Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेत चार सदस्यांच्या निरोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

 

“या सभागृहाची प्रतिष्ठा उंचावणारे, सभागृहात चेतना आणणारे आणि या सभागृहाच्या माध्यमातून लोकांच्या सेवेत वाहून घेणारे आमचे चार सहकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नव्या कार्याच्या दिशेने पावले टाकत आहेत.

श्रीयुत गुलाम नबी आजाद, महोदय, श्रीयुत समशेर सिंग महोदय, मीर मोहम्मद आणि नझीर अहमद  महोदय, मी तुम्हा चारही मान्यवरांना या सभागृहाची प्रतिष्ठा उंचावल्याबद्दल, तुमच्या अनुभवांचा, तुमच्या ज्ञानाचा सभागृहाला आणि देशाला फायदा करून दिल्याबद्दल आणि आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही जे काही योगदान दिले आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो.

मीर मोहम्मद महोदय आणि नाझिर अहमद महोदय हे दोन असे सहकारी आहेत, कदाचित सभागृहात फार कमी लोकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले असेल, पण एकही अधिवेशन असे झाले नसेल ज्यावेळी माझ्या कक्षात बसून ज्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्याची, हे विषय समजून घेण्याची संधी मला मिळाली नसेल. अगदी काश्मीरविषयीचे बारकावे, जेव्हा कधी मी त्यांच्यासोबत बैठकीत चर्चा करायचो, कधी कधी ते आपल्या कुटुंबासोबतही येत होते, माझ्यासमोर इतके विविध पैलू मांडायचे त्यामुळे माझ्यात देखील उत्साह निर्माण होत असे. तर माझे हे दोन सहकारी ज्यांचे माझ्याशी वैयक्तिक स्वरुपात घनिष्ठ संबंध होते आणि जी माहिती मला ते देत राहायचे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मला खात्री आहे की त्यांची बांधिलकी आणि त्यांची क्षमता या दोन्हींचा देशाला आणि विशेषतः जम्मू काश्मीरला खूपच फायदा होईल. देशाची एकता, देशाची सुख-शांती, वैभव वाढवण्यासाठी तिचा उपयोग होईल, असा मला विश्वास आहे.  

आमचे एक सहकारी समशेर सिंग महोदय, आता तर हे देखील आठवत नाही किती वर्षांपासून मी त्यांच्या सोबत काम केले आहे कारण मी संघाच्या विश्वातील देखील व्यक्ती आहे. याच क्षेत्रात मी काम करत होतो. अनेक वर्षे जम्मू- काश्मीरमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी माझे सहकारी कार्यकर्ता म्हणून कधी कधी एका स्कूटरवरून प्रवास करण्याची संधी देखील मिळायची. अगदी तरुण वयात आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला त्यांच्यात समशेर सिंग देखील होते आणि या सभागृहात समशेर सिंग यांची उपस्थिती आहे 96 टक्के. ही बाब खरोखरच ….. म्हणजे जी जबाबदारी जनेतेने त्यांच्यावर सोपवली ती पूर्णपणे पार पाडण्याचा हा प्रयत्न आहे. ते अतिशय मितभाषी आहेत, सरळ आहेत आणि मला खात्री आहे की जम्मू-काश्मीर मधून निवृत्त होणाऱ्या चारही आदरणीय सदस्यांसाठी त्यांच्या जीवनातील कार्यकाळापैकी हा सर्वोत्तम कार्यकाळ आहे कारण इतिहासाने आता नवी कूस बदलली आहे आणि ज्याचे ते साक्षीदार आहेत, सहप्रवासी आहेत, त्यांच्या आयुष्यातील ही खूप मोठी घटना आहे.

श्रीयुत गुलाम नबी महोदय, मला आता ही चिंता आहे की गुलाम नबी महोदयांच्यानंतर हे पद जी व्यक्ती सांभाळेल, त्यांना गुलाम नबी यांच्यासारखे बनण्यासाठी खूपच कष्ट पडतील. कारण गुलाम नबी महोदय आपल्या पक्षाची काळजी करत होतेच, पण त्याचवेळी देश आणि सभागृहाची देखील तितकीच काळजी त्यांना होती. ही साधी गोष्ट नाही अतिशय मोठी गोष्ट आहे. नाहीतर विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचा दबदबा निर्माण करणे, या सर्वांचा मोह कोणालाही होऊ शकतो. पण त्यांनी सभागृहात…… मी शरद पवार महोदयांना देखील याच श्रेणीत समाविष्ट करेन.  ते सभागृहाच्या आणि देशाच्या काळजीला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत… गुलाम नबी महोदयांनी अतिशय कुशलतेने हे काम केले आहे.

मला असे आठवते की सध्याच्या कोरोना काळात मी सदनातील नेत्यांच्या बैठकीत होतो, त्याच दिवशी गुलाम नबी महोदयांचा फोन आला- मोदीजी हे करत आहात ते तर ठीक आहे पण एक काम करा, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक नक्की बोलवा, अशी सूचना त्यांनी केली. मला खरोखरच खूप बरे वाटले की त्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत सर्व पक्षांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करण्याची मला शिफारस केली आणि त्यांच्या सूचनेनुसार मी ती बैठक देखील बोलावली. गुलाम नबी यांच्या सूचनेवरून मी ती बैठक आयोजित केली होती आणि हे सांगताना मला….  म्हणजेच या प्रकारचा संपर्क आणि याचे मूळ कारण आहे त्यांचा दोन्ही बाजूंचा असलेला अनुभव, त्यांना सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा देखील अनुभव होता. 28 वर्षांची कारकीर्द म्हणजे खरोखरच ही एक मोठी गोष्ट आहे.

खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, कदाचित अटलजींचे सरकार असेल, मला नक्की आठवत नाही, मी या सभागृहात कोणत्या तरी कामानिमित्त आलो होतो. त्यावेळी तर मी राजकारणात देखील नव्हतो, म्हणजे या निर्वाचित राजकारणात नव्हतो. मी संघासाठी काम करायचो. तर मी आणि गुलाम नबी असेच लॉबीमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि पत्रकारांचा जसा स्वभाव असतो तर ते अगदी टक लावून पाहात होते की दोघांचे विचार कसे काय जुळतील. आम्ही अगदी हास्यविनोद करत आनंदाने गप्पा मारत होतो. तर आम्ही जसे बाहेर निघालो तेव्हा पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी गुलाम नबी यांनी अतिशय सुंदर उत्तर दिले. ते उत्तर आपल्याला उपयोगी पडणार आहे. ते म्हणाले बघा तुम्ही आम्हाला वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्ही माध्यमांमध्ये किंवा सार्वजनिक सभांमध्ये एकमेकांच्या विरोधात बोलताना, वाद करताना पाहाता. पण प्रत्यक्षात या छताच्या खाली आमच्यामध्ये एका कुटुंबासारखे जे वातावरण असते ते कुठेच असत नाही. आमच्यामध्ये इतका जिव्हाळा असतो. इतकी सुख-दुःख असतात. ही जी भावना आहे ती भावनाच प्रत्यक्षात अतिशय मोठी गोष्ट आहे.

गुलाम नबी महोदयांना असलेला एक छंद कदाचित खूपच कमी लोकांना माहीत असेल आणि तुम्ही कधी त्यांच्या सोबत बसलात तर ते सांगतील. आम्ही सरकारी बंगल्यात राहातो त्यावेळी बंगल्याच्या भिंती, आपला सोफा सेट यांच्याच भोवती आपले विचार फिरत असतात. पण गुलाम नबी यांनी त्यांच्या बंगल्यात जो बगीचा तयार केला आहे तो असा आहे की एका प्रकारे तो काश्मीरच्या खोऱ्याची आठवण करून देईल. त्याचा त्यांना अभिमान देखील आहे. त्यासाठी ते वेळ देतात, नव्या नव्या गोष्टींची भर घालत राहातात आणि जेव्हा कधी स्पर्धा असते तेव्हा त्यांचा बंगला अव्वल क्रमांक पटकावतो. म्हणजेच आपल्या सरकारी जागेची देखील किती प्रेमाने काळजी घेतली आहे, म्हणजेच अगदी मनापासून त्यांनी त्याची देखभाल केली आहे.

तुम्ही जेव्हा मुख्यमत्री होता, तेव्हा मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. त्या काळात आमच्या दोघांमध्ये अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्या काळात आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद किंवा संपर्क झाला नाही, असे क्वचितच घडले असेल. एकदा गुजरातचे प्रवासी काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये गुजरातच्या पर्यटकांची संख्या जास्त असायची आणि त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बहुधा सुमारे आठ जण मारले गेले होते. त्यावेळी सर्वात पहिला फोन मला गुलाम नबी यांचा आला आणि हा फोन झालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी नव्हता. फोनवर बोलताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षणमंत्री होते. त्यांना मी फोन केला आणि सांगितले की साहेब  मृतदेह आणण्यासाठी संरक्षण दलाचे विमान उपलब्ध होऊ शकेल का? त्यावेळी खूप रात्र झाली होती. मुखर्जी साहेबांनी सांगितले की तुम्ही चिंता करू नका मी व्यवस्था करतो. पण रात्री मला गुलाम नबी यांचा फोन आलात्यावेळी ते विमानतळावर होते. त्या रात्री विमानतळावरून त्यांनी मला फोन केला आणि जशी आपल्या कुटुंबातील सदस्यांची आपल्याला चिंता असते तशी त्यांची चिंता….

पद, सत्ता जीवनात येत राहातात पण त्यांचा वापर कसा होतो…. माझ्यासाठी तो अतिशय भावुक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला की सर्व लोक लोक पोहोचले? म्हणूनच एका मित्राच्या रुपात मला गुलाम नबी यांच्याविषयी या घटना आणि अनुभवांच्या आधारे अतिशय आदर वाटतो आणि त्यांचा साधेपणा, त्यांचा नम्रपणा, या देशासाठी काही तरी करण्याची इच्छा, त्यांना कधीही शांत बसू देणार नाही याची मला खात्री आहे आणि अशी कोणतीही जबाबदारी, अशा कोणत्याही ठिकाणी त्यांनी  स्वीकारली तर त्यामध्ये ते नक्कीच मूल्यवर्धन करतील, त्यामध्ये योगदान देतील आणि देशाला त्याचा लाभ मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे, मला याची खात्री आहे. मी पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या सेवांबद्दल त्यांचे आदरपूर्वक आभार मानतो. आणि वैयक्तिक स्वरुपात माझे त्यांना आग्रहाचे सांगणे आहे की तुम्ही असे मनात आणू नका की तुम्ही आता या सभागृहात नाही आहात. तुमच्यासाठी माझे दरवाजे नेहमीच खुले आहेत. या चारही मान्यवर सदस्यांसाठी खुले आहेत. तुमचे विचार, तुमच्या सूचना देशासाठी अतिशय आवश्यक आहेत. या अनुभवाचा खूप उपयोग होतो. मला तो होत राहील, अशी माझी अपेक्षा आहे. मी तरी तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद.

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com