यांनी म्हटले आहे,वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे,गरिबांचे दुःख जाणण्याचा हा भाव ही संत श्री रामानुजाचार्य यांचीच देणगी आहे.

या एक हजार वर्षात संत श्री रामानुजाचार्य यांच्या शिकवणीने लाखो करोडो लोकांना सामाजिक एकता, सामाजिक सद्‌भाव आणि सामाजिक दायित्वाची जाणीव करून दिली. कट्टरता आणि कर्मकांडात गुंतून पडणे यालाच धर्म मानणे हा भेकड, अज्ञानी, अंध विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि तर्कहीनांचा रस्ता आहे हे त्यांनी आपल्याला सांगितले.म्हणूनच प्रत्येक व्यक्ती जी जातीभेद,विषमता आणि हिंसेच्या विरोधात उभी राहते ती गुरु नानक होते, कबीर बनते.

काळाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी, मग त्या कितीही प्राचीन असु दे , त्यात सुधारणा करणे ही आपली संस्कृती आहे.म्हणूनच वेळो वेळी आपल्या देशात अशा महान व्यक्ती झाल्या ज्यांनी व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लावून,विष प्राशन करून,धोका पत्करून समाज सुधारणेचे काम केले. शेकडो वर्षांपासून सुरु असलेल्या वाईट प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाज परिवर्तनासाठी, भारताची चेतना जागृत ठेवण्यासाठी  कार्य केले.

संत श्री रामानुजाचार्य यांच्यासारख्या ऋषींनी सुरु केलेल्या  आणि अखंड सुरु असणाऱ्या सामाजिक जागृतीमुळे आपले आचरण, रीती रिवाज, परंपरा काळानुरूप राहिली, आपले विचार काळानुरूप राहिले.

याच कारणास्तव आपला समाज ऊर्ध्वगामी राहिला.याच तत्वामुळे आपली संस्कृती चिरपुरातन असूनही नित्यनूतन राहिली आहे. या महान लोकांनी केलेल्या अमृतमंथनामुळे आपण आज अभिमानाने म्हणू शकतो,

“कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे-जमां हमारा” जगाच्या नकाशावर असणारे मोठे मोठे देश नाहीसे झाले, मात्र आपला भारत, आपला हिंदुस्थान, सबका साथ,सबका विकास हा मंत्र घेऊन आगेकूच करत आहे.

संत श्री रामानुजाचार्य यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अनेक संस्थांनी एकत्र येऊन त्यांची शिकवण त्यांचा संदेश घरा- घरा पर्यंत पोहोचवला.ही शिकवण आणि संदेश देशाच्या वर्तमानाशीही जोडलेला राहील असा मला विश्वास आहे

समाजातल्या गरीबांच्या गरजा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड संत रामानुजाचार्य यांनी घातली याची आपणा सर्वाना माहिती आहेच. उदाहरणार्थ,त्यांनी मेळकोटजवळ थोंडनूर इथे 200 एकर जमिनीवर कृत्रिम तळे निर्माण करून घेतले. संत रामानुजाचार्य यांच्या जनकल्याणाच्या कामाची साक्ष हा तलाव आजही देतो. अद्यापही हा तलाव 70 खेड्यांची तहान आणि सिंचन   गरज  भागवत आहे.

आजच्या काळात सगळीकडे पाण्याबाबत   चिंता आहे, तेव्हा एक हजार वर्षांपूर्वी तयार केलेला हा तलाव, जलसंरक्षण आवश्यक का आहे याची महती पटवतो.एक हजार वर्षात अनेक पिढयांना या तलावाचा आशीर्वाद मिळाला  आहे, जीवन मिळाले आहे. जलसंरक्षणाविषयी आपण आज जे काम करतो त्याचा फायदा येत्या शेकडो वर्षापर्यंत लोकांना मिळत राहतो.म्हणूनच आज नद्या स्वच्छता, तलाव सफाई,लाखो तलाव खोदणे,हा वर्तमानाबरोबरच भविष्याच्या दृष्टीने तयारीचा भाग आहे.

या तलावाबाबत चर्चा करताना मी आपणा सर्वाना आवाहन करतो की संत रामानुजाचार्य यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचवताना, जलसंरक्षणाबाबत आजच्या काळात काय करता येईल याविषयी लोकांना जागृत करा.

इथे जमलेल्या विविध संस्थांच्या नेत्यांनाही मी आवाहन करतो. 2022 मध्ये  भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत, आपल्या विकासाच्या मार्गात येणाऱ्या  कमकुवत बाजू आणि अडथळे दूर करण्यासाठी आपण काम करत असताना, तुम्हीही स्वतःसाठी आवाक्यात असणारे उद्दिष्ट ठरवा.

तुम्ही निश्चय करू शकता की दहा हजार गावांपर्यंत जाऊ, 50000 गावांपर्यंत जाऊ. संत रामानुजाचार्य यांच्या राष्ट्र्धर्म जागृत करणाऱ्या शिकवणीबरोबरच सध्याची आव्हाने लक्षात घेऊन मानव कल्याण, महिला कल्याण, गरीब कल्याणाविषयी लोकांना आणखी सक्रिय करण्याचे आव्हान मी करतो.

याबरोबरच मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण मला संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्याची संधी दिली.

आपणा सर्वाना अनेक अनेक धन्यवाद.

 

 

B.Gokhale/N.Chitale/Anagha