राष्ट्रपती भवनात आजपासून सुरु झालेल्या राज्यपालांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सर्व राज्यपाल महत्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवून राज्यपाल बदलासाठी काम करु शकतात, असे ते म्हणाले. 2022 पर्यंत नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ही जनचळवळ बनवायला हवी, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
यासाठी राज्यपालांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधावा, अशी सूचना पंतप्रधानांनी राज्यपालांना केली. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विविध समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना सुचवल्या, असे सांगत विद्यापीठांमधून नवनवीन संशोधन बाहेर यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्याचप्रकारे प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक युवकांना खेळावर भर दयायला हवा, असेही ते म्हणाले. स्वच्छता अभियान राबविण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, असे मोदी म्हणाले. 2019 साली महात्मा गांधीची 150 वी जयंती साजरी होणार आहे, तोपर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
देशातील विविध सण-उत्सव आणि महान व्यक्तींच्या जयंत्या अतिशय प्रेरणादायी असतात, यातून सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी मिळते. मुद्रा योजनेंतर्गंत आदिवासी, दलित आणि महिलांना अधिकाधिक कर्ज मिळावे यासाठी राज्यपालांनी बँकांना प्रोत्साहन द्यावे असे मोदी यांनी सांगितले. विशेषत: 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत वंचितांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्रशासित प्रदेशातल्या नायब राज्यपालांनी सौर ऊर्जा, थेट लाभ हस्तांतरण आणि केंद्रशासित प्रदेश केरोसिनमुक्त करणे असे उपक्रम राबविण्यासाठी केलेले प्रयत्न इतरांनाही सांगावेत, असे पंतप्रधान म्हणाले. सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/R.Aghor/Anagha
Joined the Conference of Governors at Rashtrapati Bhavan. Here are the highlights of my remarks. https://t.co/hp8J1y3pok
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2017